राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

Submitted by Hindi on Mon, 07/04/2016 - 15:16
Source
जल संवाद

श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


राजस्थानच्या तलावांची ही यशोदुंदुभी 'जसेरी' नावाच्या एका विलक्षण तलावाशिवाय पुरी होवू शकत नाही. जैसलमेरपासून साधारण 40 कि.मी दूर 'डेढा' गावाजवळ बांधलेल्या ह्या तलावाने पाणी अडवून धरायच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. चारही बाजूंनी तापणारं 'रणरणतं' वाळवंट आहे, पण जसेरी चं ना पाणी आटत, ना यश कमी होते.

जैसलमेर मरूभूमीतलं एक असं राज्य आहे, ज्याच्या नांवाचा डंका व्यापारी जगतांत वाजत असे. त्याकाळी इथे शेकडो उंटांचे काफिले रोज येत. आजच्या सिंध, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ईराण, इराक, आफ्रिका आणि दूर रशियाच्या कझाकिस्तान, उझबेकिस्तान ह्या ठिकाणचा माल इथे उतरत असे. इथल्या माणिकचौकांत आज भाजीबिजी विकली जाते. पण एके काळी इथे माणिक - मोती विकले जात होते. उंटांची रांग सांभाळणारे कतारिये इथे लाखों रूपयांचा माल उतरवीत - चढवीत होते. 1800 सालाच्या सुरूवातीपर्यंत जैसलमेर आपलं वैभव टिकवून होतं. तेव्हा इथली लोकसंख्या 35000 च्या आसपास होती - आज ती घटून जवळजवळ अर्धीच शिल्लक राहिली आहे.

परंतु नंतरच्या प्रचंड मंदीच्या काळात सुध्दा जैसलमेर आणि जवळपासच्या परिसरात तलाव बांधायच्या कामात मंदपणा आला नव्हता. गजरूप सागर, मूलसागर, गंगासागर, डेडासर, गुलाबतलाव, ईसरलालजीचा तलाव - असे एकापाठोपाठ एक तलाव बनवले गेले. ह्या शहरांत इतके तलाव बनले, की त्यांची नेमकी गणना होणही कठीण आहे. पूर्ण समजल्या गेलेल्या यादीत सुध्दा कोणीही फिरता फिरता आणखी दोन - चार नावं जोडून बसतो.

तलावांची ही सुंदर साखळी इंग्रज येईपर्यंत तुटली नव्हती. ह्या साखळीची मजबुती काही फक्त राजे, रावळ आणि महारावळ यावरच सोडलेली नव्हती... तर समाजाचा असा हिस्सा, जो आजच्या परिभाषेत आर्थिक दृष्ट्या कमजोर मानला गेला आहे, तो सुध्दा ह्या साखळीच्या मजबुतीला हातभार लावत होता.

मेघा गुरं राखायचा.... हा किस्सा 500 वर्षांपूर्वीचा आहे. गुरं घेवून मेघा भल्या सकाळी निघायचा. कित्येक कोस पसरलेलं सपाट - तापतं वाळवंट. मेघा दिवसभराचं पाणी आपल्याबरोबर एका कुपडीत म्हणजे मातीच्या चपट्या सुरईत घेवून जाई - संध्याकाळी परत येई. एके दिवशी त्याच्या कुपडीत थोडं पाणी शिल्लक राहिलं... मेघाला काय सुचलं कोण जाणे... त्याने एक छोटासा खड्डा खणला, त्यात कुपडीतलं पाणी ओतलं आणि आक च्या पानांनी खड्डा नीट झाकून टाकला.

चराईचं काम काय, आज इथे, उद्या आणखी कुठे. मेधा दोन दिवस त्या ठिकाणी येवू शकला नाही. तिसऱ्या दिवशी तो तिथे गेला... उत्सुक हातांनी आकची पानं हळूच बाजूला सारली. खड्ड्यांत पाणी नव्हतं. पण थंडगार हवा बाहेर आली. मेघा पट्कन उद्गारला - वाफ. मेघानं मग विचार केला, की इतक्या उन्हात थोड्याशा पाण्याचा ओलावा जर टिकून राहू शकतो. तर मग इथे तलाव सुध्दा बनू शकेल.

मेघाने एकट्यानेच तलाव खणायला सुरूवात केली. आता तो रोज आपल्याबरोबर कुदळ - फावडंही आणू लागला. दिवसभर एकट्यानेच माती खणायची आणि बांधावर टाकायची. गाईसुध्दा जवळपासच चरत राहायच्या. मेघाकडे भीमासारखी ताकद नव्हती, पण भीमशक्तीसारखा संकल्प जरूर होता. दोन वर्षे त्याने एकट्यानेच काम नेटाने रेटलं. आता सपाट वाळवंटांत बांधाचा मोठा घेर लांबूनच नजरेला दिसू लागला होता. बांधाची बातमी आजूबाजूच्या गावांनाही लागली. आता रोज सकाळी गावाची पोरं आणि इतर लोकही मेघाबरोबर यायला लागले. सगळे मिळून काम करीत. 12 वर्षे लोटली तरी अजूनही त्या विशाल तलावांच काम चालूच होतं - पण मेघाचं आयुष्य मात्र संपलं. त्याची बायको सती गेली नाही. आता तलावावर मेघाऐवजी ती कामाला यायला लागली. सुमारे 6 महिन्यांनी तलाव पुरा झाला. बाल म्हणजे (हिंदीत) भाप मुळे तलाव बनवायला सुरूवात झाली, म्हणून त्या जागेचही नाव बाफ पडलं. पण पुढे बिघडून त्याचं बाप बनलं. गुराखी मेघाची समाजाने मेघोजी म्हणून आठवण ठेवली आणि तलावापाळीवरच त्याच्या नावाने सुंदर छतरी आणि त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ एक देवडी बनवली गेली.

बाप ही, बिकानेर - जैसलमेरच्या रस्त्यावर असलेली एक छोटीशी वस्ती आहे. चहा- कचोरीची 5-6 दुकानं असलेला एस.टी बसस्टँड तिथे आहे. बसगाडीच्या तिप्पट उंचीची पाल (पाळी - तळ्याचा काठ) बसस्टँडला लागून उभी आहे. उन्हाळ्यात पाळीच्या ह्या बाजूला 'लू' म्हणजे गरम हवेच्या लाटा चालतात, तर त्या बाजूला मेघाजीच्या तलावात पाण्यावर लाटा उठत असतात. पावसाच्या दिवसांत तर तलावांत लाखेटा (द्वीप बेट) बनतं. तेव्हा आजूबाजूच्या 4 मैलांच्या परिसरात पाणी पसरतं. मेघ आणि मेघराजा भलेही इथे कमी येत असतील, पण ह्या मरूभूमीत मेघाजीसारख्या लोकांची कधी वाण नाही पडली.

राजस्थानच्या तलावांची ही यशोदुंदुभी 'जसेरी' नावाच्या एका विलक्षण तलावाशिवाय पुरी होवू शकत नाही. जैसलमेरपासून साधारण 40 कि.मी दूर 'डेढा' गावाजवळ बांधलेल्या ह्या तलावाने पाणी अडवून धरायच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. चारही बाजूंनी तापणारं 'रणरणतं' वाळवंट आहे, पण जसेरी चं ना पाणी आटत, ना यश कमी होते. जाळ्या आणि देशी बाभळींच्या झाडांनी झाकलेल्या काठावर एका छोटासा सुंदर घाट आणि तलावाच्या एका कोपऱ्यात दगडाची सुंदर छतरी, बस, काही खास सांगण्यासारखं काही नाही मिळणार इथे - पण कुठल्याही महिन्यांत इथे जावं - स्वच्छ निळसर पाण्यात उठणारे तरंग दिसतील, पक्ष्यांचे थवे भेटतील. जसेरीचं पाणी आटत नाही. मोठ्यांतल्या मोठ्या दुष्काळात सुध्दा जसेरी चं हे यश जराही कमी झालेलं नाही.

जसेरी तलावही आहे आणि मोठी विशाल कुंईसुध्दा. ह्याच्या आगराच्या खालून कुंईसारखीच 'बिट्टू रो बल्लियो' - म्हणजे खडीची पट्टी गेलेली आहे. तलाव खोदतांना ह्या पट्टीटी नीट जाणीव ठेवली गेली आणि तिला कुठेही तडा जावू दिला नाही. अश्या प्रकारे ह्यांच्यात 'पालरपाणी' आणि 'रेजाणीपाणी' दोन्हींचा संगम होतो. आधीच्या वर्षीचं पाणी आटत नाही आणि वरून परत येणाऱ्या पावसाचं पाणी येवून मिळतं. जसेरी म्हणजे दरवर्षी पडणाऱ्या थेंबाचाच संगम आहे.

असं म्हणतात, की ह्या तलावाच्या मध्यभागी एक पायविहीर म्हणजे 'बावडी' सुध्दा आहे. आणि तिच्याच काठावर, तलाव बांधणाऱ्या 'पालीवाल' ब्राम्हण परिवाराकडून एक ताम्रपत्र लावलं गेलं आहे... पण अजून ते कोणीही वाचलेलं नाही, कारण तलावांत कायम पाणी भरलेलं असतं. ताम्रपत्र पाहायची किंवा वाचायची कधी संधीच मिळालेली नाही आहे. कदाचित जसेरी बनवणाऱ्यांनी फार विचारपूर्वकच ताम्रपत्र तलावाच्या मध्यभागी लावलं असावं. लोक ताम्रपत्राच्या ऐवजी चांदीसारख्या चमकणाऱ्या तलावालाच वाचतात आणि त्याचं यश पसरवीत जातात.

आसपासची एक - दोन नव्हेत, तर सात गावं ह्याचं पाणी घेतात. कित्येक गावाचं पशुधन ह्या जसेरीच्या संपन्नतेमुळे टिकून आहे. अन्नपूर्णे सारखे लोक ह्याचं वर्णन 'जलपूर्णा' असं करतात... आणि शिवाय ह्याच्या यशाची सर्वांत मोठी गोष्ट अशीही सांगतात, की जसेरीमध्ये अथांग पाण्याच्या बरोबरीनेच अथांग ममता सुध्दा भरलेली आहे.... आजपर्यंत ह्यांच्यात कोणीही बुडून मेलेलं नाही. 'साद' (शेवाळं) ह्यांतही आलेली आहे, पण तरीही, उंटावर बसलेला स्वारही बुडेल इतकी ह्याची खोली असूनही, अजूनपर्यंत ह्यांत कोणी बुडून प्राणाला मुकलेलं नाही. म्हणूनच जसेरीला 'निर्दोष तलाव' असंही म्हटलं जातं.

पाण्याची अशी निर्दोष व्यवस्था करणारा समाज, बिंदूमध्ये सिंधू पाहणारा समाज भल्याभल्या चिकित्सकांनाही हैराण करून टाकतो.

जल व अन्नाचा अमरपट्टा :


ज्ञानी माणसाने विचारलं - सर्वांत श्रेष्ठ तपस्या कोणती? तर साध्याभोळ्या गवळ्याने उत्तर दिलं - 'आँख रो तो तप भले' - म्हणजे 'डोळ्यांची तपश्चर्या सर्वांत श्रेष्ठ' खरंच डोळ्यांची तपश्चर्याहीच सर्वात मोठी ठरते. आपल्या आसपासच्या जगाला नीटपणे बघणाऱ्या अनुभव आणि अश्या पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवाने बनलेला एक दृष्टीकोन - ही तपस्या पार ह्या लोकापासून ते त्या (पर) लोकापर्यंतचं जीवन सरळ बनवते. डोळ्यांच्या ह्याच तपस्येने पाण्याच्या बरोबरीने 'अन्नसंचयाची' सुध्दा अनोखी साधना केली आहे. याचं साधन बनली ती 'खडीन' !

लूनी नदीसारखा एखादा अपवाद सोडला, तर मरूभूमीतल्या अधिकांश नद्या 'बारमाही' वाहणाऱ्या नाहीत. त्या कुठूनतरी उगम पावतात, वाहतात आणि पुन्हा मरूभूमीतच विलीन होवून जातात.... पण नजरेच्या तपस्येने त्यांच्या प्रवाहाचे मार्ग अतिसूक्ष्मपणाने पाहिले आणि कित्येक अशी ठिकाणं शोधून काढली, की जिथे त्याचं पाणी अडवलं जावू शकेल.

अश्या सर्व ठिकाणी 'खडीन' बनवल्या गेल्या. खडीन म्हणजे एक प्रकारचा तात्पुरता तलावच म्हणाना. दोन बाजूंनी मातीची 'पाळी' उंचावत, तिसऱ्या बाजूला दगडाची मजबूत अशी 'चादर' बनवली जाते. खडीनच्या पाळीला 'धोरा' असं म्हणतात. ह्या धोऱ्याची लांबी पाण्याची आवक असेल त्या हिशोबात कमी - जास्त असते. काही खडीन चांगल्या 5 - 7 कि.मी पर्यंतही आहेत. पावसाळ्यांत वाहणारी नदी ह्या खडीनमध्ये बंदिस्त केली जाते, बांधली जाते. पाणी जास्त वाहायला लागलं, तर ते दगडी 'चादरी' तून बाहेर पडून, त्याच प्रवाहमार्गावर बांधलेल्या दुसऱ्या - तिसऱ्या खडीनमध्ये भरत जातं. खडीनमध्ये आराम करणारी ती नदी मग हळूहळू सुकत गेली, तरी ती अश्याप्रकारे खडीनच्या जमिनीला ओलावा देत जाते. ह्या ओलाव्याच्या बळावरच खडीनमध्ये गहू वगैरे पिकं पेरली जातात. मरूभूमीत पाऊस पडतो, त्या हिशोबाने तर इथे गव्हाचं पीक घेणं अशक्यच होतं... पण इथे कित्येक ठिकाणी विशेष करून जैसलमेरमध्ये शेकडो वर्षांपूर्वी इतक्या 'खडीन' बनवल्या गेल्या की ह्या जिल्ह्याच्या एका भागाचं नावच 'खडीन' पडून गेलं होतं.

ह्या 'खडीन' बनवायचं श्रेय पालिवाल ब्राम्हणाकडे जातं. पालीकडून येवून इथे वसलेल्या पालिवालांनी जैसलमेरचं राज्य धान्याने भरून टाकलं होतं. या भागात यांची 84 गावं वसलेली होती. गावंसुध्दा एकाहून एक सुंदर आणि प्रत्येक गोष्टीत व्यवस्थित - चौकड्यांसारखं डाव्या - उजव्या बाजूंनी कापणाऱ्या रूंद सडका, सरळ रांगेत बांधलेल्या मोठ्या मोठ्या दगडी घरांची वस्ती, वस्तीच्या बाहेर 5- 10 नाड्या (पाण्याचे पाट), 2- 4 मोठे तलाव आणि मग दूर क्षितिजापर्यंत पसरलेल्या 'खडीन' मधली लहरणारी शेतं. ह्या गावांमधून स्वावलंबन इतकं साधलेलं होतं, की दुष्काळानेही इथल्या अन्नधान्याच्या ढिगाखाली दबून जावं.

ह्या स्वावलंबीत्वाने ह्या गावांना घमेंडखोर बनवलं नाही, पण इतकं स्वाभिमानी केलं. की एका प्रसंगी राजाच्या कोणा मंत्र्यांशी वादविवाद वाढल्यावर पुऱ्या 84 गावांचं एक मोठं संमेलन भरलं आणि निर्णय घेतला गेला की 'हे राज्य सोडायचं...' झालं कित्येक वर्षांच्या मेहनतीने बनवलेली घरं, तलाव, खडीन, नाडी सगळं काही जसंच्या तसं सोडून, पालिवाल एका क्षणांत आपली 84 गावं सोडून गेले.

ह्याच काळाच्या दरम्यान बनवलेल्या अधिकतर 'खडीनी' आजही गहू देत आहेत. चांगला पाऊस पडला - म्हणजे जैसलमेरमध्ये जो काही कमी पाऊस पडतो तेवढा पडला, तर 'खडीन' 1 मण गव्हाचे 15 - 20 मण गहू पिकवून परत देते. प्रत्येक खडीनीच्या बाहेर दगडाचे मोठे मोठे 'रामकोठे' बनवले जातात, त्यांना 'कराई' म्हणतात. कराईच्या व्यास साधारणत: 15 हात, तर उंची 10 हात असते. कापणीनंतर धान्य खळ्यावर जातं आणि भुस्कट कराईमध्ये साठलं जातं. एका कराईमध्ये 100 मणांपर्यंत भुसा ठेवला जावू शकतो. त्या भुश्याला 'सूकला' म्हणतात.

तलावांच्या सारखी ह्या खडीनींची पण नावं ठेवली जातात आणि तलावांच्या भागांसारखी खडीनींच्या विविध भागांचीही वेगवेगळी नावं असतात. 'धोरा' म्हणजे पाळी. धोरा आणि दगडी चादरीला जोडणारा मजबूत बांध पाण्याचा वेग अडविण्यासाठी अर्धगोलाकार ठेवला जातो, त्याला 'पंखा' म्हणतात. दोन धोरे, दोन पंखे, एक चादर आणि जास्तीच्या पाण्याला बाहेर नेणारा नेष्टासुध्दा - सगळंकाही अतिशय काळजीपूर्वक बांधलं जातं. अगदी बारमाही नसली, तरी चौमाही म्हणजे पावसाळी नदीचा वेग देखील इतका असतो, की जराशी ढिलाई सुध्दा पुऱ्या खडीनला वाहून नेईल.

बऱ्याचश्या 'खडीन' लोकांनी बनवल्या, तर काही निसर्गदेवतेने सुध्दा. वाळवंटात निसर्गत:च काही भाग असे आहेत, की तीनही बाजूंना अडसर असल्यामुळे चौथ्या बाजूने वाहून येणारे पाणी तिथेच थांबते... अश्या ठिकाणांना 'देवीबंध' म्हणतात. ह्याचंच पुढे बोलीभाषेत 'दईबंध' सुध्दा झालं आणि मग जसं ह्याला 'दईबंध जागा' म्हणायचा नेमच झाला.

'खडीन' आणि 'दईबंध जागा' चारमाही वाहणाऱ्या नदीच्या पाण्याने भरतात. धावत - पळत जाणारी नदी इथेतिथे वळणंही घेते. अश्या वळणांवर पाण्याचा वेगवान प्रवाह जमिनीला कापीत जातो आणि मग तिथे एक छोटा खड्डा - सारखा बनतो. नदीचा प्रवाह नंतर सुकून - वाळून जातो, पण अश्या खड्ड्यांत काही दिवसपर्यंत पाणी राहतं. ह्या खड्ड्यांना 'भे' असं म्हणतात. ह्यांचा उपोयग नंतर 'रोजाणीपाणी ' मिळविण्यासाठी केला जातो.

शेतांमध्ये सुध्दा काही सखल जागांमधून कुठे कुठे पाणी सांचून राहतं... ह्याला 'डहरी' 'डहर' किंवा 'डैर' म्हणतात. हे डैरसुध्दा शेकडोंनी असतात. ह्या सर्व पाणथळ जागांवर 'पालरपाणी' अडवलं जातं, मग त्याचं 'रेजाणी' पाण्यात रूपांतर करायला वेळ मिळतो. त्याचं प्रमाण कमी की जास्त, ह्याचा एवढासा देखील विचार केला जात नाही. वजन रत्तीचं असो की हत्तीचं असो, ते वजनच - तद्वत् 'रूपेरी थेंब' चार हातभर डहरीमध्ये येण्याजोगे असोत की चार कोसांच्या खडीनमध्ये, त्यांची साठवण ही होणारच. कुंई, पार. कुंड, टांके, नाडी, तलाई, तलाव, सरोवर, बेरे, खडीन, दईबंध जागा, डहरी आणि भे - सगळे ह्या रूपेरी थेंबांनी भरतात, काही काळपर्यंत कोरडेही पडतात. पण मरत नाहीत.

हे सगळे म्हणजे डोळ्यांच्या तपश्चर्येने लिहिलेले, पाणी आणि अन्नाचे 'अमरपटो' - म्हणजे अमरलेख आहेत.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 7