वारसा पाण्याचा - भाग 21

Submitted by Hindi on Tue, 01/03/2017 - 09:40
Source
जल संवाद

भविष्यकाळात पाण्यातून अधिकची समृध्दी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अधिकचे पाणी देणे सामाजिक दृष्ट्या न्याय्य ठरणार नाही. राष्ट्रालाही ते परवडणार नाही. पाण्याचे हक्क निर्माण होवू न देता कालव्याचे जाळे व पाण्याचा प्रवाह अखंड राहून शेवटच्या घटकापर्यंत ते पाणी कसे जाईल हे पहाणे गरजेचे आहे. आज कालव्यावर अतिक्रमण होत आहे. अनियंत्रित व्यवस्थेमुळे कालव्याच्या जमिनीपर्यंत घरे गेली. लहान शेतचार्‍यात गवत वाढले.

भारताच्या इतिहासात समृध्दीचे अनेक कालखंड स्पष्टपणे नजरेस येतात. त्यात तत्कालीन समृध्दीच्या व्यवस्था लोकप्रणीत पाण्याच्या सुयोग्य नियोजनावर व नियमांवर आधारित असल्याचे अनेक साहित्यिक व क्षेत्रिय पुरावे भारताच्या विविध प्रदेशात विद्यमान आहेत. काळाच्या ओघात या पुराव्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक क्षेत्रिय वास्तु आणि तत्संबंधित साहित्यिक माहितीचा बहुमूल्य ठेवा हळूहळू नामशेष होण्याच्या अवस्थेत आहे. एक मोलाचा ऐतिहासिक वारसा म्हणून या सर्वांचे जतन होणे आवश्यक आहे. त्या त्या कालखंडात हवामान, सामाजिक व्यवस्था, जीवन पध्दती यांचा जलविकास पध्दतीशी घट्ट असा संबंध राहिलेला आहे. या ठिकठिकाणी दिसणार्‍या पार्थिव सांगाड्यातून आजही भावी पिढीला मार्गदर्शक तत्वे उपलब्ध होवू शकतात. या वास्तू बोलतात, नव्या प्रश्‍नांची उत्तरे देतात.

आपण नेमके कोठे अडखळत आहोत हे पण सांगतात. गरज आहे ती त्याच्याकडे लक्ष देण्याची, ऐकण्याची, आदर ठेवण्याची, आपुलकी बाळगण्याची. मग निश्‍चित लाख मोलाचा ठेवा उलगडून समोर उभा ठाकतो. त्यातून आपल्याला भविष्यातील प्रश्‍नाचा वेध घेण्यासाठी ताकद मिळते. विशालकाय असा कावेरी वरील बंधारा असो, पाटण येथील अति सुंदर अशी बारव असो, तापी खोर्‍यातील सिंचनाची न्याय्य फड पधद्ती असो, भारतभर पसरलेल्या लाखो मानवनिर्मित तलावाची श्रृंखला असो. या सर्व व्यवस्थेला फार मोठा असा जनाधार मिळालेला होता. त्या त्या कालखंडातील राजाने या व्यवस्था निर्माण करण्यासाठी भले आर्थिक साह्य दिले असेल, प्रेरणा दिलेली असेल, गरजेचे प्रतिपादन केलेले असेल, पण एकूण समाजमन प्रेरित होवून स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी घेवून सामुहिक श्रम पणाला लावून लोककौशल्याला आवाहन करून अशा उल्लेखनीय अजरामजर राहणार्‍या, हजारो वर्ष टिकणार्‍या आणि अविरत पणे समाज व देश समृध्द व बलवान करणार्‍या व्यवस्था त्यांनी लोक शक्तीतून निर्माण केल्या.

अशा तर्‍हेने चिरकालीन टिकणार्‍या व्यवस्था निर्माण केल्यानंतर त्यांची पूर्णपणे जपणूक करून, त्याची योग्यपणे हाताळणी करून, त्यांच्याकडून अपेक्षित लाभ पण वर्षानुवर्षे मिळवून घेतले. याचाच अर्थ लोकांनी दिलेला हा आधार या व्यवस्थेच्या निर्मितीत होता. त्याच्या व्यवस्थापना मध्ये पण हाच धागा महत्वाचा ठरतो. हीच महत्वाची बाब या व्यवस्थेच्या चिरकाल टिकण्यामध्ये दडून बसली आहे. राजाने इशारा करावयाचा असतो, प्रेरणा द्यावयाची असते, मदत करावयाची असते. थोडक्यात राजाला राजा प्रमाणेच वागावे लागते. त्याने लोकांवर विसंबून रहावे आणि लोकांच्या उत्साहाला, अंत: प्रेरणेला द्विगुणित करीत रहावे. जर यात खंड पडला तर मोठे नुकसान होते. याची प्रचिती भारतीय समाजाला गेल्या दीडशे / दोनशे वर्षांपासून (ब्रिटीशांची सत्ता आल्या पासून) आली आहे. जलव्यवस्थापन या क्षेत्रामध्ये भारतीय इतिहासाने फार मोठा वापर उपलब्ध करून दिलेला आहे. या वारशाचा आरंभच मुळी पाणी तेथे वसाहत असा झालेला आहे.

अलीकडे हे तत्व विसरले गेले आहे आणि गाव तेथे पाणी असा उलटा निकष समाजावर लादला जात आहे. यामुळे या वसाहतींना पाणी पुरवठा करण्याची सर्व जबाबदारी शासनावर पडते आणि वर्षानवर्षे अशा प्रकारच्या व्यवस्थेला कोट्यावधी रूपये खर्च झाल्यामुळे शासन हतबल ठरते. इतिहास काळात उपभोग घेणार्‍या सर्व लोकांना पाण्याचे महत्व, पाण्याची किंमत, त्याच्या संरक्षणामध्ये आपली जबाबदारी समजली असल्यामुळे या जुन्या व्यवस्था अद्यापही कार्यरत आहेत. आजची परिस्थिती नेमकी उलटी आहे.

गाव तेथे तळे आणि तळे राखील तो पाणी चाखील या म्हणी मागील अनेक शतकापासून प्रचलीत आहेत. पुढे तपशीलात जावून या म्हणीच्या अर्थाचा विचार केल्यास आपल्याला असे जाणवते की, या तलाव निर्मितीमध्ये पाणी उपभोक्त्याचा संपूर्ण सहभाग अपेक्षित होता. हा सहभाग सुलभ व्हावा म्हणून वसाहती मधील प्रत्येक घटकांना विशिष्ट कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामध्ये गावाच्या मिराशापासून ते समान्यांना समाविष्ट करून काळाच्या ओघात आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारी मध्ये प्रत्येक घटकाने प्रावीण्य निर्माण केले. पुढे त्याचे कौशल्यात रूपांतर केले.

सामाजिक घटनांना कालपरत्वे जातीमध्ये विभागण्यात आले. आणि उपरोक्‍त जबाबदारीच्या विभाजनाला जातीनिहाय मान्यता प्राप्त झाली. घाट व बारव निर्मितीमध्ये जातिनिहाय कामाचे वाटप करून नंतरच्या निगराणीची जबाबदारी समाजातील जाणकारांवर सोपविण्यात आली. या सर्वामागे ममत्वाची भावना असल्यामुळे ही निर्मिती आमची आहे, आणि तिचे संरक्षण करणे ही आमचीच जबाबदारी आहे अशा प्रकारचे बाळकडू संबंधितांना पाजले जात होते. यातूनच सामाजिक बांधिलकीचा उदय झाला. तसे पाहिले तर तलाव ही एक बाब आहे की जिच्यामुळे स्थानिक रोजगाराची मोठी निर्मिती होवू शकते. हे सूत्र सर्वच बाबतीत लागू आहे म्हणून अशा निर्मितीमध्ये रावापासून रंकापासून सर्वांचाच जवळीकीचा धागा जोडला गेला असेल. लाखो तलाव निर्माण झाले, लाखो विहीरी निर्माण झाल्या, हजारो कालवे निर्माण झाले. नद्यांकाठी घाट निर्माण झाले. या सर्वांच्या निर्मितीमध्ये, त्याच्या व्यवस्थापनामध्ये त्याच्या देखभाल दुरूस्तीमध्ये या उपभोगकर्त्याचा सहभाग होता.

भविष्यकाळात पाण्यातून अधिकची समृध्दी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अधिकचे पाणी देणे सामाजिक दृष्ट्या न्याय्य ठरणार नाही. राष्ट्रालाही ते परवडणार नाही. पाण्याचे हक्क निर्माण होवू न देता कालव्याचे जाळे व पाण्याचा प्रवाह अखंड राहून शेवटच्या घटकापर्यंत ते पाणी कसे जाईल हे पहाणे गरजेचे आहे. आज कालव्यावर अतिक्रमण होत आहे. अनियंत्रित व्यवस्थेमुळे कालव्याच्या जमिनीपर्यंत घरे गेली. लहान शेतचार्‍यात गवत वाढले. पाणी घ्यायला सर्व पुढे पण या चार्‍या मात्र शासनाने साफ कराव्यात अशी पाणी वापरणार्‍यांची अपेक्षा. इतिहास हे शिकवीत नाही. हे बदलायला हवे. आज शेतकर्‍यांना या सर्व व्यवस्थांपासून दूर ठेवले आहे. सामुहिक पुरूषार्थाची जाणीव त्यात निर्माण झालेली नाही. ब्रिटीशांनी केलेल्या सिंचन कायद्यात पाणी मागणी पध्दत आहे. तीच पुढे चालू राहिल्याने भ्रष्टाचार व गैरव्यवहार यांना आळा बसू शकला नाही. पाणी व्यवस्थितपणे वापरण्यासाठी उपभोगकर्त्यांचे संघ निर्माण व्हावे, त्यांनी पाणी पंचायत स्थापन करून तिच्या मार्फत पाण्याचे सुयोग्य असे व्यवस्थापन करावे, ही अपेक्षा आहे. सामुहिक आत्मविश्‍वास निर्माण करून वेगळ्या पध्दतीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. हेच आपल्याला इतिहास शिकवितो.

देशातील राजस्थान हा भाग सर्वात उष्ण आणि शुष्क आहे. वर्षभरात फक्त १०० ते ३०० मिलीमीटर पाऊस पडतो. देशाच्या इतर भागात एका दिवसात जितका पाऊस पडतो तेवढा जैसलमेर, बारमेर, आणि बिकानेरच्या काही भागात सर्व वर्षभरात कसाबसा पडतो. सूर्यसुध्दा येथे सर्वात जास्त तळपतो. भूजलाची पातळीसुध्दा या प्रदेशात खूपच खोल आहे. पाण्याच्या अभाव हाच अशा वाळवंटाचा स्वभाव असतो. अशी प्रतिकूल परिस्थिती असतांनासुध्दा या भागातील समाजाने या परिस्थितीला निसर्गाचा अभिशाप न समजता अतिशय कुशलतेने या संकटांवर मात केलेली आहे. पाण्याच्या या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येसुध्दा त्या समाजाने जीवनाची रीत शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जेथे तलाव नाही, पाणी नाही, तेथे गाव नाही. तलावाचे काम आधी आणि त्यानंतर त्याच्या आधारे गाव वसे. या भागातील अनेक गावांची, शहरांची नांवे सर या शब्दावर आधारित आहेत. गावामध्ये सरोवर नाही हा अपवादच.

देशातील सर्वात कमी पर्जन्यमान, सर्वात जास्त उन्हाळा, वाळूची वादळे, आणि पक्षासारख्या इकडून तिकडे उडणार्‍या वाळूच्या टेकड्या हे सर्व येथेच आढळते. अशा स्थितीत या भागात (जैसलमेर, बारमेर, जोधपूर, बिकानेर इ.) पाण्याचा अभाव सर्वात जास्त असावसाय हवा होता. परंतु प्रत्यक्षातील स्थिती अशी आहे की, या भागात १०० टक्के गावात पाण्याची स्वत:ची व्यवस्था आहे. यावर विश्‍वास बसणे थोडे कठीण वाटणे साहजिक आहे. शासकीय आकडेवारीनुसार जैसलमेरच्या ९९.७८ टक्के गावात तलाव, विहीरी, टंका अशासारख्या सोई आहेत. यात नळ, ट्युबवेल अशा सारख्या नव्या सोयी कमी आहेत.

या भागात लोकांच्या मनात तलाव आणि पाणी याबद्दल आपलेपणा आहे. ममत्वाची भावना आहे. तलावाची निर्मिती. त्याचे पावित्र्य, शुध्दता नियमित देखभाल दुरूस्ती आणि उपलब्ध पाण्याचे न्याय्य वाटप या विषयी पारंपारिक पध्दतीने घालून दिलेले नियम खूपच संयुक्तिक व व्यवस्थेला चिरकालत्व देणारे आहेत. मौर्यकालापून ते १८ व्या शतकापर्यंत तलाव निर्मितीची परंपरा अखंडपणे चालू होती.

पूर्वीच्या काळी निर्माण झालेल्या जलव्यवस्थापनातील लाखो च्या संख्येतील साधने (तलाव, बारवा, विहीरी, बंधारे, कालवे, आड इ.) काही अचानक प्रकट झालेली नाहीत. येवठ्या मोठ्या प्रमाणावर तलाव निर्मितीसाठी त्या काळी काही सिव्हील इंजिनिअर नव्हते. परंतु तलाव निर्मितीची विद्या जाणणारे असंख्य लोक देशात सर्वदूर विखुरलेले होते. गौंड, कोळी, भोई, माळी, भिल्ल, बंजारा, परिहार, सहारिया इ. अनेक जातीचे लोक तलाव, बंधारे, कालवे, विहीरी, आड ही साधने निर्माण करण्यामध्ये जाणकार होती.

अशा निर्मितीच्या पाठीमागे लोकांचा भाव अतिशय वेगळा होता. समाजासाठी दानधर्म करणे म्हणजे पाण्याची साधने निर्माण करणे हे समीकरण ठरलेले होते. पूर्वीच्या काळी प्रसंग सुखाचा असो वा दु:खाचा असो पाण्याचे साधन निर्माण करणे यात लोकांना पुण्यकाम केल्याचे समाधान मिळत असे. साधनसामग्री कमी असेल, आर्थिक ऐपत कमी पडत असेल तर लोक जुन्या तलावाच्या बंधार्‍याचे मजबूतीकरण करणे, त्याची दुरूस्ती करणे, गाळ काढणे इ. कामे करीत असत. घरातील एखादी व्यक्ती मृत झाली तर त्याच्या स्मरणार्थ अशी साधने निर्माण केली जात असत. दान या शब्दाचा अर्थ त्या काळात व्यापक अर्थाने स्वीकारला होता हेच यावरून दिसून येईल. दुष्काळ पडल्यानंतर सुध्दा श्रमदान करून गावाने तलावाची श्रृंखला निर्माण केल्याची उदाहरणे देशात अनेक ठिकाणी आहेत. बिहारच्या मधुबनी भागात दुष्काळामध्ये निर्माण केलेले अनेक तलाव आजपण उपयोगात आहेत.

काही वेळेस पारितोषिक म्हणून तलाव निर्माण केले जात असत. तर काही वेळेस तलाव निर्माण केल्याबद्दल बक्षिस दिले जात असे. वैनगंगा खोर्‍यातील गौंड राज्याच्या सीमेत जो कोणी तलाव निर्माण करेल त्याच्या खालील जमिनीचा सारा राजाकडून माफ होत असे. यामुळे तलाव निर्मितीला गती मिळाली. बुंदेलखंडमध्ये जात पंचायतीमध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून तलाव, विहीर, आड करण्याचा आदेश देत असत. अशी परंपरा देशाच्या बर्‍याचशा भागामध्ये (राजस्थान) आज पण आहे. एखाद्या व्यक्तीने जात पंचायतीचा निवाडा न मानल्यास त्याला दंड केला जाई आणि तो केलेला दंड तलावाच्या दुरूस्ती, निर्मितीसाठी वापरला जात असे.

आजचा समाज आपली मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी धनाच्या स्वरूपात दान करतो. देवळाच्या हुंडीत धन टाकतो. अन्दानाच्या पंगती उठवतो. लग्न कार्यामधून अन्नदान केल्याचे समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. पण याच समाजाचा इतिहास हा वेगळा दिसतो. पाण्याची साधने निर्माण करून पारंपारिक समाज आपल्या पायावर उभा ठाकलेला आपणास दिसून येतो, तर दानधर्म नेमका कशा स्वरूपात करावा, याचे भान हरवलेला आजचा समाज सतत याचकाच्या भूमिकेतच वावरतो. हा यातील मोठा भेद जाणून घेण्याची गरज आहे. तलाव निर्मितीबरोबरच त्याची देखभाल - दुरूस्ती, विशेष काळजी तो समाज स्वत:च्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे घेवून पार पाडीत असे.

अमावस्या व पौर्णिमा हे दोन दिवस सार्वजनिक कामासाठी शुभ मानण्यात येत होते. या दोन्ही दिवशी शेतकरी स्वत:च्या शेतात काम करीत नसे. आपल्या परिसरातील जलव्यवस्थापनच्या साधनाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी तो कुटुंबासह श्रमदान करीत असे. मनुष्य शक्तीचे रूपांतरण श्रम शक्तीमध्ये करणे आणि त्यातून सार्वजनिक भल्यासाठी पायाभूत सोयी निर्माण करून व्यापक हित साधणे हे त्या समाजाने घेतलेले ब्रीद होते असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही. थोडक्यात श्रम हे त्या समाजाचे भांडवल होते आणि या भांडवलाचा उपयोग संपत्तीपेक्षाही जास्त काटेकोरपणे सार्वजनिक हितासाठी ते करीत असत.

देशाच्या कानाकोपर्‍यात अशा प्रकारची उदाहरणे विखुरलेली आहेत. परकीय सत्तेच्या काळात या सार्वजनिक व्यवस्थेची (तलाव, कालवे इ.) मालकी सत्ताधार्‍यांनी लोकांकडून हिरावून घेवून स्वत:कडे घेतली. या व्यवस्थेकडे तत्कालीन राजसत्ता उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू लागली. त्याच्या देखभाल दुरूस्तीवर मात्र खर्च करणे त्यांना नकोसे वाटू लागले. त्यामुळे या साधनांची खूपच उपेक्षा झाली. अनेक तलाव, बारवा गाळाने भरून गेल्या. या साधनाबाबतची ममत्वाची भावना नष्ट झाली. लोकव्यवस्था या साधनांपासून दूर गेली. काळाच्या ओघात पिढ्यामागून पिढ्या जात असतांना लोकांना पण या जनउपयोगी वास्तू शासनाच्याच आहेत असे ठामपणे वाटू लागले. याचा परिणाम म्हणून या व्यवस्था हळूहळू लुप्त होत गेल्या. आजचे चित्र हेच आहे. याला उत्तर म्हणजे या सर्व व्यवस्थेमध्ये परत लोकाभिमुखता, लोकसहभाग, लोकांची मालकी, लोकांचे व्यवस्थापन, लोकांसाठी त्याचे पुनरूज्जीवन, त्याचा लाभ लोकांना इत्यादी भावना, नियमाचा आधार घेवून आणण्याची गरज भासते.

सम्पर्क


डॉ. दि. मा. मोरे. पुणे, मो : ०९४२२७७६६७०