पॉझिटीव्ह वॉटर बॅलन्स कंपनी

Submitted by Hindi on Thu, 08/10/2017 - 11:45
Source
जलसंवाद, मे 2017

वास्तविक औरंगाबाद परिसरात लहान मोठे सुमारे पाच हजार कारखाने आहेत. मात्र दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करण्यासाठी सर्वात आधी पुढे सरसावली ती बजाज ऑटो प्रा.लि.ही कंपनी. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकासासाठी रचनात्मक कार्य करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले. त्यानुसार सर्व प्रथम मराठवाडा आणि विदर्भ या प्रादेशिक विभागातील अती दुष्काळी गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.

औद्योगिक संस्थांनी सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून आपल्या नफ्यातील काही हिस्सा लोक कल्याणकारी योजनांसाठी खर्च करावा अशी सक्ती आता कायद्यानेच केली आहे. तथापि काही मोजक्या औद्योगिक संस्थानी या आधीच आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कार्य करण्यास सुरुवात केली. यामध्ये बजाज ऑटो प्रा.लि.ही जगविख्यात कंपनी अग्रभागी आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वीच या कंपनीने सामाजिक कार्याची गुढी उभारली . बजाज कंपनीने एकात्मिक ग्रामीण विकासाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था (JBGVS) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. या उपक्रमांची फलश्रुती सर्वश्रुत आहेच.

अलीकडे दुष्काळाची दाहकता विशेषत्वाने जाणवतेय. पाण्याची उपलब्धता आणि मागणी यामध्ये प्रचंड तफावत आहे. या पार्श्वभूमीवर पाच वर्षात टँकर मुक्त महाराष्ट्र ही महत्वाकांक्षी योजना अमलात आणण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी जलयुक्त अभियानासारखे ठोस उपाय राबविण्यात येत आहेत. जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने देखील आपला वाटा उचलावा या अनुषंगाने चर्चा सुरु झाली. संस्थेचे प्रमुख ट्रस्टी मधुरजी बजाज, संस्थेचे अध्यक्ष सी.पी. त्रिपाठी, ज्येष्ठ संचालक कर्नल विनोद देशमुख, संचालक व्ही.बी. सोहनी यांनी एकमताने निर्णय घेऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे ठरविले. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली.

वास्तविक औरंगाबाद परिसरात लहान मोठे सुमारे पाच हजार कारखाने आहेत. मात्र दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करण्यासाठी सर्वात आधी पुढे सरसावली ती बजाज ऑटो प्रा.लि.ही कंपनी. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकासासाठी रचनात्मक कार्य करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले. त्यानुसार सर्व प्रथम मराठवाडा आणि विदर्भ या प्रादेशिक विभागातील अती दुष्काळी गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. आराखडा तयार करण्यात आला. ग्रामीण भागात राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने ठिकठिकाणी जलसाठे निर्माण करण्याची मालिकाच सुरु केली. संस्थेचे प्रमुख अधिकारी, तज्ञ आणि कर्मचारी अशी टीम कामाला लागली.

गाळ काढणे, जुन्या बंधार्‍यांची दुरस्ती करणे, नवीन सिमेंट बंधार्‍यांची उभारणी करणे, नदी व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे असे विविध उपाय अमलात आणले गेले. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली. ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पाण्यासाठी वणवण थांबली. मात्र या पुढे जाऊन संस्थेने ग्रामीण भागातील युवकांना पाणलोट क्षेत्र विकासाचे तंत्र अवगत व्हावे यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी राळेगणसिध्दी येथे आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ग्रामस्थांना पाणी बचतीचे धडे देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले. जलसाक्षर समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन कामाची व्यापकता वाढविली, पाणी या विषयाशी निगडित विविध पैलूंवर लक्ष केंद्रीत करुन सर्वस्पर्शी काम करण्याचा प्रयत्न केला.

जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने आतापर्यंत मराठवाड्यातील ४२ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत. गंगापूर,पैठण, फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यांमधील ही गावे आहेत. याशिवाय विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील २३ गावांमध्ये देखील अशा स्वरुपाची कामे झाली आहेत. सुमारे ३१.४४ किलो मीटर लांबीपर्यंत नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे सन २०१६ च्या पावसाळ्याच्या केवळ सहा महिने आधी करण्यात आली आहेत. नऊ किलो मीरट लांबीचे नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सध्या सुरु आहे.

जलसंधारणासाठी केवळ नाला रुंदीकरण व खोलीकरण या एकमेव बाबीवर जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने भर दिलेला नाही. अन्य अनुषंगिक पर्यायांचा देखील साकल्याने विचार करुन गावाच्या गरजेनुसार जलसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जुन्या सिमेंट बंधार्‍यांची दुरुस्ती आणि नव्याने उभारणी अशा स्वरुपाची आठ कामे पूर्ण करण्यात आली. याशिवाय अशा स्वरुपाची नऊ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. याच कालावधीत लहानाची वाडी या फुलंब्री तालुक्यातील गावाच्या शिवारात सुमारे ७० मीटर रुंदीचा सिमेंट बंधारा अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत बांधून पूर्ण करण्यात आला. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. सन २०१६-२०१७ मध्येच वर्धा जिल्ह्यातील हेटकीकुंडी आणि वैरुल या गावांमध्ये दोन पाझर तलाव उभारण्यात आले.

जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या या जलसाठवण प्रकल्पांच्या निमित्ताने एकट्या औरंगाबाद जिल्हृयातील या दुष्काळी गावांमध्ये १६,२६३ टीएमसी पाणी अडविले गेले. याशिवाय विदर्भातील वर्धा जिल्ह्यांतील गावांमध्ये १४८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. एरव्ही हे पाणी वाहून गेले असते. सन २०१६ मध्ये झालेल्या पावसाचे पाणी जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने उभारलेल्या विविध साठवण प्रकल्पांमध्ये अडविले गेले. साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरी जिवंत झाल्या. पाण्याची पातळी वाढली. सततच्या दुष्काळामुळे खालावलेली भूजलाची पातळी वाढावी यासाठी येत्या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर पाणलोट विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा धाडसी निर्णय जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने घेतला आहे.

संस्थेने दुष्काळी गावांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांचा लाभ असंख्य ग्रामस्थांना झाला. तथापि उदाहरणादाखल हर्षी गावाबद्दल जाणून घेणे उचीत ठरेल. कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाड्याचे प्रतिनिधीत्व करणारे हर्षी हे एक गाव. पैठण हे या गावाचे तालुका मुख्यालय. पाण्याअभावी निर्माण होणारी सर्व संकटे या गावाने अनुभवलेली. तीन चार वर्षांपासून विहिरींनी तळ गाठलेला. गावात येणारा टँकर हा एकमेव पाण्याचा स्त्रोत. पर्यायाने शेती उत्पन्नाचा सतत घटत जाणारा आलेख हे या गावाचे वैशिष्ट्ये. गरजेपेक्षा निम्मे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे गावकरी हवालदिल झालेले. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने मराठवाड्यातील ४२ गावांत नाला खोलीकरण/रुंदीकरण व सिमेंट बंधारे अशी कामे केली, ज्यामध्ये हर्षी गावाचा देखील समावेश होता.

हर्षीमध्ये सहा नाल्यांचे मिळून सुमारे अडीच किलो मीटर इतक्या लांबीचे खोलीकरण/रुंदीकरण करण्यात आले. याशिवाय दोन बंधारे बांधरे बांधण्यात आले. संस्थेने या कामासाठी सुमारे ८० ते ९० लाख रुपये खर्च केले. याशिवाय तीन बंधार्‍यांची कामे सुरु आहेत. अशास्वरुपाची कामे दादेगाव, डावरवाडी, रांजणगाव,खुरी, नांदर, थेरगाव व अन्य गावांतही करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९० टक्के निधी संस्थेतर्फे तर उर्वरित १० टक्के लोकवर्गणीतून उभारण्याचा शिरस्ता आहे.

संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या कामांमुळे हर्षी गावाचा कायापालट झाला आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केल्याने २०१६ च्या चांगल्या पावसात खोल व रुंद केलेले नाले/नद्या पूर्ण भरल्या. तसेच नाल्यातून काढलेला गाळ शेतांत टाकल्याने ७-८ एकर जमीन नव्याने सुपीक झाली. याशिवाय गावात असलेल्या २६ बोअरवेलना पाणी लागले. एरव्ही कोरडया असलेल्या सुमारे २५० विहिरींमध्ये १०-१५ फुट पाणी राहू लागले. शेती उत्पन्नात तिप्पट वाढ झाली. गावातील शेतकर्‍यांना कापूस पिकाला ३-४ वेळा पाणी देता आले. एकूण १२६० हेक्टर क्षेत्रावर कापूर पिक घेण्यात आले आहे. पाण्या अभावी ३-४ क्विंटलवर घसरलेले कापूस उत्पादन आता ७-८ हेक्टरी क्विंटल झाले आहे.

संस्थेतर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, वैजापूर, फुलंब्री तालुक्यांत या स्वरुपाची कामे करण्यात आली आहेत. एकूण ३१.४४ किमीचे नाला खोलीकरण व रुंदीकरण आणि आठ नवीन सिमेंट नालाबांधांचे काम पूर्ण केली , तर नऊ किमीचे काम व नऊ बंधार्‍यांचे काम सुरु आहे. या कामांमुळे या गावांमध्ये पाणी साठवण क्षमता १६,२६३ टीसीएम (थाऊझंड क्युबिक मीटर) झाली आहे.

श्री. मुकुंद बडवे, डी.जी.एम, बजाज ऑटो लिमिटेड

Disqus Comment