वर्षाजल साठवण - शिरपूर पॅटर्न

Submitted by Hindi on Tue, 12/08/2015 - 10:59
Source
जल संवाद

शिरपूर तालुक्यातील नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा अभ्यास श्री. सुरेश खानापूरकर, भूवैज्ञानिक आणि मा. आमदार अमरिशभाई पटेल यांनी केला. त्यात त्यांना असे आढळले की पारंपारिक पध्दतीत केवळ नाल्यावर बांध बांधणे आणि नाल्याच्या पात्रात पाणी साठवणे अभिप्रेत असते. तसेच इथे शासकीय यंत्रणेस केवळ बांध बांधणे अपेक्षित असते. त्याच्या लाभाचे नेमके गणित मांडले जात नाही. त्यात विशेषकरून नाल्याचा भूवेज्ञानिकी अभ्यास अपेक्षित नसतोच. केवळ सिव्हील इंजिनिअरिंगच्या दृष्टीने विचार करून बांध प्रस्तावित केलेले आणि बांधलेले असतात.

शिरपूर तालुक्यातील नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा अभ्यास श्री. सुरेश खानापूरकर, भूवैज्ञानिक आणि मा. आमदार अमरिशभाई पटेल यांनी केला. त्यात त्यांना असे आढळले की पारंपारिक पध्दतीत केवळ नाल्यावर बांध बांधणे आणि नाल्याच्या पात्रात पाणी साठवणे अभिप्रेत असते. तसेच इथे शासकीय यंत्रणेस केवळ बांध बांधणे अपेक्षित असते. त्याच्या लाभाचे नेमके गणित मांडले जात नाही. त्यात विशेषकरून नाल्याचा भूवेज्ञानिकी अभ्यास अपेक्षित नसतोच. केवळ सिव्हील इंजिनिअरिंगच्या दृष्टीने विचार करून बांध प्रस्तावित केलेले आणि बांधलेले असतात. पण आजपर्यंत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे फारसे पाणी साठत नाही आणि साठलेच तर ते जमिनीत मुरत नाही असा सार्वत्रिक अनुभव असल्याने; त्यांचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. उन्हाळ्यात जेव्हा त्यांची खरी गरज असते, तेव्हा हे कृत्रिम स्त्रोत कोरडे पडलेले आढळतात. अनेक बांध बांधायचे म्हणून निव्वळ बांधलेले आहेत. असा निष्कर्ष काढून स्वत:चा असा एक नवीन शिरपूर पॅटर्न श्री.खानापूरकर, भूवैज्ञानिक आणि मा. आमदार अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यात राबवला.

पण याच बरोबर शिरपूरची भूवैज्ञानिकी रचना लक्षांत घेणे गरजेचे आहे. या भागात डेक्कन ट्रॅप नावाचा लाव्हाफ्लोपासून तयार झालेला खडक आहे. हा खडक कमी सछिद्र असून चांगला जलवाहकही नाही. हा भूभाग लाव्हाफ्लोच्या अनेक थरांनी बनलेला आहे. लाव्हाफ्लोचा एक थर एक मीटर पासून ते 15 - 20 मिटर पर्यंत जाड असू शकतो. तसेच त्याचे भौत्तिक गुणधर्म त्याच्या तळापासून ते माथ्यापर्यंत सारखेच नसतात. त्याच्या तळाकडचा थोडा थर सछिद्र तर त्याच्या वरचा एकदम अछिद्र तर त्याच्या वरचा भाग उत्तम सांधे असलेला तर पुन्हा पृष्ठभागाकडचा थर सछिद्र अशी त्याची संरचना असते. त्यामुळे त्यात सरसकट भूजल साठा होत नसतो. त्यात जलसंचयन किंवा जलवहन सुलभपणे होत नाही. पण हाच खडक जर खोलवर उत्तम विदारित असेल, तर त्यातील सांधे - भेगा खुले होतात, एकमेकांना जोडले जातात आणि त्यामुळे ते उत्तम जलवाहक बनू शकतात. शिरपूर भागात खडक खोलवर विदारित झालेले आहेत. त्यामुळे त्यात पाणी साठत असले, तरी ते हवे तितक्या प्रमाणात साठत नसणार. कारण भूपृष्ठ जल खोलवर जाण्याच्या दृष्टीने बांधांची रचना केलेली नव्हती. यासाठी नाले खोदून खोल करणे जरूरीचे आहे. हे मुद्दे शिरपूर पॅटर्न मध्ये श्री.खानापूरकर यांनी लक्षात घेतलेले दिसून येते.

शिरपूर तालुक्यात श्री.सुरेश खानापूरकर, भूवैज्ञानिक आणि मा.आमदार अमरिशभाई पटेल यांनी राबविलेला वर्षाजल साठवण प्रकल्प यशस्वी झाला आहे असा त्या दोघांचाही दावा आहे. हा पॅटर्न तसा आजपर्यंतच्या पारंपारिक अभियांत्रिकी पध्दतीपेक्षा थोडा वेगळा आहे. कोणताही बांध हा दोन उद्देशाने निर्माण केलेला असतो. एक त्यामुळे नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडून साठून रहावे आणि दुसरा म्हणजे कालांतराने ते पाणी जमिनीत मुरावे व भूजल पातळी वाढावी. या नव्या शिरपूर पॅटर्न मध्ये ज्या नाल्यावर बांध बांधावयाचा त्याचा भूवैज्ञानिक अभ्यास प्रथम करणे अभिप्रेत आहे. याचे कारण असे आहे की सिव्हील इंजिनिअरींग नुसार जसे नाल्याचे संपूर्ण पात्रचबांध बांधण्यास योग्य नसते तसेच भूवैज्ञानिकी दृष्ट्याही नाल्याचे संपूर्ण पात्र भूपृष्ठ जल शोषून घेण्यास आणि भूजल पुनर्भरणास सक्षम नसते. कारण पाणी जमिनीत तेथेच मुरते जेथे नाल्याचा तळ आणि बाजूवरचा खडक सछिद्र जलवाहक बनलेले असतात. नाल्याच्या अशा भागामध्ये जर पाणी साठले तरच ते आजूबाजूच्या जमिनीत मुरू शकते. तेव्हा नाल्याच्या या भागाच्या खालच्या बाजूस बांध बांधण्यायोग्य खडक असल्यास त्यावर बांध बांधणे केव्हाही फायदेशीर ठरते. शिरपूर पॅटर्न मध्ये श्री.खानापूरकर यांनी हेच केले आहे असे त्यांचे म्हणणे आहे, ते बरोबरही आहे.

तसेच नाल्याच्या पात्रात जरी सछिद्र खडक नसला आणि तेथे अछिद्र खडक असला आणि तो खोलवर विदारित झाला असेल, तर विदारणाने त्याची सछिद्रता आणि जलवाहकता कदाचित वाढलेली असू शकेल. अशा ठिकाणी नाल्याचे पात्र खणून खोल केल्यास पात्रात पाणी साठवण्याची क्षमता वाढते. तसेच पाणी जमिनीत झिरपण्याची शक्यताही वाढते. हेही खरेच आहे.

जमिनीचा वरचा थर हा मृदा आणि माती यांनी बनलेला असतो. त्यात मृदा जर रेगुर (काळी मृदा) असेल तर सछिद्रता खूपच कमी असते. भूपृष्ठावरून जमिनीत खोलवर पाणी मुरण्याची प्रक्रिया काळ्या मातीत खूपच संथ गतीने होते. त्याच मृदेची जाडी खूप असेल तर मुरलेले पाणी त्यातून खाली खोलवर जाण्यास अनेक वर्षे लागतात. शिरपूर तालुक्यात मृदेची जाडी नक्कीच जास्त आहे. त्यामुळे अगदीच तुटपुंजे जल भूजलात मिसळते. त्याने भूजल पातळीत नगण्य वाढ होते. पण जर मृदा - मातीचा थर खालून खोलीवरून जमिनीत पाणी मुरण्याची सोय केल्यास भूजल पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता अधिक असते. श्री.खानापूरकर यांनी नाल्यावर बांध बांधण्याअगोदर नाले खोल करून घेतले आहेत. मगच त्यात पाणी साठवले आहे. त्याचे हेच कारण आहे. त्यामुळे त्यांचा जो दावा आहे की भूजल पातळी 10 - 20 फुटांनी वाढली आहे तो खरा असू शकतो. या प्रकारच्या भूजलपुनर्भरणास 'तळापासून भूपृष्ठभागाकडे' (बॉटम टू टॉप) असे संबोधले जाते.

श्री.खानापूरकर यांनी असेही नमूद केले आहे की ते जेव्हा नाले खोल करतात तेव्हा थारोळ्याच्या मध्यावर किंवा बांधाच्या थोडे अलीकडे थारोळ्याचा सर्वात खोल भाग येईल आणि तेथून नाल्याच्या दोन्ही बाजूला खोली कमी होत जाईल असा उतार राहिल असे खोदकाम केले जाते. यात बंधाऱ्याच्या बाजूचा उतार नाल्याच्या माथ्याकडच्या पात्रापेक्षा अधिक तीव्र असतो. माथ्याकडचा उतार त्यामानाने खूपच मंद असतो. यामुळे बांधावर पडणारा पाण्याचा दाब कमी होईलच, पण नाल्यात वरच्या पात्रातून वाहत येणारा गाळही या मुद्दाम तयार केलेल्या डोहात साठून राहिल. सर्व नाल्यातला गाळ काढण्यापेक्षा एकाच ठिकाणचा डोहातला गाळ काढणे केव्हाही सोपे, नाही का ? त्यामुळे अशा प्रकारे नाले योग्य ठिकाणी खोल करून बांध बांधल्यास नक्कीच फायदा होईल. पण नाला कुठे खोल करायचा हे कळण्यासाठी भूवैज्ञानिकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि हे आमदार अमरिशभाई पटेल यांना बरोबर समजले आहे. त्यामुळे त्यांनी हा वर्षाजल साठवण आणि भूजल पुनर्भरण प्रकल्प राबविण्यास इंजिनिअर पेक्षा भूवैज्ञानिकाची निवड केली.

आज जरी शिरपूर पॅटर्न योग्य असला आणि भविष्यात त्या प्रमाणे कामे होणे गरजेचे तरी हा शिरपूर पॅटर्न राबवायचा असेल तर तो भारतीय जल संस्कृती मंडळासारख्या एनजीओ (की ज्याच्याकडे तज्ज्ञ मनुष्यबळ आहे) मार्फत राहवण्यात यावा.

ही योजना शासकीय यंत्रणेकडून राबवली गेल्यास पुन्हा जुनाच राग आळवला जाण्याची शक्यता आहे. कारण आपल्याकडे सरकारी योजना राबवण्यात इतक्या स्तरावर तपासण्या आणि मंजुऱ्या घ्याव्या लागतात की ती योजना प्रत्यक्षात येईपर्यंत त्यातला प्राण (चार्म) नाहीसा झालेला असतो. पुन्हा परत डेडलाईन असतील आणि मार्च 31 चा तगादा असेल तर पहायलाच नको. कसे क्वालिटी वर्क होणार ? तशातही कामे होतात हे नसे थोडके. आजच्या शासकीय चौकटीत आणि रोजगार हमी योजना, पाणलोट विकास यासारख्या योजनात ती कशी बसवायची, हे शासनच ठरवणार आहे. आणि या योजनामध्ये मानवी मजूरीला महत्व असून यंत्रांचा वापर नाकारण्यात आला आहे, तेव्हा त्याचाही एक आक्षेप या योजनेच्या अंमलबजावणीबाबत घेण्यात येत आहे. त्यावर मध्यम मार्गाचा अवलंब करणे हेट श्रेयस्कर आहे.

तेव्हा शिरपूर पॅटर्नचा आपापल्या भागात कसा वापर करून घेता येईल हे आपण पाहिले पाहिजे. या पॅटर्नला शासनाची मंजुरी आहे. त्याचा जिथे शक्य आहे तेथे फायदा करून घ्यावा. पण भूवैज्ञानिकी सल्ला घ्यायला विसरू नका. विशेष करून दुष्काळी भागासाठी तर हा पॅटर्न नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे भविष्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करता येईल.

प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे कोल्हापूर - मो : 8308001113

Disqus Comment