राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


जैसलमेर जिल्ह्यांत आज 515 गावं आहेत. त्यातली 53 गावं ह्या ना त्या कारणांनी ओस पडली आहेत. जागती गावं आहेत 462. त्यापैकी फक्त 1 गांव सोडून बाकी प्रत्येक गावांत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अगदी ओस पडलेल्या गावांतही ही सोय कायम आढळून येते. सरकारी आकड्यांनुसार जैसलमेरच्या 99.78 टक्के गावांतून तलाव, विहीरी आणि अन्य मार्ग आहेत.

टाक्यांत आणि कुंडामध्ये साठलेलं पाणी इतकं निर्मळ असू शकतं, याचा अंदाज देशभर वाहत्या म्हणीला सुध्दा येत नसेल.

बिंदू मध्ये सिंधू समान भक्ति रसांत बुडालेल्या संतकवींनी 'बिंदूमध्ये सिंधुसमान' असं म्हटलं. घर - संसारात बुडालेल्या लोकांनी त्याला आधी आपल्या मनांत आणि मग आपल्या धरतीवर काही अश्या तऱ्हेने उतरवलं की 'हेरनहार हिरान' म्हणजे हेरणारे - पाहणारे व्हावेत - थक्क व्हावेत.

'पालर' पाण्याला म्हणजे पावसाच्या पाण्याला वरूणदेवाचा प्रसाद मानून ग्रहण करायचं आणि मग त्याचा कणभरही, थेंबही इतके - तिकडे वाया जाऊ नये, ह्या श्रध्देने त्याची साठवण करायचं काम आध्यात्मिक तर होतंच, तसंच निव्वळ सांसारिक सुध्दा. विराट वाळवंटात ह्याच्या शिवाय 'जीवन' कसं होवू शकलं असतं !

'पुर' शब्द सगळीकडे आहे, पण 'कापुर' शब्द कदाचित केवळ इथेच मिळतो. 'कापुर' म्हणजे 'मूलभूत सोयींपासून वंचित गाव'. भाषेत कापुर शब्द पूर्वीप्रमाणेच प्रचलित राहिला, पण कोणत्याही गावाला कापुर म्हटलं जावू नये ह्याची मात्र पक्की व्यवस्था केली.

बंध - बंधा, ताल - तलाई, जोहड - जोहडी, नाडी, तालाब, सखर, झील, देईबंध, जगह, डहरी, खडीन आणि भे, ह्या ह्या सगळ्या - सगळ्यांना बिंदूंनी भरून टाकून 'सिंधुसमान' बनवलं गेलं. आजच्या नव्या समाजाने ज्या क्षेत्राला पाण्याच्या बाबतीत एक 'असंभ क्षेत्र' मानलंय, तिथे पुरातन समाजाने 'कुठे - काय काय संभव आहे' ह्या भावनेनं काम केलं. 'देवा, इतकं द्या' च्या ऐवजी 'देवा, जितकं द्याल तितकं' असं म्हणून सामावून घेवून दाखवलं.

धरती आणि आकाश यांच्या बदलत जाणाऱ्या रूपांबरोबरच इथे तलावांचे आकार - प्रकार आणि त्यांची नावंसुध्दा बदलतात. चारही बाजूंनी भक्कम डोंगर असतील, पाऊस खूप पडत असेल तर त्याला वर्षभरच नव्हे, पण कित्येक वर्षे थांबवून ठेवू शकणारी तळी आणि मोठमोठे तलाव बांधले गेले. ही मोठी कामं काही फक्त राजघराण्यांनीच केली असतील असं नाही, तर कित्येक तळी आणि मोठे मोठे तलाव भिल्लांनी, वंजाऱ्यांनी, गुराख्यांनी देखील वर्षानुवर्षे मेहनत घेवून बनवलेले आहेत.

चांगला पगार मिळणाऱ्या पुष्कळश्या इतिहासकारांनी ह्या अश्या मोठ्या कामांचा 'बिगारी' प्रथेशी संबंध जोडून पाहिला, पण म्हणून अपवादांना कोणी नियम मानत नाही. ह्यातील काही कामं तर कोण्या दुष्काळाच्या वेळी लोकांना थांबवून धरण्यासाठी, धान्य पोहोचविण्यासाठी, आणि त्याचबरोबर नंतरही पडू शकणाऱ्या दुष्काळाला सामना करण्याची ताकद एकवटण्साठी केली गेली. तर काही चांगल्या काळात आणि उत्तम भविष्यासाठी पूर्ण केली गेली.

पाण्याची आवक पुरेशी नसेल, पाणी रोखण्यासाठी जागाही छोटी असेल, तरी ती ठिकाणे अशीच सोडून देत नाहीत. त्या ठिकाणी तलावाच्या मोठ्या कुटुंबातली सगळ्यांत छोटी सदस्या 'नाडी' बनवलेली सापडेल. रेतीची छोटी टेकडी, 'स्थळी', किंवा छोट्याश्या 'मगऱ्यां' च्या आगोर पेक्षा सुध्दा, अतिशय बारीक धारेनेच वाहणाऱ्या पाण्याचाही पुरा मान राखते ही नाडी. ती धार वाहून वाया नाही जावू देत ही नाडी. तिची साधन - सामग्री कच्ची म्हणजे फक्त मातीच असते, पण त्याचा अर्थ असा नाही की नाडीची प्रकृतीही कच्चीच असेल. इथे दोनशे - चारशे वर्षांच्या जुन्या नाड्या देखील अजूनही उभ्या सापडतील. लहानात लहान गावातही एकापेक्षा जास्त नाड्या आढळतात. मरूभूमीत वसलेल्या गावांमध्ये यांची संख्या प्रत्येक गावी दहा - बारा सुध्दा असू शकते. जैसलमेरात पालीवाल्यांच्या ऐतिहासिक 84 गावांमधून सातशेहून अधिक नाड्या किंवा त्यांच्या खूणा अगदी आजही दिसू शकतात.

तळी (तळ्याचे स्त्रिलिंग) किंवा जोहड - जोहडी मध्ये पाणी, नाडीपेक्षा थोडा अधिक काळ आणि थोड्या अधिक प्रमाणात जमा केलं जातं. ह्यांच्या पाळीवर (काठावर) दगडी बांधकाम, छोटासा घाट, पाण्यात उतरण्यासाठी चार - पाच लहान पायऱ्यांपासून ते महालवजा छोटी इमारतही दिसू शकते.

जिथे अणखी काहीच बनू शकत नाही, तिथे पाण्याच्या तळ्या बनतात. राजस्थानात मिठाच्या सरोवरांच्या आसपास पसरलेल्या लांब रूंद भागातील पूर्ण जमीन खारी आहे. इथे पावसाचे थेंब जमिनीवर पडताच खारट होतात. त्यामुळे भूजल म्हणजे पाताळपाणी खारट, वरून वाहणारं पालरपाणी खारट आणि ह्या दोन्हीच्या मध्ये अडकलेलं रेजाणी पाणी सुध्दा खारटच. इथे नवीन कूपनलिका झाल्या, हातपंप लागले - पण सगळ्यांतून खारट पाणीच उपसलं गेलं. पण अगदी अश्या ठिकाणी सुध्दा चारशे - पाचशे वर्षांपूर्वीच्या तळ्या अशाप्रकारे बनवलेल्या आढळतात, की ज्या पावसाच्या थेंबांना, खारट जमिनीपासून दोन - चार हात उंच वर उचललेल्या आगोरमध्येच साठवून वर्षभर गोड पाणी देतात.

अश्या अधिकांश तळ्या साधारण चारशे वर्षांपूर्वी पासूनच्या आहेत. तो असा काळ होता, ज्यावेळी मिठाचं सारं काम बंजारा लोकांच्या हातात होतं. हे बंजारा लोक हजारो बैलांचा तांडा घेवून मिठाच्या कारभारासाठी देशाच्या ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जात असत. तेव्हा ते, वाटेत लागणाऱ्या गावाबाहेरच्या मोकळ्या जागांवर मुक्काम करीत असत. त्यांना आपल्या जनावरांसाठीही पाणी हवं असायचं. बंजाऱ्यांना मिठाचा स्वभाव माहित होता, की ते पाण्यात सहजी विरघळतं, तसेच ते पाण्याचाही स्वभाव जाणून होते की ते मिठाला आपल्यांत मिसळून घेतं.... पण ह्या लोकांनी ह्या दोघांच्या एकमेकांत पार मिसळून जाण्याच्या स्वभावाला कश्याप्रकारे चतुरतेने रोखून वेगवेगळं ठेवलं आहे - हे सांगतात सांभर सरोवराच्या लांब - रूंद खाऱ्या आगारात जराशा वरती उचलून बांधलेल्या तळ्या !

विसाव्या शतकातील सर्व प्रकारची सरकारं आणि आताचं एकविसाव्या शतकात घेवून जाणारं सरकारही, अश्या खाऱ्या क्षेत्रांमधल्या गावांसाठी गोड पाणी जमवू शकली नाहीत. पण बंजारा लोकांनी तर ह्या इलाख्याचं मीठ खाल्लं होतं, (त्याला जागण्यासाठीच जसं) त्यांनीच ह्या गावांना गोड पाणी पाजलं आहे. काही वर्षांपूर्वी नव्या- जुन्या सरकारांनी, ह्या बंजाऱ्यांनी बांधलेल्या तळ्यांच्या आसपास अगदी तश्याच नवीन तळ्या बांधायची शिकस्त केली, पण मीठ आणि पाण्याच्या मिसळून जाण्याच्या स्वभावाला ते वेगळं नाही तरू शकले.

पाऊस पडण्याची आणि त्याला साठवून ठेवण्याची जागा जर आणखी मोठी मिळाली, तर तळ्यांच्या पुढची पायरी म्हणून तलाव बनत राहिले आहेत. यामध्ये पावसाचं पाणी पुढल्या पावसाळ्यापर्यंत टिकून रहातं. नव्या धकाधकीच्या कारणांनी काही जुने तलाव नष्ट जरूर झाले आहेत, पण तरीदेखील आजही पूर्ण वर्षभर भरून राहणारे तलावही इथे काही कमी नाहीत. म्हणूनच जनगणना करणाऱ्यांना विश्वासच नाही बसत, की वाळवंटातल्या ह्या गावांमध्ये इतके सारे तलाव कुठून आले आहेत. सरकारं आपल्या अश्या प्रकारच्या अहवालांमध्ये हे सांगायला कचरतात, की हे तलाव कोणी बनवले. ही सगळी व्यवस्था तिथल्या समाजाने स्व - बळावर केली आणि तीसुध्दा इतकी मजबूत, की उपेक्षेच्या इतक्या मोठ्या कालावधीनंतरही ती कोणत्या ना कोणत्या रूपाने आजही टिकून आहे आणि तिने समाजही टिकवून ठेवला आहे.

सरकारी राजपत्रांतून जैसलमेरचं वर्णन तर फारच भयानक केल आहे - 'इथे एकही बारमाही नदी नाही. भूजल 125 ते 250 फूट आणि कुठे कुठे तर 400 फूट खोलवर आहे. पाऊसमान विश्वास बसू नये इतकं कमी - फक्त 16.40 सेंटिमीटर आहे. गेल्या 70 वर्षांच्या अभ्यासानुसार वर्षाच्या 365 दिवसांपैकी 355 दिवस कोरडे गणले गेले आहेत. म्हणजे 120 दिवसांचा पावसाळा इथे सर्वात कमी स्वरूपात फक्त 10 दिवसांसाठीच असतो.'

पण हे सगळे हिशोब - ठिशोब काही नव्या लोकांचे आहेत. मरूभूमीतील समाजाने ह्याच 10 दिवसांच्या पावसाचे करोडों चंदेरी थेंब पाहिले आणि मग त्यांची साठवण करायचं महत्कष्टाचं काम हरेक घरात, हरेक गावात आणि आपल्या शहरांमधूनही केलं. ह्या तपश्चर्येचं फळ समोर आहे -

जैसलमेर जिल्ह्यांत आज 515 गावं आहेत. त्यातली 53 गावं ह्या ना त्या कारणांनी ओस पडली आहेत. जागती गावं आहेत 462. त्यापैकी फक्त 1 गांव सोडून बाकी प्रत्येक गावांत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अगदी ओस पडलेल्या गावांतही ही सोय कायम आढळून येते. सरकारी आकड्यांनुसार जैसलमेरच्या 99.78 टक्के गावांतून तलाव, विहीरी आणि अन्य मार्ग आहेत. त्यामध्ये नळ, कूपनलिका यासारख्या आधुनिक सोयी कमीच आहेत. ह्या सीमेवरील जिल्ह्यांच्या 515 गावांपैकी केवळ 1.75 टक्के गावांत वीजपुरवठा आहे. हिशोबाच्या सोयींसाठी तो 2 टक्के धरला, तरी त्यांत 11 गावं येतात. ही आकडेवारी मागच्या जनगणना अहवालातली आहे. समजून चालू, की ह्या दरम्यान आणखी थोडा विकास झाला असेल, तर पहिल्या 11 गावांत आणखी 20 - 30 गावांची भर पडेल. म्हणजे मूळ 515 गावांमध्येही वीज असणाऱ्या गावांची संख्या तरीसुध्दा अगदी नगण्यच असेल. ह्याचा एक अर्थ असाही होतो की पुष्कळ ठिकाणी ट्यूबवेल विजेवर नाही, तर डिझेलच्या सहाय्याने चालतात. तेल बाहेरून लांबून येतं. तेलाचे टँकर आले नाहीत तर पंप चालणार नाहीत, पाणी मिळणार नाही. सगळं काही ठिकठाक चालू राहिलं, तरी पुढे मागे ट्यूबवेल मध्ये पाण्याची पातळी घटेलच. त्याला जिथल्या तिथे थोपवून धरण्याची कोणतीच योजना अजून तरी उपलब्ध नाही आहे. तसं म्हटलं जातं, की जैसलमेरच्या जमिनीखाली पाण्याचा चांगला साठा आहे... पण पाण्याच्या ह्या भंडारात काही भर न घालता फक्त काढतच राहण्याची ही प्रवृत्ती कधीतरी धोका देईलच.

पुन्हा एकवेळ म्हणूया... की मरूभूमीत सगळ्यांत बिकट मानल्या गेलेल्या ह्या क्षेत्रात 99.78 टक्के गावांत पाण्याची व्यवस्था आहे आणि तीही स्व - बळावर. त्याचबरोबर त्या सोयींची तुलना करू या, ज्या करण्यासाठी नव्या समाजातील नवीन संस्था, मुख्यत: सरकार जबाबदार मानलं जातं. पक्क्या रस्त्यांनी आतापर्यंत फक्त 19 टक्के गावं जोडली जावू शकली आहेत, तसेच डाकव्यवस्था वगैरे साधारणपणे 30 टक्के पसरू शकली आहे. आरोग्याची देखभाल 9 टक्के पर्यंत पोहोचली आहे... तर शिक्षणाची सोय ह्या तुलनेत थोडी बरी म्हणजे 50 टक्के गावांत आहे. इथे ही गोष्ट देखील लक्षांत ठेवली पाहिजे, की पोस्ट - डॉक्टर - शिक्षण किंवा वीज ह्या सोयी करण्यासाठी फक्त एका विशिष्ट प्रमाणात पैशाची गरज असते. राज्याच्या कोषांतून त्यासाठी तरतूद केली जावू शकते, तसेच गरज पडली तर काही वेगळ्या प्रकारची मदत किंवा अनुदानाच्या सहाय्याने त्यांत वाढ केली जावू शकते. तरीही आपल्याला आढळून येतं, की ह्या सोयीसुध्दा इथे केवळ प्रतिक रूपात - नाममात्रच चालू शकताहेत.

पण पाण्याचं काम मात्र असं नाही आहे. सृष्टीच्या ह्या भागांत मिळणाऱ्या पाण्यांत वाढ करणे समाजाला शक्य नाही आहे. त्याचं (पाण्याचं) बजेट स्थिर आहे. बस्स्.... आहे तेवढ्यांतच पूर्ण काम करायचं... अश्या स्थितीतही समाजाने ते करून दाखवलं आहे. 515 गावामधल्या नाड्या आणि तळ्या नका मोजू... पण मोठे तलावच 294 आहेत.

ज्याला नव्या लोकांनी निराशेचं क्षेत्र मानलं, तिथे सीमेच्या टोंकावर, पाकिस्तानच्या थोडं अलिकडे आसूताल म्हणजे आशेचा तलाव आहे... जिथे उष्णतामान 50 डिग्रीला पोहोचतं. तिथे शितलाई म्हणजे शीतल तळी आहे... आणि जिथे पावसाळी ढग सगळ्यांत जास्त धोका देतात, तिथे बदरासर म्हणजे ढगांचं सरोवर (मेघसरोवर) सुध्दा आहे.

पाण्याची अतिदक्षतेने साठवण आणि मग पुऱ्या फायद्यानिशी त्याचा उपयोग - अशा स्वभावाला समजू न शकलेले राजपत्रकर्ते (गॅझेटियर्स) आणि ते ज्यांचं प्रतिनिधीत्व करतात त्या राज्याला आणि समाजाला, तसेच त्याच्या नव्या सामाजिक संस्थांना देखील हे क्षेत्र वैराण, कळाहीन, स्फूर्तीहीन आणि जीवनहीन दिसते.... पण राजपत्रांतून हे सगळं लिहून जाणारा सुध्दा जेव्हा घडसीसर ला पोहोचतो, तेव्हा तो आपण वाळवंटातून प्रवास करतोय.. हे देखील विसरून जातो.

कागदांवर, पर्यटनाच्या नकाशांवर जैसलमेर हे शहर जेवढं मोठं आहे. जवळजवळ तेवढाच मोठा घडसीसर तलाव आहे. कागदांवरल्या सारखेच प्रत्यक्षांतही मरूभूमीत हे दोघे एकमेकांना खेटून उभे आहेत... घडसीसर शिवाय जैसलमेल नाहीच. सुमारे 800 वर्ष पुराण्या ह्या शहराचा संबंध सुमारे 700 वर्षे तरी त्याचा एकेक दिवस घडसीसरच्या एकेका थेंबाशी याप्रमाणे जोडला गेला आहे.

रेतीचं एक मोठं थोरलं टेकाड उभं आहे. जवळ पोहोचल्यावर सुध्दा समजणार नाही, की हे टेकाड नसून घडसीसरचं उंचपुरं - लांबरूंद आवार आहे. जरा थोडं पुढे गेलं की दोन बुरूज आणि दगडावर नक्षीकाम केलेल्या पाच झरोक्याचं, तसंच दोन लहान आणि एका मोठ्या पोल चं प्रवेशद्वार माथा उंचावून दिसेल. मोठ्या आणि छोट्या पोल च्या समोर निळं आभाळ असतं. जसे जसे आपण पुढे जातो, तसे तसे प्रवेशद्वारांतून दिसणाऱ्या झलकेतच नव्या नव्या दृष्यांची भर पडते. इथपर्यंत पोहोचल्यावर लक्षात येईल की, पोल मधून जो निळं आकाश दिसत होतं, ते समोर पसरलेलं निळं निळं पाणी आहे. मग डाव्या - उजव्या बाजूंना सुंदर पक्के घाट, मंहीर, पटियाल, बारादरी, अनेक स्तंभांनी सजलेले व्हरांडे, खोल्या आणि कोण जाणे काय काय - जोडलं जातं. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या दृष्यांना जेव्हा तलावासमोर पोहोचल्यावर विराम मिळतो, तेव्हा तर समोर दिसणाऱ्या सुंदर दृष्यावर एका जागी नजर ठरत नाही. डोळे भिरिभरत क्षणोक्षणी त्या विचित्र दृष्याला मोजू मापू पाहतात.

पण डोळे त्याचा ठाव नाही घेवू शकत. तीन मैल लांब आणि सुमारे एक मैल रूंद पसरलेल्या आगराच्या ह्या तलावाचा आगोर 120 चौरसमैल क्षेत्रावर विस्तारलेला आहे. तो जैसलमेरचा राजा महारावल घडसी याने विक्मसंवत् 1391 म्हणजे इसवी सन 1335 मध्ये बनवला. दुसरे राजेही तलाव बनवत, पण महारावल घडसीने हा तलाव स्वत: बांधला. राजा महारावल स्वत: रोज उंच किल्ल्यावरून उतरून इथे येत असत... आणि खोदकाम, भराई वगैरे प्रत्येक कामाला स्वत: लागत असत.

तसेही हा काळ जैसलमेर राज्यासाठी फार उलथापालथीचाच काळ होता. भाटी वंश गादी बळकावण्यासाठीचे अंतर्गत कलह, षड्यंत्र आणि भांडणे यांना तोंड देत होता. मामा आपल्या भाच्यावर जीव खावून आक्रमण करत होता, सख्ख्या भावाला देशोधडीला लावलं जात होतं, तर कुठे कुणाच्या पेल्यांत विष कालवलं जात होतं. राजवंशात तर आपापसांत भांडणं होतीच, पण तिकडे राज्य आणि जैसलमेर शहरही वाटेल तेव्हा देशी - विदेशी हल्लेखोरांनी घेरलं जात होतं आणि जेव्हा तेव्हा पुरूष वीरमरण पत्कारीत होते... आणि स्त्रिया जोहाराच्या ज्वालांमध्ये स्वत:च्या आहुती देत होत्या. अश्या धगधगत्या काळात, स्वत: घडसीने, राठोडांची सेना मदतीला घेवून जैसलमेरवर कब्जा केला होता. इतिहासाच्या पानांत राजा घडसीचा काळ जय - पराजय, वैभव - पराभव, मृत्यूचं तांडव आणि युध्दसागर यांनी भरलेला आहे.

तेव्हाही हा तलाव बनत राहिला होता. वर्षानुवर्षाच्या ह्या योजनेच्या कामासाठी राजा घडसीने अपार धैर्य आणि अपरंपार साधनं लावली होती, तसेच त्यासाठी सर्वात जास्त किंमतही मोजली होती. पाल बनत होती, राजा महारावल तिच्यावर उभे राहून स्वत: सारं राम पाहात होते...

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading