वारसा पाण्याचा - भाग 10

31 Dec 2015
0 mins read

नदीतील, नाल्यातील वाहत्या पाण्याला अडसर निर्माण करून तलावाच्या व बंधाऱ्यांच्या स्वरूपात नदी आणि नाल्याच्या पात्रामध्ये साठवणूकीची श्रृंखला निर्माण करण्याचे हे तंत्र अनेक ठिकाणच्या इतिहासकालीन व्यवस्थेमधून दिसून येते. आज आपण कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची श्रृंखला निर्माण करत आहोत. देवगिरीच्या परिसरात मातीच्या तलावाची श्रृंखला (सूर्य तलाव, चंद्र तलाव इ,) दिसून येते. या डोंगरी किल्ल्याच्या पायथ्याशी, निर्माण केलेल्या भूईकोट किल्ल्याच्या शेवटच्या खंदकाचा वापर बंधाऱ्याची मालिका निर्माण करून पाणी साठविण्यासाठी केलेला दिसून येतो.

नदीतील, नाल्यातील वाहत्या पाण्याला अडसर निर्माण करून तलावाच्या व बंधाऱ्यांच्या स्वरूपात नदी आणि नाल्याच्या पात्रामध्ये साठवणूकीची श्रृंखला निर्माण करण्याचे हे तंत्र अनेक ठिकाणच्या इतिहासकालीन व्यवस्थेमधून दिसून येते. आज आपण कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची श्रृंखला निर्माण करत आहोत. देवगिरीच्या परिसरात मातीच्या तलावाची श्रृंखला (सूर्य तलाव, चंद्र तलाव इ,) दिसून येते. या डोंगरी किल्ल्याच्या पायथ्याशी, निर्माण केलेल्या भूईकोट किल्ल्याच्या शेवटच्या खंदकाचा वापर बंधाऱ्याची मालिका निर्माण करून पाणी साठविण्यासाठी केलेला दिसून येतो. हे सर्वच बंधारे चुन्यात व दगडी बांधकामात केलेले आहेत. यातील गंमतीचा भाग म्हणजे या बंधाऱ्यांना आतल्या बाजूला (u/s) उतार आहे आणि खालच्या बाजूला (d/s) भिंत उभी आहे व ogee - shape दिलेला दिसत नाही. असाच प्रकार त्याकाळच्या दगडी बंधाऱ्यांच्या बाबतीत (लाहूकी बंधारा) पण दिसून येतो. बंधाऱ्याची उंची तीन ते चार मीटर पर्यंत आहे. Ogee नसतांना पण बंधाऱ्यांचे नुकसान झालेले नाही असे दिसून येते.

नळदूर्गच्या जलमहालाची रचनासुध्दा अशाच प्रकारची आहे. या जलमहालाच्या खाली खंदकामध्ये म्हणजेच बोरी नदीच्या प्रवाहात दगडी बांधकामात बंधारे निर्माण केले असल्याचे आपणास आजसुध्दा त्यांच्या अस्तित्वावरून दिसून येते. औरंगाबाद येथे पण सातवाहन कालीन तलाव (राजतडाग) आहे. या तलावाच्या खाली खांब नदीवर हिमायत बागेच्या काठाने अशाच प्रकारचे दगडी बंधारे एकाखाली एक याप्रमाणे निर्माण केलेले आहेत. तुंगभद्रा नदीचे पात्र तर अशा बंधाऱ्यांच्या श्रृंखलेचे आगर आहे असे म्हणले तर अतिशयोक्ती होवू नये. या बंधाऱ्याच्या मालिकेतूनच हंपीला वैभवाचे स्वरूप मिळवून दिले आहे. देशभरातील तलाव मग ते मातीचे असोत वा दगडी बांधकमात असोत ते एका श्रृंखलेच्या स्वरूपात आपणास दिसतात. रामटेक जवळ एकाखाली एक असे सात तलाव आपणास पहावयास मिळतात. विदर्भामध्ये हीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे तलावाची व बंधाऱ्याची श्रृंखला निर्माण करण्याचे पारंपारिक कौशल्य आपल्या समाजाने पूर्णपणे आत्मसात केलेले होते असेच म्हणावे लागेल. या सर्व बंधाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सिंचन राबविले जात असे, आज पण अनेक ठिकाणी त्याचा वापर केला जातो. इतिहासकालीन फड सिंचन पध्दत ही नद्यांवर बांधलेल्या श्रृंखलेवरच उभारलेली आहे. तापी नदी खोऱ्यात सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी या पध्दतीचा विस्तार झाला. आजसुध्दा शंभरएक बंधारे या सिंचन पध्दतीवर कार्यरत आहे.

