राजस्थानचे रजत जलबिंदू - 5
श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर
सार्वजनिक कुंड्याही लोकच बनवतात, पाण्याचे काम म्हणजे पुण्यसंचयाचं काम, कोणत्याही घरांत काही शुभकार्य निघाले की तिथला गृहस्थ सार्वजनिक कुंडी बनवायचा संकल्प करतो आणि तो पूर्ण करण्यासाठी गांवांतली दुसरी घरंही आपले श्रम देवून हातभार लावतात. काही धनिक कुंटुंब सार्वजनिक कुंडी बनवून तिच्या राखणींच काम एखाद्या कुटुंबावर सोपवितात. तेव्हा कुंडीच्या आसपासच्या परिसरांत, आगोर च्या बाहेर जवळच ह्या कुटुंबाची राहायची सोय केली जाते.
ही व्यवस्था दोन्ही बाजूंनी (धनिक आणि सामान्य अशा दोन्ही कुटुंबाकडून) एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. कुंडी बनविणाऱ्या कुटुंबाचा प्रमुख आपल्या संपत्तीचा एक ठराविक भाग कुंडीच्या देखभालीसाठी वेगळा काढून ठेवतो. आणि नंतरच्या पिढ्याही ही जबाबदारी निभावतात. आजही तिथे अशी बरीच कुंडं आहेत, जी बनविणारे परिवार नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने तिथून निघून आसाम, बंगाल, मुंबई इथे स्थानिक झाले आहेत, पण रखवाली करणारी कुटुंब मात्र कुंडांजवळत राहाताहेत. हे मोठे कुंड आजही पावसाचे पाणी साठवत आहेत - आणि पूर्ण वर्षभर, कुठल्याही नगरपालिकांपेक्षा जास्त, स्वच्छ - शुध्द पाणी पुरवत आहेत.
काही कुंड तुटलेल्या - फुटलेल्या तर कुठे कुठे पाणीही खराब झाले आहे - पण हे सगळं समाजाची एकूण जी तोड मोड झाली आहे त्याच प्रमाणात आढळेल. त्यामध्ये ह्या पध्दतीचा काहीच दोष नाही आहे. या पध्दतीच्या ठिकाणी तर नव्या, खर्चिक आणि अव्यवहारी योजनांचे दोषसुध्दा झाकण्याची उदारता आहे.
ह्या इलाख्यांमध्ये मागच्या काही काळात पाण्याचे संकट निवारण्यासाठी जितके म्हणून जलकूप आणि हातपंप लावले, त्या सगळ्यांतून खारट पाणीच निघाले आहे. पिण्यालायक गोडं पाणी मात्र ह्या कुंड - कुंड्यांमधूनच उपलब्ध होते. म्हणून मग मागाहून अक्कल सुचल्यावर कुठे कुठे ह्या कुंडांवरच हातपंप लावले गेले. खूप गाजावाजा झालेल्या इंदिरा गांधी नाल्यातून अशा काहीच ठिकाणी पिण्याचे पाणी पोहोचवलं गेले आहे आणि ह्या पाण्याची साठवण, कुठे कुठे तर, नव्याने बसविलेल्या सरकारी टाक्यांमधून केली गेली आहे... तर कुठे कुठे त्याच जुन्या कुंडांमध्ये.
ह्या कुंडांनी पूर्वीचा काळ पाहिला आहे. नवा - आताचाही. ह्या हिशोबाने ती समयसिध्द (सर्वकालिक) आहेत. स्वयंसिध्दता हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची सामग्री आणखी कुठून तरी नाही आणावी लागत. मरूभूमीत पाण्याचे काम करणाऱ्या विशाल संघटनेचा एक मोठाच गुण आहे, की आपल्या जवळ उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासूनच आपली एक मजबूत योजना उभी करणे. कुठे एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू मिळते, पण दुसरीकडे ती मिळत नाही. तरीदेखील तिथेही कुंडी बनणारच.
जिथे दगडाच्या पट्ट्या मिळतात, तिथे कुंडीचा मुख्य भाग त्यांपासूनच बनतो. काही ठिकाणी त्या नसतात, मग तिथे फोग नावाचे झाड आहे मदतीला. फोग च्या फांद्या एकमेकींत गुंतवून, अडकवून कुंडीच्या वरचा घुमटवजा आकार बनवला जातो. त्याच्यावर रेती, माती आणि चुन्याचा जाड लेप लावला जातो. घुमटाच्या वर चढण्यासाठी, आत गुंफलेल्या फळ्यांचा थोडासा भाग बाहेर काढून ठेवला जातो. मध्यभागी पाणी काढायची जागा. इथेही पावसाचे पाणी कुंडीभोवतालच्या ओयरो किंवा भोकांतून जाते. दगडी पट्ट्यांच्या कुंडीवर ह्या भोकांची संख्या एकापेक्षा जास्त असते, पण फोग लाकडूवाल्या कुंडीवर भोक फक्त एकच ठेवलं जातं. कुंडीचा व्यास काही सात - आठ हात, उंची चारेक हात आणि पाण्यासाठी भोक साधारण एक बित्ता मोठं असतं. पावसाचे पाणी आत कुंडीत जमा झाल्यानंतर इतर वेळी हे भोक कापड गुंडाळून केल्या गेलेल्या एका डाट ने झाकून ठेवतात. फोगवाल्या कुंड्या वेगवेळ्या आगोर च्या ऐवजी एकाच मोठ्या आगोरमध्ये बनतात, कुंईसारख्या . आगोर च्या जवळच छान लिंपून काढलेली सुंदर घरं आणि तशाच लिंपलेल्या कुंड्या, चारी बाजूंनी पसरलेल्या मोठ्या वाळवंटात लपाछपी खेळत असलेल्या वाटतात.
राजस्थनांत रंगांच एक विशेष आकर्षण आहे. लेहंगे, ओढण्या आणि चटकदार रंगांच्या पगड्या, आयुष्याच्या सुखदु:खांत रंग बदलतात. पण ह्या कुंड्यांचा मात्र फक्त एकच रंग - फक्त पांढरा. कडक उन्ह व उष्णतेच्या ह्या इलाख्यात जर कुंड्यांना कुठचा गडद रंग दिला, तर तो बाहेरची उष्णता शोषून आंतल्या पाण्यावरही त्याचा परिणाम करील. म्हणून इतका रंगीन समाज कुंड्यांना फक्त पांढऱ्या रंगात रंगवतो. सफेदी कडक उन्हाच्या किरणांना परावर्तित करते. फोगच्या फांद्यांनी बनलेला घुमटसुध्दा ह्या कडक उन्हात गरम नाही होत. त्यांत उन्हाच्या चटक्यांनी भेगा पडत नाहीत आणि आंतल पाणी गारच राहातं.
मागील काही काळांत कुठल्या तरी खात्याने एका नवीन योजनेच्या अंतर्गत ह्या इलाख्यात फोगच्या कुंड्यांवर काही प्रयोग केले होते. फोग च्या ऐवजी नवीन - आधुनिक सामग्री म्हणून सिमेंट वापरले. प्रयोग करणाऱ्यांना अपेक्षा होती की ही आधुनिक कुंडी जास्त टिकावू ठरेल, पण तसं झालं नाही. सिमेंटने बनवलेल्या ह्या आदर्श (?) कुंडीच्या वरच्या घुमटाला इतका कडक उन्हाळा सहन झाला नाही.... आणि तो खाली खड्ड्यांत कोसळला. मरूभट्टीत डांबरसुध्दा वितळून गेलं. पावसांत जमा केलेलं सगळं पाणी वाया गेलं. तेव्हा लोकांनी तिथे पुन्हा फोग, रेती आणि चुन्याने बनणारी समयसिध्द कुंडी आपलीशी केली आणि आधुनिक सामग्रीमुळे निर्माण झालेलं जलसंकट दूर केलं.
मरूभूमीत कुठे कुठे खडीची पट्टी फार खाली नसून, खूपशी म्हणजे चार - पांच हात वर असते. त्यावेळी कुंई बनणे शक्य नसते. कुंई तर रेजाणी पाण्यावर चालते. खडियापट्टी कमी खोलवर असेल तर त्या भागात रेजाणी पाणी इतकं जमा नाही होवू शकत की पुढे वर्षभर कुंई घडा भरीत राहू शकेल. मग त्या भागांत ह्या खडीचा उपयोग प्रत्यक्ष कुंडी बनवण्यासाठीच केला जातो. खडीचे मोठाले तुकडे खाणींतून काढून ते लाकडांच्या विस्तवावर चांगले भाजून घेतले जातात. एका ठराविक तापमानाला हे मोठे डले फुटून त्यांचे छोटे छोटे तुकडे बनतात. मग ते तुकडे कुटले जातात. आगोर ची व्यवस्थित निवड करून कुंडीचं खोदकाम होतं. आंतलं चिणकाम आणि वरचा घुमटसुध्दा ह्या खडीच्या चुऱ्यापासून बनवले जातात. पांच - सहा हात व्यासाचा हा घुमटही साधारणत: एक बित्ता जाडीचा ठेवला जातो. मग त्यावर दोन बायका उभ्या राहून पाणी काढतील, तरी तो तुटायचा नाही.
मरूभूमीत कितीतली ठिकाणी मोठाले खडक आहेत. त्यापासूनच खडीच्याा पट्ट्या निघतात. ह्या पट्ट्यांचा वापर करूनच मोठे मोठे कुंड बनविले जातात. ह्या पट्ट्या साधारणपणेे दोन हात रूंद आणि चौदा हात लांबीच्या असतात. जेवढा मोठा आगोर असेल आणि जितकं जास्त पाणी एकत्र केलं जावू शकेल, तितकंच मोठं कुंड ह्या पट्ट्यांच्या झांकणांनी बनवलं जातं.
घरं लहान - मोठी, कच्ची - पक्की कशीही असोत, कुंडी मात्र त्यांत पक्कीच बनते. मरूभूमीत गावं दूर दूर वसलेली आहेत. लोकसंख्या सुध्दा कमीच आहे. अशा विखुरलेल्या गावांना पाण्याच्या मध्यवर्ती व्यवस्थेने जोडायचं काम शक्यच नाही आहे......म्हणून समाजाने इथलं पाण्याचं सारं काम एकदम विकेंद्रीत करून त्याची जबाबदारी थंबाथेंबांनी एकमेकांत वाटून घेतली. हे काम, निव्वळ एक शुष्क तंत्र - यांत्रिक न राहतां, एक संस्कार बनलं. ह्या कुंड्या किती देखण्या असू शकतात, त्याची ओळख करून देतात जेसलमेरची गावं.
प्रत्येक गावांत साधारणपणे पंधरा - वीस घरंच आहेत. पाऊस इथे खूपच कमी पडतो. जेसलमेरच्या सरासरी पावसापेक्षाही कमी पावसाचा भाग आहे हा. इथे घरासमोर एक मोठासा चबुतरा बांधलेला आढळतो. चबुतऱ्याच्या वर आणि खाली भिंतीवर रामरज पिवळी माती आणि गेरूने बनवलेली सुंदर नक्षीकामं - जसाकाही रंगीत गालिचाच अंथरला आहे. इथे बसून घरांतली सारी कामं होतात. धान्य वाळवलं जातं, मुलं खेळतात, संध्याकाळी इथेच मोठ्यांची बैठक बसते आणि कोणी पाव्हणा आला तर रात्रीचा त्याचा मुक्कामही ह्याच चबुतऱ्यावर असतो.
पण हे सुंदर चबुतरे म्हणजे निव्वळ चबुतरेच नसतात. ते कुंड असतात. घराचं छोटंसं छप्पर, अंगण किंवा समोर मैदानात पडणारं पाणी त्यांच्यात जमा होतं. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला आणि हे कुंड पूर्ण भरले नाहीत, तर जवळपासच्या दुसऱ्या कुठल्या विहीरीचं किंवा तलावाचं पाणी उंटाच्या गाडीतून आणून त्यात भरलं जातं.
टांके सुध्दा कुंड - कुंडीसारखेच असतात.... ह्यांच्यात मात्र अंगणाऐवजी सामान्यपणे घरांच्या छप्परांवर पडणारं पावसाचं पाणी जमा केलं जातं. ज्या घराचं जेवढं मोठं छप्पर,त्या प्रमाणात त्याचं तेवढंच मोठं टाकं. टाक्यांचा लहान - मोठेपणा तिथे राहणाऱ्या कुटुंबांच्या लहान - मोठेपणावर, तसेच त्यांच्या पाण्याच्या गरजेनुसारही ठरतो. वाळवंटातल्या सगळ्या गांवातली नी सगळ्या शहरांतली घरं अशाच प्रकारे बांधली जातात, की त्यांच्या छतांवर पडणारा पाऊस त्यांच्याखाली बांधलेल्या टाक्यांत जमा व्हावा. हरेक छताला हलकासा उतार असतो. उताराच्या तोंडाशी एक स्वच्छ पाट किंवा पन्हाळ बनवली जाते. पन्हाळीच्या तोंडाशीच, पाण्याबरोबर योणारा कचरा अडविण्याची सोय केलेली असते. त्यातून पाणी गाळून ते खाली टाक्यांत जमा होतं. दहा - बारा माणसांच्या कुटुंबाचं टाकं साधारणत: पंधरा - वीस हात खोल आणि तेवढंच लांबरूंद ठेवलं जातं.
टाकं, एखाद्या खोलीच्या, बैठकीच्या किंवा अंगणाच्या खाली असतं. ते सुध्दा उत्तम तऱ्हेने झाकलेलं असतं. एका खोपऱ्यात लाकडाच्या स्वच्छ झाकणाने मोखी (मुख) झाकलेली असते, जी उघडून तिथून बादलीने पाणी काढलं जातं. टाक्याचं पाणी वर्षभर पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरलं जातं. त्याची शुध्दता टिकून राहण्यासाठी म्हणून, ह्या छतांवर सुध्दा कोणीही पायात बूट - चप्पल घालून जात नाहीत. उन्हाळ्यात रात्री ह्या छतांवर कुटुंब झोपतात जरूर, पण अजाण अशा लहान मुलांना छताच्या अशा भागांत झोपवतात की जो भाग टाक्यांच्या जवळपासही नसतो. तान्ही अबोध पोरं रात्री बिछाना ओला करू शकतात - आणि त्याने छत खराब होवू शकतं - म्हणून ही खबरदारी.
पहिली दक्षता तर इथेच घेतली जाते, की छत, पाण्याचा पाट (पन्हाळ) आणि त्याच्या टोकाशी जोडलेलं टाकं पूर्णपणे स्वच्छ राहील. पण तरीही काही वर्षांच्या अंतराने, उन्हाळ्याच्या दिवसांत म्हणजे पावसाळ्याच्या बरोबर आधी, जेव्हा वर्षभरात पाणी कमी होवून गेलेलं असतं तेव्हा, टाक्यांची साफसफाई, धू - पूस आतूनसुध्दा केली जाते. आत उतरायला छोट्या छोट्या शिड्या आणि तळांत तसाच खमाडियो बनवलेला असतो, की जेणेकरून गाळ सहजपणे बाजूला करता येईल. कुठे कुठे टाकी मोठ्या छतांबरोबरच घरांच्या मोठ्या अंगणाशी सुध्दा जोडली जातात. तेव्हा पाणी साठविण्याची त्यांची क्षमता दुपप्ट होते. अशी मोठाली टाकी भले एका मोठ्या घराच्या मालकीची असतील, पण वापराच्या दृष्टीने मात्र त्यांच्यावर पुरी आळी जमा होते.
मोहल्ले, गाव, वसाहतींपासून खूप दूर, अगदी निर्जन जागीसुध्दा टाकी बनवतात. टाकी बनवणारे त्यांना आपल्या स्वत:साठी नव्हे, तर आपल्या समाजासाठी बनवतात. स्वामित्व विसर्जना चं इतकं सुंदर उदाहरण क्वचितच कुठे सापडेल. ही टाकी गोपालांच्या - पशुपालकांच्या कामी येतात. सकाळी खांद्यावर भरलेली कुपडी (मातीची टपटी सुरई) टांगून जाणारे गोपाल - गुराखी दुपारसुध्दा गांठत नाहीत, तोवर कुपडी रिकामी होते. पण आजूबाजूलाच मिळतं एखादे टाकं. प्रत्येक टाक्यावर दोर बांधलेली बादली न पेक्षा एखादा पत्र्याचा डबा तरी ठेवलेलाच असतो.
वालुकामय भागात जिथे कुठे थोडीशीही दगडाची किंवा मुरूमाची जमीन असते, तिथे टाकं बनवलं जातं. इथे जोर पाण्याच्या प्रमाणावर नव्हे, त्याच्या साठवणीवर असतो. चुर्रो चं पाणीसुध्दा अडवून टाकी भरून घेतली जातात. चुर्रोम्हणजे रेतीच्या टेकाड्यांच्या मधोमध असलेली अशी छोटीशी जागा, की जिथे पावसाचे जास्त पाणी वाहू शकत नाही. पण बारकासा प्रवाहसुध्दा टाकी भरण्यासाठी अडवला जातो. अशा टाक्यांच्या आजूबाजूला थोडी आडजागा बनवूनही पाण्याची आवक वाढवली जाते.
नव्या हिशोबाने बघितले, तर छोट्यात छोट्या कुंडीत - टाक्यांमध्ये सुमारे दहा हजार लिटर, तर मध्यम आकाराच्या कुंडात पन्नास हजार लिटर पाणी जमा केलं जातं. मोठे कुंड आणि टाके तर बस्, लाखोपतीच असतात. त्यांच्यात लाख - दोन लाख लिटर पाणी साठवलेले असतं.
पण सगळ्यांत मोठ्ठ टाकं म्हणजे अगदी करोडपती च समजा. त्यात साठ लाख गॅलन, म्हणजे सुमारे तीन कोटी लिटर पाणी मावतं. हे आजपासून साधारणपणे साडेतीनशे वर्षांपूर्वी जयपूरच्या जवळ जयगढ किल्ल्यांत बांधले गेले. सुमारे दीडशे हात लांब रूंद असं हे भरभक्कम टाकं चाळीस हात खोल आहे. ह्याचं तेवढंच विशाल छत आतमध्ये पाण्यात बुडालेल्या 81 खांबांवर टेकलेलं आहे. चारही बाजूंना गोख म्हणजे गवाक्षं आहेत. ताजी हवा आणि प्रकाश आतपर्यंत खेळण्यासाठी. त्यामुळे पाणी वर्षभर दोषरहित राहातं. टाक्यांच्या दोन कोपऱ्यातून आत उतरण्यासाठी दोन्ही बाजूंना दोन दरवाजे आहेत. हे दोन्ही दरवाजे लांबलचक गलियारा ने किंवा व्हरांड्याने जोडलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी पाण्यापर्यंत उतरायला पायऱ्या आहेत. इथूनच उतरून बहंगिया तून पाणी वर आणलं जातं. बाहेरच्या गवाक्षांमधून एखादा कवडसा खांबांच्या मधून खाली पाण्यावर पडतो, तेव्हा अंदाज येतो की पाणी किती निळं आहे.
हे निळं पाणी, किल्ल्याजवळच्या टेकड्यांवरून काढलेल्या छोट्या नाल्यांतून एका मोठ्या नाल्यांत येतं. सडकेसारखा रूंद नाला, किल्ल्याच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेवून, किल्ल्याच्या भिंतीखाली उतरून मग किल्ल्याच्या आत पोहोचतो.
पावसाळ्याच्या सुरूवातीला नाल्यांची स्वच्छता तर केली जातेच, पण तरी सुध्दा पहिल्या पावसाचे पाणी त्या टाक्यांत मात्र येत नाही. मुख्य मोठ्या टाक्यांबरोबर आणखी दोन टाकी आहेत. एक उघडं आणि एक बंद. ह्या टाक्यांजवळ खुलणाऱ्या मोठ्या नाल्याला दोन झडपा लावलेल्या आहेत. सुरूवातीला मोठ्या टाक्यांशी पाणी आणणाऱ्या नाल्याची तिकडची झडप बंद ठेवली जाते आणि उघड्या टाक्यांजवळची झडप उघडली जाते. पहिल्या पावसाचं पाणी नाल्याला धुवून स्वच्छ करीत करीत उघड्या टाक्यांत जातं आणि मागाहून त्याला जोडूनच असलेल्या बंद टाक्यांत. ह्या दोन्ही टाक्यांतल्या पाण्याचा उपयोग जनावरांच्या साठी केला जातो. मुळातच जयगढ हा मोठा किल्ला होता आणि कधीकाळी इथे पुरं सैन्य राहात होतं. सैन्यात हत्ती - घोडे - उंट सगळं सगळं होतं. शिवाय एवढ्या मोठ्या किल्ल्याची साफसफाई सुध्दा ह्या पहिल्या दोन टाक्यांच्या पाण्याने होत होती.
जेव्हा पाण्याचा पूर्ण मार्ग नाल्याचं पुरं जाळं धुतलं जाईल, तेव्हा पहिली झडप बंद होते, दुसरी झडप उघडते आणि मग मोठं टाकं तीन कोटी लिटर पाणी सामावून घ्यायला सिध्द होतं. एवढी मोठी क्षमता असलेलं हे टाकं किल्ल्याच्या पाण्याच्या आवश्यकतेबरोबरच किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठीही बनवलं गेलं. कधी किल्ला शत्रूंनी घेला गेला, तरी खूप काळपर्यंत आत पाण्याची कमतरता राहू नये याचीही दक्षता घेतली गेली.
राजे गेले, त्यांच्या सेना गेल्या, आता मात्र जयपूरला फिरायला येणारे पर्यटक इथे येतात. चांगला मोठा चढ चढून येणाऱ्या पर्यटकांचा थकवा ह्या टाक्यांच्या गार आणि निर्मळ पाण्याने दूर होतो.
सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836