वृक्षायन

Submitted by Hindi on Fri, 07/28/2017 - 14:46
Source
जलसंवाद, जून 2017

ज्याचे पल्लव मंगलप्रदक्षिणा, छाया जयाची हरी ।
गंधेयुक्त फुले, फळे ही असति ज्याची सुधेच्या परी ॥
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखीचे, भला ।
आम्रा त्या पिक सेविता समसमां संयोग की जाहला ॥


कृष्णशास्त्री चिपळूणकरांची ही अन्योक्ति किती सुंदर आहे ना ? तुकाराम महाराजांनी पण वृक्षवल्ली आम्हा योयरी वनचले । पक्षीही सुस्वरें आळविती । असं म्हटलयं.

आपलं जीवन दुसर्‍यांसाठी अर्पिणारे कर्मयोगी वृक्ष हे वृक्षायन या महाकाव्याचे नायक आहेत. महाकाव्यात असणारी नायक - नायिका - खलनायक, ऋतू, रस, भावभावना, जीवनातील शाश्‍वत मूल्यं ही सर्व या वृक्षायन नावाच्या महाकाव्यात म्हणजेच वृक्षांच्या जीवनात सामावलेली आहेत. आपण आपल्या पंचेज्ञानेंद्रियांनी या निसर्ग महाकाव्याचे वाचन, गायनस्तवन करीत असतो.

वृक्षायनातील प्रत्येक वृक्ष हा महाकव्याचा नायक असतो. चरित्र नायकाचे सर्व गुण दया, क्षमा, शांती हे वृक्षांमध्ये असतात. लाल, गुलाबी, निळे, जांभळे, कुणी पांघरले शेले, हिरवे पिवळे, असे वसंतात फुलांनी नटलेले वृक्ष हे नायक तर विविधरंगी पुष्पमंडित वेली ह्या नायिका. इतर अनेक वृक्ष हे या नायकांचे सहचर असतात. तर वटवृक्ष हा पितामह असतो, जो अनेकांचा आधार असतो. कित्येक प्राणी, पक्षी, कीटक, वेली, झुडपं, पंख, पानं, फुलांनी भरलेले व सजलेले, प्रत्येक वृक्षांचे राज्य वेगळे असते. तरीही ते एका निसर्गराजाचे मांडलिक असतात. त सम्राटासह त्यांचे एक मोठे वैश्‍विक एकत्र कुटुंब असते.

मूळच्या नैसर्गिक जंगलाचा काही भाग देवाचे जंगल म्हणू धार्मिक भावनेने राखला असतो त्याला देवराई म्हणतात. देवराईत दगडाची एखादी छोटीशी मूर्ती, शेंदूर लावलेला दगडविरगळ या नावाने वा तांदळा स्वरूपातील देवतेची मूर्ती या स्वरूपात असते. तिला त्या देवराईची देवता मानतात. तिचे नाव चिरडोबा, बापुजीबुवा, थलोबा, काळूबाई, वाघजाई, काळम्मादेवी, भराडीदेवी अशी असतात. पिढ्यांपिढ्या अस्पर्शित असलेल्याने देवराईतील जंगलाची परिसंस्था समृध्दीच्या कळसाला पोहोचलेली असते. त्यात जैवविविधताही भरपूर असते. झाडझाडोर्‍याला अभय असल्याने वृक्षलतांचे आकारमान भव्यदिव्य असते. त्याबाबत ज्येष्ठ वनसप्तीशास्त्रज्ञ डॉ. विनया घाटे म्हणतात, देवरायांची एक महत्वपूर्ण खासियात असते - ती म्हणजे त्यात आढळणारे वृक्षपुरूषोत्तम आणि अजस्त्र महालता. आतापयर्ंत ३९ जातीचे ६.६० वृक्षपुरूषोत्तम व ३२ जातीच्या महालता नोंदल्या गेल्या आहेत. यांतील काही वृक्ष ६० ते ७० फूट उंच आहेत. आठ -दहा लोकांच्या कवेत त्यांचा घेर मावत नाही. काही देवराया हजारो वर्षांच्या आहेत. भारतात १५००० च्या वर, तर महाराष्ट्रात २,८०० देवरायांची नोंद झालेली आढळते. त्यापैकी पुणे जिल्ह्यात २३० देवराया आहेत. भारताप्रमाणे घाना, नायजेरिया, तुर्कस्तान व इतर अनेक देशांत अशा देवराया आहेत.

महाकाव्यात असणारे खास पात्र म्हणजे राजाचा विदूषक - जो राजाचा मित्र असतो. या ठिकाणी वानरं हे काम करतात. दात विचकून हसण्याबरोबर विशिष्ट आवाज काढून वाघासारखे प्राणी आल्याची सूचना इतर प्राण्यांना देतात. त्या बरोबरच जंगलातील अनेक महत्वपूर्ण भूमिका निभावतात.

देवराया ही जशी निसर्गनिर्मित जंगल आहेत तशी मानवनिर्मित वनराई पण आहेत. वनीकरणाच्या अनेक सरकारी योजना कार्यरत आहेत, शिवाय स्मृतिउद्यान, रोपवाटिका वेगवेगळ्या धर्तीवरची उद्याने - बागा अशा नवीन गोष्टीही समाजात रूजल्या आहेत. बारामती येथे नक्षत्र उद्यान ही कल्पना राबवून २७ नक्षत्रांचे २७ वृक्ष लावले आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात औंधमध्येही एक नक्षत्रवाटिका साकारते आहे. त्याचप्रमाणे पर्वतीवर देवदेवेश्‍वर मंदिराच्या मागे ३०० वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा देवचाफ्याचा पुरातन वृक्षही आहे.

इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांनी एक मूल एक झाड ही कल्पना राबवली होती. पण बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील धरहरा या गावात जर मुलगी जन्माला आली तर गाव दहा वृक्ष लावून तिला भेट देतो. त्यातून त्या मुलीचे भरणपोषण, शिक्षण तर होतेच पण पर्यावरणाचे रक्षणही होते. गेल्या २०० वर्षांची ही परंपरा आहे. १२०० एकर क्षेत्रफळ असलेल्या छोट्या गावात ५०० एकरचे वृक्षक्षेत्रफळ आहे. कन्या व सृष्टी यांना सुरक्षित ठेवणारी धरहरा नक्षरी ही वृक्षायनातील महाकाव्याची एक राजधानी आहे.

या महाकाव्यातील नायकाचा एक सखा आहे. आसामचा जादव पायेंग. १९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला प्रचंड पूर आला होता. पूर ओसरल्यावर अरूणा शापोरी (शापोरी - बेट) वर अनेक सापांचे सांगाडे इतस्तत : पडलेले होते. ते पाहिल्यावर १५ वर्षांचा जादव फार दु:खी व बेचैन झाला. त्याने गावातील वृध्दांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांनी बेटावर झाडं नसल्याने माती वाहून जाते. त्यामुळे असे झाले. तुला काही करता आलं तर बघ, असं सांगितलं. जादवला बांबूची २० रोपं दिली. मग जादव कामाला लागला. बेटावर रोज रोपं घेवून जायचं. खड्डे करून रोपं लावायची. गेली २७ वर्ष जादव हे काम एकटाचं करीत आहे. या प्रदीर्घ काळात त्याने हाजारो झाडं लावली. जंगल वसवणारा माणूस म्हणून त्याची जगभर ख्याती झाली. जेमतेम अक्षर - ओळख असलेल्या जादवने ५०० एकर जमिनीवर या ३७ वषात वृक्षोरोपण केले व आज ते जंगल मोलाई कठोनी किंवा मोला फॉरेस्ट (मोला हे जादवचे नाव आहे) म्हणून ओळखलं जाते. वृक्षराईबरोबरच वाघ, गेंडे, गवे, हत्ती, हरणं, माकडं, ससे, गिधडं अशा अनेक प्राण्यांचे हे जंगल आश्रयस्थान आहे. ५२ वर्षीय जादवला पद्मश्री बरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. मोला फॉरेस्ट प्रमाणेच पंजझीरंगा, भरतपूर, गीर, मदुमलाई, बांदीपूर, सायलेन्ट व्हॅली, पंचमढी अशा अनेक राज्यांची महती या महाकाव्यातील निसर्गवर्णनांनी नटली आहेत. अनेक प्राणी, पक्षी, आदिवासी या राज्यात सुखेनैव राहत तर आहेतच पण या निसर्गचित्रांना रंगीबेरंगी सुंदर रूप देत आहेत. या वृक्षराजींनी आम्हाला कंदमुळे फळंं दिली. षड्रसयुक्त चवदार अन्न पुरवलं. उदा. आंबट, चवीची चिंच, लिंबू, कोकम, टमाटे, कडू चवीची मेथी, कारली, तुरट चवीची आवळा सुपारी, तिखट चवीची मिरची, आलं, मिरे, ओवा, खारट चवीच्या पालेभाज्या व नारळ पाणी, गोड चवीची सर्व फळं, धान्य, भाज्या, यातली प्रत्येक चव वेगळी अगदी आंबट चव म्हटली तरी चिंच, कोकम, लिंबू, टमाटे घेतले तर आंबट असले तरी प्रत्येकाची आंबट चव वेगळीच !

वृक्षायनातील खलनायक क्वचित निसर्ग व नेहमीसाठी मानवप्राणी यातील निसर्ग म्हणजे अस्मानी संकट, भूकंप, पूर, अवर्षण, अतिवर्षा, या सर्ववेळी वृक्षांची कसोटी लागते. कारण त्यांना या सर्व गोष्टींपासून दूर पळता येत नाही. दुसरा खलनायक मानव - जो सदैव वृक्षतोड करीत असतो. मानवाची प्रगती वृक्षांच्या मुळावरच आली आहे. शिवाजी राजांनी आपल्या आज्ञापत्रात वृक्ष वठलेला असला तरच तोडावा. एक वृक्ष तोडला तर पाच वृक्ष लावावे, अशी आज्ञा रयतेला दिली होती, परंतु आज रस्ते मोठे करायचेत, रेल्वेमार्ग बांधायचे, इमारती बांधायच्या एक का अनेक कारणांनी जंगलं तोडली जात आहेत.

महाकाव्याचं महत्वाचं लक्षण त्यातील रसवर्णन, वसंतात फुलेली - फळलेली सृष्टी शृगांररसाची द्योतक आहे. अनेक अद्भूत गोष्टी वृक्षसृष्टीत आढळतात. जसे - बांडगूळ, त्यातील आर्किडची सुंदर, नयनमनोहर फुलं, तसेच लाजाळू व कीटकभक्षी वनस्पती आपल्याला चक्रावून टाकतात. अनेक प्रतिकूल परिस्थितीत एखादे झाड वा बीज टिकून राहते व योग्यवेळ येताच फुलते. वृक्षांच्या जीवनात त्यांची आलेली फुलं, फळं, येणारा पहिला पाऊस, पक्ष्यांचं सुरेल संगीत, हे हास्यरसाचे उद्गम होत. वृक्ष रौद्ररूप कधीच धारण करीत नाहीत. पण वादळवार्‍यांचे थैमान झालेच तर वृक्ष उन्मळून पडतात. वृक्षांची माहिती नसली तर दातपाडीसारखी वनस्पती दाताला लागली तर दात पडू शकतात. काही झाडांना अंग घासले गेले तर अ‍ॅलर्जी येते, पण त्याबरोबरच अनेक औषधी वनस्पती मानवासाठी उपयुक्त आहेत. वृक्ष म्हणजे मूर्तिमंत करूणा ! अहो, कुर्‍हाड चालवली तरी फळं देणारे, सुगंध देणारे, जीवंत असताना फुलं, फळं , सावली, आनंद देणारी वृक्षराजी तोडल्यावरही मानवाच्या सेवेसाठीच उपयोगी पडते. ज्ञानेश्‍वराप्रमाणे शांतरस बरसणारे वृक्ष सर्वांना संदेश देतात - जगा व जगू द्या. सुखाशांती व मोक्ष मिळविण्यासाठी मुमुक्षु काय करायला हवे ते सांगतात - नेति - नेति या शब्दांनी वर्णिलेली मोक्ष-मुक्ती-मुमुक्षत्व ही कल्पना सर्वसामान्य माणसापासून खूप दूर आहे. पण योग्याप्रमाणे आल - स्थिर राहणारी ही वृक्षसंपदा मानवाला शांतीची - करूणेचा व सेवेचा संदेश देते.

महाकाव्यं लिहिली गेली ती यक्षाला सत्यधर्माचा विजय कसा होतो ते सांगण्यासाठी. वृक्षाचं सर्व जीवनच ह्या सत्य धर्मासाठी शांती - अहिंसा - दया - करूणा - क्षमा व सेवा यासाठीच वाहिलेले आहे. महाकाव्यापासून आपण प्रेरणा घेतो तशीच वृक्षांपासून आपण प्रेरणा घेवून पर्यावरणाचं रक्षण करण्याचं व्रत घेतलं पाहिजे. ह्या चातुर्मासात हा वसा सवार्ंनी घ्यावा ही विनंती.

आशा कुलकर्णी , पुणे, मो : ९८८१७३१४५५

Disqus Comment