विविध जलसंवर्धन उपक्रम

16 Apr 2017
0 mins read

रोटरी क्लब पुणे साऊथचे ‘जलसंवर्धन’ संबंधित उपक्रम -

2016 च्या दुष्काळी परिस्थितीत उद्भवलेल्या पाणी टंचाईचा फटका पुणेकर नागरिकांनाही बसला आणि पाण्याबाबत काय करता येईल याबाबत विचार करण्यास रो.डि. 3131 च्या संचालक सतीश खाडे यांनी बोलवलेल्या बैठकीसाठी पुणे साऊथचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ‘पाणी वाचवा’ मोहिमेत पुणे रॉयल क्लबबरोबर पुणे साऊथ देखील आहे ( त्या प्रकल्पाची माहिती स्वतंत्र लेखात दिली आहे)

सन 1970 मध्ये स्थापन झालेल्या रोटरी क्लब पुणे साऊथने दीर्घकाळ समाजसेवी प्रकल्प यशस्वीपणे राबवले एवढेच नव्हे तर काही प्रकल्प ‘पथदर्शक’ (Pioneering) ठरले. ‘घरगुती परिचारिका प्रशिक्षण, आरोग्य महाप्रदर्शन आणि पुणे हार्ट ब्रिगेड’ या सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश केला जातो. सन 2005 मध्ये सुरूवात करून या क्लबने ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधून देण्यास सुरूवात केली. तेव्हापासून त्यासाठी आवश्यक असा पाणी पुरवठा ही शाळांसाठी समस्याच असते याकडे क्लबमधील अभ्यासू सदस्यांचे लक्ष गेले आणि रोटरी शताब्दी वर्ष उलटले तसे त्याबाबत काय करता येईल यावर विचार मंथन सुरू झाले. मात्र त्याच सुमारास राज्य सरकारने गावोगाव, वाड्या - वस्त्यांवर विंधन विहीरी अर्थात कुपनलिका देण्यास सुरूवात केल्याने हा विषय मागे पडला.

सन 2012-13 या रोटरी वर्षामध्ये वेल्हा तालुक्यातील आंबवणे या गावच्या हायस्कूलमध्ये स्वच्छतागृहे बांधून दिली तेव्हा त्यांच्या स्वच्छेसाठी पाणी पुरवठा हा प्रश्‍न समोर आला आणि तेव्हापासून आता हे पाचवे वर्ष आहे की हा क्लब यशाशक्ती पाणी प्रश्‍नाबाबत काही ना काही काम करत आहे.

त्या शाळेच्या स्वच्छतागृहांसाठी एक टाकी व आवश्यक असे नळ जोडून दिले. त्याच्या पुढच्याच वर्षी एक पाऊल पुढे जावून 800 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या त्या शाळेला ‘ मेम्ब्रेन फिल्टर ’ हा अत्याधुनिक जलशुध्दीकरण संच प्रदान करण्यात आला. शुध्द पाण्यासाठी 2000 लिटर क्षमतेची टाकी आणि 10 नळ हात धुण्यासाठी असे एकूण काम केले. ते काम करताना शाळेला अशी अट घातली की आसपासच्या ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी तेथून पाणी घेवू द्यावे. आजमितीला 25 घरे ते शुध्द पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

तेथून दोन कि.मी अंतरावर असलेल्या सांगवी बु. येथील ग्रामस्थांसोबत इतर कामे करत असताना जाणवले की त्यांच्यासाठी अशीच सोय करता येईल. म्हणून तेथील जि.प.ची प्रा. शाळा आणि अर्था कि.मी चे नळ जोडून तेथेही मेम्ब्रेन फिल्टर बसवण्यात आला. त्या गावकर्‍यांनी श्रमदान केले तसेच घरोघर नळ देण्याऐवजी नळकोंडाळी बसवण्याचा प्रयोग केला ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो. (हा राळेगण चा प्रभाव आहे.)

रो. वर्ष 2014 - 15 मध्ये दिवे ता. पुरंदर या ठिकाणच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असा निरोप मिळाल्याने तेथे पर्जन्य जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) चा प्रयोग करण्यात आला. सुमारे रू. 2 लाख पेक्षा थोडा अधिक खर्च करून कार्यान्वित केलेला तो संच आजही तेथील पाण्याची गरज भागवत आहे. ती शाळा आता निवासी क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे.

जून 2015 मध्ये कुरंगवडी येथील हायस्कूलला चार स्वच्छतागृहे प्रदान केली. त्यांना पाणी पुरवठ्याची सोय केली त्यामुळे आजही ती स्वच्छ असून वापरात आहेत. त्या शाळेला अगोदर ‘ वॉटर फिल्टर ’ व ‘ वॉटर कूलर ’ दिलेले आहेत.

रो. वर्ष 2015 - 16 च्या वर्षी वेल्हे तालुक्यातील पासली या दुर्गम गावातील हायस्कूलच्या भिंती पडल्या, खिडक्या मोडल्या असा निरोप मिळाल्याने ती दुरूस्ती करायला घेतली तेव्हा तेथील स्वच्छतागृहांची दुरवस्था लक्षात आली. त्या शाळेसाठी दूर असणार्‍या विंधनविहीरीतून नळाने पाणी उचलून उंच टाकीत साठवण आणि स्वच्छतागृहांना पाणी पुरवण्याबरोबरच हात धुण्यासाठी 10 नळ अशी योजना करून ते काम पूर्ण केले. आता ती शाळा त्या सांडपाण्यावर 200 पेक्षा जास्त झाडे वाढवत आहे. तेथील पाण्याच्या तपासणीमध्ये फिल्टरची गरज नसल्याचा अहवाल मिळाल्याने ते बसवले नाही.

2016 च्या दुष्काळी अवस्थेशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली. भोर तालुक्यातील कृषी अधिकारी श्री. वडखळकरांनी पुणे आऊथशी संपर्क साधला आणि वाजारवाडी ता. भोर (75 कि.मी) येथील कोरड्या पडलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. 26 मे 2016 ला सहसिलदार प्रांत ऑफिसर यांच्या शुभहस्ते कामाचा नारळ फोडला व जेसीबी धडधडू लागले. 31 मे पर्यंतच्या सहा दिवसात 2200 घनमीटर एवढा गाळ काढला, तो गावकर्‍यांनी ताबडतोब तेथून हालवला आणि सर्वांच्या शेतांमध्ये ती सुपिक माती पसरवण्यासाठी दिली. रूंदी, खोली वाढवण्याबरोबरच पाणलोट क्षेत्राची लांबी देखील वाढवण्यात आली.

पाणी भरून वाहू लागल्यानंतर दि. 31 ऑगस्टला भोर बी.डी ओं.च्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले की भोर तालुक्यातले हे पहिले व सर्वात मोठे जलसंवर्धनाचे काम झाले. सुमारे 1400 गावकर्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा व सुमारे 164 हेक्टर शेतीला सिंचनाचा प्रश्‍न त्या कामामुळे सुटला आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये त्या योजनेत भाग घेवून काम करणारा पुणे साऊथ हा एकमात्र क्लब ठरला. रो. क्लब पुणे युनिव्हर्सीटी ने या कामात अर्थिक सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे तलावातील गाळाच्या मातीमुळे शेतांची सुपीकता वाढली, त्याचे प्रात्यक्षिक 31 ऑगस्टला दाखवण्यात आले तो फायदा ‘ बोनस ’ समजावा.

2016 च्या दुष्काळी परिस्थितीत उद्भवलेल्या पाणी टंचाईचा फटका पुणेकर नागरिकांनाही बसला आणि पाण्याबाबत काय करता येईल याबाबत विचार करण्यास रो.डि. 3131 च्या संचालक सतीश खाडे यांनी बोलवलेल्या बैठकीसाठी पुणे साऊथचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ‘पाणी वाचवा’ मोहिमेत पुणे रॉयल क्लबबरोबर पुणे साऊथ देखील आहे (त्या प्रकल्पाची माहिती स्वतंत्र लेखात दिली आहे)

पुणे साऊथच्या जलविषयक प्रकल्पामधले सातत्य राखण्यात रो. दत्तात्रय देवधर, रो. सुधांशु गोरे, रो. नितीन पाठक, रो. राजा येळनूरकर यांचा सक्रिय सहभाग असतो. रो. श्रीराम गोगटे हे अर्थसाह्याचा प्रश्‍न सातत्याने सोडवत आले आहेत. याशिवाय त्या त्या बर्षीचे अध्यक्ष मार्गदर्शन करूत असतातच. 2016 - 17 मध्ये पुणे साऊथचे जलसंवर्धनाबाबत दोन ग्लोबल ग्रांट प्रोजेक्टचे प्रस्ताव पाठवले असून परदेशी सहभागी क्लबची प्रतिक्षा करत आहोत.

रो. सुधांशु गोरे, रो. क्लब पुणे साऊथ

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading