व्यक्ती, संस्था, कृती, उक्ती आणि दृष्टी


वन संरक्षण समिती ही जणू गाव विकास समिती झाली. निर्धूर चुली आल्या, अनेक कल्याणकारी योजना आल्या, नेवडकर निघाले... गाव त्यांच्या मागे निघाले... विकास मागोमाग येत राहिला. मेवाडकर ही व्यक्‍ती राहिली नाही, ती एक दिशादर्शक पताका झाली. यशाचा मार्ग दाखवित राहिली.

महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे असे म्हणतात. व्यक्‍ती तितक्या संस्था असा थोडासा उपहासात्मक असला तरीही सत्य परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकणारा वाक्प्रचार येथे रुढ आहे. पाणी टंचाई, पाण्याची सातत्याने वाढणारी आणि पूर्ण होवू न शकणारी गरज, आम्हाला पाणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे असे म्हणत कानावर हात ठेवून बसणारे सामान्यजन, आमच्या जवळ जेवढा पैसा उपलब्ध होईल तेवढ्यात जमेल तेवढेच काम .... जसे जमेल तसे करु... असे म्हणणारे शासन या सगळ्या गुंतवळ्यात सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे एक जाळे उभे राहिले. त्यातून आम्हाला जमेल तेवढे आणि जमेल तसे ... इथून सुरुवात करुन खूप मोठे आणि वेगळे काम महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उभे राहिले.

धुळे जिल्हा हा उत्तर टोकावरचा जिल्हा. सध्यातरी आर्थिक दृष्टीने शेवटच्या पाचसहा क्रमांकात शोधावा लागेल अशा आर्थिक स्थितीत असलेला.(मा. वि. निर्देशांकानुसार महाराष्ट्रात 29 वा) जिल्हा. अशावेळी काही व्यक्‍ती आणि काही संस्था यांचे कामामुळे महाराष्ट्रात जवळजवळ नेतृत्वस्थानी येवून उभा राहिला आहे. ज्यांच्या मूलभूत दृष्टीकोनातून आणि अथक प्रयत्नातून हे घडले त्यांचा अल्प परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. खरे तर लेखाची शब्द मर्यादा आणि पानांचे बंधन यामध्ये हे सारे गुंफणे म्हणजे मुंगीने पर्वत उचलण्याचाच एक प्रयत्न आहे.

शिरपूर.... शिरपूर पॅर्टन.... आमदार अमरीशभाई पटेल ....सुरेश खानापूरकर.... प्रियदर्शीनी सूत गिरणीची सेवाभावी संस्था हे सारे माहाराष्ट्र भर गाजत आहे. त्यांची अँजिओप्लॅस्टी ही संकल्पना एक परवलीचा शब्द झाला आहे. ते काम, त्याची पध्दत, त्याचे यशापयश याबद्दल इथे लिहिण्याचे प्रयोजन नाही. दोन भिन्न भिन्न ठिकाणच्या व्यक्‍ती वेगवेगळ्या वातावरणातल्या, भिन्न संस्कारातल्या एकच स्वप्न बघतात या दुष्काळप्रवण क्षेत्रात पाणी देता येईल का, आणता येईल का ? एका जवळ विचार व दृष्टी असते, नोकरीमुळे आयुष्यभर पाणी या विषयाचा संपर्क असतो, शिक्षणामुळे त्याचा अभ्यास असतो, दुसर्‍या व्यक्‍तीजवळ हे पुस्तकी ज्ञान नसते, त्याच्याजवळ असते व्यावहारिक जगात माणसे वाचून शिकलेले शहाणपण. माणसाच्या डोळ्यातून त्यांची परिस्थिती जाणून घेण्याची ताकद, त्यांच्या उत्कर्षासाठी काहीतरी चांगले करण्याची अंतर्यामी उर्मी, जे जे उत्तम ते सारे घडविन हा आत्मविश्वास आणि बरेच काही.

योगायोगाने दोघांची गाठ पडली. आपल्या डोक्यात काय आहे ते सुरेशजींनी सांगितले, आपल्याला जे करायची इच्छा आहे ते करू शकणारा माणूस तो हाच हे अमरिशभाईंना समजले. कधी रिटायर होताय ? 30 सप्टेंबरला .... एक ऑक्टोबर पासून या असा भाईंनी निरोप दिला. शेवटच्या महिन्यातल्या पगाराएवढा पगार दिला. आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री घेवून दिली, हाताशी माणसे दिली आणि भाई अलगद पडद्याआड जावून थांबले. कोणते काम आधी घ्यायचे, कोणते नंतर, कोणाची मदत घ्यायची, किती खोलीपर्यंत माती खोदायची या गोष्टींसाठी संपूर्ण स्वायंत्र्य दिले, ना स्वत: कधी हस्तक्षेप केला... ना इतर कुणाला करू दिला...

त्यातून उभे राहिले हे सगळ्या भारताला नेतृत्व देऊ शकेल असे शिरपूर पॅटर्न चे काम. व्यक्‍ती येतात... जातात.. .संस्था उभ्या राहतात... फोफावतात... थांबतात... संपतात... चिरस्थायी टिकतो तो विचार. तो एका गावातील एक छोटी संस्था इतका लहान नसतो. एकेक व्यक्‍ती पाहिले येत गेली, एकएक ठिकाणी पदरात बांधून जात राहिली. वन्ही फुलत राहिला. त्यामागची काम करणारी यंत्रणा म्हणजे संस्था. त्या व्यक्‍तींपेक्षा विचार मोठा, कृती मोठी त्याही पेक्षा दृष्टी मोठी. त्यातूनच हे असे शिरपूर पॅटर्न रूजते... फुलते.

यापेक्षा अगदी वेगळ्या परिस्थितीत लामकानी होती. सुमारे 350 मि.मी पाऊस पडणारे गाव. फेब्रुवारी आला की टँकर ठरलेला. 8000 च्या आसपास लोकसंख्या आणि 18 पगड जातीजमातींची मिश्र वस्ती. एके काळी दाट जंगल होते. डोंगराचे उतार हिरवेगार होते. आता त्या डोंगरउतारावर गवताची काडीही नव्हती. त्याच गावाचा एक सुपूत्र डॉ.धनंजय नेवाडकर.... बुध्दीमान... कष्टाळू... परिस्थितीची जाणीव असलेला. एकदा जीवघेणा अपघात झाला पण जीव बचावला. हाती पायी सुखरूपपणे त्यातून बाहेर आला. येताना जाणीव घेवून आला... मृत्यूच्या दारातून परत आलोय... आता उर्वरित आयुष्यात समाजाच्या हिताचे काम करायचे. निदान माझ्या गावाचा प्रश्‍न तरी सोडवायचा. गावाला पाणी द्यायचे, मग अण्णा भेटले, पोपटराव भेटले, पण मुख्यत: भेटले गावातील नागरिक, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले, वेगवेगळ्या व्यवसायातले, वेगवेगळ्या वयोगटातले, स्त्री - पुरूष सगळे. सगळ्यांचे म्हणणे एकच - पाणी आले तर प्रश्‍न सुटतील, पण ते येणार कुठून आणि या कामासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून?

आधी या मागे काही व्यक्‍तिगत महत्वाकांक्षा, काही स्वार्थ, काही राजकीय इच्छाशक्‍ती आहे काय हे गावकर्‍यांनी तपासून घेतले, वेगवेगळ्या जातीधर्माचे, राजकीय विचारांचे लोक एकत्र येणे आणि तसे एकत्र टिकून रहाणे ही अतिशय अवघड बाब होती. पण ते जमू शकले. इच्छा असली की मार्ग सापडतो, ध्येय उत्तम असले की कामाला हात मिळतात, पैसा उभा रहातो. इथे तसेच घडले - गाव एकत्र आला, गावाभोवती डोंगर... जंगल... वन खात्याची जमीन.. शासनाची हातांना कामा देण्याची रोजगार हमी योजना, गावची वनसंरक्षक समिती स्थापन झाली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार काम करू लागली. दरवर्षी 50 हेक्टर चे क्षेत्र निवडायचे, समतल चर खोदायचे, त्या क्षेत्रात चराईबंदी, कुर्‍हाडबंदी राबवायची. जो हा नियम तोडेल त्याला गावाने शिक्षा करायची. रोजगार हमी चा पैसा, जंगर खात्याची जमीन, डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि गावाची मेहनत यातून 10 वर्षात 400 हेक्टर क्षेत्रावर हे काम उभे राहिले. सगळे डोंगर डोक्याएवढ्या उंचीच्या गवताने झाकले गेले. मग ससे आले.. हरणे आली.. वेगवेगळे् पक्षी आले... निसर्गाचे एक नवे चक्र तिथे रूजू झाले. हळूहळू बोरे, लिंब वैगरे झाडे ही वाढू लागली.

पाऊस पूर्वी पडायचा तेवढाच पडतो, तो मोजायला सुरूवात झाली. गवताच्या विविध जातींचा अभ्यास सुरू झाला. कारण मुरण्याचे पाणी मिळाले. 500 फूटापर्यंत कोरड्या असलेल्या बोअरला 50 फुटावर पाणी मिळू लागले. 100 फुटापेक्षाही जास्त खओल गेलेल्या विहीरींना उन्हाळ्यातही 15 फुटांवर पाणी आले. जिथे एकही एकर बागायत नव्हती तिथे निम्म्यापेक्षाही जास्त गाव उन्हाळ्यातले तिसरे पीक घेवू लागले. गेल्या वर्षीच्या दुष्काळात धुळे जिल्ह्याला लागणारा सगळा 400 टन चारा एकट्या लामकानीने पुरविला.

वन संरक्षण समिती ही जणू गाव विकास समिती झाली. निर्धूर चुली आल्या, अनेक कल्याणकारी योजना आल्या, नेवडकर निघाले... गाव त्यांच्या मागे निघाले... विकास मागोमाग येत राहिला. मेवाडकर ही व्यक्‍ती राहिली नाही, ती एक दिशादर्शक पताका झाली. यशाचा मार्ग दाखवित राहिली.

बारीपाड्याच्या चैत्राम पवारची हकीकत ही अणखीच वेगळी. चार चौघांसारखा कॉलेजात जाणारा तरूण... मौजमस्ती करणारा... खेळणारा.... हुंदडणारा... एक दिवस डोक्याला दगड लागला. रक्‍त वाहणारे वाहते डोके घेवून डॉक्टर कडे गेला. तिथे रांग ... नंबर लागायला वेळ लागतो आहे... रक्‍त वाहतेच आहे.. संतापला... रांग तोडून घुसू लागला.. त्या अवस्थेतही डॉक्टरला अद्वातद्वा बोलला. डॉक्टरांना दिसले त्या तरूणातले स्फूलिंग. डॉक्टर फाटक हे औरंगाबादचे, हैडगेवार हॉस्पिटलचे. आदिवासी भागात जावून रूग्ण सेवा करणारे. दर सोमवारी वासी येथे जात, तिथेच झाला हा प्रसंग. त्यातून दोघांचे संबंध निर्माण झाले, दृढावले, त्यातून तरूणांना एकत्र यायची स्फूर्ती मिळाली. बारीपाडा म्हणजे एक छोटासा आदिवासी लोकांचा वस्ती असलेला पाडा. फारशी शेती नाही, पाणी नाही, उद्योग वपोट भरणे यासाठी सर्व तरूण तरूणी गुजरातेत मजूरीसाठी जाणे हा एकमेव मार्ग. गावाभोवती जंगल, मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात, आपण हे जंगल संभाळले तर ? तेच आपल्याला जगायचे साधन देऊल का ? निश्‍चितपणे देईल, हा चैत्रामचा विचार. तो त्याच्या काही मित्रांना पटला. एक टीम तयार झाली... कामाला लागली... पहिल्या वर्षी काही झाडे लावली, त्यांना पाणी हवे म्हणून दगडी बंधारे बांधले, त्यात पाणी थांबू लागले. सहा महिने बाहेरून पाणी आणणारे गाव अशा पध्दतीने पाणी थांबते म्हटल्यावर श्रमदानातून व शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठ्या बंधार्‍यांच्या मागे लागले. अवघ्या 7 वर्षात पाणी उसनवार घेणारे गाव आजूबाजूला सहा सात पाड्यांना पाणी पुरवू लागले.

त्यातून शेती पिकू लागली, गाई म्हशी आल्या, शाळा सुरू झाली, घरे पक्के रूप घेवू लागली. बाहेर मजूरी साठी जाणार्‍या गावात आता बाहेरच्या गावातले लोक रोजगारासाठी येवू लागले. खेडे स्वयंपूर्ण होवू लागले. या विकासात महिलांचाही मोठा हात होता. गावाची पंचायत हीच विकास करणारी संस्था बनली. एकेका कामाकरता एक समिती स्थापन झाली. तिच निर्णय घेवू लागली. चैत्राम वर्तुळाचा मध्यबिंदू झाला. गावाच्या कर्तृत्वाचा आलेख विकसित होत गेला.

चैत्रामसारख्या, नेवाडकर, खानापूरकर सारख्या, अमरिशभाई सारख्या व्यक्‍ती या व्यक्‍ती नसतातच. ते असतात तेजाचे पुंजके, आपला परिसर उजळून टाकणारे, त्या व्यक्‍ती ह्याच संस्था बनतात, त्या जो मार्ग पत्करतात तो इतकरांसाठी पुढील वाटचालीचा मार्ग बनतो. अशा अनेक व्यक्‍ती परिसरात असतात. विकासासाठी वेगवेगळे क्षे्त्र निवडून त्यात काम करित असतात. मात्र त्या व्यक्‍तींपेक्षा कृती आणि त्याही पेक्षा विचार महत्वाचा. त्यापेक्षाही ती दृष्टी ही अधिक महत्वाची. असा विचार करून तो समाजासमोर मांडणारे ज्ञानऋषी देखील त्या जिल्ह्यात आहेत. हेच असतात समाजाचे नंदादीप... स्वतेजाने लखलखणारे... अशा व्यक्‍ती याच संस्था... हाच प्रगतीचा लेखाजोखा... त्यांच्या कृती, उक्‍ती आणि शब्द हेच उद्याचे वेदमंत्र.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading