विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण


ज्या विहीरीतून भूजल पुनर्भरण साधावयाचे आहे ती विहीर विनावापर असली तरी चालू शकते. परंतु अशी विहीर भूजल अतिउपशामुळे भूजल पातळी खालावून, परिणामी विहीरीतील जलधारक प्रस्तर भूजल विरहीत झाल्यामुळे विनावपर झाली असणे महत्वाचे आहे. विहीरीचे बांधकाम करताना जलधारक प्रस्तराअभावी अयशस्वी विहीर पुनर्भरणासाठी योग्य ठरणार नाही याची दखल घ्यावी.

भारत देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीची दीडशे वर्षे स्वातंत्र्यानंतरची दोन दशके भूपृष्ठावरील पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे, तद्नंतर देशात हरितक्रांती आली आणि सिंचनचित्र पूर्णत: बदलले. आता जवळजवळ 2/3 सिंचन क्षेत्र भूजल आधारित आहे. देशात होणारा भूजलाचा वापर प्रतिवर्षी 250 घनकिलोमीटर असून इतर देशांपेक्षा तो सर्वात जास्त आहे. देशात आता 200 लाख सिंचन विहीरी असून दरवर्षी त्यात 8 लाख विहीरींची भर पडत आहे. प्रत्येकी चार जमिनधारकांपैकी एक विहीरमालक असून इतर जमिनधारक विहीरमालकांकडून भूजलाची खरेदी करून सिंचन साधतात.

पावसाळ्यांत होणाऱ्या भूजलाच्या नैसर्गिक पुनर्भरणास किंवा गरजेनुसार केलेल्या कृत्रिम भूजल पुनर्भरणास किंवा पुननिर्मितीस मर्यादा आहेत. परंतु भूजलाचा प्रमुख वापर सिंचन हाच असल्याने आणि सिंचन विहीरींच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने दरवर्षीच्या भूजल पुननिर्मितीपेक्षाही अधिक भूजल उपसा झाल्याने भूजलाचे अविरत खाणकाम सुरू आहे. परिणामी भूजल पातळी खालावून भूजल गुणवत्ता बाधित होऊ लागली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अतिखोलीवरील भूजल उपसून शेती सिंचन करणे आर्थिक दृष्टीकोनातून परवडणारे राहिले नाही. शेती उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कमीत कमी जेथे भूजल पुनर्भरणास अजूनही वाव आहे तेथे कृत्रिम भूजल पुनर्भरण ही काळाची गरज झाली आहे. इतर जलसंधारणाच्या उपाययोजनांबरोबर विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण व त्याद्वारे भूजलसाठ्यांचे पुनरूज्जीवन ही केंद्राची योजना, भूजलाची मर्यादित स्थलकालसापेक्ष उपलब्धता आणि वाढती मागणी यांचा मेळ घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या योजनेत लाभधारकांच्या सहकार्य आणि सहभागातून, त्यांना त्यांचेच पारंपारिक ज्ञान, स्थानिक कौशल्य, साधनसामुग्री आणि मजूर वापरण्याचे स्वातंत्र्य दिल्यास अशा योजनांची देखभाल दुरूस्ती गावपातळीवर लाभार्थीच्या सहकार्याने होऊन सिंचन आणि इतर वापरासाठी शाश्वतपणे भूजलाची उपलब्धता होणार आहे. कृत्रिम पुनर्भरण ही लोकांची चळवळ होऊन भूजल विकासातून ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारणार आहे.

केंद्राची योजना :


भूजल पातळी प्रचंड प्रमाणात घटण्याची समस्या गंभीर झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यांचा समावेश होतो. या राज्यांचा भूगर्भ मुख्यत: कठीण दगडांचा असल्याने येथील भूजलसाठा कमी आहे. त्यात विविध वापरांसाठी आता भूजलावर विशेष भर दिल्याने भूजल अतिउपसा झाला असून भूजल पातळी घटली आहे. ही भूजल पातळी वाढविण्यासाठी व भूगर्भातील जलसाठ्याचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. (सकाळ 25 मे 2008)

ज्या शेतकऱ्यांकडे विहीरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान आणि उर्वरित शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्रीय भूमिजल मंडळ, नाबार्ड व स्वयंसेवी संघटनांचा या योजनेत सहभाग असेल. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक,राजस्थान, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या सात राज्यांमधील 110 ब्लॉकमधील 45.55 लाख विहीरींचा या योजनेत समावेश आहे. योजनेचा एकंदर खर्च 1870.10 कोटी रूपये असून अनुदानापोटी केंद्र सरकार शेतकऱ्यांना 1499.27 कोटी रूपये देणार आहे. अनुदानाची रक्कम नाबार्डतर्फे जिल्हा शिखर बँकेला दिली जाईल आणि बँकेतर्फे ती शेतकऱ्यांना दिली जाईल.

विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण पध्दती :


शेतकऱ्यांच्या वापरात असलेल्या विहीरी किंवा भूजलाच्या अतिउपशामुळे भूजल पातळी खालावून विनावापर झालेल्या विहीरींच्या माध्यमातून या योजनेत कृत्रिम भूजल पुनर्भरण साधावयाचे आहे. कृत्रिम भूजल पुनर्भरणाचा मुख्य उद्देश हा भूजलाच्या अतिउपशामुळे भूजल पातळी खालावून भूजल साठ्याच्या दृष्टिकोनातून कमी पडलेले भूजल प्रस्तरांतील जलसाठ्याचे पुनरूज्जीवन करणे असा आहे आणि अशा भूजलाचा अतिविकास झालेल्या 110 ब्लॉक मध्ये ही योजना राबवावयाची आहे. अशा क्षेत्रांत समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश जेथे गोड्या पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने समुद्राच्या खाऱ्या पाण्याची घूस चालू आहे अशा क्षेत्राचाही समावेश होतो.

भूजल पुनर्भरणास आवश्यक बाबी :


कृत्रिम भूजल पुनर्भरणासाठी पुरेशा आणि चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याची पुनर्भरणासाठी वापरावयाच्या विहीरीपासून जवळच्या अंतरावर सहजासहजी उपलब्धता आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. उद्भव पाणी मुलत: चांगल्या गुणवत्तेचे असल्यास त्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज नसते. शिवाय पाणी जवळच उपलब्ध असल्यास वाहतूकीचा खर्च वाचतो. विशेषत: हे उद्भव पाणी पावसाची अपधाव, कॅनालमधून साठेलेले धरणातील अधिकतम पाणी किंवा प्रक्रिया केलेले सांडपाणी किंवा उद्योग - कारखान्यामधून बाहेर पडलेले परंतु उचित प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी एक असू शकते. हे उद्भव पाणी पावसाची अपधाव म्हणून उपलब्ध होणार असल्यास डब्लू.एल. स्टेन या शास्त्रज्ञाने सुचविलेल्या तक्त्याचा वापर करून एकंदर अपधावेचे मापन करावे आणि ज्या क्षेत्रातून ही अपधाव होते ते क्षेत्र सुरक्षित ठेवणे महत्वाचे ठरते. अशा क्षेत्रात उकीरडे, जनावरांचे गोठे, उघड्यावरती संडास नसावेत. तसेच हे शेतजमिनीचे क्षेत्र असल्यास तेथे रासायनिक खते, जंतु व कीटकनाशकांचा वापर मर्यादित असावा. तसेच या क्षेत्रातून बाहेर पडून पुनर्भरणासाठी उपलब्ध पाणी गाळविरहीत करण्यासाठी उचित फिल्टरबेडचा वापर अत्यावश्यक आहे. पुनर्भरित पाण्याचा मुख्य वापर सिंचनासाठी होणार असला तरी सुध्दा 80 ते 85 टक्के ग्रामीण जनता पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर अवलंबून असल्याने भूजलगुणवत्ता अबाधित ठेवणे महत्वाचे ठरेल.

ज्या क्षेत्रात उघड्या जलाशयातून होणारा उत्पादन वजा बाष्पीभवनातून होणारा ऱ्हास अधिक आहे उदा. अमरावती, अकोला, बुलढाणा हे विदर्भातील जिल्हे, अशा क्षेत्रात पावसाचे पाणी जमिनीवर साठविण्याऐवजी ते पाणी विहीरींच्या माध्यमातून पुनर्भरीत केल्यास भूजलसाठे पुनरूज्जीत होऊन बाष्पीभवनातून वाचविलेले पाणी उन्हाळ्यात वापरण्यास उपलब्ध होणार आहे.

ज्या विहीरीतून भूजल पुनर्भरण साधावयाचे आहे ती विहीर विनावापर असली तरी चालू शकते. परंतु अशी विहीर भूजल अतिउपशामुळे भूजल पातळी खालावून, परिणामी विहीरीतील जलधारक प्रस्तर भूजल विरहीत झाल्यामुळे विनावपर झाली असणे महत्वाचे आहे. विहीरीचे बांधकाम करताना जलधारक प्रस्तराअभावी अयशस्वी विहीर पुनर्भरणासाठी योग्य ठरणार नाही याची दखल घ्यावी. अशा विनावापर विहीरीतील किंवा आस्तित्वातील विहीरीतील गाळ काढून स्वच्छ करावी. पाण्यामध्ये मासे, बेडकी, खेकडे, झिंगे सोडल्यास विहीरीतील पाण्याची जलधारक प्रस्तरांशी कायमस्वरूपी जोड साधून भूजलसाठा पुनरूज्जीत होणार आहे. पुनर्भरणांती भूजल पातळीतील वाढीमुळे विनावापर विहीर वापरात आणावी जेणेकरून भूजल उपशाबरोबर जलधारक प्रस्तरातील गाळाचे कण धुऊन बाहेर फेकले जातील आणि विहीर भूजलपुनर्भरणासाठी पुन:तयार असेल.

भूजल पुनर्भरणासाठी वापरावयाची विहीर चांगल्या क्षमतेची, सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याची विहीर असली तरी योग्य ठरते. फक्त विहीरीतील जलधारक प्रस्तर पूर्णत: खोदलेले असावेत, त्यांची पाणी साठविण्याची क्षमता चांगली आहे आणि भूजल गुणवत्ताही चांगली आहे याची खात्री करावी. विहीरीतील जलधारक प्रस्तर चांगल्या खोलीचे असावेत. त्यांचा आडवा विस्तार दूरवर असल्यास अशा विहीरीतून मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण साधता येईल आणि जमिनीखालील पुनरूज्जीवित भूजल साठ्यामुळे जवळपासच्या ह्याच जलधारक प्रस्तरांची उभी वाहक क्षमता चांगली असावी म्हणजे जमिनीतून जिरलेले पाणी त्वरित जलधारक प्रस्तरात उतरेल, परंतु त्यांची आडवी भूजलवाहक क्षमता बेताची असावी म्हणजे जलधारक प्रस्तरातील पाणी दुरपर्यंत त्वरित वाहून जाणार नाही. शक्यतो पुनर्भरण केलेल्या विहीरीतूनच पुन्हा वापरण्यासाठी उपलब्ध होईल.

भूजल पुनर्भरणासाठी कठीण खडकामधील सिंचनासाठी बांधलेल्या विहीरींचा उपयोग केला जाणार आहे. अशा कठीण खडकांमधील जलधारक प्रस्तरांची पारगम्यता, वाहकता आणि साठवण क्षमता स्थल काल सापेक्ष असल्याने प्रत्येक विहीरीसाठी भूजलपुनर्भरण कार्यपध्दतीत वेगळेपणा असू शकतो. तसेच उद्भव पाण्याची उपलब्धता, त्याची गुणवत्ता प्रत्येक विहीरीसाठी वेगळी असल्याने भूजल पुनर्भरण पध्दतीच्या खर्चाचे अंदाजपत्रक वेगळे वेगळे राहणार आहे.

थोडक्यात विहीरींच्या माध्यमातून कृत्रिम भूजल पुनर्भरण साधताना 1. पुनर्भरण क्षेत्राचा प्रकार - अपधाव, पुनर्भरण, साठवण क्षेत्र 2. स्थिर भूजलपातळीवरील जमिनीचा व खडकाचा प्रकार 3. उख्रळ जलधारक प्रस्तराची जाडी, पारगम्यता, वाहकता आणि आडवा विस्तार 4. पावसापूर्वी आणि पावसाळ्यानंतरची स्थिर भूजल पातळी आणि भूजल पातळीच्या मागील दहा वर्षांच्या नोंदी 5. भूजलपातळीतील उतार आणि दिशा 6. जवळपासच्या नदीनाल्याचा प्रकार, अंतरे आणि उद्भव पाणी म्हणून वापरण्यास वाव, 7. उद्भव पाण्याची गुणवत्ता, या बाबी माहित असणे आवश्यक राहील.

कृत्रिम भूजल पुनर्भरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा प्रक्रिया चालू असताना - 1. जवळपासच्या नदीनाल्यांतील पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असल्यास पुनर्भरण बंद करावे कारण पुनर्भरणाची मर्यादा ओलांडल्याने विहिरीत पुनर्भरीत केलेले पाणी जवळपासच्या नदीनाल्यात बाहेर फेकले जाईल. 2. पुनर्भरण क्षेत्रात भूजल पातळी वाढून जमीन पाणथळ होत असल्यास पुनर्भरण प्रक्रिया थांबवावी, पंरतु 3. विहीरीची क्षमता वृध्दी होऊन भूजल गुणवत्ता सुधारत असल्यास पुनर्भरण प्रक्रिया चालू ठेवावी.

भूजल व्यवस्थापनात लाभधारकांची क्षमताबांधणी :


कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या या केंद्र सरकारच्या योजनेत केंद्रीय भूमिजल मंडळाचा तांत्रिक सहभाग राहणार आहे. परंतु केंद्रीय स्तरावर भूजल सर्व्हेक्षण, अन्वेषण, विकास व व्यवस्थापन करणाऱ्या या यंत्रणेला सात राज्यातील राज्यस्तरीय भूजल यंत्रणेचे सहाय्य अतिमहत्वाचे व गरजेचे राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग या योजनेत आहे. तरीसुध्दा भूजलासारख्या अदृश्य संपत्तीचे कठीण खडकातील अस्तित्व, वहन, विभागणी आणि विविध जलधारक प्रस्तरातील भूजलाचे वय याबाबत त्यांची क्षमता बांधणी आणि त्यांच्या माध्यमातून लाभधारकांची क्षमता बांधणी साधण्यास खऱ्या अर्थाने विहीरींच्या माध्यमातून भूजलसाठे पुनरूज्जीवीत होणार आहेत.

बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल जागरूक राहून तयार केलेली बांधकामे निरंतरपणे वर्षापुवर्षे भूजल पुनर्भरण साधणार आहेत. अर्थात विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण साधताना पाणलोट क्षेत्र हा घटक मानून माथ्यापासून पायथ्यापर्यंत जलसंधारणाच्या विविध पारंपारिक उपाययोजनांचा अवलंब करणे उपयुक्त ठरेल. याचबरोबर दरवर्षीच्या पावसाळ्यात होणाऱ्या नैसर्गिक भूजल पुनर्भरणाच्या मर्यादेत भूजल उपसा होण्याची गरज आहे. परंतु विविध क्षेत्रातील भूजलाच्या वाढत्या मागणीमुळे काही क्षेत्रात भूजल उपसा नैसर्गिक पुनर्भरणाहून अधिक होत आहे. अशा क्षेत्रात भूजल विकासाबरोबर भूजलाची मागणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नैसर्गिक भूजल पुनर्भरणाशिवाय कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करून भूजल उपलब्धतेत वाढ साधता येईल. वैयक्तिक पातळीवर या अनुषंगाने प्रयत्न होण्याची गरज आहे.

भूजल पुनर्भरण मर्यादा आणि पाणी मागणी व्यवस्थापनाच्या विविध पैलुंचा गरजेनुसार वापर :


विहीरींच्या माध्यमातून भूजल पुनर्भर ही एक भूजल साठा वाढविण्याची महत्वाची योजना आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील विविध जलसंधारण उपाययोजनांचा अवलंब करूनही अतिरिक्त भूजल पुनर्भरण साधता येते. परंतु भूजल पुनर्भरणास मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही. पुनर्भरणाची ठराविक मर्यादा ओलांडल्यानंतरही जमिनीवर अडविलेले पाणी जमिनीत जिरते, भूजलात रूपांतरीत होते परंतु भूजल पातळी उंचावून ठराविक पातळीवर आल्यानंतर त्याच पातळीवर असलेल्या जवळपासच्या नदीनाल्यात बाहेर फेकले जाते. पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतरच्या काही कालावधीत पाणलोट क्षेत्रातील नदीनाले वाहतात म्हणजेच पाणलोट क्षेत्रातील जलधारक प्रस्तरांनी भूजल पुनर्भरणाची मर्यादा गाठली आहे, ते भूजलाचे पुर्णत: संपृक्त झाले असून यानंतरच्या कालावधीत पुनर्भरण होणारे भूजल नदीनाल्यांत उत्सर्जित होऊन वाहू लागते. परंतु काही जलधारक प्रस्तर जमिनीखाली खोल अंतरावर असून वरील उथळ जलधारक प्रस्तरांपासून काही रूंद परंतु पारगम्यता व उभीआडवी वाहन क्षमता नसलेल्या भूस्तरांनी वेगळे ठेवल्याने त्याच ठिकाणच्या पावसातून होणाऱ्या भूजल पुनर्भरणापासून वंचित राहतात.

अशा जलधारक प्रस्तरांचे पुनर्भरण केवळ त्यांच्या आडव्या थरातून दूरवरील पुनर्भरण क्षेत्रातून होत असते. आडवी वाहक क्षमता जेमतेम असल्यास साठवण क्षमता चांगली असून देखील अशा जलधारक प्रस्तरांना पूर्ण संपृक्त होण्यास बराच वेळ लागतो. अशा खोलवरील जलधारक प्रस्तरांचे पुनर्भरण ज्या विहीरींमध्ये उथळ जलधारक प्रस्तर अशा खोलीवरील जलधारक प्रस्तरांशी विहीर बांधताना जोडले आहे, त्या विहीरीतून साधता येईल. विहीरीच्या तळाशी घेतलेल्या विंधन नलिकेमधून असे पुनर्भरण साधता येईल. अर्थात ही पुनर्भरण प्रक्रिया त्या क्षेत्रातील नदीनाले ज्या कालावधित वाहतात तेवढ्याच कालावधीत चालू ठेवता येईल, जेणेकरून उथळ जलधारक प्रस्तरातील भूजल जवळपासच्या नदीनाल्यामध्ये फेकून वाया घालविण्याऐवजी खोलवरील जलधारक प्रस्तरात साठवून गरजेनुसार प्राथम्याने पाणीटंचाई कालावधीत पिण्यासाठी वापरता येईल. उथळ जलधारक प्रस्तरातून खोल किंवा अतिखोल जलधारक प्रस्तरामध्ये भूजल पुनर्भरणासाठी सायफन प्रणालीचा वापर केल्यास वीजेची बचत होऊन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पुनर्भरण साधता येते. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने 1993-96 दरम्यान प्रायोगिक तत्वावर राबविलेल्या 37 प्रकल्पांपैकी 14 पुनर्भरण प्रकल्प सायफन पध्दतीचा वापर केला. सर्व 37 प्रकल्पांमध्ये ग्रामपंचायत विहीर किंवा नळ पाणी पुरवठा उद्भव विहीरीतील भूजल पुनर्भरणासाठी वापरले. अर्थात ही पुनर्भरण प्रक्रिया जोपर्यंत उथळ जलधारक प्रस्तर संपृक्त होऊन नदीनाल्यातून वाहत आहेत तोपर्यंत चालू ठेवण्यात आली.

भूजल पुनर्भरणाच्या मर्यादा लक्षात घेता भूजल उपसा नियंत्रीत व भूजल पुनर्भरणाच्या मर्यादेत ठेवण्यासाठी मागणी व्यवस्थापनाच्या विविध पैलुंचा गरजेनुसार वापर हितावह ठरेल. सद्यपरिस्थितीत पाण्याची मागणी वाढत आहे हे भेडसावणारे चित्र, तरीसुध्दा कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देण्यास पिकांचा अवलंब, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिक पध्दती व पिक रचना, सूक्ष्मसिंचन पध्दतीचा वापर, विविध क्षेत्रात पाण्याचा पुनर्वापर केल्यास मागणी नियंत्रीत राहून भूजल उपसा पुनर्भरणाच्या मर्यादेत राहणार आहे. इतर क्षेत्रातही पाण्याची उधळपट्टी थांबवून पाण्याचा काटकसरीने वापर अपेक्षित आहे. स्वयंनियमन साधून सामाजिक हितासाठी उन्हाळ्यात विहीरीतील भूजल माणसं व जनावरांना पिण्यासाठी राखून ठेवण्याचे बंधन पाळावे लागेल.

भूजल कायद्यातील तरतूदीचा अवलंब:


भूजल उपसा नियंत्रीत ठेवून भूजल गुणवत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल कायद्यात तरतूदी असणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै 2003 मध्ये महाराष्ट्र जलनिती प्रसिध्द केली. त्यात भूजलाचे नियतकालिक पुनर्मुल्यांकन करणे, भूजलाचे समुपयोजन, पुनर्भरणाच्या मर्यादाकरणे याची तरतूद आहे. भूजलाच्या नवीन कायद्याचे स्वरूप जनतेला सुसह्य व शासनाला उपयुक्त असावे. भूजल कायदा सर्वस्पर्शी असावा. तो भूजल विकासाचे आड येता कामा नये. जनतेकडून कायद्याचे स्वयंस्फूर्तीने पालन होणे तेवढेच महत्वाचे आहे.

भूजलाच्या कृत्रिम पुनर्भरणाच्या विविध पध्दती अधिक लोकप्रिय होऊन त्याबद्दल जनमानसामध्ये जलसाक्षरता व उचित क्षमता बांधणी साधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून भारत सरकारने शासन निर्णय दि.14.4.2006 अन्वये मा.मंत्री जलसंसाधन यांचे अध्यक्षतेखाली कृत्रिम पुनर्भरण सल्लागार मंडळाची स्थापना केली आहे. तसेच मसूदा विधेयक, 2005 अन्वये सर्व राज्यांना राज्य भूजल प्राधिकरण स्थापित करून भूजलाचा विकास आणि व्यवस्थापन नियंत्रीत करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. भारत निर्माण अंतर्गत भूजल आधारित सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून भूजलाच्या कृत्रिम पुनर्भरण कार्याक्रमास राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जोड दिली आहे.

थोडक्यात, लाभधारकांची जलसाक्षरतेतून क्षमता बांधणी साधल्यास भूजल पातळीच्या नोंदी गावपातळीवर घेतल्या जातील. त्यातून तयार केलेल्या जलालेखाचा ग्रामसभेमध्ये अभ्यास होऊन चर्चेअंती पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर भूजल पातळी सुरक्षित खोलीवर ठेवण्याचे प्रयत्न होणार आहेत. भूजलाची गुणवत्ता राखून नदीनाले वर्षातील बराच काळ वाहताना दिसणार आहेत. अनेक कोरड्या विहीरी जिवंत होतील आणि आस्तित्वातील विहीरींची सिंचन क्षमता वाढेल. भूजल पातळी उंचावल्याने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूजल उपसा परवडणार आहे. सर्व क्षेत्रात वापरण्यासाठी पुरेसे स्वच्छ व शुध्द पाणी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागात भूजल आधारित सिंचनाच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन वाढणार आहे. बहुतांशी जनतेचे जीवन कृषिक्षेत्राशी निगडीत असल्याने राज्याची खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक उन्नती साधणार आहे.

विहीरीच्या माध्यमातून भूजल कृत्रिम पुनर्भरण : काही अनुकरणीय प्रयोग :


1. लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचे सायफन पध्दतीने कोरड्या विहीरीच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण : (राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्था, हैद्राबाद,

- मौजे कानडीकुरूमन्नीला, ता.अनंतरपूर, आंध्रप्रदेश
- बाष्पिभवनामुळे होणारी पाण्याची तूट थांबवून पाणी वाचविण्याचा आणि वाचविलेल्या पाण्याचा अधिक सिंचनासाठी उपयोग
- 2.5 से.मी. व्यासाच्या सायफन नळीमधून 30 ते 40 लिटर प्रतिमिनीट वेगाने तलावातील पाणी कोरड्या विहीरीमध्ये 16 जुलै 1986 ते 20 जानेवाही 1987 या कालावधीमध्ये सतत टाकण्यात आले. तलावातील पाणी पातळी खूपच कमी झाल्याने सायफन बंद पडले. तरीसुध्दा या कालावधीत 10,000 घनमीटर्स इतके पाणी कोरड्या विहीरीत टाकण्यात आले.

2. मौजे गुदसारा, सौराष्ट्र गुजरात

- सौराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान.
- आर्थिकदृष्ट्या तसेच पर्यावरणाचे समतोल राखण्यास सोयीस्कर.
- गावातील 277 विहीरींपैकी 210 विहीरीमध्ये मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण. भूईमुगाचे पीक अधिक प्रमाणात घेण्यात मदत.

अ) पावसाळ्यात काही काळ वाहणारी उपनदी जवळ पास असल्यास - पर्जन्यमान सरासरी इतके किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास उपनद्यातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा भूजल पुनर्भरणासाठी वापर.

- उपनद्यांच्या पात्रातील पाणी 25 से.मी. व्यासाचे सिमेंट पाईपद्वारे सभोवतालच्या कोरड्या विहीरींना जोडले जाते.
- पुनर्भरणाची प्रक्रिया पूर्ण कोरड्या विहीरी काठोकाठ भरतात.
- विहीरीतील साठविलेले पाणी सर्वसाधारणपणे दोन दिवसाच्या कालावधीत जलधारक प्रस्तरात साठविले जाते.
- पुनर्भरीत विहीरी जास्तीच्या एक एकर क्षेत्रात भूईमुग पीक घेण्याकरिता कार्यरत.

ब) पावसाळ्यात काही काळ वाहणारी उपनदी जवळपास नसल्यास -

- कोरड्या नदीच्या परिसारतील जमिनीतील नैसर्गिक खड्डे शोधून त्यामध्ये साठणारे पावसाचे पाणी चारीद्वारे विहीरींचे नजीक 2 ज्र् 2 मीटर सिमेंट खड्ड्यामध्ये साठविण्यात येते.
- पाण्यातील गाळ, माती किंवा अन्य घटक नैसर्गिक पध्दतीने तळाला बसतात.
- सिमेंट टाकीच्या वरच्या बाजूकडील स्वच्छ पाणी पाईपलाईनद्वारे नजीकच्या कोरड्या विहीरीत सोडण्यात येते.

प्रस्तुत पुनर्भरण प्रयोगाचे जनक म्हणून श्री. शामजी अंताला यांना श्रेय.

3. नदी गाळाचे प्रदेशात विनावापर विहीरीच्या माध्यमातून कृत्रिम भूजल पुनर्भरण (भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा)

- नदीच्या गाळाचे प्रदेशातील मौजे बामणोद ता. यावल जि. जळगाव
- भूजलाच्या अतिउपशामुळे भूजल पातळी 35 ते 40 मी. खोलापर्यंत पोहचल्याने 20 -25 मीटर खोल कोरड्या विहीरींचा भूजल पुनर्भरणासाठी वापर - भूस्तर रचना भूजल पुनर्भरणास योग्य.
- पुनर्भरणासाठी आवश्यक पाणी हातनूर कालव्यामधून उपलब्ध.
- 50 वापरात नसलेल्या विहीरीच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण.

श्री. सूर्यकांत बागडे, पुणे

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading