पहिली राष्ट्रीय युवा परिषद जलस्थापत्य: इंजिनियरिंग आणि आर्किटेक्चर


कोल्हापूरमध्ये जलस्थापत्य: इंजिनियरींग आणि आर्किटेक्चर या विषयावर पहिली राष्ट्रीय परिषद नुकतीच म्हणजे २२, २३, आणि २४ सप्टेंबर २०१७ ला घेण्यात आली. या परिषदेच्या नियोजनाच्या संकल्पने संबंधी मोठा किस्सा आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कोल्हापूरातील टीक नेचर क्लब, वसुंधरा पाणी परिषद, आणि भारतीय जल संस्कृती मंडळ, यांच्यावतीने २३ सप्टेंबर हा दिवस पृथ्वी जलदिन म्हणून साजरा करतो. यावर्षी या दिनाच्या निमित्ताने एखादा मोठा कार्यक्रम करावा असे गेल्या २३ सेप्टेंबर १६ पासूनच मनात होते. पण, नेमके काय करावे ते ठरत नव्हते. एक दिवस अचानक भारतीय जल संस्कृती मंडळाच्या शिखर संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. दता देशकर सरांचा फोन आला म्हणाले तुम्हाला शिखर संस्थेवर आम्हाला घ्यायचे आहे. तुम्ही काम करायला तयार आहात कां?मी होकार दिला आणि विसरून गेलो त्यानंतर बर्‍याच दिवसानी त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले मला कार्यकारणीत घेतले असून ’जलस्थापत्य मंचचा’ उपाध्यक्ष करण्यात आले आहे. मी म्हणालो ठीक आहे. तेव्हा पासून जलस्थापत्या वर काही कार्यक्रम करण्याचा विचार मनात सुरु झाला. मग कोल्हापूर ब्रँचच्या कार्यकारिणीतील इतर सदस्या बरोबर चर्चा करताना जलस्थापत्याचे नेमके काय कार्यक्रम करायचे ते लक्षांत येईना. या अगोदर भा.ज.सं.मं.तर्फे जलस्थापत्याबद्दल असा वेगळा काही कार्यक्रम झाला नव्हता. मग ठरवलं या विषयावर प्रथम कार्यक्रम करण्याची संधी आहे; तर आपण करू या. झालं, एकदाचा निर्णय झाला. पृथ्वी जलदिना दिवशीच जलस्थापत्य विषयावर परिषद घेण्याचे ठरले आणि मार्च १७ पासूनच मी कामाला लागलो.

डिपार्टमेंट आफॅ टेकनॉलॉजी कडून उत्तर न आल्याने प्रो.डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरु शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांना प्रत्यक्ष भेटून सहकार्याबद्दल पत्र दिले. त्यांना परिषदेची संकल्पना खूप भावली. ते म्हणाले, “ जे काम आम्ही करायला हवे ते तुमची सामाजिक संस्था करत आहे. विद्यापीठाकडून तुम्हाला हवे ते सर्व सहकार्य मिळेल.“ मग त्यांनी आमच्या इच्छेनुसार राजर्षी शाहू सभागृह आणि वि.स.खाण्डेकर भाषा भवनचा हॉल परिषदेसाठी देतो आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या परिषदेत सहभागी होण्यास सांगू असे म्हणत, ‘ आम्हा मराठवाड्याच्या लोकांना पाण्याचे अनन्यसाधारण मह्त्व आहे, असे कार्यक्रम सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत, लोक जलसाक्षर झाले पाहिजेत, मी येथे असेन तर नक्की येईन.” हेही सांगितले. परिषदेस सदिच्छा दिल्या. आमच्या पत्रावर योग्यतो शेरा मारून पत्र पी.ए.कडे दिले. त्या पत्रावर कार्यवाही करण्याचे पी.ए.नी आश्‍वासन दिले.

त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, महाराष्ट्र चॅप्टर्स, कोल्हापूर सेंटर, या संस्थेचे चेअरमन, आर्किटेक़्ट सतीशराज जगदाळे यांची भेट घेतली. त्यांनी सह-आयोजक होण्याचे मान्य केले आणि कार्यकारीणीची मिटिंग घेऊन पत्र देतो असे सांगितले. त्याप्रमाणे एक दोन आठवड्यानी त्यांचे पत्र आले. त्यात त्यांनी परिषदेसाठी एकूण रु.७५,०००/- ते रु.१.००,०००/- पर्यंतचा खर्च करण्याचे आश्‍वासन दिले. त्यात तीन व्याख्याते आणि त्यांचा जो काही खर्च असेल तो करणार असल्याचे आणि कमीत कमी रु. ५०,०००/- रक्कम रोख देणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे स्थळ विद्यापीठ असल्याने प्रा. श्रीकांत भोसले, प्रा. अमोल कुलकर्णी आणि प्रा.डॉ. जयदीप बागी, डीओटी, शिवाजी विद्यापीठ यांनी कार्यक्रमासाठी लागणारे दोन्ही हॉल बुक करून ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली. तसेच पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊसच्या दोन खोल्या आणि परिषदेच्या ब्रेकफास्ट आणि भोजन व्यवस्थेसाठी डायनिंग हॉल रिझर्व करून घेतले. तसेच त्यांनी त्यांच्या १८ विद्यार्थ्यांची आणि ६ प्राध्यापकांची नोंदणीही करून टाकली. त्यामुळे एक वेगळीच उभारी आली. प्रा. अमोल कुलकर्णी आणि मी अनेक महाविद्यालयांत प्रत्यक्ष जाऊन प्राचार्य आणि स्टाफला भेटून परिषदेची माहिती देऊन त्यात सहभागी होण्याचे आणि विद्यार्थ्यांनाही नोंदणी करण्यास उद्युक्त करावे अशी विनंती केली. काहींना फोनवरून सहभागी होण्यास आणि विद्यार्थ्याना पाठवण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर ज्यांना नोंदणी करणे शक्य नाही; पण, परिषदेत चालणार्‍या ज्ञान यज्ञात सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी परिषदेचे दरवाजे खुले आहेत; तेव्हा सर्वानी यावे, असे निमंत्रण पण दिले. याला केवळ गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या प्राचार्यानी, स्टाफने, विद्यार्थ्यानी आणि व्यवस्थापनाने मोठ्या संख्येने परिषदेची नोंदणी करून साथ दिली.

परिषदेचा प्रथम दिन :


आज २२ सप्टेंबर २०१७, दुपारचे चार वाजले आहेत. सभागृह जवळ जवळ भरत आले आहे. अजून विद्यार्थी येत आहेत. सगळे पाहूणे व्यासपीठावर स्थानापन्न झाले आहेत. आज या परिषदेस उपस्थित आहेत समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि उदघाटक सन्माननीय डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ; अध्यक्ष आहेत सन्माननीय डॉ.दत्ता देशकर, अध्यक्ष, भारतीय जल संस्कृती मंडळ, शिखर संस्था, औरंगाबाद; आणि सन्माननीय अतिथी आहेत आर्कि. सतीश माने, चेअरमन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, महाराष्ट्र चॅप्टर्स,पुणे; यांच्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत आर्कि. सतीशराज जगदाळे , चेअरमन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, महाराष्ट्र चॅप्टर्स, कोल्हापूर सेंटर; प्रो.डॉ. जयदीप बागी, डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर , प्रो. डॉ.पी.डी.राऊत, हेड, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि प्रा.डॉ. अनिलराज जगदाळे, उपाध्यक्ष, जलस्थापत्य मंच, भारतीय जल संस्कृती मंडळ. या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत आहेत प्रा.सौ. कल्पना सावंत.

प्रा.सौ. कल्पना सावंत यांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागींचे स्वागत केले आणि कार्यक्रमाला सुरवात केली. प्रथम त्यांनी प्रा.डॉ. अनिलराज जगदाळे सरांना प्रस्ताविकासाठी बोलावले. प्रा.जगदाळे सरांनी परिषदेचा उद्देश, त्याची कार्यपद्धती आणि तीन दिवस चालणा-या ज्ञान यज्ञा बद्दल सांगितले. ते म्हणाले “ सध्या सगळीकडे पाण्याची समस्या अधिकाधिक तीव्र बनत आहे. आपल्याकडचे हवामान गेल्या हजारो वर्षापासून असेच लहरी आहे. पाऊस नेहमीच असमान पद्धतीने वितरीत होत असतो. त्यामुळे देशाच्या निरनिराळया भागात निरनिराळ्या प्रमाणात पाऊस पडतो. या वर्षी चांगला पाऊस झाला, तर तो पुढच्या वर्षी पडेलच असे नाही. त्यामुळे पावसापासून मिळणारे पाणी जपून वापरावयास हवे.

आपले पूर्वज याबाबत काय करत होते? हे नवीन पिढीने समजाऊन घेणे आवश्यक आहे. तसे ते त्यांना माहीत करून देण्यासाठीच ही जलस्थापत्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. आपण स्वत:ला फार पुढारलेले समजतो. आजचे तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे, असे मानतो; पण स्थापत्य शास्त्राचा विचार केला तर असे दिसेल की आपले पूर्वजच आपल्या पेक्षा प्रगत होते. त्यांनी पाण्यासाठी केलेली बांधकामे कित्येक वर्षेच नव्हे तर कित्येक शतके काम करत आहेत. आजही ती आपला उद्देश पुरा करत आहेत. मग ती औरंगाबादची पाणचक्की असो; नाहीतर बीडची खजाना विहीर असो; आजही ही जलस्थापत्ये आपले काम करत आहेत. तेही फक्त गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर.” ते पुढे म्हणाले की “भारतीय जल संस्कृती मंडळ किंवा टीक नेचर क्लब हे जलदूत आणि पर्यावरणाचेेही कार्यकर्ते तयार करण्याचे काम करतात. एक चीनी म्हण आहे, ‘ तुम्ही जर एक वर्षासाठी नियोजन करत असाल तर शेतात बी पेरा, तुम्ही जर १० वर्षासाठी काम करत असाल, तर झाडे लावा आणि जर तुम्ही १०० वर्षाचे नियोजन करत असाल, तर माणसे घडवा.“ हेच या दोन्ही संस्था करत आहेत. पाण्याविषयीचे काम पिढ्यानपिढ्या चालणारे आहे; त्यामुळे नवनवीन कार्यकर्ते निर्माण करण्याची जबाबदारी जुन्या पिढीचीच आहे.

यानंतर प्रमुख पाहुण्यासह सर्वांचा ’रिइन्हेंटिंग इन्डिया’ हे मा. डॉ. रघुनाथ माशेलकरांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कलशपूजनाने परिषदेचे उदघटन करण्यात आले. उदघाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे मा.प्रो.डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानात पाणी समस्येबाबत चिंता व्यक्त करून, आज च्या परिषदांसारख्या अनेक परिषदांच्या माध्यमातून तरूणांचे प्रबोधन करणे आणि त्यांना जलसाक्षर करण्याची निकड व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये गेल्या काही वर्षापासून केलेल्या जलसंधारण आणि वर्षाजल साठवणींच्या कामांची माहिती दिली. सध्या, पाण्याच्या बाबत विद्यापीठ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असून आता नुकतेच विद्यापीठाने म्युनिसिपल कार्पोरेशनचे पाणी घेणे बंद केले आहे. ही जलस्थापत्य परिषद युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि चांगल्या अनुभवी व्याख्यात्यांची भाषणे ऐकायला मिळतील, तेव्हा विद्यार्थ्यानी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उदघाटन कार्यक्रमास बोलावल्या बद्दल आयोजकांचे आभार मानून त्यानी परिषदेस शुभेच्छा दिल्या आणि आपले मार्गदर्शनपर भाषण संपवले.

यानंतर समारंभाचे अध्यक्ष मा.डॉ. दत्ता देशकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय जल संस्कृती मंडळाच्या स्थापनेचा इतिहास सांगून हे मंडळ जलसाहित्य मंच, जलस्थापत्य मंच, जलसाक्षरता मंच, लोकधारा मंच आणि पर्यावरण मंच या पाच धारांच्या किंवा मंचाच्या आधारे कसे काम करते हे विषद केले. आज पर्यंत निरनिराळ्या जिल्ह्यात स्थापन झालेल्या भा.ज.सं.मं.च्या शाखांचीही माहिती दिली. त्यांनी सर्वांचे लक्ष एका गोष्टीकडे वळवले ते म्हणजे जलव्यवस्थापनाकडे. ते म्हणाले खरं तर आपल्याला मिळणारा पाऊस आपली गरज भागविण्यास पुरेसा असतो; पण, पाऊस पडत असताना आपण त्याच्या कडे दुर्लक्ष करतो आणि पाण्याची टंचाई भासायला लागली की काही तरी केले पाहिजे म्हणून उसासे टाकत बसतो. डॉ.देशकरांनी आपल्या भाषणात अनेक उदाहरणे देऊन जलसाक्षर समाज निर्माण करणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.

अध्यक्षांच्या भाषणानंतर आर्कि.सतीशराज जगदाळे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, महाराष्ट्र चॅप्टर्स,कोल्हापूर सेंटर या संस्थेची ओळख करून दिली आणि आर्किटेक्चरमध्ये पाण्याचे महत्व कसे आहे ते विषद केले. त्यांनी या उदघाटन समारंभास वेळात वेळ काढून हजर राहिल्या बद्दल आणि चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल मा.प्रो.डॉ.डी.टी. शिर्के , प्र-कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉ.दत्ता देशकर यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यानंतर उदघाटनाचा कार्यक्रम संपला.

चहापानाच्या कार्यक्रमा नंतर, पहिल्या तांत्रिक सत्राला सुरवात झाली. इंजि. गजानन देशपांडेे यांनी बीडच्या खजाना विहिरीचा सखोल अभ्यास केलेला असल्याने त्यांनी त्या विहिरीची माहिती सांगितली. ते म्हणाले ही विहीर म्हणजे जलस्थापत्य क्षेत्रातील एक आश्‍चर्य - मिरॅकल- आहे. सदर विहीर इ.सन १५७२ मध्ये बीडच्या त्यावेळच्या जाहागिरदाराने शेतीला पाणी देण्यासाठी बांधली. ही विहीर १० मी. व्यासाची आणि १० मी. खोलीची आहे. ती पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेली असून, तिला अगदीच कमी व्यवस्थापनाचा खर्च येतो. या विहिरीला दोन इनलेट टनेल असून ते १.५ कि.मी. लांबीचे आहेत. ते भू पृष्ठभागा खालून ३० फूट खोलीवरून जातात. त्यातून डोंगरांच्या बाजूने जमिनीत मुरलेले पाणी विहिरीत येते. या दोन इनलेट टनेलच्या बरोबर विरूद्ध दिशेला एक आउटलेट टनेल आहे. त्यातून विहिरीतील पाणी जलसिंचनासाठी घेतले जाते. पाणी टनेलमधून निव्वळ गुरुत्वाकर्षणाने वाहते. ही आउटलेट टनेलही जमीनी खालून तीस फुटावरून जाते. अगदी नदीच्या पात्रा खालूनही नदीच्या पलिकडे जाते. तेथे ती जमीनीवर उघडी होते आणि त्यातील पाणी उघड्या चरातून, पाटातून २११ एकर जमीनीला दिले जाते. या आउटलेट टनेलला १०० मि. अंतरावर हवेसाठी चिमण्या ठेवलेल्या आहेत. त्यातून हवा टनेल मध्ये जातेच, पण, या चिमण्या विहिरी सारख्या मधल्या शेतक-यांना आणि नागरिकांना पाणी घेण्यासाठी उपयोगी पडतात. ही सर्व माहिती अगदी सुबोध भाषेत गजानन देशपांडे सरांनी सांगितलीच; पण, त्याच बरोबर विहिरीचे, टनेलचे फोटो आणि नकाशेही दाखवले त्यामुळे त्यांचे भाषण रोचक तर झालेच पण विद्यार्थ्यानाही सहज समजले.

त्यांच्या नंतर लगेचच आर्कि.मिलिंद रणदिवे यांचे ’वॉटर इन आर्किटेक्चर’ या विषयावर पीपीटीच्या सहाय्याने व्याख्यान झाले. त्यांनी भारतातील निरनिराळ्या भागातील बारव, स्टेपवेल्स, पुष्करणी दाखवून त्यातील पाणी आणि स्थापत्य यांचा संबंध व त्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आर्किटेक्चरचा झालेला उपयोग, याचे सुरेख विवेचन केले. त्यानंतर दोन्ही व्याख्यांनावर सहभागी सदस्यांमध्ये जवळ जवळ एक तास चर्चा झाली. सहभागींनी विचारलेल्या प्रश्‍नांना सहभागीतील काही सिनियर लोकांनी उत्तरे दिली. या पहिल्या सत्रासाठी अनेक प्रतिष्ठित आर्किटेक्टस आणि आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

एकंदरीत दिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्या नंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० भोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि परिषदेचा पहिला दिवस संपला.

परिषदेचा दुसरा दिवस :


आज २३ सप्टेंबर २०१७. परिषदेचा दुसरा दिवस. ब्रेकफास्ट नंतर सकाळी दहा वाजता दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरवात प्रा.डॉ.अनिलराज जगदाळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून डॉ.दत्ता देशकर, अध्यक्ष, भा.ज.सं.मं., औरंगाबाद यांना व्याख्यानास पाचरण करण्यापासून झाली. डॉ. देशकर यांनी ‘वॉटर मॅनेजमेंट : अ व्हायटल अ‍ॅस्पेक्ट’ या विषयावरील आपल्या व्याख्यानाने सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणात जलस्थापत्याबरोबरच योग्य जल व्यवस्थापनाची कशी नितांत गरज आहे ते सांगितले. आज आपण जल व्यवस्थापनाचा दीर्घ काळासाठी विचार करताना दिसत नाही. आजचे आपले जलस्थापत्य हे खोर्‍यातील खरोखरच गरजू असणार्‍या लोकांपेक्षा ज्यांना त्याची फारशी गरज नाही अशा लोकांसाठीच केलेले दिसते. नदी काठावरच्या लोकांना नैसर्गिकरित्याच पाणी मिळत असते, पण, नदी पात्राच्या दोन्ही बाजूला असणार्‍या उतारांच्या जमीनीला पाण्याची खरी गरज असते. त्या भागाला आपल्या कुठल्याच योजनेत स्थान दिले जात नाही. म्हणजेच आहेरेलाच पाण्याचा मोठा वाटा मिळतो नाहीरे पुन्हा पाण्यापासून वंचित रहातो. आपल्या भाषणात ते म्हणाले जायकवाडी धरणाचा खरा फायदा ज्या जिल्ह्यात ते आहे त्या औरंगाबाद जिल्ह्यास न होता तो परभणी आणि नांदेड जिल्ह्यांनाच अधिक होतो.

आपण पाऊस जेथे पडतो तेथेच तो पकडून ठेवायला पाहिजे, खरे तर ! ; पण , आपण तसे न करता पावसाच्या पाण्यास आपण वाहून जाऊ देतो आणि मग ते ओहोळ, नाला, छोटी नदी आणि मोठ्या नदीत रुपांतरीत झाल्या नंतर त्यावर जॅकवेल किंवा धरण बांधून त्यास उलट्या दिशेने पुन्हा खेचून आणतो. यात आपली खूपच शक्ती वाया जाते. खर्चही वाढतो. मोठी योजना झाल्याने समस्याही मोठ्या होतात. पाणी आडवा, पाणी जिरवा या घोषवाक्याची आठवण करत त्यानी श्री विलासराव साळुंकेंची खोर्‍यातील पाण्यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे ही समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना मांडली. पाण्याचे संबंधात विचार करतांना अर्थशास्त्र व समाजशास्त्राचे भान ठेऊन काम झाले पाहिजे या विषयावर त्यांनी आपल्या भाषणात जोर दिला. डॉ. देशकरांचे व्याख्यान खूपच छान झाले. त्याचा सहभागीवर दिवसभर प्रभाव राहिला.

त्यानंतर आजच्या दिवसाचे खरे महत्व सर्वांना समजावे म्हणून प्रा.डॉ.अनिलराज जगदाळे यांनी २३ सप्टेंबर हा दिवस ‘पृथ्वी जलदिन’ म्हणून का निवडला आहे, ते विषद केले. २३ सप्टेंबर हा दिवस इक्वीनॉक्स - म्हणजे दिवस आणि रात्र समसमान असणारा- दिवस आहे. तो पावसाळ्यात येतो आणि समन्यायी पाणी वाटपाचे तो चांगले प्रतिनिधीत्व करतो म्हणून निवडण्यात आला आहे. या दिवशी जगभरातल्या ज्या ज्या लोकांनी आपल्याला पाणी मिळावे यासाठी जन अंदोलने केली, सत्याग्रह केला, चळवळी चालवल्या, उपोषणे केली, प्रसंगी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास सोसला, नवनवीन शक्कल लढवून स्थानिक पातळीवरील पाण्याच्या समस्या सोडवल्या, नवीन तंत्रज्ञान शोधून काढले आणि आपले जीवन अधिक सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या लोकनेत्यांचे आणि अधिकार्‍यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी फक्त दोन मिनिटे उभे राहून स्तब्धता पाळण्यास सांगितले. त्यानंतर, त्यानी पुढील संकल्प करून घेतलाः

“ मी पाणी काटकसरीने जपून वापरीन,त्याचे प्रदुषण होणार नाही याची काळजी घेईन. माझ्या गावात / शहरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्यासाठी, साठवण्यासाठी, जमीनीत मुरवण्यासाठी आणि त्याचे समन्यायी तत्वावर वाटप करण्यासाठी व सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल हे पाहण्यासाठी, मी आवश्यक तेथे झाडे लावून, ती जगवून, श्रमदान व सहकार्य करेन. माझ्या गावातील प्रत्येक जण सम्रुद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्ˆय रेषे खाली रहाणार नाही आणि अशिक्षित असणार नाही , हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश सम्रुद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटीबद्ध असेन.” संकल्प सवार्ंनी मनापासून केल्याचे जाणवले. त्यानंतर १५ मिनिटाचा टी ब्रेक देण्यात आला. तोपर्यंत पुढील वक्त्यांनी आपापल्या पीपीटी कंप्युटर मध्ये लोड केल्या.

चहा पाना नंतर सरांनी प्रथम डॉ. प्रदीप वेसणेकर, एन.ई.एस.सायन्स कॉलेज, नांदेड यांना त्यांच्या सादरीकरणासाठी बोलावले. त्यांचा थोडक्यात परिचय करून दिल्यानंतर डॉ.वेसनेकर सरांनी आपले सादरीकरण सुरू केले. आंबेजोगाई गावातून जानेवारी २०१६ मध्ये तिथल्या आंबेजोगाई ग्रुपचेे सरांना बोलावणे आले. आंबेजोगाई गावाला एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक आधिष्ठान आहे. येथे श्री योगेश्‍वरी देवीचे मंदिर असून ते एक शक्तीपीठ आहे. गावाने सर्व नागरिकांची एक सभा घेतली. त्यात डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, आणि गावातील इतर प्रतिष्ठीत नागरिक , सरकारी अधिकारी हजर होते. सभा होती गावातील पाणीसमस्येसंबंधी. गावात गेल्या काही वर्षापासून पाणी पुरवठा पुरेसा होत नाही; तेव्हा नवीन बोअर किंवा विहीर काढावी असा प्रस्ताव होता. डॉ .वेसणेकर भूगर्भ शास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांना विहीरीसाठी किंवा बोअरसाठी जागा दाखवण्यास बोलावले होते.

पण, सरांनी प्रथम अस्तित्वात असलेल्या विहिरींचा आणि बोअरचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तसे गावकर्‍यांना त्यांनी सांगितले. गावकर्‍यांनी सम्मत्ती दिली. त्यानंतर सरांनी संपूर्ण गावाचे सर्वेक्षण केले. त्या प्राथमिक सर्वेक्षणात त्यांना आंबेजोगाई गावात एकूण १२ बारव आणि १७ विहिरी असल्याचे आढळून आले.. या बारव खूप घाण झाल्या होत्या. त्यात कचरा, माती पडल्याने त्या जवळ जवळ मृत झाल्या होत्या. गेल्या ५-१० वर्षापर्यंत त्या सर्व वापरात होत्या. पण गावाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने त्यांची ही दूरावस्था झाली होती. सरांनी त्या बारवांचा बारकाईने अभ्यास करून त्या बारा बारव पैकी दोन बारवां मधील गाळ काढण्याचे ठरविण्यात आले. त्या प्रमाणे फेब्रुवारी २०१६ मध्ये जेसीबी मशिनच्या सहाय्याने गाळ काढण्यात आला. बारव मध्ये १५ फुट खोल गाळ होता. तो सर्व काढल्यानंतर भूजलाच्या झर्‍यांची तोंडे मोकळी झाली आणि बारवांमध्ये पाणी येऊ लागले.

आंबेजोगाई गटाने सर्वच बारव आणि विहिरींच्या पुनर्जीवीकरणाची जबाबदारी उचलली आणि सरांनी बारवांचा अधिक सखोल अभ्यास करण्याचे ठरवले. हे सर्व सांगत असतांना सरांनी आंबेजोगाई गावातील बारवांची पूर्वीची स्थिती आणि पुनर्जीवीकरण केल्या नंतरची स्थिती पीपीटीच्या सहाय्याने दाखवल्याने विषय समजण्यास सोपे गेले. तसेच सरांच्या ओघवत्या शैलीमुळे कंटाळा आजिबात आला नाही.

त्यानंतर सादरीकरण होते प्रा.डॉ.विजयकुमार भुसे यांचे. त्यांचा विषय होता ’केमिस्ट्री ऑफ वॉटर’. पण त्यांचे हे सादरीकरण पूर्ण पणे सैद्धांतिक झाले.

त्यानंतर सादरीकरण केले श्री चेतन ग़ोगवले, यु.एन.प्रुफिंगज,पुणे यांनी. पुण्या पासून ५०-६० कि.मी.वरील पिन्गोरी ता. पुरंधर या गावात एकमोठे तळे होते, त्यात पावसाळ्यात पाणी साठायचे, पण, फार काळ टिकायचे नाही, शेतकर्‍यांना त्या तळ्याचा काही उपयोग होत नव्हता, ते तळे म्हणजे जमीनीतला एक खोल खड्डा होता इतकेच. पण, श्री. चेतन गोगावले आणि श्री उमेश नाईक यांनी या कच्च्या खड्ड्याला जलप्रतिरोधकाचा लेप देऊन पाणी साठवण्या योग्य बनविण्याचा विडा उचलला. काम खूप खर्चिक तर होतेच, पण, कष्टही खूप करावे लागणार होते. प्रथम त्यांनी सर्व खड्ड्याची पाहाणी केली. जागोजागी त्यांना मातीचे आवरण असल्याचे आढळले. कारण इथला खडक मोठ्या प्रमाणावर अपक्षयीत झाला होता. मूळ बेसाल्ट खडकाचे अपक्षयन होऊन त्याचे पृष्ठभागाचे मुरुम आणि मातीमध्ये रुपांतर झाले होते. हा वरचा थर खूपच ठिसूळ असल्याने तो काढून टाकणे गरजेचे होते. तो भाग माती विरहीत करण्यासाठी हाताने मजूरा करवी प्रथम झाडलोट करून घेण्यात आली. नंतर व्हॅक्युम क्लिनरचा वापर करून अगदी बारीक मातीही बाजूला केली गेली आणि खडकांचा मातीविरहीत पृष्ठभाग उघडा करण्यात आला.

जेथे खोलवर माती आणि मुरमाचा भाग होता आणि तो काढणे शक्य नव्हते तेथे काळ्या दगडांचे पिचींग करून घेतले. आता माती काढलेल्या भागावर लावण्यासाठी सिमेंट आणि ईपॉक्झीचे योग्य प्रमाणात मिश्रण करून त्याचे द्रावण तयार करण्यात आले. ते द्रावण आता खड्ड्याच्या तळावर आणि भिंतीवर लावायचे होते. ते काम साध्या रंगाच्या ब्रशनी करावे लागणार होते. खड्डा खूपच मोठा असल्याने भरपूर कामगार लागणार होते. त्यासाठी गोगवले आणि नाईक यांनी गावातील शेतकरी, शेतमजूर, इतर कामगार यांनाच प्रशिक्षित करून त्यांचे माध्यमातून खड्याच्या तळवर आणि भिंतीना सिमेंटच्या द्रावणाचा लेप दिला, जिथे पिचिंग केले होते त्या भागावर प्रथम ग्राऊटींग़ करून पिचिंगचे सगळे दगड स्थिर करून घेतले आणि नंतर त्यावर जलरोधक द्रावणाचे मिश्रण लावले. या पद्धतीने सर्व खड्डा झिरपा रोधक बनवला. आता पहिल्याच पावसात त्यात तीन कोटी लिटरचा जल साठा झाला. शेतकर्‍यांचा जलसिंचनाचा आणि गावकर्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला. या पाण्यावर आता शेतकर्‍यानी बागायती फळ शेती करायला सूरूवात केली आहे. गावात समृद्धी यायला सुरू झाले आहे. हा, खड्ड्याचे तलावात रूपांतर, करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने, आता माळरानावर असे तलाव बांधून पाण्याच्या समस्या सोडवणे शक्य होणार आहे. ही जलस्थापत्यातील मोठी उपलब्धी आहे.

श्री. चेतन गोगावले यांच्या सादरीकरणानंतर श्री, डी.आर.दुर्गे, निवृत्त डेप्युटी डायरेक्टर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांचे ’भूजल विकास ’ या विषयावर सादरीकरण झाले. त्यांनी महाराष्ट्रातील आजच्या भूजलाच्या स्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या विविध भागात भूजल साठ्यांचे प्रमाण आणि त्यांचे उपसा प्रमाण विस्ताराने सांगितले. तसेच मुळातच कमी सच्छिद्र असणा-या महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकात पाणी मुरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे भूजल साठा अतिशय मंद गतीने वाढतो, पण भूजलाचा उपसा मात्र खूपच वेगाने होतो. भूजल पुनर्भरण आणि भूजल उपसा यांचे एकमेकाशी प्रमाण खूपच व्यस्त आहे. ते कमी करायचे असेल; तर, खडकांची सच्छिद्रता वाढवणे आवश्यक आहे. हे लक्षांत घेऊन त्यांनी जीएसडीए मार्फत काही प्रयोग केले. त्यांची माहिती दिली. यात भूपृष्ठ जल अडवण्यापासून ते सर्व पारंपारीक पद्धतींचा वापर कसा केला; ते सांगितलेच, पण, विषेश करून खडकांत ड्रिलींग आणि ब्लास्टिंगच्या सहाय्याने देशातच नव्हे तर जगात कठीण खडकांची सच्छिद्रता वाढवण्याचा हा प्रयोग प्रथमच करण्यात आला. तो अनेक ठिकाणी यशस्वी पण झाला. श्री. दुर्गे साहेबानी आपल्या म्हणण्या पुष्ठ्यर्थ पीपीटीच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने विषय अधिक सोप्या पद्धतीने समजाऊन दिला.

नंतरचे सादरीकरण होते ‘ नदी पुनर्जीवीकरण अभियान’ या विषयावर प्रा. डॉ. अनिल नारायणपेटकर, माजी प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ जिओलोजी, सोलापूर विद्यापीठ , सोलापूर आणि आता आर्ट ऑफ लिव्हिंगचे हायड्रॉलोजी सल्लागार यांचे. ‘ नदी पुनर्जीवीकरण अभियान’ हे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे मार्फत राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी त्यानी लातूर येथे केलेल्या नदी पुनर्जीवीकरण कामाविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे माहिती सांगितली आणि या वर्षी त्याचा काय परिणाम झाला ते फोटोद्वारे दाखवलेही. त्यांचे ओघवते निवेदन आणि सुंदर फोटो यामुळे सहभागींना तो विषय चांगला समजला.

जैन इरिगेशन, जळगाव चे प्रतिनिधी मि. मधुकर फुके यानी ’ज़ैन इरिग़ेशनस लिफ़्ट टू ड्रिप प्रोजेक्ट मध्ये अ‍ॅटोमायझेशनचा वापर’ यावर सादरीकरण केले. त्यांनी जैन इरिगेशनच्या ठिबक सिंचन व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या मार्फत सांगली येथे राबण्यात येत असलेल्या २००० एकरावरील स्वयंचलित प्रयोगाची फोटोसह माहिती दिली. ते म्हणाले या २००० एकर जमीनीचे ठिबक सिंचन व्यवस्थापन एका छोट्या खोलीत बसून एक व्यक्ती करू शकते. ही योजना संपूर्णपणे कार्यक्षम असून तिचे अनेक फायदे आहेत. संपूर्ण गावाची जमीन सिंचनाखाली आणून समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करता येणे सहज शक्य आहे. त्यांचे हे सादरीकरण फारच प्रभावी झाल्याचे जाणवले.

यानंतर ’कंटेंपोररी जलस्थापत्य‘ या विषयावर श्री. खलिल अन्सारी, कार्यकारी संचालक,कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशन, वॉटर रिसोर्सेस, ठाणे यांचे बीजभाषण झाले. त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेती, त्यातील सिंचनयुक्त आणि बिगर सिंचन शेतीची माहिती देऊन महाराष्ट्रात आजवर बांधलेल्या एकूण धरणांची माहिती दिली. किती जलसाठा होतो आणि किती जमीन भिजते त्यांचे आकडे दिले. नंतर त्यांनी कोकणातील पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वापर याचा ऊहापोह केला. कोकणात भरपूर पाणी साठा करता येऊ शकतो; पण, त्याचा वापर करण्या इतपत शेतकरी सक्षम नव्हता. आता नवीन पिढी शेतीकडे वळली, तर त्यांना बागायती शेती करता येईल, हे त्यांनी विषद केले.

नंतरचे सादरीकरण प्रा.सी.एफ.राजेमहाडिक आणि त्यांचे विद्यार्थी श्री.एस.एम.तुबकि, श्री.जी.एन.चव्हाण-पाटील आणि श्री. एम.एम. कुलकर्णी घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे, ता.हतकणंगले, यांचे ’अ‍ॅक्टीव्ह थिन्किन्ग ऑन वॉटर’ या विषयावर सादरीकरण झाले. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या कँम्पसमध्ये असलेल्या जलस्थितीचा अभ्यास केला आहे. या कॅम्पसमध्ये एकूण किती पाऊस पडतो, त्यापासून किती पाणी दरवर्षी उपलब्ध होते, प्रत्यक्ष त्या कॅम्पसची पाण्याची गरज किती आहे, सद्याचे सर्व स्रोतापासून किती पाणी उपलब्ध आहे आणि अजून किती पाण्याची आवश्यकता आहे; याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि रेनवॉटर साठवण वाढवण्याची गरज असल्याचे त्यानी निष्कर्ष काढला. या मुलांनी उत्तम सादरीकरण केले.

आजच्या दिवसाचे शेवटचे सादरीकरण प्रा.डॉ. गजानन राशिंगकर आणि त्यांच्या टीमचे झाले. त्यांच्या टीम मध्ये प्रा.डॉ. प्रकाश अरूण बनसोडे, सांगोला कॉलेज सांगोला आणि प्रा.डॉ इंदुमती सोमसुंदरम, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापूर , हे दोघे होते. डॉ.राशिंगकर यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले की त्यांना कळले की बुलढाणा जिल्ह्यातील ’लोणार लेक’ हे उल्कापातामुळे तयार झालेले असून त्याच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. त्यापासून कॅन्सरही बरा होउ शकतो. त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढली आणि त्या पाण्यावर त्यानी संशोधन सुरू केले. स्थानिक लोकांनी त्यांना सांगितले की लोणार सरोवराच्या पाण्यात आंघोळ केल्यास सर्व त्वचा रोग बरे होतात. अगदी सोरायसिस सारखा आजार देखील बरा होतो. तेव्हा त्यानी त्या दिशेने संशोधन करण्यास सुरवात केली. त्यांच्या,संशोधन पत्रिकेचे शीर्षक आहे Remarkable Antisporiatic and Antiangiogenic Activity of Salt from Lonar Lake Water'.डॉ.राशिंगकर, डॉ. बनसोडे आणि डॉ. सोमसुंदरम ,तिघानीही प्रेझेन्टेशन केले. प्रेझेन्टेशन खूप छान झाले.

शेवटी प्रथे प्रमाणे दिवसभर झालेल्या व्याख़्यानावर सहभागीमध्ये चर्चा झाली. आजच्या दिवसातील सर्वच वक्त्यांचे विषय आणि त्यांचे सादरीकरण सर्वांनाच भावले. चर्चेमधून सूर उमटला की असे प्रत्यक्ष अनुभव संपन्न काम व्हायला हवे. निव्वळ सैद्धांतिक काम करून चालणार नाही. सकाळी पृथ्वीजल दिना निमित्त घेतलेला कार्यक्रम आणि केलेला संकल्प सर्वानांच भावला. तो प्रत्यक्षात आणण्याचा सर्वानी मनापासून ठरवले. इथेच आजचा दुसरा दिवस संपला.

परिषदेचा तिसरा दिवस :


तिसरा दिवस २४ सप्टेबर हा दिवस रविवार असल्याने श्रोत्यांची संख्या कमी होती. आज आर्किटेक्चरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते; कारण दोन प्रथितयश आर्किटेक्टची व्याख्याने होती. पहिले बीजभाषण होते आर्कि. शिरीष बेरी ,कोल्हापूर यांचे. आणि दुसरे होते आर्कि.राजीव लुमकड , नवी दिल्ली यांचे. आजच्या सत्राची सुरूवात आर्कि. सतीशराज जगदाळे यांनी केली. त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि सत्राची सुरूवात केली. प्रथम त्यांनी आर्कि. बेरींंची ओळख करून दिली त्यांना नुकत्याच मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पारितोषकाची माहिती दिली. आर्कि. बेरींचे व्याख्यान बरोबर दहा वाजता सुरू झाले. त्यांचा विषय होता, 'Water in Architechure and Architecture in Water'. त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वत:च्या कविता सादर करून आपला विषय अत्यंत काव्यात्मक पद्धतीने मांडला. पाणी हे इमारतीच्या रचनेलाच नाही, तर त्या इमारतीत रहाणार्‍या व्यक्तीना उच्चतम आध्यात्मिक आणि निरव शांततेचा आनंद उपभोगायला कशी मदत करते, ते सांगितले. त्याच बरोबर आर्किटेक्चरल रचनेमुळे पाण्यालाही कसा अस्थेटिक सेंस येतो हे त्यांनी निरनिराळ्या त्यांच्या कामांचे फोटोग्राफ दाखवून विषद केले. त्यांचे व्याख्यान असेच चालत रहावे थांबूच नये असेच सर्वांना वाटत होते. एक वेगळाच काव्यात्मक अनुभव घेण्यात सर्व गढून गेले होते. पण वेळेचे बंधन असल्याने त्यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

लगेच दुसरे व्याख्यान होते आर्कि.राजीव लुमकड यांचे. ते खास या परिषदेसाठी नवी दिल्ली येथून आले होते. आर्कि. सतीशराज जगदाळे यानी त्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आणि त्यांना व्याख्यानास पाचारण केले. आर्कि.राजीव लुमकड यांचा विषय होता, 'Restoration of Jal Mahal at Jaipur' त्यांनी काम सुरू करण्या आगोदर, तेथे काय परिस्थिती होती, ते सांगितले. जयपूरचा हा जलमहल ज्या सरोवरात होता, ते सरोवर पूर्वीच पूर्णपणे आटून गेले होते. जयपूर शहराचे सगळे सांडपाणी या तलावात आणून सोडले जात होते. त्यामुळे सरोवर गाळाने खचाखच भरले होते. दहा वर्षापूर्वी हे सरोवर आणि जलमहल रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी रु.२५/- कोटी खर्चही करण्यात आले होते. ज्या कंत्राटदाराला काम दिले होते त्याचे म्हणणे होते शासकीय आदेशानुसार त्यांचे सांगण्या प्रमाणे काम केले होते. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती खूपच वाईट झाली होती. आर्क़ि.

राजीव लुमकड जेंव्हा त्या प्रकल्पाशी जोडले गेले; तेव्हा, तो नव्याने सुरु करण्यात आला. त्यांनी सांगितले, सुरवातीला वाटले होते, हा केवळ आर्किटेक्चरल प्रकल्प असेल; पण, जसजसे सरोवराचे सर्व्हेक्षण होऊ लागले, तसतशी त्याची सखोलता लक्षांत येऊ लागली. हा प्रकल्प निव्वळ आर्किटेक्ट किंवा सिव्हील इंजिनिअरींगचा न रहाता तो मल्टीडिसिप्लिनरी होऊ लागला होता. यात शहरातील सांडपाण्याचा, घन कचर्‍याचा, लिमनॉलॉजीचा विचार करणे भाग पडले. प्रथम सरोवरातील संपूर्ण गाळ काढून घ्यायला सुरवात केली. त्याच वेळी तळ्यात येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून बाहेर पडणारे पाणी पुन्हा सरोवरातच सोडण्याचे ठरले. त्याच वेळी जलमहलाचे रिस्टोरेशनचे आर्किटेक्चरल कामही हाती घेण्यात आले. अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी यांचे सहकार्याने काम पूर्ण केले. या कामालाही २५ कोटी खर्च आला. पण, आता ते सरोवर पूनर्जीवीत झाले असून त्यातील सजीव पुन्हा सरोवरात बागडू लागले आहेत आणि जलमहाल दिमाखाने उभा आहे.

सहभागी सदस्यांच्या प्रतिक्रिया :


चहापानाच्या नंतर प्रतिपुष्ठी कार्यक्रम सुरू झाला. या मध्ये सहभागीनी उत्साहाने आपली मते मांडली. त्यांनी अगदी जलकलश पूजनाने उदघाटन केल्यामुळे पाण्याचे पावित्र्य मनावर चांगलेच बिंबले, हे सांगून सुरूवातीला या परिषदेत नेमके काय होणार? निव्वळ अभियांत्रीकी किंवा आर्किटेक्चरची तांत्रिक चर्चाच होणार असे वाटले; पण जलस्थापत्याशी पाण्याचे इतके विविध पैलू जोडले गेलेले असतील; हे परिषदेमुळे कळले. आलेले वक्ते कसे जमिनीवर होते आणि त्यांची शिकवण्याची तळमळ किती होती; हे सहभागीना जाणवलेले दिसले. कुठेही विरोधी सूर निघाला नाही. परिषदेच्या व्यवस्थापनापासून ते अगदी ब्रेकफास्ट, भोजनापर्यंत प्रतिक्रिया आल्या. पण, सगळ्या चांगल्याच आल्या. अन्न सगळ्यानाच आवडले आणि कॅटररनीही मुलांना हवे तितके वाढले. इथे नमुद करावयास आनंद होतो की कुणीही अन्नाची नासाडी केली नाही. आवश्यक तितकेच घेतले आणि घेतलेले सर्व खाल्ले. ताटात काही राहू दिले नाही. काही मुली तर प्रतिक्रिया देताना माईकवरून श्रोत्यांसमोर पहिल्यांदा बोलल्या. कारण त्यांना आपले मत मांडायचेच होते. सगळ्यांनी या परिषदेत झालेल्या गोष्टी इतरांपर्यंत पोचवण्याची हमी दिली.

सहभागीनी आणखी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, आम्ही प्रथमच पहात होतो की येथे सर्वांना प्रवेश होता. ज्याला ऐकायला यायचे त्याला परिषदेचे दरवाजे उघडे होते. ज्यांना सर्टिफिकेट आणि ब्रेकफास्ट,लंच, चहाफराळ ,डिनर आणि परिषदेचे किट हवे त्यांनाच नोंदणी करण्यास सांगण्यात येत होते. तरीही अनेक श्रोते नोंदणी नकरताच भोजनाचा, चहापानाचा आस्वाद घेत होते. पण, हे माहीत असून ही, संयोजकांनी तिकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक सहभागी आपल्या मित्राने नोंदणी केली नसली तरी परिषदेस घेऊन येऊ शकले. सहभागीपैकी कु.अंबिका येमूल, आर्ट ऑफ लिव्हिंग, सोलापूर, श्री. अजय पोरलेकर आणि श्री राकेश बिश्‍वास दोघेही गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज ,कोल्हापूर, श्री. माणिक पाटील, कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर आणि श्री. महेश साळुंखे, डीओटी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यानी चांगली प्रतिपुष्ठी दिली.

शेवटी सर्वांनी पाण्याची काटकसर करण्याचा, पाणी प्रदुषित न करण्याचा आणि त्याचे समन्यायी तत्वावर वितरण करण्याचा संकल्प केला.

समारोपाचा कार्यक्रम :


मा.श्री शशिकांत फडतरे, निवृत, उपसंचालक, नगर रचना, पुणे यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी फडतरे साहेबांनीही सहभागीना मार्गदर्शन केले. ते म्हणाले शासकीय अधिकार्‍यांना काम करावयास लावण्यासाठी कौशल्याने वागावे लागते. अनेक अधिकार्‍यांना काम करायचे असते पण राजकीय इच्छा आडवी येते अशावेळी अधिकार्‍याची सुद्धा कसोटी लागते. आपण आपले काम कौशल्याने रेटत राहिल्यास यश हमखास येते.

ऋणनिर्देश :


समारंभाच्या शेवटी प्रा.डॉ. अनिलराज जगदाळे यांनी सर्व प्रथम पालक मंत्री मा. नामदार श्री. चंद्रकान्तदादा पाटील यांचे त्यांच्या सर्वतोपरी सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार मानले. त्यानंतर सर्व स्थानिक लोक प्रतिनिधींचे आभार मानले. या परिषदेस मा.डॉ.माधवराव चितळे, जलतज्ञ आणि मा.डॉ. दि.मा.मोरे, अध्यक्ष , महराष्ट्र सिंचन परिषद, औरंगाबाद उपस्थित राहू न शकल्याने सर्वांची निराशा झाली. ते दोघेही यावेत ही आमची मनोमन इच्छा होती. पण दोघांनाही काही कारणाने येता आले नाही, ते आले असते तर परिषद एका वेगळ्याच उंचीवर पोचली असती. त्यांचे मार्गदर्शन भा.ज.सं.मं. बरोबर नेहमीच असते. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आणि परिषदेस असलेल्या सदिच्छा बद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.

प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यानी श्री. आशिष कोरगावकर, विश्‍वस्त, गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था, कोल्हापूर यांचे, त्यांनी परिषदेतील सहभागीना बॅगा आणि किट देऊन केलेल्या मदतीसाठी आणि कायम भा.ज.सं.मं. कोल्हापूरच्या पाठिशी राहून संस्थेस मदत केल्याबद्दल विशेष करून आभार मानले.

विद्यापीठाचे वतीने सर्वतोपरी सहकार्य केले बद्दल त्यांनी मा.कुलगुरु प्रो.डॉ.देवानंद शिंदे आणि मा.प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांचे विशेष आभार मानले. सदर परिषद आयोजनामध्ये साथ दिल्या बद्दल त्यांनी आर्कि. सतीश माने, चेअरमन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, महाराष्ट्र चाप्टर्स, पुणे; आर्कि. सतिशराज जगदाळे , चेअरमन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, महाराष्ट्र चाप्टर्स, कोल्हापूर सेंटर; कोल्हापूर; आणि प्रो.डॉ.जयदीप बागी, डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ,यांचे आभार मानले. मा. श्री. जयकुमार देसाई, सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर आणि प्राचार्य गडकरी, जी.के.जी. कॉलेज कोल्हापूर यांच्या कृतीशील सहकार्याबाबत त्यांचेही आभार मानले.

या परिषदेच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या स्मरणिकेसाठी ज्यांनी वेळेत आपले लेख पाठवले; त्या सर्व लेखकांचे मनापासून आभार मानण्यात आले. वेळेत निधी न जमल्याकारणाने ही स्मरणिका छापता आली नाही; त्याबद्दल दिलगिर आहोत, आता आमचा प्रयत्न परिषदेचे प्रोसिडिंग काढण्याचा आहे, त्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रा. जगदाळेंनी केले.

याच बरोबर परिषद यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या व्यक्ती मध्ये डॉ.दत्ता देशकर अध्यक्ष, आणि इंजी. गजानन देशपांडे, सचिव, शिखर संस्था, भा.ज.सं.मं.औरंगाबाद सौ. पल्लवी कोरगावकर, उपाध्यक्ष, भा.ज.सं.मं. , कोल्हापूर, सौ. मिलन होळणकर, सचिव, भा.ज.सं.मं., कोल्हापूर, प्रा.सौ.स्मिता गिरी, सहसचिव,भा.ज.सं.मं. , कोल्हापूर श्री. शामराव देसाई, कोषाध्यक्ष, भा.ज.सं.मं. , कोल्हापूर, प्रा.डॉ. सौ. धनश्री पाटील, कार्यकारी सभासद, भा.ज.सं.मं. , कोल्हापूर, सौ.कल्पना सावंत, कार्यकारी सभासद, भा.ज.सं.मं. , कोल्हापूर , श्री बाबासाहेब नदाफ , आजीवन सभासद, श्री. अमोल कुलकर्णी, आजीवन सभासद, प्रा. सौ. योगीता पाटील,आजीवन सभासद, प्रा.भूपेश बागी, आजीवन सभासद, प्रा. अभिजित पाटील,विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, प्रा. श्रीकांत भोसले आणि प्रा. महेश साळुंखे, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, श्री. सुनिल होळणकर कोल्हापूर, सौ.सौम्या तिरोडकर,विश्‍वस्त, व्ही.टी.पाटील फाऊन्डेशन, कोल्हापूर, ऋचा जगदाळे-केणे आणि श्री.नंदकिशोर कुलकर्णी,पुणे, श्री प्रशांत चव्हाण, सी.पी एन्टरप्रायझेस, श्री. सुनील यादव, एस अ‍ॅण्ड एस राजारामपुरी, कोल्हापूर, श्री. विनोद आपटे, आपटे प्रिंटर्स,श्री डॉ. सागर देशपांडे, सह्याद्री प्रकाशन, पुणे या सर्वांचे प्रा.डॉ.अनिलराज जगदाळे यानी मनापा

डॉ. अनिलराज जगदाळे, कोल्हापूर - मो : 08308001113

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading