नर्मदे .......हर हर


नर्मदेची परिक्रमा असल्याने नर्मदा ही संतत सोबत असतेच. तिच्या शिवाय काहीच घडत नाही, ह्या परिसरात नर्मदेला 'मैय्या' म्हणतात. दोन व्यक्ती जेव्हा ऐकमेकांना भेटतात तेव्हा 'नर्मदे हर' म्हणून साद घालतात, नमस्कार करतात. ही परिक्रमा कोणी करावी ह्यावर कोणतेही बंधन नाही, कोणत्याही वयातले स्त्रीपुरूष ती करू शकतात. किती वेगळी आहे ही परिक्रमा ? कुंटेच्या शब्दातच लिहितो.

भारतीय संस्कृतीत, विशेषत: हिंदु परंपरेत नदीला माता म्हटले जाते. नदीच्या आधारेच जीवन जगणे हा एक शतकानुशतके चालत आलेला जीवनक्रम आपण आजही ऐकून आहोत.

माते नर्मदे ह्या नावाने दत्तप्रसाद दाभोळकरांनी आधुनिक दृष्टीकोनातून, वैज्ञानिक तत्वांच्या आधारे नदी व पाणी संभाळण्याची रीत कशी असली पाहिजे, ह्याबद्दल अतिशय परखड व तत्वशुध्द विश्लेषण केले त्याबद्दल आपण ह्याच मालिकेत परिचय करून घेतला आहे, तो स्मरत असेलच. 'पुनश्च माते नर्मदे ' हे त्याच लेखकाचे त्याच मालिकेतले दुसरे पुस्तक. तेही तसेच सुंदर, वाचनीय व संस्मरणीय आहे. मुद्दाम मिळवावे व संग्रही ठेवावे असे आहे.

मात्र हिंदु तत्वज्ञानानुसार नदीला अध्यात्मिक महत्व आहे. आजच्या वैज्ञानिक युगातही ते संपलेले नाही. गंगेत अंघोळ करणे, नदीची ठराविक दिवशी पूजा करणे, वगैरे अनेक गोष्टींचा उल्लेखही करता येईल. जिथपर्यंत आजच्या आधुनिक सुखसुविधांचा कवडसाही पोहोचला नाही अशा वन क्षेत्रात, आदिवासी बुहल भागात आजच्या एकविसाव्या शकतकातही पूर्ण जीवन हे नदीच्या आधारेच असते. हे फक्त ऐकूनच माहीत असते. नर्मदा ही भारताच्या मध्यभागातून पश्चिमेकडे वाहणारी नदी. मध्यप्रदेश, महाराष्ट्राचा काही सीमावर्ती भाग आणि गुजराथेतून वहाणारी. तिला संपूर्ण पायी प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत पुण्याचे काम समजले जाते. जिची अशी परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा केली जाते की नर्मदा ही एकमेव नदी आहे.

जगन्नाथ कुंटे हे पुण्याला रहाणारे गृहस्थ, तसे अध्यात्तमी वृत्तीचे, त्यांनी ती परिक्रमा केली, तीन वेळा. त्यातले सगळे अनुभव त्यांनी लिहून काढले. नर्मदे हर हर हेच ते पुस्तक. एका अगदी वेगळ्या, आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा जीवनाचा परिचय करून देणारे.

नर्मदेची परिक्रमा असल्याने नर्मदा ही संतत सोबत असतेच. तिच्या शिवाय काहीच घडत नाही, ह्या परिसरात नर्मदेला 'मैय्या' म्हणतात. दोन व्यक्ती जेव्हा ऐकमेकांना भेटतात तेव्हा 'नर्मदे हर' म्हणून साद घालतात, नमस्कार करतात. ही परिक्रमा कोणी करावी ह्यावर कोणतेही बंधन नाही, कोणत्याही वयातले स्त्रीपुरूष ती करू शकतात. किती वेगळी आहे ही परिक्रमा ? कुंटेच्या शब्दातच लिहितो.

परिक्रमेत आस्वाद भोजन घ्यावे असा नियम आहे. म्हणजे चविष्ट भोजन बनवू नये, पण जिथे जे तयार भोजन मिळते ते खाणेच योग्य. परिक्रमेत देहाला कष्ट होतात, मान अपमान होतो, भिक्षा मागावी लागते, ह्या गोष्टींमुळे अहं म्हणजे मी पणा नष्ट व्हायला मदत होते. सामान लुटण्याच्या परंपरेमुळे आसक्ती कमी व्हायला मदत होते. अडचणी येतात, संकटे येतात पण नर्मदामैय्या त्यांचे निवारण करते अशी जी श्रध्दा आहे ती अधिकच दृढ होत जाते. परिक्रमेत, कुठेही जंगलात, एकांत रस्त्यावर, खेडेगावात कुणाचेही भय नाही, सर्वत्र बहुधा आदरच मिळतो.

परिक्रमेचे काही नियम आहेत, परिक्रमावासियाने ह्या काळात कुठेही खुर्चीवर, खाटेवर किंवा कॉटवर बसू नये, जमिनीवरच बसावे. रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा स्नान करावे, नर्मदेची आरती करावी. ज्यादिवशी नर्मदा दूर असेल व स्नानास जाता येणे शक्य नसेल तेव्हा जवळच्या बाटलीतल्या पाण्याचा वापर करावा. शक्यतो पांढरी वस्त्रे वापरावीत.

चातुर्मास संपल्यावर परिक्रमा सुरू करतात व सुरू होण्यापूर्वी संपवितात तशी ती संपली नाही तर चार महिने एकाच जागी थांबून अनुष्ठान करतात. तो संपताच पुन्हा परिक्रमा पुढे सुरू करतात. रोज पाच किलोमीटर चालले तर तीन वर्षे, तीन महिने तेरा दिवसात ही पूर्ण होते. वीस पंचवीस कि.मी चालले तर सुमारे पाच महिन्यातच पूर्ण करता येते.

नर्मदेचा उगम अमरकंटकला. तिथून नर्मदा उजव्या हाताकडे म्हणजेच उजव्या दिशेला ठेवून ही परिक्रमा सुरू करतात. मात्र ओंकारेश्वर, नारेश्वर, गरूडेश्वर तसेच नेमावर आणि ग्वारीघाट इथूनही सुरू करण्याचा प्रघात आहे. संपूर्ण परिक्रमेत एकदाही नर्मदा ओलांडावयाची नाही, पुलावरूनही एका तीरावरून दुसरीकडे जावयाचे नाही असा नियम आहे. अनेक इतरही रूढ संकेतांचे नियम आहेत पण ते इथे लिहित बसणे फारसे प्रस्तुत नाही.

मात्र ह्या निमित्ताने काही गमतीदार पध्दती कळतात. या किंवा बसा ह्यासाठी 'आसन लगाओ' असा शब्द प्रयोग होतो 'राम' हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. उदाहरणार्थ नीरू म्हणजे रामरस, जेवणातले पदार्थ म्हणजे सब्जीराम, चपातीराम इत्यादी. कुठल्याही वयाच्या स्त्रीला माताराम म्हणतात.

जगन्नाथ कुंटे हे मुळातच तसे मनस्वी. अध्यात्मिक वृत्तीचे, योग, प्राणायम, समाधी वगैरे नित्यक्रमात आचारणारे, त्यात रमणारे, संसार, पैसा अडका वगैरे गोष्टीत फारसा रस नसणारे. प्रारब्धावर विश्वास ठेवणारे, आपण सर्वसामान्य जीवन जगणाऱ्यांपेक्षा कुणीतरी वेगळे आहोत ही जाणीव असणारे व ती जपणारे. त्यामुळे मित्रमंडळी देखील त्यांना स्वामी अगर महाराज म्हणत. पत्नी जानकीनेही ते ओळखले. त्यांना बंधनात अडकविले नाही. पंखात बळ असेल तो पर्यंत भराऱ्या मारू द्या, हिंडू द्या, मग घरटे आहेच. म्हणून त्यांना मुक्तपणे हिंडायला व जगायला फारसा अटकाव केला नाही. त्यातूनच त्यांचे हातून ही परिक्रमा घडली.

आपण सगळेच आपापल्या भावविश्वात रमणारी माणसे. कुंटेनी लिहून ठेवली तशी परिक्रमा करणे फारच अवघड. त्यामुळे त्यांच्या नजरेने त्यांनी जे बघितले ते वाचले तरी एक वेगळेच विश्व नजरेसमोर अवतरते. तरीही कुंटे म्हणतातच - खरा अनुभव घ्या, आपणही परिक्रमा करा, त्यासारखा आनंद नाही. ते नर्मदामैय्याचे रंग, तरंग, ती कृपा अनुभवा.

अर्थात ही कथा नर्मदा परिभ्रमणाची असली तरी नर्मदेच्या परिसरातले मानवी नमुन्यांच्या दर्शनामुळे ती खऱ्या अर्थाने भ्रमणाची यशस्वी गाथा आहे असे जाणवते. कुंटेचे निरीक्षण दांडगे, बारीक बारीक तपशीलही त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. रोजच्या दैनंदिन अन्नपाण्याच्या गरजा कुठे कुठे कशा कशा रीतीने पूर्ण होत गेल्या ह्या बद्दल त्यांनी जी वेगवेगळी निरीक्षणे नोंदवली आहेत, ती ह्या पैशाच्या मोहमयी दुनियेत वावरतांना केवळ अविश्वसनीय वाटतात. असेही जग असू शकते ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. कुंटे अधूनमधून एखादे टीकात्मक वाक्य लिहून जातात तेव्हा एका वाक्यामागचे त्यांचे चिंतन झरकन नजरेसमोर उभे रहाते.

ह्याच अर्थाने कुंटेंची ही कलाकृती एक जलसाहित्य म्हणून विचारात घ्यावी लागली. शेवटी साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा. ह्या आरशातली नर्मदा परिक्रमातली काही विलोभनीय दृश्ये समोर ठेवतो.

कुंटे म्हणतात, इतके दिवस सातत्याने रोज चालायचे असल्याने, कमीतकमी सामान बरोबर असणेच योग्य. एखादा लोटा, थाळी, दोन कपडे, एखादे अंथरूण, पांघरूण एवढेच, पण तेही नसले तर कुठे बिघडते. शूलपाणेश्वरच्या जंगलात नेहमी लुटालूट होते तिथे लुटारू मंडळी जवळचे सर्व काढून घेतात. कुटेंजवळ फक्त लंगोटी उरली. ते म्हणतात - बरे झाले, तेवढाच वस्तुंचा मोह कमी झाला. समजा लंगोटीही नसती उरली तर ? तर काय ? हा देहही निसर्गच. त्याबद्दलचा जास्त विचार कशाला ? ममता कशाला ? आपण मध्यमवर्गीय मंडळी तशी वृत्तीने भिडस्त. कुणाला काही मागायचे म्हणजे प्रतिष्ठा आड येते. इतरांना काय वाटेल हा विचार प्रकर्षाने पुढे येतो. अशावेळी ही परिक्रमा फार वेगळे शिकवून जाते.

बिनदुधाचा काळा चहा... चालेल गुळाचा चालेल... चहा ऐवजी दही म्हणजे ताक फारच छान, भाकरी, पोळी , भात जे मिळेल ते पक्कवान्न. परिक्रमा करणाऱ्यांना मैय्याचे नातलग मानतात. नर्मदा तीरावरची अत्यंत दारिद्र्यात जगणारी आदिवासी मंडळी त्यांना खाऊ पिऊ घालतात. मोठ्या प्रेमाने निरपेक्ष वृत्तीने. त्यांना आपापल्या कुवतीनुसार मान सन्मान करतात, वस्त्रे, दक्षिणा देतात. हे परिक्रमावासी देखील आपल्या अत्यंत गरजेएवढ्याच वस्तु जवळ ठेवून बाकीच्या इतरांना वाटून टाकतात. सगळेच आश्चर्य.

कुंटे आपली साधना, ठिकठिकाणच्या देवस्थानातील बरे वाईट अनुभव, मान अपमान, स्तुती व कौतुकाबरोबरच शिव्याशाप ह्या सगळ्याबद्दल अगदी तटस्थपणे लिहीतात, कोणताही अभिनिवेश न बाळगता.

एकदा एका मंदीरात प्रसाद म्हणून सहा रोट्या दिल्या. आपली भूक कमी म्हणून त्यांनी चार आधीच बाजूला काढून ठेवल्या. त्याचा राग आल्यामुळे महंताने पानावरून उठवून हकलून दिले. काही मठाधिपती वा संस्थानाधिपती बनून श्रीमंत झालेल्या साधू संन्याशांची ही तामसीवृत्ती माणसाच्या मनाचे पापुद्रे कसे विविध रूपात असतात हे दर्शवित रहाते.

कुठे मंदिरे, वस्तीस्थाने, त्यांची रचना, रस्ते, आजूबाजूचा निसर्ग ह्याचा उल्लेख करीत करीतच जातात. मात्र तरीही फार तपशीलात शिरत नाहीत. नदीकाठचा एखादा पार, एखादी विहीरीजवळची शेतावरची जागा, एखादे मोठे झाड, एखाद्या मारूतीचा पार अशा उघड्या आकाशाखालच्या जागा हेच त्यांचे आवडते वस्तीस्थाने. ह्या साधुसंन्याशांच्या भांग, गांजा ह्या व्यसनांबद्दल लिहितांनाच आपण स्वत: सिगरेट ओढतो हे ही प्रामाणिकपणे कबूल करतात. त्याचबरोबर शूळपाणेश्वरच्या जंगलात आपली तंबाखूची पुडी दरोडेखोरांकडून परत मागणाऱ्या परिक्रमा करणाऱ्याला तो दरोडेखोर एक मुस्काटीत कशी ठेवून देतो आणि 'तंबाखू नही खाएगा तो मर जाएगा क्या साले' म्हणून कसा उपदेश करतो तो भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

मुळात नर्मदा परिक्रमा म्हणजे पुण्य जोडण्यासाठी केलेली तीर्थयात्रा ही सार्वजनिक भावना. लोक श्रध्देने येतात, दान करतात, पुण्य कमवतात. मग ते दाम घेणारेही येतात, मागून घेणारे येतात, हिसकावून घेणारे येतात, पुण्याचा व्यापार करणारे येतात. पुण्याचे दलाल भेटतात. इथेही असेच.... असा प्रश्न आपल्यासारख्यांच्या मनात उद्भवतो. संन्याशांबरोबर ढोंगी साधू भेटतात. संतापीपणा म्हणजेच आपले मोठेपण मानणारे बोके संन्याशी भेटतात. लांबवरच्या काठावरचा दूरचा दिवा दाखवून तीच नर्मदामैय्या म्हणून दाखविणारे नावाडी भेटतात.

मात्र सामान्य माणूस हा त्यापेक्षा कितीतरी वेगळा असतो. तो अनेकदा समोर येतो. स्वत:च्या दोन भाकरीतली एक देणारी वृध्दा भेटते. आता आम्ही मुसलमान आहोत हे आधी सांगून, शिधा देऊ इच्छिणारी गृहिणी भेटते. आपण ढोर, मांग आहोत हे आधीच सांगणारे कसे प्रेमाने आदरातिथ्य करतात त्याचीही उदाहरणे समोर येतात. कुंटेंचे निरीक्षण आपल्यालाही मान्य करावे लागते. हा दरिद्री समाज मनाने अत्यंत श्रीमंत आहे. त्यांचे उध्दरासाठी शासनाने अनेक योजना कागदावर आखल्या आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. वर्षानुवर्षे तशीच उलटत रहातात. मैय्याने ठेवले आहे तसेच रहातो. तिची कृपा म्हणून माणसे समाधानाने, तृप्ततेत जगतात.

ह्या परिक्रमेत चहा पाजणारे टपरीवाले भेटतात, बागायतीदार शेतकरी भेटतात, अनेक गावांमध्ये वस्तीला असणारी, सहजपणे तिथल्या समाजजीवनात विरघळून गेलेली मराठी मंडळी भेटतात. आपापले जीवन हे परमेश्वराने नेमून दिलेले विहीतकार्य म्हणून समजून सहजपणे कसे जगतात हेही सहजपणे दिसते.

हिंदुधर्माचे परंपरेत चमत्कार, साक्षात्कार ह्यांना फार मोठे स्थान मिळालेले आहे. अर्थात अन्य धर्मीय त्यापासून फार वेगळे आहेत असे नाही. कुंटे म्हणतात - अशा परिक्रमेत वावरतांना लोकांच्या जवळ जातांना कळते, आपण मानतो तो देव तसा नाहीच. हिंदुंचा देव, मुसलमानांचा देव, ख्रिस्तांचा देव असे त्याचे वेगवेगळे तुकडे कसे असतील ? तो एकच असला पाहिजे आणि तो तसा असेल तर आपण समजतो तसे कोणतेच काम तो करीत नाही.

मात्र तरीही ते काही चमत्कार नोंदवितातच. एक दिवस त्यांना व त्यांच्याबरोबर परिक्रमा करणारा त्यांचा शिष्यवत सहकारी कुंतल ह्याला मोतीचुराचे लाडू खाण्याची इच्छा झाली. ऐन जंगलात, एका साधूने त्यांची टिंगलही केली. जा जवळच्या गावात भीक मागा नाहीतर उपाशी मराल, असे धमकावलेही. मात्र नदीपारहून एक मध्यमवयीन स्त्री नदी ओलांडून आली, तिने एक परडी दिली, त्यात मोतीचुराचे लाडू होते.

सातपुडा, विंध्यपर्वत ह्या भागात डोंगरात अश्वत्थामा रहातो. सात चिरंजीवांपैकी तो एक. काही मंडळींना तो दिसतो. कुंटेंना तो भेटला असे त्यांनी लिहून ठेवले आहे.

वारा, उन्ह, पाऊस, थंडी, पायाखालची चटके देणारी वाळू, ढोपरभर पाय रूतत जातील असा चिखल, काटे, दगड, गोटे, खळगे ह्या सगळ्यातून जात जात पुरी करावी लागते ही परिक्रमा. एक कठीण व खडतर प्रवास. जवळ खिसाच नाही तर त्यात पैसे असणार कुठले ? इंदूरहून पुण्याला परततांना परिक्रमा संपल्यावर परतीच्या प्रवासात, तिकीटासाठी पुरेसे पैसे नव्हते. पुण्याला उतरल्यावर पैसे देईन असे कंडक्टरला सांगितले, तोही सज्जन, त्याने कबुल केले. मग रिक्षाने मित्राकडे जावून, त्याच्याकडून पैसे घेऊन ते कंडक्टरला नेवून दिले. तोपर्यंत तोही अस्वस्थ. मनातल्या शंका त्याचे ओठावर. शिव्या देऊन मोकळा झालेला, पैसे मिळताच त्याने मोकळ्या मनाने माफी मागितली.

भाषा वेगवेगळ्या असल्या तरीही धर्म ही सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट आहे, शतकानुशतके टिकून आहे, त्यामुळे बंगाली, गुजराथी, शीख, मराठी हा भेदभाव उरत नाही. जो येतो तो नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी आलेला भक्त असतो. मात्र तो येतो ते स्वत:चे वैशिष्ट्य घेऊनच. त्यामुळे प्रांताप्रांतातल्या पध्दतींचे, खाद्यपदार्थांचे, रीतीरिवाजांचे एक सुरेख दर्शन त्या परिक्रमेतून कुंटे घडवितात.

चमत्काराशिवाय नमस्कार नसतोच. एका गावात दोन वर्षे पाऊस नाही, दुष्काळ. कुंटेंनी विचारले - बाबाजी, पाऊस नाही, ते सहज उत्तरले - पडेल, भरपूर पडेल, आणि पाऊस सुरू झाला. अगदी हिंदी सिनेमातला प्रसंग वाटावा अशी ही सत्यकथा. लागोपाठ दोन दिवस तीन खेड्यांमध्ये घडलेली. कुंटे त्या गावकऱ्यांचे दृष्टीने कुंटे हे महान साधक ठरले, हिरो ठरले. पण आपण तसे नाही हे स्वत:ची वृत्ती स्वत:शी जपत त्यातून त्यांनी स्वत:ला बाहेर काढले.

समाधी लावणे, दोन दोन, तीन तीन तास त्या समाधीत स्वत:ला विरघळून टाकणे, ओंकाराचा नादघोष इत्यादी बाबींमुळे लोकांमध्ये एक वेगळाच आदर निर्माण होत असला तरी कुंटे स्वत:ला त्यापासून अलिप्त ठेवू शकतात ते स्वत:च्या विवेकी वृत्तीमुळेच. त्यामुळेच काठावर बसून, लोट्याने अंगावर पाणी घेऊन अंघोळ करणाऱ्या कुंटेंची टवाळी करणारा एक संन्यासी पाण्यात कसा उतरला आणि माश्यांनी त्याला कसे गिळले हे लिहितांना तो पाण्यावरचा त्यांनी लिहिलेला लाल तरंग हा आपल्याही नजरेसमोरून जात नाही.

त्यामुळेच कुंटे म्हणतात - त्यात सत्य जाणवत रहाते. हा समाज आहे, इथे तुकाराम महाराज आहेत तसे मंबाजीही आहेत. तुकाराम कोण अन् मंबाजी कोण हे ओळखणे काही वेळा कठीण जाते. पण शेवटी असली नकली हे ओळखता येतेच. केवळ एखादा चमत्कार घडला तर कोणी महात्मा ठरत नाही. आपल्या बुध्दीच्या कक्षेच्या बाहेर अनेक गोष्टी घडत असतात. त्यांचा कार्यकारण भाव समजत नाही पण तरीही त्या नाकारताही येत नाहीत. त्यालाच काही वेळा प्रचिती म्हटले जाते. साधू ओळखणे तसे कठीणच. पण थोडा वरचा शेंदूर खरवडला की असली नकली हे ओळखता येतेच.

देवबीव सब झूट म्हणणारे व परिक्रमेची परीक्षा घेणारेही त्यांना भेटले. त्यांचे कसे मत परिवर्तन झाले हे कबूल करणारेही भेटले. हे असे कसे घडले व का घडले म्हणून हैराण झालेलेही भेटले. उच्चशिक्षित ते अडाणी आणि करोडपती ते कंगाल अशी अनंत तऱ्हेची माणसे ह्या परिक्रमेत भेटली. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले. त्यामुळेच ही नर्मदा परिक्रमा हजारो वर्षे आपले महत्व व अस्तित्व टिकवून आहे.

गतीमान, अर्थवादी अशा ह्या यंत्रयुगात, संगणक युगातही ही परिक्रमा आपले महत्व टिकवून आहे ते तिच्यात आढळणाऱ्या ह्या मानवी दर्शनातून. भारतातली सर्वात जुनी नदी नर्मदा. तिच्या मानाने गंगा वगैरे हिमालयातल्या नद्या आधुनिक कारण हिमालयच तरूण आहे. त्यामुळेच हा परिक्रमेचा मान नर्मदेला. देव आहे की नाही ? असल्यास तो कसा पहायचा ह्यावर अनेक मंडळी शतकानुशतके वाद घलाताहेत. कुंटे म्हणतात - हा भाग जीवनाच्या प्रचितीचा.

परमेश्वर आहे परंतु नक्की कोठे ?
परमेश्वर नाही सांग तसे का वाटे ?
तो असो की नसो
पण सांग कशावरून तू असशी ?
काठाशी राहून राहे रिकामी कळशी

हे अनुभवाचे नर्मदाजल कुंटेंनी शब्दबध्द करून ठेवले म्हणून आपल्याला पहाता तरी आले. ज्याला अनुभवता येईल तो नशीबवान.

नर्मदे हर ! हर नर्मदे
बस इतकेच.

पुस्तकाचे नाव : नर्मदे हर
लेखक : जगन्नाथ कुंटे
पुस्तक परिचय : मुकुंद धाराशिवकर

मुकुंद धाराशिवकर, धुळे - दू : 02582 236987

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading