श्री. मुकुंद धाराशिवकर : बहु आयामी व्यक्तिमत्त्व


भारतीय जल संस्कृतीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर व मंजु गुप्ता फाउंडेशनचे श्री. रावसाहेब बडे यांनी जलसाहित्य संमेलन धुळे येथे घेण्याचे ठरविले व श्री. मुकुंद धाराशिवकर यांनी केलेल्या जलव्यवस्थापना संबंधीच्या कार्याचा या संमलेनात पूर्ण आढावा होईल व त्यांच्या स्मृती पुन्हा जागृत होऊन धुळे शाखा पुन्हा एकदा उभारिस लागेल व पाणी याविषयी जनजागृती कार्य त्यांच्या हातून घडेल यामुळे मी धुळे शाखेचा सक्रेटरी या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो.

श्री. मुकुंद धाराशिवकर ऊर्फ दादा हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. एक लेखक, एक कुटुंबवत्सल मनुष्य, एक कुशल संघटक, एक सच्चा मित्र, एक हुषार तल्लख बुद्धिमत्तेचा अभियंता इ. त्यांच्या जीवनाच्या अनेक बाजू होत्या. त्यांच्या स्वभावात एक विशेष गुण होता. कोणतेही काम हाती घेतले तर त्या कामाप्रती असलेली निष्ठा प्रकर्षाने दिसून येत असे. मग तो विज्ञान प्रसाराचा विषय असो वा सर विश्वेश्वरैयांचे स्मारकाच्या उभारणीचा प्रश्‍न असो. तापी खोरे गॅझेटियर निर्मितीचा ध्यास, कथा, कादंबर्‍या, नाटक इ. लेखनाचा विषय असून देत. प्रत्येक ठिकाणी झोकून देत काम करण्याचा त्यांचा स्थायीभाव होता. विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, संस्कृत, प्राचीन वास्तुशिला ही त्यांच्या आवडीची क्षेत्रे होती. याशिवाय अध्यात्मिक ग्रंथ, वेद, उपनिषदे इ. चे त्यांचे वाचन प्रचंड असे होते.

श्री. धाराशिवकर यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार म्हणून ३८ वर्षे व्यवसाय करुन वयाच्या ६० व्या वर्षी स्वेच्छेने निवृत्ती घेतली आणि यापुढे सामाजिक विकासाची कामे करायचे असे ठरविले. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरवातही केली. निवृत्तीनंतर विज्ञानाचा प्रसार व प्रचार, पाणी प्रश्‍नासंबंधी मुलभूत अभ्यास, लोकजागृती आणि लोकसहभाग इत्यादीसाठी लेखन व प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. या प्रयत्नातूनच धुळे जिल्ह्यातून व आजूबाजूच्या परिसरातून योग्य लेखकांची निवड करुन ‘समर्थ धुळे जिल्हा २०२०‘ वेध उद्याचा विकासाचा खंड १ व २ तसेच सन २०१३ मध्ये प्रगतीच्या पाऊलवाटा भाग १ व २ अश्या महत्त्वपूर्ण खंडाची निर्मिती केली व त्याचा फायदा भविष्यातील संशोधकांना व अभ्यासकांना निश्‍चितच होणार आहे व होत आहे. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबर्‍यांपैकी तीन कादंबर्‍यांना पारितोषिकेही मिळाली आहेत. पाण्याच्या उपलब्धतेवरच सर्व सजीवांचा विकास अवलंबून असल्याचे त्यांना कळल्याने त्यांनी पाणी व पाणी व्यवस्थापनासंबंधी जवळपास १० ते १२ पुस्तके लिहिली.

यात तुमचे आमचे पाणी, पाण्याच्या भारतीय परंपरा, प्राचीन ग्रंथातील पाणी, पाणी तुमच्या शेतात इ. त्यांची पुस्तके भविष्याच्या पाण्यासंबंधी नियोजनासाठी व संशोधनासाठी उपयुक्त ठरत आहेत. म्हणूनच त्यांना खान्देशातील ज्येष्ठ जलतज्ञ अशी संबोधने जोडली गेलेली आहेत. विशेषत: खान्देशाबद्दल त्यांना खडानखडा माहिती प्राप्त होती. याच माहितीच्या आधारावर त्यांनी खान्देशतील अनेक संशोधक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या संशोधन कार्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यात माझाही प्रत्यक्ष संबंध एम. फिल व पीएच. डी करताना मी स्वत: व माझा पीएच. डी. विद्यार्थ्याने अनुभवला आहे. ही सर्व कामे ते हसतखेळत, बारकावे शोधून करीत होते. गरज भासल्यास आपली वैयक्तिक ग्रंथालयाचा वापरही करण्याची मुभा संशोधकाला होती. अश्या त्यांच्या स्वभावामुळे अनेक माणसे जोडली गेली व ह्याच लोकांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील कल्पना सत्यात उतरविण्याचे कार्य केले.

धाराशिवकर ह्यांचा स्वभाव न थकणारा, अखंडपणे काम करणे, कामाचा तगादा लावणे, सातत्याने नवनविन कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सतत प्रयत्न करणे व त्या अंमलात आणण्यासाठी येतील त्यांना सोबत घेणे या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी भारतीय जल संस्कृती मंडळ धुळे शाखेने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अनेक योजना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केले आहेत. २४ ऑक्टोबर २०१२ रोजी धुळे शाखेची स्थापना झाली. त्यानंतर मात्र त्यांची कामे जोरदार वेगाने होऊ लागली. सन २०१२-१३ या वर्षी पाण्याच्या संदर्भात काम करण्यास सुरुवात केली व धुळे शाखेने लोकांना काहीतरी उपयोगी पडेल या उद्देशाने शि. वि. प्र. संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे, ग्रामपंचायत, सरपंच, पदाधिकारी व नागरिक, नवकार ग्रुप, वसुधा धुळे इत्यादींचा सहभाग ह्या कार्यानुभवाच्या कामात लाभलेला आहे. ही कार्यशाळा धुळ्याच्या एम. आय. डी.सीच्या मागील बाजूला लळींगच्या डोंगराच्या पायथ्याशी दिवाणमळा या गावाच्या परिसरात घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने लळींगच्या डोंगरातून निघणारे दोन छोटे ओहोळ अडवून, त्यावर गॅबीयन पद्धतीने दोन बंधारे बांधण्याचे कार्य पूर्ण केले.

पर्यावरण संरक्षण म्हणजे नक्की काय ? व ते कसे करावे ? हा विषय महाविद्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न ठेवता अश्या प्रकारची जागा निवडून प्रबोधनाला प्रत्यक्ष कार्यानुभवाची जोड देत ही एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अश्याप्रकारे विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व त्यातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टाकलेले एक छोटेसे पण अत्यंत महत्त्वाचे पाऊल धाराशिवकरांच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे सफल झाले. विशेषत: हे काम कोणत्याही पैशाशिवाय केले गेले. फक्त मदतीद्वारेच काम केले गेले. सदर गॅबीयन पद्धतीच्या बंधार्‍यामुळे निश्‍चितच दिवाणमळा परिसरात भविष्यात पाण्याची पातळी वाढण्यास व पाण्याबद्दलाची जनजागृती विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच या कामात सहभागी होणार्‍या अनेक संस्थामध्ये घडून आली.

जलव्यवस्थापनासंबंधी त्यांचे कार्य पुढे त्यांनी न थकता चालू ठेवले. पुढे सन २०१३-१४ मध्ये धुळे शाखेने अनेक उपक्रम हाती घेतले. धाराशिवकरांनी त्यांच्या परिचयाच्या अनेक संस्थांना हाताशी धरुन पाणी बचतीकरीता विद्यार्थ्यांना सक्रीय करण्यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत २८ शाळांमधून एकूण ७० शिक्षकांनी सहभाग नोंदविला. तसेच ५० पोस्टरांचे पाण्याशी संबंधीत चित्र प्रदर्शन घडवून आणण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसर्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यशाळेस वेगवेगळे जलतज्ञ बोलविण्यात आले व त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. जसे की, श्री. सुरेश खानापूरकर, सौ. भतवाल, डॉ. दि. मा. मोरे, अध्यक्ष सिंचन सहयोग, डॉ. दत्ता देशकर, डॉ. नेवाडकर इ. सुमारे ६० ज्येष्ठ नागरिक त्या कार्यशाळेला उपस्थित होते. याशिवाय पाणी प्रश्‍न आणि विद्यार्थी या विषयावर श्री. धाराशिवकर यांनी एस. एस. व्ही. पी. एस. संस्था धुळे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. त्यात जवळपास १०० विद्यार्थ्यांपर्यंत पाण्ी प्रश्‍न पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले.

भारतीय जलसंस्कृती मंडळ, धुळे शाखेच्या वतीने दोंडाईचा येथे ‘जैव विविधता‘ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यशाळेला १७५ सदस्यांनी सहभाग नोंदविला. पाण्याशी संबंधीत पाणी बचतीच्या संदर्भातील ५०० विद्यार्थ्यांना पासबुक वाटण्यात आले होते. राज्य शासनाने प्रवरा खोरे विभागाचे गॅझेटियर प्रकाशित केले होते. या संकल्पनेतूनच धाराशिवकरांना तापी खोरे गॅझेटियर निर्मितीच्या संकल्पनेने झपाटले होते. त्यासाठी भारतीय जलसंस्कृती मंडळ धुळे शाखेच्या अनेक बैठकीच्या माध्यमातून, लोकसहभागातून गॅझेटियर सदृश्य ग्रंथांची निर्मिती करावी असे ठरविण्यात आले. त्यासाठी धुळे व नंदुरबार तसेच आजूबाजूच्या परिसरातील नामवंत व संबंधीत विषयाशी संलग्नीत असणार्‍या अश्या एकूण २७ लेखकांची टिम कार्यान्वीत करण्यात आली. त्यांनी केलेला शासन स्तरावरील पत्रव्यवहार, धुळे व नंदुरबार येथील लेखकांशी व्यक्तीगत पातळीवर संवाद साधून योग्य ती जबाबदारी सोपविण्यात आली. वयाची सत्तरी ओलांडलेल्या या माणसास उत्साहाने, कामाच्या सुबद्ध नियोजनाचे व सातत्याने पाठपुरावा करत राहण्याचे कसब इत्यादी गोष्टीतून त्यांनी त्यांचे कार्य सातत्याने सुरु ठेवले.

याशिवाय त्यांनी अनेक पाण्याशी, पर्यावरणाशी संबंधित परिषदा मध्ये हजेरी लावून आपला कार्यभाग चालू ठेवत पाणी या प्रश्‍नाविषयी जेथेही विचारमंथन होई तेथे धाराशिवकर हजर नसतील असे होणे शक्य नव्हते. फक्त हजर न राहता आपले मत मांडीत. सिंचन सहयोग यासाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणून कार्यभार पाहिला. नुकत्याच ‘शोधवेध‘ या भांडारकर पब्लिकेशन, धुळे यांच्या मासिकाचे ते मुख्य संपादक म्हणून यशस्वी भूमिका साकारली. त्यांचे पांझरा बारमाही प्रकल्प धुळे जिल्हा यामध्ये ते तज्ञ सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांची भूमिका धुळे जिल्ह्यातील नागरिक कधीही विसरु शकणार नाहीत. अनेकदा वर्तमान पत्रात अनेक विषयावर लेख लिहून लोकांना विविध माहिती उपलब्ध करुन देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे. त्यांचे पाणी व्यवस्थापनासंबंधीचे कार्य ते अगदी लिलया पद्धतीने पार पाडीत होते. याशिवाय ते इतर अनेक संस्थांच्या प्रमुख पदांचे कार्य कसोशिने कारणी लावत होते.

भारतीय जल संस्कृतीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर व मंजु गुप्ता फाउंडेशनचे श्री. रावसाहेब बडे यांनी जलसाहित्य संमेलन धुळे येथे घेण्याचे ठरविले व श्री. मुकुंद धाराशिवकर यांनी केलेल्या जलव्यवस्थापना संबंधीच्या कार्याचा या संमलेनात पूर्ण आढावा होईल व त्यांच्या स्मृती पुन्हा जागृत होऊन धुळे शाखा पुन्हा एकदा उभारिस लागेल व पाणी याविषयी जनजागृती कार्य त्यांच्या हातून घडेल यामुळे मी धुळे शाखेचा सक्रेटरी या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण श्री. धाराशिवकर यांच्या जाण्याने उत्साहाचा झरा लुप्त झाला होता. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील, देशातील दुष्काळी भागाच्या परिवर्तनासाठी केवळ चिंतन नव्हे तर प्रयोगशिलतेची जोड देण्याची आस धरणारा एक कृतीशील विचारवंत जाण्याने जी पोकळी निर्माण झाली होती त्यास उभारी लागेल व नवीन ऊर्जा मिळेल. परंतु असे खचून न जाता त्यांनी सोपविलेली सर्व प्रकारची कामे पुढे नेण्याचे कार्य करण्याचे भारतीय जलसंस्कृती मंडळ धुळे शाखेने ठरविले आहे. असे मी सेक्रेटरी या नात्याने जाहीर करीत आहे व हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मला व माझ्या सहकार्यांना वाटते.

प्रा. डॉ. संजय पी. पाटील, धुळे - मो. ९४२१४ ३७५७०

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading