रुरबन गावठाण निर्मितीचा ध्यास घेतलेला एक अवलिया कृषिशास्त्रज्ञ श्री.अरुण देशपांडे

Submitted by Hindi on Fri, 08/11/2017 - 12:26
Source
जलसंवाद, जून 2017

जल संकटाच वादळ पुन्हा घोघाऊ लागलं. आमच्या विहिरीचं पाणी पाहून पाणलोट क्षेत्रातल्या इतर खालच्या बाजूच्या शेजारच्या सर्व शेतकर्‍यांनी विहिरी खणण्याचा सपाटा लावला होता. एवढंच नव्हे तर विहिरींच्या तळात आणि कडेला आडवी बोअर्स केली गेली. जमिनीची अक्षरश: चाळण झाली. शक्तीशाली पाणबुडे पंप्स लावले गेले. पाण्याचा उपसा कित्येक पटीने वाढला. त्यात १९९८ च्या दुष्काळाची भर पडली. पाणी संपल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे शहराकडे स्थलांतर सुरु झाले.

रुरल आणि अर्बन जीवनशैलीचं एकत्रीकरण असलेल्या रुरबन वसाहतीचे केवळ पुरस्कर्तेच नव्हे तर अशी वसाहत प्रायोगिक तत्वावर निर्माण करण्यासाठी अखंड परिश्रम घेणारे ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ. तथापि त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे ती अंकोली शिवारात. शहरी महानगरी विकासनितीचा प्राण असलेलं पेट्रोलियम लवकरच संपणार आहे. आपला देश पूर्णपणे तेल आयातीवरच अवलंबून असल्यामुळे आलिशान आणि चकचकीत महानगरांचं तारु कधीही बुडेल. उध्वस्त होईल. त्यानंतर तेथून लक्षावधी लोक आपआपल्या गावी, शिवाराकडे परत येतील. त्यांना सामावून घेण्याची जबाबदारी अर्थातच शेतकर्‍यांची असेल. त्या प्रचंड घरवापसी, रिव्हर्स मायग्रेशनसाठी पूर्व तयारी म्हणजे स्वावलंबी रुरबन वसाहती. या रुरबन वसाहतीचा पाया असेल वॉटर बँक. अंकोली मध्ये अरुण देशपांडे यांनी असे विविध चाकोरीबाह्य प्रयोग केले आहेत. स्वत: सतत गावगाड्याबाहेर राहणार्‍या या अवलियाने मात्र, नजिकच्या भविष्यकाळाशी सुसंगत रुरबन गावगाड्याचं मॉडेल विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे.

अंकोली हे सोलापूर-पंढरपूर रस्त्यावरील एक चिमुकलं खेडं. पाच कोटी लिटर साठवण क्षमता असलेली आशियातील पहिली वॉटर बँक असलेलं ठिकाण. वास्तविक अंकोलीची एवढीच ओळख नाही. गेल्या तीस वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अरुण आणि सौ.सुमंगला देशपांडे यांनी गांधीयन इंजिनिअरिंगची प्रत्यक्ष केलेली अमलबजावणी हे अंकोलीचं वैशिष्टय. रचना आणि संघर्ष यातून घडलेली जलसाधना हे अंकोलीच्या भूमीचे आणखी एक वेगळेपण.

केवळ पाणी अडवा आणि जिरवा म्हणजे जलसंधारण नव्हे, खरं जलसंधारण जरा वेगळं आहे. राळेगणसिध्दीमध्ये काय झालं. गेल्या वर्षी तिथेही टँकर मागवावे लागले. त्याचं कारण काहीतरी वेगळं आहे. ते आर्थिक आहे. गांधीजी संपूर्ण समजले तर जलसंधारण होईल आणि ते जर नीट समजले तर आपल्या गरजेच्या तिप्पट पाणी आहे. दुष्काळ नावाची गोष्ट येण्याची शक्यताच नाही. हे आमच्या येथे सिध्द झालय. गेली दहा वर्षे टंचाई नाही अरुण देशपांडेंच्या या ठाम स्वराला आधार आहे, तो त्यांनी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या विकासनीतीनुसार अमलात आलेले ग्राम सबलीकरण आणि जलसंधारणाचे प्रयोग. हे प्रयोग अंकोली परिसरास दुष्काळच्या विळख्यातून मुक्त करणारे ठरत आहेत.

गांधीयजन इंजिनिअरिंग :


गांधीयन इंजिनिअरिंग विषयी भरभरुन बोलणारे, या तत्वप्रणालीचा हिरीरीने पुरस्कार आणि अमलबजावणी करणारे अरुण देशपांडे बालपणी चक्क गांधी व्देष्टे होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण सोलापूरातील हरीभाई देवकरण शाळेत झालं असलं तरी माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना पुणे गाठावं लागलं. पुण्यात ते भावे स्कूलमध्ये दाखल झाले. शाळा भावे स्कूल आणि निवास सदाशिवपेठत. स्वाभाविकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव असलेल्या वर्तुळात त्यांचा वावर वाढला. महात्मा गांधींविषयी काहीशी तिरस्काराची भावना याच कालावधीत रुजली असावी. तथापि ते राष्ट्रपित्याच्या प्रेमात पडले, ते बी.एस्सी.(Agri) अभ्यासक्रमासासाठी पुण्यात कृषि महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा. गांधीयजन इंजिनिअरिंग अमलात आणण्याचं बीजारोपण बहुधा याच ठिकाणी झालं. चाकोरीबाह्य जगण्याची ओढ त्यांना सुरुवातीपासूच असावी. त्यांच्या सदाशिपेठेतील तत्कालिन संवगड्यांनी करिअरसाठी कृषि पदवीधर होण्याचा कधी विचारही केलेला नव्हता. अरुण देशपांडे मात्र कृषि महाविद्यालयात दाखल झाले.

साधारण १९६५ चा तो कालखंड असावा. कृषि महाविद्यालयात कृषि अभियांत्रिकी शिकवणार्‍या प्रा.धोंडे सरांचे अरुण देशपांडे हे आवडते विद्यार्थी. प्रा.धोंडे यांनी विकसित केलेलं कंटूर मार्कर हे साध,सोप परंतु पाणी व्यवस्थापनासाठी अत्यंत प्रभावी असलेल साधन म्हणजे महात्मा गांधीचा ज्ञानचरखाच होता. केवळ बेरीज, वजाबाकी,गुणाकार, भागाकार येणार्‍या कोणत्याही व्यक्तीस दोन दिवसात जलसाक्षर करणारं ते साधन होतं. या कंटूर्सना धरुन कोणत्याही डोंगरावर उतारावर माळरानावर शेतांमध्ये सलग समपातळी चर किंवा नांगराचे तास घातले तर व त्यावर झाडं, झुडपं,गवत, पिकं यांची लागवड केली तर त्या संपूर्ण पाणलोटाचं पाणी शोषून घेणार्‍या स्पंजमध्ये रुपांतर करता येतं. ढगातून कित्येक हजार मीटर उंचीवरुन सुटलेला प्रत्येक थेंब अलगद झाडांच्या पानांनी झेलला जाऊन मगच जमिनीवर आला पाहिजे. त्यानंतर ते पाणी उतारावर पळू लागलं तर त्याला चालायला आणि रांगायला लावलं पाहिजे. रांगलेलं पाणी थांबायला हवं. त्यानंतर ते सलग समपातळी चरात गेलं पाहिजे. जमिनीच्या पोटात दिसनास झाल पाहिजे आणि केवळ स्वच्छ , नितळ असं पाणी झर्‍यांच्या स्वरुपात विहिरींमध्ये प्रकटलं पाहिजे. प्रा.धोंडे सरांचा हा ज्ञानचरखा हातात आल्यानंतर संपूर्ण विकेंद्रीत जलव्यवस्थापनशास्त्र हाती गवसल्याची भावना निर्माण झाली. हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष जमिनीवर वापरलं तर एका वर्षातच चमत्कार होतो. कोणत्याही उजाड पाणलोटाचं माथा ते पायथा हिरव्यागार स्पंजात रुपांतर होतं, असे अरुण देशपांडे यांनी अनुभवलं.

टर्निंग पाँईट :


पुढे एका फर्टिलायझर कंपनीत मार्केटिंग ऑफिसर म्हणून नोकरी सुरु झाली आणि हे विषय मागे पडले. नोकरीनिमित्त भटकंती सुरु असताना नक्षलप्रभावी परिसरात काही काळ त्यांना व्यतित करावा लागला. एका स्वयंसेवी संस्थेच्या निमित्ताने बांगला निर्वासितांशी याच कालावधीत त्यांचा संबंध आला. संवेदनशील मनाला विषण्ण करणारं व्यथित करणारं ते चित्र होतं. तेव्हा पुन्हा मूलभूत प्रश्नांविषयी चिंतन सुरु झालं. भोपाळच्या वायू दुर्घटनेत कीडामुंगी सारखी माणसं मेली. तेव्हा देशातील शास्त्रज्ञ भानावर आले. आपल्या ज्ञानाचा उपयोग परकीय कंपन्यांसाठी करण्याऐवजी देशबांधवांसाठी करण्याची भावना प्रबळ झाली. लोकांसाठी विज्ञान या चळवळीचं नेतृत्व करणार्‍या अरुण देशपांडेंसाठी हा टर्निंग पाँईट ठरला. ज्येष्ठ गांधीवादी नेते अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे आणि बाबा आमटे यांची भेट झाली. पेस्टीसाईड विकणार्‍या आंतरराष्ट्रीय कंपनीतील नोकरीचा अरुण देशपांडे यांनी राजीनामा दिला.

बाबांच्या सूचनेनुसार अरुण आणि सुमंगला यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या सोमनाथ प्रकल्पातील श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठातील चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अमलात आणा हा बाबांचा संदेश प्रत्यक्ष आणण्याचा निर्धार देशपांडे दाम्पत्याने केला. मधली काही वर्षे अरुण देशपांडे लोकविज्ञान चळवळीमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता व सेक्रेटरी तसेच दिल्लीच्या कार्यालयातील समन्वयक होते. यानिमित्ताने देशभर भ्रमंती करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने ठिकठिकाणचे पाणी प्रश्न, भूस्तर रचना, दुष्काळप्रवण भागातील पाणी व्यवस्थापन याबाबींचा जवळून संबंध आला. त्यावेळी दिल्लीहून वॉटर नावाचे मासिक प्रकाशित होत असे. तो खजिना त्यांना मिळाला. औरंगाबादच्या वाल्मी मध्ये सहा महिन्याचा एक अभ्यासक्रम त्यांनी एकलव्य पध्दतीने पूर्ण केला.

विज्ञानग्राम उभारण्याचं स्वप्न :


अंकोलीच्या माळरानावर विज्ञानग्राम उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशपांडे दाम्पत्य दाखल झाले. १९८६ च्या दुष्काळाचं ते वर्ष होतं. अंकोलीच्या माळरानावरील दृष्य पाहून देशपांडे हादरलेच. बालपणी ज्या विहिरींमध्ये ऐन मे महिन्यात अरुण देशपांडे सूर मारत त्या विहिरी कोरड्या झाल्या होत्या. वास्तविक आता या विहिरी तीनशे फूट खोल झाल्या होत्या. परंतू त्यांनी पाणी गमावले होते. सरकारी यंत्रणांमार्फत दररोज येणार्‍या टँकर्सवर ग्रामस्थांची गुजराण सुरु होती. ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्या बोअरवेल्समुळे पाण्याची पातळी खालावली होती. परिस्थिती चिंताजनक होती. या विहिरीत पुन्हा सूर मारता आला पाहिजे. हे अरुण देशपांडे यांनी ठरविलं.

सर्वच दृष्टीने प्रतिकूल असलेल्या अंकोलीच्या भूमीत काही प्रयोग केले. काही सूत्र सापडले, तर ते सर्वत्र लागू होईल, हा दृष्टीकोन होताच. त्यांनी वैज्ञानिक पध्दतीने पाणलोट क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ, शेजारी यांच्याशी चर्चा सुरु झाली. कंटूर मार्कर तंत्राची अमलबजावणी करण्याचे त्यांनी ठरविले होते. असंख्य अडचणी होत्या. १०० एकरात २२ जण मालक होते. सगळयाना वैज्ञानिक जलव्यवस्थापन समजावून सांगण्यास आणि त्यांच एकत्रीकरण करण्यात सहा वर्षे गेली. दरम्यान पश्चिमेकडून येणार्‍या उष्ण झळांचा पाण्याचं बाष्पीभवन करण्यामध्ये मोठा सहभाग असल्याचं लक्षात आलं. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा निर्धार केलेल्या अरुण देशपांडे यांनी पश्चिमेस बाभुळ,निंब,सुबाभुळ यावृक्षांची मोठ्याप्रमाणावर लागवड करण्यास सुरुवात केली. पाच वर्षात ही झाड वाढली. या वनराईमुळे उष्ण वार्‍यांना प्रतिबंध निर्माण झाला. पाणलोटक्षेत्रातील बाष्पीभवनास आळा बसला. गारवा निर्माण झाला. या अति घनदाट वनशेतीमुळे पाणलोट क्षेत्राचं स्पंजात रुपांतर झालं. झाडांचा पालापाचोळा काटक्या कुजून मऊ सुपीक मातीत रुपांतर झालं. त्यामुळे पडलेला प्रत्येक थेंब न थेंब त्या जमिनीत खोलवर जावून विसावत होता. त्यामुळे विहिरीचं पाणी आटणं बंद झालं.

२० मे १९९२ रोजी मी पुन्हा त्याच विहिरीत सूर मारु शकलो. अगदी सध्याच्या तीन वर्षांच्या भीषण अवर्षणात सुध्दा आमची विहीर भरलेली आहे. अंकोली शिवाराचा विचार केला तर एक मिलीमीटर पाऊस एका हेक्टरवर पडला तर १० लाख टँकर्स आमच्या गावाला दरवर्षी आकाशमार्गे येतात आणि पाणी ओतून जातात. एवढं पाणी आमच्या सर्व गरजांसाठी लागणार्‍या पाण्याच्या तिप्पट आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सरासरीनं आमच्या गरजापेक्षा चक्क तिप्पट पाऊस पडतो. कंटूर मार्कर तंत्रानुसार झाललं जलसंधारण परिसरातील पाण्याची पातळी वाढविणारं ठरलं. परंतू १९९५ पासून पुन्हा परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाली.

जल संकटाच वादळ पुन्हा घोघाऊ लागलं. आमच्या विहिरीचं पाणी पाहून पाणलोट क्षेत्रातल्या इतर खालच्या बाजूच्या शेजारच्या सर्व शेतकर्‍यांनी विहिरी खणण्याचा सपाटा लावला होता. एवढंच नव्हे तर विहिरींच्या तळात आणि कडेला आडवी बोअर्स केली गेली. जमिनीची अक्षरश: चाळण झाली. शक्तीशाली पाणबुडे पंप्स लावले गेले. पाण्याचा उपसा कित्येक पटीने वाढला. त्यात १९९८ च्या दुष्काळाची भर पडली. पाणी संपल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे शहराकडे स्थलांतर सुरु झाले. पश्चिमेकडे महत् प्रयासाने निर्माण केलेली वनराई कोरडी पडण्यास सुरुवात झाली. पाण्याअभावी जनावराचा मृत्यू झाल्याचं पाहावं लागलं. तेव्हा आम्ही कठोरपणे पाण्याचं ऑडिट करण्याचं ठरवलं.

पाण्याचा ताळेबंद :


मी पाण्याचे ताळेबंद मांडायला सुरुवात केली. डोळे पांढरे व्हायची वेळ आली. पाणी जातय कुठे? एका वर्षी तर सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला तरी पाणी टंचाई आहेच. अस का होतंय? आमच्या पाण्याच्या गरजा मोजायला सुरुवात केली. नीट मोजमापं केली. तेव्हा असं लक्षात आलं की आपण जी कृषि उत्पादनं शहरांकडे विक्रीसाठी पाठवितो तेव्हा प्रत्यक्षात पाणी निर्यात करतो. त्याला व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर असं नाव आहे. एक लिटर दुधासाठी दहा हजार लिटर पाणी म्हणजे साधारण एक टँकरभर पाणी आपण निर्यात करतो. चारा+ पशुखाद्य तयार करताना पाणी लागतं. एक अंड तयार होण्यासाठी ६०० लिटर पाणी लागतं. एक किलोग्रॅम मटण तयार होण्यासाठी ३५ हजार लिटर पाणी लागतं. एक किलोग्रॅम ज्वारीसाठी ६००० लिटर तर एक किलोग्रॅम साखरेसाठी ४००० लिटर पाणी लागतं. हे एक अपचनीय वैज्ञानिक सत्य आहे. आमच्या पाणलोट क्षेत्रातून नव्हे तर आमच्या गावातल्या सर्व पाणलोट क्षेत्रांमधून ही उत्पादने घेतली जातात.

तृणधान्ये,कडधान्य,तेलबिया, भाजीपाला, फळफळावळ, साखर अशी वनस्पतीजन्य दूध, अंडी, मांस,कातडी, लोकर अशी प्राणीजन्य उत्पादने होतात ती बाजारपेठांसाठी शहरांची/महानगरांची वाट धरतात. उदा. एक लिटर दूध अंकोलीहून सोलापूरला जाते. त्यावेळी चक्क पाण्याचा एक टँकरच रस्त्याने जणू सोलापूरकडे जातो. म्हणजे पाणी चढाकडून उताराकडं वाहतं हा निसर्गनियम आहे. परंतु पाणी शिवाराकडून शेतीमधून शहराकडे, महानगराकडे तिथून परदेशातही वाहून जातं हा लुटारु बाजारपेठांचा आणि विकास नितीचा नियम आहे. शहरातील उच्च मध्यमवर्गीय परिवार एक दिवसासाठी जेवढं पाणी वापरते त्यापैकी मोठा हिस्सा ग्रामीण भागाकडून आलेला असतो. खोलवरचं पाणी उपसून बाजारपेठांच धन वाढतय. शहरीबाबूंच्या पगाराच्या वाढीच्या दरापेक्षा शेतीमालाचे दर वाढीचा वेग अत्यंत कमी. त्यामुळे शेतकरी मात्र कायम दारिद्रयरेषेखाली.

वॉटर बँक :


आम्ही शहरी बाजारपेठांशी असहकार करण्याचं ठरवलं. पाण्याचा एक थेंब देखील शहरांकडे निर्यात करायचा नाही असा निर्धार केला. आम्ही अंकोलीच्या विज्ञानग्रामात २१ व्या शतकातील स्वावलंबनाच्या दिशेनं खडतर वाटचाल सुरु केली. त्यासाठी शहराकडून स्वत:हून शिवाराकडे परत फिरु इच्छिणार्‍या ५० कुटुंबासाठीची स्वावलंबी रुरल+अर्बन =रुरबन वसाहतीची योजना बनविली. त्या वसाहतीमध्ये सर्व पायाभूत सोयी विकसित केल्या.ग्रीनएनर्जी बँक,निमल बँक,बी-बियाणं, रोपं यांची बँक/नर्सरी , स्क्रॅप बँक अशा बँका/पतपेढ्या निर्माण केल्या. त्यातली सर्वात महत्वाची होती ती वॉटर बँक. पाणलोटक्षेत्रातच खोदकाम करण्यात आलं. प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात २००० घन मीटर पाण्याची श्वावती निर्माण केली. या वॉटर बँकेची मालकी आणि व्यवस्थापन विज्ञान ग्रामातील स्त्रियांचचं असेल. सौ.सुमंगला देशपांडे यांनी ही संकल्पना पूर्ण विकसित केली आहे. ५ कोटी लिटर क्षमतेच एक प्लास्टीक जिओमेंबरेनयुक्त प्रचंड जलाभेद्य तळं म्हणजे बँकेची तिजोरी. भीमा-सीना नदीच्या खोर्‍यात साधारण पन्नास एकरमध्ये ही वॉटर बँक निर्माण करण्यात आली आहे.

जमीनीपासून पाच मीटर उंच आणि तीन मीटर खोल असलेल्या या वॉटरबँकेसाठी साधरणपणे दोन लाख स्क्वेअर फूट प्लास्टिक वापरण्यात आलं. सन २००२ मध्ये वॉटर बँकेची उभारणी झाली. सुमारे ७० लाखाच्या आसपास खर्च आला. अंकोली परिसराचे सरासरी पर्जन्यमान ५०० मिलीमीटर आहे. परंतू बाष्पीभवनाचे प्रमाण आहे ते २५०० एमएम. पावसाळ्यानंतर साधारण दोन-तीन महिने विहिरींमध्ये पाणी असतं. यापैकी किमान दहा टक्के म्हणजे साधारण तीस कोटी लिटर पाणी डिपॉझिट व्हावं अशी अपेक्षा होती. त्यासाठी दुष्काळी परिस्थितीत टिकाव धरणार्‍या वृक्षराजींची लागवड पुन्हा वॉटरबँकेच्या सभोवताली करण्यात आली. कुजलेल्या पालापाचोळ्याचा थर वाढला. पाण्याचा प्रत्येक थेंब तिथेच जिरण्यास सुरुवात झाली. दाटवृक्षराजींमुळे उष्ण वार्‍यांचा वेग मंदावला. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली. पाणलोटक्षेत्र वाटेहिस्स्यामध्ये विभागलेलं होतं. सर्वांच प्रबोधन झाल्यानंतर पुन्हा समतलचर पध्दतीची अमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे नैसर्गिकपध्दतीने वॉटर बँकेत पाण्याचे साठवण होतेच. शिवाय वॉटर बँकेचे सदस्य त्यांच्या पंप आणि पाईपलाईन्सच्या माध्यमातून या बँकेत पाणी जमा करतात, आणि गरजेच्या वेळी आवश्यतेनुसार पाणी वापरतात. एक मुख्य पाईप लाईन यासाठी आहे. जेवढं पाणी जमा केलं तेवढच पाणी उचलता येतं. ओव्हर ड्राप्ट सुविधा या वॉटरबँकेत नाही.

वॉटर बँकेतील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी काही कृत्रिम उपाय करण्यात येतात. या व्यतिरिक्त वॉटर बँकेतील पाण्याचं बाष्पीभवन कमी व्हाव यासाठी अरुण देशपांडे यांच्या एका मित्रांने उपलब्ध करुन दिलेला एक रासायनिक स्प्रे पृष्ठभागावर फवारण्यात येतो. वॉटर बँकेची फलश्रृती लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने आणि बँकांनी २५ नवीन वॉटर बँकेच्या उभारणीच्या प्रस्तावास अनुकुलता दर्शविली आहे. मात्र यासाठी एक अट आहे ती म्हणजे या वॉटर बँकांमुळे खेड्यातून शहराकडे जाणारे लोंढे थांबले पाहिजेत, आणि शहरात पोट भरण्यासाठी गेलेले तेथे नदी नाल्यांकाठावर गलिच्छ वस्त्यांमध्ये राहणा-या कामगारांची घरवापसी सुरु झाली पाहिजे. वॉटर बँकेचे व्यवस्थापन दहा महिलांनी एकत्र येऊन गट स्थापन करण्याचा ठरविले तर सबसिडी देखील आहे. अर्थात हे पाणी पुन्हा महानगरांमधील वॉटर फूट प्रिंट सर्वाधीक असलेल्या लाडावलेल्या श्रीमंतासाठी कृषी उत्पादनांच्या माध्यमातून निर्यात होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्व खटाटोप रिव्हर्स मायग्रेशनसाठी ...

शहरांकडून ग्रामीण भागाकडे अशा रिव्हर्स मायग्रेशनसाठी मी अत्यंत आग्रही आहे. अशा पध्दतीने परत येऊ इच्छिणार्‍या १०० कुटुंबांची सोय आमच्या शेतात उभारण्यात आलेल्या रुरबन गावठाणात होऊ शकते. आम्ही बाजारपेठांवर अवलंबून राहू इच्छित नाही. आमच हे गावठाण स्वयंपूर्ण असेल. आमच्या अन्न,ऊर्जा, निवास आणि पाण्याच्या गरजा येथेच भागविण्याची सोय असेल. एका सभासद कुटुंबाला २००० चौ.फुट पाण्याचा पृष्ठभाग,२५ फुट खोल पाण्याच्या पृष्ठभागावरची तरंगती शेती, मत्स्य शेती, तरंगती घरं, तरंगती ग्रीन हाऊसेस बनविता येतात. वॉटर बँकेच्याच बांधावरती २००० चौफुट जागा सुंदर टुमदार लेक व्हयू घरासाठी, शिवाय बांधाच्या पोटात गुहे सारखं घुमटाकार मातीच घर बनविता येतं. वॉटर बँकेच्या पाण्यातून हवा घेऊन ते सहज एअरकंन्डीशनही करता येतं. याशिवाय प्रत्येक सभासदाला १६००० चौ फुटाची म्हणजे १६ गुंठ्यांची परसबाग करण्यासाठी अत्यंत सुपीक जमीन देण्यात येते. त्या परसबागेला आम्ही फोटोट्रॉन बाग असं वैज्ञानिक नाव दिले आहे. ३००-३५० प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात येते.

अंकोलीचे जल तीर्थ स्थळ :


रुरबन वसाहतीचा पाया असलेली वॉटर बँक निर्माण करण्यासाठी आता स्त्रियांनी पुढ यायला हवं. कारण दुष्काळात सर्वात जास्त होरपळ त्यांचीच होते. त्यासाठी प्रत्येक ग्रामीण स्त्रीला किमान १००० ते २००० घनमीटर पाणी वर्षाला तिचा जन्मसिध्द अधिकार आहे. म्हणून तिच्या आधारकार्डवर प्रिंट होऊन मिळायला हवा. किमान एवढे तरी पाणी स्त्रीधन म्हणून समजण्यात यावे. पाणी राखून ठेवण्यात यावे. निरनिराळ्या पाणलोट क्षेत्रात जमीनीची तुकडेजोड देवघेव इत्यादी मार्गानी १० एकर २० एकर अशा वॉटर बँका, परसबागा व्हाव्यात. त्याच सर्व तंत्रज्ञान आज आमच्या अंकोलीच्या विज्ञान ग्रामात उपलब्ध आहे. त्याच प्रशिक्षण देखील उपलब्ध आहे. मात्र कोणत्याही वर्षी कोणत्याही मार्गाने गावात पाणी आलं की प्राधान्यक्रमाने प्रथम या जलाभेद वॉटर बँका भरुन घेण्यात याव्यात. मग ते जलयुक्त शिवार योजनेतलं पाणी असो नाहीतर पावसाचं. कालव्याचं असो. कोणत्याही पाण्यावर पहिला हक्क फक्त स्त्रियांच्या वॉटर बँकाचाच असावा. महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत या वॉटर बँकेतील एक थेंबही पाणी बाजारपेठेसाठी तयार होणा-या शेतीसाठी होता कामा नये. एक थेंबही शहरांकडे,महानगरांकडे वाहून जाता कामा नये. हे पाणी त्या स्त्रियांच्या घरगुती वापरासाठी सदाहरीत परसगागासाठीच मोजून मापून वापरले गेले पाहिजे. त्यातून त्या स्त्रीयांना जलसुरक्षा, अन्नसुरक्षा, चारा सुरक्षा, सरपण सुरक्षा खात्रीची मिळाली पाहिजे. वॉटर बँकांचं व्यवस्थापन स्त्रियांच्या हाती सुरक्षित राहील यात शंका नाही, अशी खात्री देशपांडे दांम्पत्यास आहे.

अंकोलीच्या भूमीत साकारलेल्या आगळयावेगळया प्रयोगाची प्रचिती प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय येणार नाही. एका लेखात समाविष्ट होणारे हे काम नाही. इच्छुकांनी अरुण देशपांडे यांच्या ९८२२१७४०३८ या भ्रमणध्वनीवर आधी संपर्क साधावा. एकदा अवश्य भेट द्यावी असे हे अंकोलीचे आधुनिक जल तीर्थ स्थळ पंढरपूरपासून अवघ्या तीस किमीअंतरावर आहे. येथील स्थानपुरुष कमरेवर हात ठेऊन उभा नाहीये. तो नजिकच्या भविष्यकाळाशी सुसंगत गावठाणाची निर्मिती करण्यात अहोरात्र व्यस्त आहे, आपल्या सहचारिणीसह.

श्री.संजय झेंडे , मो : ०९६५७७१७६७९

Disqus Comment