नदीवर बंधारे बांधून कालव्याद्वारे पाणी दूर अंतरापर्यंत नेणे काही वेळा कठीण होत असे. कारण जमिनीचा चढ उतार अनुकूल नसतो. अशा वेळी पृष्ठभागावरून उघडा कालवा बांधण्याऐवजी पृष्ठभागाखालून तो मऊ मातीत कोरून चार पाच कि.मी अंतरावर पाणी वाहून नेण्याची व त्यातून सिंचन वाढविण्याची उदाहरणे आपणास बऱ्याच ठिकाणी दिसतात. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सोमपूर येथे जायखेडा फड पध्दतीचे बंधारे हे याचे उत्तम उदाहरण आहे. विजापूरच्या किल्ल्यामध्ये सैन्याच्या हालचालीसाठी त्या काळी जवळ जवळ वीस ते बावीस किलोमीटर लांबीचा बोगदा खोदल्याचे व तो सध्यापण अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. त्याचा काही भाग आपणास आज पण पहावयास मिळतो. तो बोगदा सरळ रेषेत नाही. अनेक भुईकोट किल्ल्यातून भुयारी मार्ग काढल्याच्या नोंदी इतिहासामध्ये मिळतात. कठीण खडकातून नव्हे तर मऊ मातीतूनसुध्दा भुयारी मार्ग खोदून त्या समाजाने अभियांत्रिकी क्षेत्रात भरारी मारली होती हेच यातून दिसते. देवगिरी किल्ल्याच्या गिरीदुर्गावर जाण्यासाठी प्रवेशद्वारावर असाच खडक कोरून अतिशय दुर्लभ व अवघड मार्ग केलेला आपणास आज पण पहावयास मिळतो.

देशभरात अनेक ठिकाणी विकसित झालेल्या गुंफा किंवा लेणी ही भूगर्भशास्त्रातील त्या काळातील कौशल्य दर्शविते. जपान मधील टोकीओ शहर अर्धे जमिनीच्या खाली आहे. ते पण मातीत आहे. जपान मधील हा विकास अलिकडच्या काळातील आहे. त्याच्यापूर्वी भारतात वर उल्लेखिल्याप्रमाणे भुयारी मार्ग निर्माण करण्याचे तत्व उत्तमपणे राबविलेले दिसते. औरंगाबाद हे शहर तर कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते. भूमिगत कालवे खडकात खोदलेले आहेत, कोरलेले आहेत. या कालव्याचा आकार साधारणत: 1.2 मीटर ज्र् 2 मीटर असा आहे. ज्या ठिकाणी खडक अस्थिर आहे त्या ठिकाणी या कालव्याला दगडी अस्तरीकरण दिलेले आहे. कालव्यामध्ये गाळ आहे काय याची तपासणी करण्यासाठी एका लहानशा घोड्यावर बसून माणूस कालव्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तपासणी करीत जावू शकेल अशी व्यवस्था निर्माण केल्याचे आपणास दिसून येते. भूमिगत कालव्याचे असेच एक वैशिष्ट्यपूर्ण जाळे तापी खोऱ्याच्या काठावर बुऱ्हाणपूर शहरामध्ये आपणास दिसून येते. अमृतसर शहरात तलावाला जे पाणी आणलेले आहे ते पण जुन्या काळात भूमिगत नहरीद्वारेच रावी नदीचा प्रवाह वळवून आणले गेल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी त्याच्या खाणाखुणा, अवशेष आपणास पहावयास मिळतात.

भूस्तर कठीण असो वा मऊ असो तो पाहिजे त्या आकाराचा कोरणे आणि त्यातून पाणी वाहून नेण्याच्या व्यवस्था निर्माण करणे हे कौशल्य त्या समाजाच्या अंगवळणी पडलेले होते असेच म्हणावे लागेल.

यापूर्वीच्या विवेचनामध्ये आपणास असे दिसून आले आहे की, पाण्याने भरलेला खंदक हा भुईकोट किल्ल्याचा आधार आहे. चोहोकडून पाणी आणि आत किल्ल्याच्या स्वरूपात शहर आणि त्यातून पाण्याची विपुलता हे सूत्र आपणाला यातून दिसून येते. त्या काळातील कल्पकता याच्याही पलिकडे गेलेली होती. तलावामध्येच किल्ला असे पण प्रयोग त्यांनी अनेक ठिकाणी केलेले आहेत. सोलापूरचा चालुक्यकालीन किल्ला हा सिध्देश्वर तलावात बांधलेला आहे. किंबहुना तलाव निर्माण करण्यासाठी जो खडक खोदला गेला त्या खडकातून किल्ल्याचे बांधकाम केले आहे असेही म्हणता येईल. किल्ल्याची भिंत म्हणजेच तलावाची भिंत आहे. तलावाचे दोनही बाजूचे सांडवे म्हणजेच किल्ल्याच्या खंदकामध्ये पाणी ओतणारे कालवे आहेत. या किल्ल्यामध्ये सुंदर अशा बारवा आहेत. यातून किल्ला हा पिण्याच्या पाण्यामध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे. चंद्रपूर येथील गौंड राजाचा किल्ला रामाळा तलावामध्ये बांधलेला आहे. इराई नदीच्या उपनदीला अडवून तिच्या पाण्यातून तलाव निर्माण करून त्या नदीचे पात्र खंदकामध्ये घेवून हा किल्ला निर्माण करण्यात आलेला आहे. दिल्ली येथील तुघलक किल्ला हा तलावातच वसविलेला आहे व किल्ल्यात परत सात तलाव व अनेक विहीरी निर्माण केल्या आहेत. फत्तेपूर सिक्रीचा किल्ला पण तलावातच आहे.

बिदरचा किल्ला हा लाल खडकातील भुईकोट किल्ला आहे. जवळ जवळ 500 एकरात हा विस्तारलेला असावा. जवळपास नदी नाही. जांभ्या खडक तासून या किल्ल्याच्या भोवती तिहेरी खंदक (tripple moat) आहे. जगातील हे अशा प्रकारचे एकमेव उदाहरण असावे. याही पुढचा महत्वाचा भाग म्हणजे या खंदकाला पाणी किल्ल्यामध्येच निर्माण केलेल्या तलावाद्वारे पुरविले जात होते. या किल्ल्याच्या पाणलोट क्षेत्रात जो पाऊस पडतो तोच पाऊस या तलावाला पाणी देतो आणि तलाव खंदकामध्ये पाणी खेळवितो. वरंगलच्या किल्ल्याला मातीचा तट आहे, आणि हा तट म्हणजे तलावाची पाळ आहे. किल्ल्याच्या भोवती तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत. मध्य प्रदेश मध्ये भोज राजाची राजधानी धार ही होती. धारचा किल्ला हा पण तलावानेच वेढलेला आहे. चोहोकडून मातीची पाळ आणि एकाला लागून दुसरा तलाव अशी रचना आहे. जैसलमेर या बेंटोनाईट (bentonite) पिवळी माती वर वसलेल्या किल्ल्याभोवती पण सात तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यातील एक तलाव हा गढीसर या नावाने ओळखला जातो.

भुईकोट किल्ल्याला खंदक असतो. पण काही ठिकाणी शहरासाठी पण खंदक निर्माण केलेली उदाहरणे आपल्या डोळ्यापुढे आहेत. अक्कलकोट आणि मंगळवेढा ही ती ठिकाणे आहेत. बहुतेक ठिकाणी खंदक हे जवळपासची नदी वळवून पाण्याने भरले जातात. पण काही ठिकाणी किल्ले हे उंचावर असल्याने नदीचे पाणी खंदकामध्ये वळविता आलेले नाही. राष्ट्रकुटाची कंधार ही उपराजधानी (army headquarter). या ठिकाणी राष्ट्रकूट राजवटीत राजाने आपल्या मुलाचे नाव देवून एक मोठा तलाव निर्माण केला. त्या तलावाला जगतूंग समुद्र असे म्हटले जाते. या तलावाला तीन विमोचके (Outlets) आहेत. दोन सिंचनासाठी तर एक विमोचक तलावाच्या खालच्या बाजूच्या किल्ल्याच्या खंदकामध्ये पाणी पोहोचविण्यासाठी आहे. कंधारचा किल्ला हा मानार नदीच्या काठावर वसलेला आहे. मानार ही गोदावरीची उपनदी आहे. पण नदी खालच्या बाजूला आहे आणि किल्ला वरच्या पातळीवर आहे. खंदकाला पाणी पुरवठा करण्यासाठी तलावाची व्यवस्था त्या काळातील राजवटीने निर्माण केलेली दिसते. करमाळ्याच्या किल्ल्याची व्यवस्था पण अशाच प्रकारची आहे. सात विहीरीची विहीर व वरच्या भागात तलाव अशी ती रचना आहे आणि त्या तलावातील जास्तीचे पाणी हे करमाळा किल्ल्याच्या खंदकामध्ये खेळविलेले आहे.

बसवकल्याण ही कल्याणीच्या चालुक्याची राजधानी. या ठिकाणी पण एक उत्तम किल्ला आहे. हा किल्ला जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या काठावर आहे. पण किल्ला वरच्या भागात आहे. म्हणून नदीचे पाणी खंदकात वळविता येत नाही. या किल्ल्यापासून वरच्या भागात साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर सिंचनासाठी त्रिप्रांत (त्रिपूरअंत) या नावाचा तलाव बांधलेला आहे. विजयनगरच्या आणि त्यापूर्वीच्या राजवटीमध्ये दक्षिण भारतात जे असंख्य तलाव निर्माण झाले त्या तलावापैकी हा एक असावा. लाल मातीत (laterite) निर्माण केलेला हा तलाव आहे. तलावाखालची जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे. त्या काळात आणि आज सुध्दा हा भाग उत्तम प्रकारचा ऊस पिकविणारा आणि चवदार गुळ निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो. आज सुध्दा ती व्यवस्था कार्यरत आहे. बसवकल्याण हे राजधानीचे ठिकाण त्रिपुरांत या तलावाच्या लाभक्षेत्रात आहे. या तलावाचा उजवा कालवा सिंचन करीत थेट या किल्ल्याच्या खंदकामध्ये रिकामा होतो, आणि हा खंदक पाण्याने भरतो. हजारो वर्षांपूर्वी कालव्याच्या पाण्याचा वापर वेगवगेळ्या उपयोगासाठी कशा प्रकारे केला जात होता याचे आणखी एक प्रत्यंतर आपणास बसवकल्याण या ठिकाणी पहावयास मिळते. अशी किती तरी उदाहरणे देता येतील की ज्या ठिकाणी तलाव आणि त्याचे कालवे आणि त्यातून खंदकाला पाणी पुरवठा अशी साखळी निर्माण केलेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात वैरागड म्हणून भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याच्या खंदकातील पाण्याचा उपयोग खालच्या भागात भात शेती पिकविण्यासाठी केला जात होता व आहे. या ठिकाणी हा खंदक म्हणजे एक जुना तलाव असे समजून त्याला जुन्या पध्दतीने विमोचक (तुडूंब) बसविलेले आहे. ही कल्पकता वाखाणण्यासारखी आहे.

अक्कलकोट आणि मंगळवेढा या इतिहासप्रसिध्द शहरांनी पण खंदकाची व्यवस्था निर्माण केलेली आहे. अक्कलकोट या ठिकाणी लहानसा किल्ला आहे पण तो टेकडीवर आहे. बहामनी राज्याचा एक भाग म्हणजे बरीदशाही. तिचे राजधानीचे ठिकाण म्हणजे बिदर आणि या बिदरच्या बादशहाचा एक दुय्यम अधिकारी (Store keeper) म्हणजे मंगळवेढ्याचा दामाजीपंत. दुष्काळामध्ये माणुसकीला जागून मंगळवेढा या ठिकाणची धान्याची कोठारे लोकांना उघडे करून देणारा हा भला माणूस मंगळवेढा या ठिकाणचा आहे. अनेक कारणासाठी हे ठिकाणी प्रसिध्द आहे. या शहरामध्ये बारवा आहेत, विहीरी आहेत, तलाव आहेत आणि खंदक पण आहेत. खंदकाच्या माध्यमातून शहरामधील बारवांना, विहीरींना, आडांना पुनर्भरणाची सोय करण्याची कल्पकता या शहराच्या निर्माणकर्त्यांनी त्या काळी राबविलेली आहे असे यातून दिसून येते. सोलापूरचा किल्ला, करमाळ्याचा किल्ला, बिदरचा किल्ला यांची वर्णने यापूर्वीच आलेली आहेत.

या पूर्वीच्या विवेचनावरून आपणास असे दिसून आले आहे की, शहरे ही नदीच्या काठावर वसलेली होती आणि नदीतील पाणी हा त्या शहराच्या विकासाचा आधार होता. हे जरी खरे असलेे तरी बहुतांशी मोठ्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा नदीऐवजी अन्य साधनातून केला जात असे. दिल्ली शहराला यमुनेचे पाणी वापरले गेले नाही. यमुनेच्या कालव्यातून पाणी आणले. बुऱ्हाणपूर शहराला तापीमधून पाणी उचलले नाही. अशी अनेक उदाहरणे आपणास देता येतील. याला कारण त्या नदीच्या पाण्यातील अशुध्दता हे असावे. नदीचे वाहते पाणी हे पिण्यायोग्य नसते. इतिहासकाळात पण याची जाण होती आणि म्हणून त्या काळी लोकांनी जवळच्याच डोंगरातून जमिनीमध्ये मुरलेले, पाझरलेले व स्वच्छ झालेले (Filtered) पाणी नेमकेपणाने शोधून त्या ठिकाणाहून भूमिगत कालव्याद्वारे, नलिकांद्वारे शहरांमध्ये आणून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केलेला आहे. अशा कालव्यांना काही ठिकाणी नदी वा नैसर्गिक खोलगट भाग ओलांडावा लागतो. बऱ्याचशा ठिकाणी हे कालवे जमिनीखालून उटल्या वक्रनलिकेद्वारे (Inverted siphon) नेलेले आहेत. पण काही ठिकाणी हे अडचणीचे दिसून आले असावे, आणि त्या ठिकाणी त्यांनी जलसेतूचा वापर केला. जलसेतू म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेला पूल, असे म्हणण्यास हरकत नाही.

जगातील ज्या जुन्या संस्कृती आहेत, त्यामध्ये रोमन संस्कृतीचा उल्लेख आवर्जून केला जातो. जलसंधारणाचे काही अवशेष आज पण रोम शहरामध्ये पहावयास मिळतात. इटलीमधील रोम हे शहर टायबर या नदीच्या काठावर वसलेले आहे. त्या रोम शहराचा पाणीपुरवठा करणारी दोन मजली जलवाहिनी (Aqueduct) ही डोंगरातील झऱ्याचे पाणी रोम शहरासाठी वाहून नेणारा कालवा आहे. आज सुध्दा तो काही ठिकाणी दिसतो. यालाही मागे टाकेल असा जलसेतू खुद्द कोल्हापूर शहरात आहे. डोंगराच्या पोटात निर्माण होणाऱ्या कात्यायनी झऱ्याचे रूपांतरण लहानश्या नदीत झाल्यावर, त्या नदीला बांध घालून कोल्हापूरच्या वरच्या भागात कळंब नावाचा तलाव निर्माण करण्यात आलेला आहे. या तलावाचे पाणी भूमिगत कालव्याद्वारे कोल्हापूर शहरामध्ये खेळविलेले आहे. पाण्याचा खजिना म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रचंड अशा हौदास, हा ऐतिहासिक कालवा जोडला आहे. या जलसेतूला करवीर जलसेतू म्हणण्यास काही हकरत नसावी. इतिहासकरांनी याला नाव दिलेले नाही. हा जलसेतू कात्यायनी परिसरातील पाणी जलसेतूद्वारे कोल्हापूर शहरामध्ये आणून जनतेची तहान भागवित असे. त्या काळामध्ये आग्रा येथे एक जलसेतू निर्माण केलेला आहे. लोक ताजमहालला भेट देतात पण त्या ताजच्या विशाल परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या या जलसेतूकडे कोणाचेही लक्ष जात नाही. यमुनेतून पाणी उचलून ताज परिसरात या जलसेतूच्या माध्यमातून आज पण पाणीपुरवठा केला जातो. त्या काळी हत्ती, बैल यांच्या मदतीने यमुनेतून मोटेद्वारे पाणी उचलून या जलसेतूत टाकले जात असे. आज मोटेच्या ठिकाणी विजेवर चालणाऱ्या पंपाची व्यवस्था केलेली आहे.

पूरनियंत्रणासाठी जलाशये निर्माण केलेले देशातील एकमेव उदाहरण म्हणजे हैद्राबाद. शहराचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेली हिमायतसागर आणि उस्मानसागर ही दोन जलाशये. मुशी आणि तिची उपनदी इशा पुरामध्ये हैद्राबाद शहराला धोका निर्माण करत होत्या. त्यापासून संरक्षण करण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने सर विश्वैश्वरय्या यांच्या मदतीने पूरनियंत्रणाची व्यवस्था निर्माण केली. खास पूर नियंत्रणासाठी निर्माण केलेले असे दोनच तलाव आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. अलिकडच्या काळात या दोन तलावातून हैद्राबाद शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अंतर पंचवीस ते तीस किलोमीटर असावे. वाटेत अडथळे ओलांडण्यासाठी जलसेतू निर्माण करण्यात आले आहेत. या भागमती जलसेतूची रचनासुध्दा ताज वा करवीर या जलसेतूसारखीच आहे.

इजिप्तची राजधानी कैरो येथे नाईल नदीचे पाणी उचलून राजवाड्याला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था पण भव्य अशा जलसेतूच्या माध्यमातून केलेली आहे. रहाटगाड्याच्या सहाय्याने नाईलचे पाणी दगडी बांधकामावर आधारलेल्या कमानीच्या जलसेतूच्या वाहिनीतून (Duct) कैरो येथील राजवाड्याला आणि भोवतालच्या परिसराला पाणी पुरवठा केला जात असे. या वाहिनीचा आकार 1 मीटर X 1 मीटर असावा. हा जलसेतू आज सुध्दा भक्कम स्थिती आहे. या जलसेतूची निगराणी एक ऐतिहासिक वारसा म्हणून इजिप्त शासनाकडून केली जाते.

मांडवगड हा भोज राजाने निर्माण केलेला जगातील सर्वात मोठा वनातील गड असावा. जलव्यवस्थापनाच्या साधनाचे हे माहेरघर आहे. राणी रूपमतीची व मुघल सरदार बाज बहादूर याची कथा पण प्रसिध्द आहे. या ठिकाणच्या महालांना पण अशाच प्रकारच्या जलसेतूच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला गेला आहे. अठराव्या शतकात जपानमध्येसुध्दा अशाच प्रकारचे जलसेतू एका सरोवरातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेण्यासाठी बांधले गेले असल्याचे दिसून येते.

अगदी वेगळ्या प्रकारचे जलसेतू सांगली - मिरज या शहराच्या परिसरात पहावयास मिळतात. या दोन शहरांना बाजूच्याच डोंगरातून येणाऱ्या नाल्यावर बंधारे बांधून भूमिगत कालवे व नलिकेद्वारे पाणी आणलेले आहे. नाल्यावर जमिनीच्या खाली वाफा (Trough) बांधलेला आहे. या वाफ्याच्या (Trough) दोन्ही बाजूला जॅकवेल सारख्या विहीरी आहेत. या वेगळ्या प्रकारच्या बांधकामामुळे या वास्तूस जलसेतूसारखा आकार उपलब्ध झाला आहे. म्हणून याला भूमिगत जलसेतू असेच नाव दिले आहे. ज्या ठिकाणी एकाच बाजूला विहीर आहे त्या ठिकाणच्या जलसेतूला Single node underground aqueduct असे नामकरण केले आहे. या व्यवस्थेद्वारे शहरात पाणी आणले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था अप्रतिम आहेत व आज पण पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणच्या भूगोलाशी, मातीशी एकरूप होणाऱ्या अशा व्यवस्था आपणास अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. अशीच कालव्याची, नलिकांची व्यवस्था भोर, मांढरदेवी जवळील कोथळेवाडी या ठिकाणी आपणास पहावयास मिळतात. या ठिकाणचा पाणी पुरवठा आज पण या इतिहासकालीन जुन्या व्यवस्थेवरच बेतलेला आहे. कृष्णेवरील धोम जलाशयातून आणलेल्या शासकीय योजनेचे पाणी हे गाव वापरीत नाही (कारण ते तितके स्वच्छ नसते म्हणून).

या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते की, त्या त्या काळातील समाज व्यवस्थेने त्यांच्या अंगभूत कौशल्यातून, प्रतिभेतून, विवेकातून, अनुभवातून निर्माण केलेल्या अति उत्कृष्ट अशा कलाकृतींना आपल्या क्षेत्रातच बंदिस्त केले नव्हते. तर दळणवळणाच्या साधनाचा अभाव असतांनासुध्दा जगभरामध्ये त्याचे आदान प्रदान झाले होते. रोमचा जलसेतू, मांडवगडचा जलसेतू, जपानचा जलसेतू, ताजचा जलसेतू यामध्ये साधर्म्य दिसून येते. अशा साधनाचे त्या काळामध्ये तथाकथित स्वरूपात केलेले एकाधिकार नव्हते असेच म्हणावे लागेल. आजच्या काळामध्ये असे आदान प्रदान सहजासहजी होणे अडचणीचे ठरत असावे.

डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading