राजस्थानचे रजत जलबिंदू - 13


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


राजस्थानच्या चारी बाजूंना रूपेरी बिंदूंच्या प्रमाणे विखुरलेल्या ह्या कुंड्या, टाकी, कुंईयां, पार आणि तलावांनी समाजाची जी सेवा केली आहे, पिण्याच्या पाण्याची जी साठवण केली आहे, त्याच्या मूल्याचा आज आपण अंदाजही घेवू शकत नाही. एखाद्या मध्यवर्ती पध्दतीने हे काम पूर्ण करणे एक तर शक्य नाही... आणि जर काही थोडं फार केलं गेलं, तर त्याची किंमत काही कोटी रूपयांची असेल.

फोग च्या फांद्यांनी बनवलेल्या कुंड्या बिकानेर जिल्ह्याच्या सीमेवर, पाकिस्तानच्या हद्दीला चिकटून असलेल्या जालवाली गावात, श्री. ओम् थानवी आणि राजस्थानच्या गोसेवा संघचे श्री. भंवरलाल कोठारीजी यांच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाल्या. कुंड्यांवर सफेद रंग लिंपण्याचे रहस्य श्री. ओम् थानवी ह्यांनी समजावले.

खडिया ने बनलेल्या कुंड्या बिकानेर - जैसलमेर मार्गावर ठिकठिकाणी विखुरलेल्या आहेत. बज्जू विभागातही आम्हाला, उरमूल ट्रस्टचे श्री. अरविंद ओझा यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात अश्या कुंड्या पाहायला मिळाल्या. कालत्मक चबुतऱ्यांसारख्या बांधलेल्या कुंड्या आम्हा जैसलमेरच्या रामगढ परिसरात राजस्थान गोसेवा संघाचे श्री. जगदीशजी यांच्यासह केलेल्या प्रवासात पाहू शकलो.

जैसलमेरच्या अगदी अलीकडेच वसलेल्या आणि बनवलेल्या एका पूर्णत: नवीन गावात - कबीरबस्ती मध्ये प्रत्येक घराच्या समोर अश्याच कुंड्या बांधल्या गेल्या आहेत.... ह्या विषयीची माहिती आम्हाला जैसलमेर खादी ग्रामोदय परिषदेचे श्री. राजू प्रजापत यांच्याकडून मिळाली. छप्परं आणि अंगणाच्या आगोर नी जोडून दुप्पट पाणी एकत्र करणारे टाकं जोधपूरच्या फलोदी शहरात, श्री. ओम् थानवी यांच्या सौजन्यामुळे पाहता आले. चुर्‌रो चं पाणी खूप किफायतशीर प्रकारे घेणाऱ्या टांक्याची माहिती दिलीय् श्री. जेठूसिंह भाटी यांनी. श्री. संतोषपुरी नावाच्या संन्याश्याने अलीकडेच अशी टाकी, जैसलमेरच्या नरसिंहकी ढाणी ह्या भागाजवळ बांधली आहेत. संन्यास घेण्यापूर्वी ते गुराखी होते.... ह्या भागात पडणारा पाऊस वाहून जातांना बघत होते... संन्यासी बनल्यावर त्यांना वाटलं, की ह्या पाण्याचा उपयोग व्हायला हवा... त्यांच उरलेलं कार्य आता त्यांचे शिष्य इथे पूर्ण करत आहेत. घरसंसार सोडलेले संन्यासी पाण्याच्या कामाला किती आध्यात्मिक प्रकारे आपलंसं करतात, त्याची विस्तृत माहिती श्री. जेठूसिंहजींच्या कडे मिळू शकते.

जयगढ किल्ल्यात बांधलेल्या विशाल टाक्यांची मोघम माहिती, जयपूर शहरातल्या संग्रहालयात लावलेल्या एका जाहिरातीमधून प्रथम आम्हाला मिळाली होती. त्या जाहिरातीत, जगांतील सर्वात मोठं टाकं असा ह्याचा उल्लेख केला गेला होता. नंतर चाकसू ची एक संस्था - अॅग्रो अॅक्शन चे श्री. शरद जोशी यांच्यासह आम्ही तिथे गेलो आणि मग ह्या संबंधीची प्राथमिक माहिती सुध्दा त्यांच्याकडूनच मिळाली. ह्या सर्वात मोठ्या टाक्यांची संक्षिप्त माहिती ही अशी आहे -

टाक्यांचा आगोर जयगढच्या टेकड्यांवर 4 कि.मी पर्यंत पसरलेला आहे... छोट्या मोठ्या अनेक पाटांचं जाळं, टेकड्यांवर बरसणाऱ्या पाण्याला गोळा करीत, किल्ल्याच्या भिंतीपर्यंत आणतं... पाटांचा उतारसुध्दा अश्या प्रकारे केला आहे की त्यांच्यातून पाणी वाहण्याऐवजी हळूहळू पुढे चढतं ... अश्या तऱ्हेने पाण्याबरोबर येणारा केरकचरा - गाळ मागे पडत जातो... पाटांच्या वाटेत सुध्दा कितीतरी छोटे छोटे कुंड बनवलेले आहेत... त्यामधून सुध्दा पाणी, गाळ मागे टाकत, स्वच्छ होत होत, पुढे मुख्य टाक्यांच्या दिशेने वाहतं.

दुष्काळाच्या दरम्यान, म्हणजे 1975 - 76 साली, सरकारने ह्याच टाक्यांमध्ये जयपूर घराण्याच्या गुप्त खजिन्या च्या शोधासाठी, खूप खोदकाम केले होते. हे खोदकाम कित्येक महिने पर्यंत चाललेलं होतं. तीनही टाक्यांत आसपास खोदकाम झालं. टाक्यांचं सगळं पाणी मोठमोठ्या पंपांच्या मदतीने उपसलं गेलं.

आयकर विभागाच्या ह्या छाप्यांमध्ये खजिना मिळाला की नाही कोण जाणे, पण पावसाच्या पाण्याच्या सांठवणीचा हा अद्भूत खजिना मात्र चारही बाजूंनी केलेल्या खोल खुदाईमुळे काहीसा लुटलाच गेला होता. तथापि ही त्याची मजबूतीच मानावी लागेल, की काही 400 वर्षांपूर्वी बांधलेली ही टाकी, ह्या विचित्र अभियानाला सुध्दा सहन करू शकली आहेत... आणि आजही आपली कामगिरी नेटकेपणाने करत आहेत.

ही टाकी - छापे आणि खोदकाम यासंबंधीची सविस्तर माहिती श्री. आर.एस. खंगारोत आणि श्री. पी.एस. नाथावत ह्यांनी लिहिलेल्या 'जयगढ - द इन्व्हिजिबल फोर्ट ऑफ आमेर' ह्या इंग्रजी पुस्तकात मिळू शकते. प्रकाशक आहेत- आर.बी.एस.ए. पब्लिशर्स, एस.एस.एस. हाथवे, जयपूर.

राजस्थानच्या चारी बाजूंना रूपेरी बिंदूंच्या प्रमाणे विखुरलेल्या ह्या कुंड्या, टाकी, कुंईयां, पार आणि तलावांनी समाजाची जी सेवा केली आहे, पिण्याच्या पाण्याची जी साठवण केली आहे, त्याच्या मूल्याचा आज आपण अंदाजही घेवू शकत नाही. एखाद्या मध्यवर्ती पध्दतीने हे काम पूर्ण करणे एक तर शक्य नाही... आणि जर काही थोडं फार केलं गेलं, तर त्याची किंमत काही कोटी रूपयांची असेल. राजस्थान सरकारच्या जनस्वास्थ्य अभियांत्रिकी विभागातर्फे इथे काही पेयजल योजना (पिण्याच्या पाण्याच्या योजना) बनविण्यासाठी निविदा सूचना वर्तमानपत्रांतून वेळोवेळी निघत असतात. 94 सालच्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या जनसत्ता दैनिकात छापलेल्या अश्याच एका निविदा सूचनेमध्ये, बाडमेर जिल्ह्याच्या शिव, पचपदरा, चौहटन, बाडमेर आणि शिवना ह्या तालुक्यांच्या एकूण 250 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना बनविण्याचा सरासरी अपेक्षित खर्च 40 कोटी रूपये दाखविला गेला आहे. ह्याच निविदेमध्ये बिकानेर जिल्ह्यांतल्या बारा तालुक्यांच्या 600 गावांमध्ये होणाऱ्या कामाचा अपेक्षित खर्च 96 कोटी रूपये असणार आहे.

ह्याचबरोबर 94 सालच्या फेब्रुवारीत, राजस्थानच्या वर्तमानपत्रांमध्ये छापलेली निविदा सूचना सुध्दा लक्षणीय आहे. जोधपूर जिल्ह्याचा फलोदी परिसरात ह्याच विभागाकडून 25 हजार लिटर ते 45 हजार लिटर पाणी साठा क्षमता असलेल्या भूतल जलाशय - कृत्रिम तलाव - म्हणजे आणखी कुठूनतरी पाणी आणून साठवणीच्या टाक्यांच्या निर्मितीची योजना आहे. ह्या सर्वांचा सरासरी अपेक्षित खर्च 43 हजार ते 86 हजार रूपये बसतोय्... त्यात 1 लिटर पाणी साठवायचा अंदाजे खर्च 2 रूपये येईल... पण पाणी अन्य ठिकाणांहूनच आणावे लागणार आहे, त्याचा खर्च वेगळा... हे काम फलोदीच्या फक्त 13 गावांमध्ये होणार... त्याचा एकूण खर्च आहे साधारणपणे 9 लाख रूपये.

आता कल्पना करा राजस्थानी समाजाच्या त्या विभागाची, जो एकाच वेळी कुठल्याही जाहिरातीशिवाय, निविदा सूचना आणि ठेकेदारीच्या आपल्याच मजबूत पायावर, सुमारे 30 हजार गावांमध्ये निर्मळ पाणी साठवू शकत होता.

बिंदूमध्ये सिंधुसमान : 'देवा, एवढं दे', च्या ऐवजी 'देव जेवढं म्हणून देईल, त्यात कुटुंब' सामावून दाखवणाऱ्या ह्या समाजाची पुष्कळशी माहिती आम्हाला ह्याच्या आधीच पुस्तक आजभी खरे है ताबाव हे तयार करतांना मिळालेली होती. ह्या अध्यायाचा अधिकांश भाग हा त्या पुस्तकाच्या मृगतृष्णा झूठलाते तालाब ह्या भागावर आधारित आहे. तलाव कसे बनतात, कोण त्यांना बनवतात, तलावांचे आकार - प्रकार आणि त्यांची तऱ्हेतऱ्हेची नावे, त्या परंपरा - ज्या तलावांना वर्षानुवर्षे सांभाळून ठेवणं जाणत होत्या, अश्या अनेक गोष्टी गांधी शांति - प्रतिष्ठान तर्फे छापलेल्या या पुस्तकात आधी आलेल्या आहेत. ह्या विषयात रूची असणाऱ्या वाचकांनी ते पुस्तकही चाळून बघायला हवं.

तलावाच्या मोठ्या परिवारातली सर्वात छोटी आणि गोड सदस्या नाडी, हिची प्राथमिक माहिती आम्हाला मरूभूमी विज्ञान विद्यालय चे संचालक श्री. सुरेंद्रमल मोहनोत यांच्याकडून मिळाली. त्यांनी जोधपूर शहरात जलसंग्रहाच्या उज्जवल परंपरे विषयी काम केलेले आहे. त्यांच्या ह्या अभ्यासातून असे लक्षात येते की, शहरामध्ये सुध्दा नाड्यांचं बांधकाम होत आलेलं आहे. जोधपूरमध्ये आजही काही नाड्या बाकी आहेत. त्यांच्यातल्या मुख्य आहेत - जोधाकी नाडी, इ.स. 1520 मध्ये बनलेली गोल नाडी, गणेश नाडी, श्याम नाडी, नरसिंह नाडी आणि भूतनाथ नाडी.

सांभर सरोवराच्या आगोर मध्ये चारही बाजूंनी खाऱ्या जमिनीच्या मध्यभागी गोड पाण्याची तळी, आम्हाला, प्रयत्न नावाच्या संस्थेचे श्री. लक्ष्मीनारायण आणि सोशल वर्क अँड रीसर्च सेंटर च्या श्रीमती रतनदेवी आणि श्री. लक्ष्मणसिंह ह्यांच्यासह केलेल्या प्रवासात, पाहून - समजून घेता आली. ह्यांचे पत्ते असे आहेत -

1. प्रयत्न, गाव - शोलावता, पोस्ट - श्रीरामपुरा, व्हाया - नरैना, जयपूर... आणि 2. सोशल वर्क अँड रीसर्च सेंटर, तिलोनिया, व्हाया - मदरगंज, अजमेर.

बालविवाह - विरोधी कायदा बनवणारे समाज - सुधारक श्री. हरविलास शारदा ह्यांनी आपल्या अजमेर : हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह (ऐतिहासिक व विवरणात्मक) ह्या पुस्तकात अजमेर, तारागढ, अन्नासागर, विसलसर, पुष्कर इत्यादी वर विस्ताराने लिहिले आहे. इ.स. 1933 च्या ऑक्टोबर महिन्यात अजमेरमध्ये अखिल भारतीय स्वदेशी औद्योगिक प्रदर्शन भरले होते. प्रदर्शन समितीचे अध्यक्ष श्री. हरविलास शारदा हेच होते. कित्येक लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ह्या विषयावरच्या ह्या प्रदर्शनाने अजमेरच्या अन्नासागर नावाच्या तलावाबद्दल विशेष माहिती दिली गेली होती.

ह्याच भागात पाणी आणि गायरान हे विषय घेवून काम करीत असलेले श्री. लक्ष्मणसिंह राजपूत ह्यांच्याकडून आम्हाला, इथल्या जवळजवळ प्रत्येक गावात बंजारा लोकांकडून बनवल्या गेलेल्या तळ्यांची माहिती मिळाली आणि मग त्यांच्या बरोबर घडलेल्या प्रवासात ती तळी पाहण्याचा योगही आला. इथे त्यांना दंड तलाई म्हणतात. ह्या सर्व तळ्यांच्या काठावर दंड म्हणजे ह्या बंजारांचे स्तंभ लागलेले आहेत... कदाचित ह्याच कारणामुळे त्यांना ह्या नावाने लक्षात ठेवले जात असावे. श्री. लक्ष्मणसिंह हे अश्या तळ्यांची डागडुजी करण्याचे अभियानही चालवतात. त्यांचा पत्ता असा आहे - ग्राम विकास नवयुवक मंडल, गाव - लापोडिया, व्हाया - दूदू, जयपूर.

जैसलमेर, बाडमेर, बिकानेर ह्यांची आकडेवारी आम्हाला ह्या जिल्ह्यांच्या गॅझेटियर्स मधून आणि सन 1981 च्या जनगणना रिपोर्ट मधून मिळाली. ह्यामध्येच आम्ही ह्या मरूभूमीचं ते भितीदायक स्वरूप पाहिले आहे, जे सर्व योजनाकारांच्या मनात वाईट तऱ्हेने भरून राहिले आहे.

जैसलमेरच्या तलावांची प्राथमिक यादी आम्हाला श्री. नारायण शर्मा ह्यांच्या जैसलमेर ह्या पुस्तकातून मिळाली. ह्याचे प्रकाशक आहेत - गोयल ब्रदर्स - सूरजपोल, उदयपूर. मग प्रत्येक वेळी ह्या यादीत आणखी 2- 4 नव्या नावांची भर पडत गेली आहे. आम्ही आजही शहराच्या परिपूर्ण यादीचा दावा करू शकत नाही. मरूभूमीच्या ह्या भव्यतम नगरात प्रत्येक कामासाठी तलाव बनवले गेले आहे... मोठ्या गुरांसाठी तर होतेच, पण बछड्यांसाठी सुध्दा वेगळे तलाव होते. वासरांना, मोठ्या गुरांबरोबर दूरवर चरण्यासाठी पाठवले जात नसे, त्यामुळे त्यांचे तलाव शहराजवळच बांधले होते. एके ठिकाणी 3 तळ्या जवळ जवळ होत्या - त्या जागेचं नावही तीन तलाई पडलेलं होतं. आज त्या बूजवून त्यांच्यावर इंदिरा हांधी स्टेडियम उभं राहिले आहे.

जैसलमेरचे तलाव समजून घेण्यात आम्हाला श्री. भगवानदास माहेश्वरी, श्री. दीनदयाळ ओझा, श्री. ओम् थानवी आणि श्री. जेठूसिंह भाटी ह्यांची फार मदत झाली आहे. ओझाजी आणि भाटीजी ह्यांनी तर आम्हाला खरोखर बोटाला धरून ह्यांचे बारकावे दाखवून समजावून दिलेत.

घडसीसर, गडसीसर, गडीसर - नाव घासलं जातं, घासून आणखी चमकायला लागतं. हा गडीसर तलाव समाजमनावर तरंगतो. अनेक गावं - अनेक रूपं. हा तलाव जैसलमेरच्या अभिमानाचं कारण आहे. तसं दिमाखाचं देखील. इथे कोणी एखाद असं मोठं काम केलं - ते त्याच्या ताकदीच्या बाहेरचे आहे, तर त्याच्या त्या कामाचे सगळे श्रेय त्याच्याकडून काढून घेवून गडीसर ला बहाल करण्याचीही चाल आहे - काय, गडीसरला जावून तोंड धुवून आलास काय ? असं विचारलं जातं... आणि जर कोणी आपला डांगोरा पिटत असेल, तर त्यालाही जमिनीवर आणण्यासाठी कोणी तरी म्हणेल - जा, गडीसरच्या पाण्याने तोंड तरी धुवून ये जरा !

लोक गडीसर ला आणि तो बनवणाऱ्या महारावल घडसी ला आजही इतके मानतात, की विशेष प्रसंगी लांबून लांबून इथे नारळ चढवायला येतात. महारावळ घडसी ह्यांची समाधी पाळीवर कुठे आहे, हे कदाचित त्यांचे वंशज भले विसरून गेले असतील, लोकांना मात्र ते आजही ठावूक आहे.

असे सांगतात, की स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत गडीसर च्या बाबतीत शहरात मोठी शिस्त होती. एक अपवाद सोडून, ह्या तलावात आंघोळ - पाय धुणे, पोहणे मना होते. बस्स्, फक्त पहिल्या पावसात सर्वांना यांच्यात आंघोळ करण्याची मुभा होती... बाकी पूर्ण वर्षभर ह्याचं पावित्र्य राखण्यासाठी आनंदाचा थोडा एक अंश पोहणं, नाहणं ह्यावर बंधने घातलेली होती.

ह्या आनंद - सरोवरीपाशी समाज आपले उच्च नीच भेदही विसरून जात होता. कुठे दूरवर पावसाचा सुगावा लागला, की मेघवाल परिवारांच्या स्त्रिया वर स्वत:हून येत, इंद्रदेवाला रिझवायला कलायण गीत गात असत. ह्या इंद्राचे कितीतरी किस्ते आहेत - कोण जाणे कोणाकोणाला भुलवायला अप्सरांना पाठवायचे ! पण ह्या गडीसरला मात्र खुद्द इंद्रालाच रिझवलं जात होतं....आणि मेघवाल परिवारांच्या स्त्रिया ह्या गाण्यासाठी पैसे घेत नसत... तसेच कोणी त्यांना ह्या कामाची मजुरी किंवा मानधन द्यायचे धाडस सुध्दा करीत नसत. स्वत: महारावळ राजा त्यांना ह्या गीतानंतर प्रसाद देत असे. प्रसादात 1 पासरीभर गहू आणि गूळ असे. तो सुध्दा सगळा तिथेच पालावरच वाटला जाई.

गडीसर मध्ये कुठून कुठून - किती किती पाणी येते ते समजणं मोठ कठीण काम आहे. रेतीच्या कणाकणाला अडवून धरून पाण्याचा एकेक थेंब गडीसरकडे वहात यावा, यासाठी मैलोम्मैल लांबीची आड - (एक प्रकारचा बांधीव पाट जो पाणी एका बाजूने वळवून आणतो) सुध्दा बनवली गेली होती. तलावाच्या खाली बांधले होते अनेक बेरे - म्हणजे विहीरी.... आणि कधीतरी ह्या विहीरींची सुध्दा स्तुती करणाऱ्या काव्यपंक्ती संस्कृत आणि फारसी भाषोत लिहिल्या गेल्या होत्या.

आज गडीसर मध्ये, नाल्यांचे पाणी लांबून पाईपमधून आणून घातले जातेय. हे सर्व लिहित असतांनाच कळले आहे की जी पाईपलाईन फुटली होती, ती आता दुरूस्त झाली आहे - आणि गडीसरमध्ये नाल्याचे पाणी पुन्हा एकदा येवू लागले आहे... पण पाईपलाईनचा काही भरवसा नाही - लिहिता लिहिता दुरूस्त होणारी पाईपलाईन वाचता वाचता पुन्हा फुटू शकते.

बापका तालाब ची सफर, बिकानेरच्या उरमूल ट्रस्ट ह्या संस्थेचे श्री. अरविंद ओझा यांच्या मदतीने घडली. बाप ची कहाणी आम्हाला उस्ताद निजामुद्दीन कडून समजली. त्यांचा पत्ता असा आहे - बालभवन, कोटला रोड, नवी दिल्ली.

जसेरी चे जस म्हणजे - यश आम्ही श्री. जेठूसिंह भाटींकडून ऐकले होते - आणि भाटींच्या सौजन्यानेच आम्हाला ह्या भव्य तलावाचे दर्शन होवू शकले. अन्य ठिकाणी तलाव सुकून जातात आणि त्यांच्या आसपासच्या विहीरी चालू राहतात... पण इथे आजूबाजूच्या विहीरी सुकल्या, तरी जसेरी मध्ये मात्र पाणी भरलेलंच असतं. इथे जवळच वनविभागाची एक झुडुपशाळा (नर्सरी) आहे. त्यांचा स्वत:चा पाण्याचा साठा सुध्दा जेव्हा उन्हाळ्यात आटून जातो, तेव्हा ते लांबून जसेरी च्या पाणयावर आपल्या झाडापेडांना राखू शकतात.

जसेरी वरचे सुध्दा लोकांचे प्रेम विलक्षण आहे. श्री. बैनाराम भिल्ल आहेत... उंटावरून आणि जीपमधून प्रवाशांना इथेतिथे फिरवून आपली उपजीविका करतात.... पण जर का जसेरी ला जायची संधी आली, तर बाकीची सगळी कामं बाजूला सारतात. त्यांनी जसेरीची मोड तोड कशी दुरूस्त केली जावू शकते ह्यावर खूप विचार केला आहे... ह्या साऱ्याचा नकाशा कुठे कागदावर नाही, तर त्यांच्या हृदयात आहे.

जसेरीवर गांधी शांति केंद्र, हैद्राबाद आणि गांधी शांति प्रतिष्ठान, नवी दिल्ली ह्यांनी एक सुंदर पोस्टर सुध्दा प्रकाशित केले आहे.

पाणी आणि अन्नाचा अमरपट्टा : खडीन ची प्राथमिक माहिती आम्हाला जैसलमेरमध्ये पालीवालांच्या उजाड गावात, श्री. किरण नाहटा आणि जैसलमेर जिल्हा खादी ग्रामोदय परिषदेचे श्री. राजू प्रजापत यांच्याबरोबर फिरतांना मिळाली होती, मागाहून पाणीमोर्चा चे श्री. अरूणकुमार आणि श्री. शुभू पटवा यांनी तिच्यात भर टाकली. वयोवृध्द गांधीवादी श्री. भगवानदास माहेश्वरी यांनी जैसलमेरच्या काही प्रसिध्द खडीन ची चित्र पाठवली... आणि पुढे श्री. दीनदयाळ ओझा, श्री. जेठूसिंह भाटी आणि जैसलमेर जिल्हा खादी ग्रामोदय परिषदेचे श्री. चौइथमल ह्या मंडळींच्या बरोबर केलेल्या प्रवासात हा विषय विस्तृतपणे समजून घ्यायची संधी मिळाली.

जोधपूरमध्ये ग्रामीण विज्ञान समिती ह्या संस्थेकडून नव्या खडीन बनवण्याचे काम केले गेले आहे. त्यांचा पत्ता असा - पोस्ट - जेलू गगाडी, जोधपूर. ज्ञानी लोक आणि साध्या भोळ्या गुराख्यांमधला संवाद आम्हाला श्री. जेठूजी यांच्याकडून मिळाला - ते पुरं संभाषण असं आहे -

- ज्ञानी म्हणतात - सूरज रो तो तप भलो, नदी रो तो जल भलो,
भाई रो तो बल भलो, गाय रो तो दूध भलो,
चारों बातों भले भाई, चारों बातों भले भाई !


म्हणजे - सूर्याची तपस्या चांगली, पाणी नदीचे चांगले, शक्ती भावाची चांगली, दूध गाईचे चांगले - ह्या चार गोष्टी नेहमीच चांगल्या -

- त्यावर गुराखी उत्तर देतो - आँख रो तो तप भलो, कराख रो तो जल भलो,
बाहु रो तो बल भलो, मां रो तो दूध भलो,
चारों बातों भले भाई, चारों बातों भले भाई !


म्हणजे- तपश्चर्या तर डोळ्यांची चांगली - म्हणजेच जे प्रत्यक्ष अनुभवले ते कामाच, पाणी गोड लागते ते खांद्यावरून वाहून आणलेल्या धड्याचे, शक्ती तर आपल्या मनगटांतलीच आपल्या कामाला येते आणि दूध तर आईच्या स्तन्याइतके अन्य कुठलेच श्रेष्ठ नाही. म्हणून डोळ्यांची तपश्चर्या, घड्याचे पाणी, मनगटांतील शक्ती आणि आईचे दूध ह्या चार गोष्टी नेहमीच चांगल्या.

आधुनिक कृषीपंडीत सांगतील, की पाऊसमानाला अनुसरून पूर्ण वाळवंट हे गहू पेरायला लायक नाही...हा तर खडीन बनवणाऱ्या त्या लोकांनी केलेला चमत्कार होता, की इथे शेकडो वर्षांपासून मण गहू पिकवला गेला. पालीवाल ब्राम्हणांनी जैसलमेर राज्याला धान्य आणि चाऱ्याच्या बाबतीत बराच मोठा काळपर्यंत संपन्न ठेवलेले होते.

दईबंध म्हणजे देवीबंध ची माहिती आम्हाला श्री. जेठूसिंह आणि श्री. भगवानदास माहेश्वरी यांच्याकडून मिळाली. त्या भागाच्या प्रकृति ने निसर्गदेवीने जितकी काही अशी ठिकाणं बनवली असतील, त्यातली क्वचितच अशी असतील - जी समाजाने आपल्या तप:पूत डोळ्यांनी पाहिली नसतील. .... असे अमरपट तिथे चारी दिशांना पसरलेले आहेत... शिकल्या - सवरल्या समाजाला ते वाचता येत नसतील, तर ती गोष्ट वेगळी.

भूणा तुझे बारा मास : इंद्राची एक घटका आपल्यासाठी बारा महिन्यात बदलणाऱ्या समाजाची पहिला झलक आम्हाला बिकानेरच्या भीनासर गावात, गायरान - जमिनीत बनवलेल्या रामसागर नावाच्या साठी विहीरीने दाखवली. ह्या ठिकाणी आम्ही श्री. शंभू पटवा यांच्या सौजन्याने पोहोचलो होतो.

भूण आणि इंद्र यांचा संबंध आम्हाला श्री. जेठूसिंहजींनी समजावून दिला. अदृष्य पाताळजळाला पाहू शकणारे सीखी आणि मग इतक्या खोलपर्यंत विहीरी खणणारे कीणिये ह्यांची माहिती आम्हाला श्री. दीनदयाळ ओझांकडून मिळाली. फांकखुदाई - म्हणजे फांकेसारखे किंवा फोडीसारखे खोदकाम - ह्यांचे रहस्य समजावलं श्री. किशन वर्मा यांनी... त्यांच्याकडून बारीक चिणकामाची सुध्दा माहिती मिळाली.

बावडी, पगबाव (पायऱ्यांची विहीर) आणि झालरा - ह्यांच्यावर ह्या अध्यायांत वेगळे काही देता आलेले नाही आहे, परंतु विहीरींप्रमाणेच ह्यांची देखील एक भव्य परंपरा अस्तित्वात आहे. तशी तर बावडी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पर्यंत सुद्दा मिळू शकेल - पण देशाच्या नकाशावर त्यांचा एक खास पट्टा आहे आणि ह्या पट्ट्यावरच गुजराथ, मध्यप्रदेश व राजस्थान येतात.

राजस्थानच्या ह्या वैभवाचे पहिले वहिले दर्शन आम्हाला चाकसूच्या श्री. शरद जोशींनी घडविले होते. त्यांच्याच बरोबर आम्ही टौंक जिल्ह्याची बावडी टोडा रायसिंह पाहू शकलो. त्या बावडीच्या जिन्यावर उभे राहिल्यावर, नजर फाटून जाणे ह्याचा नेमका अर्थ काय, ते आम्हाला कळाले. ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ ह्याच बावडीच्या चित्राने सजवले आहे. ह्याला गांधी शांति केंद्र, हैद्राबाद, आणि गांधी शांति प्रतिष्ठान ह्यांनी एका पोस्टरच्या स्वरूपातही छापले आहे. श्री. शरद जोशांनी, राजस्थानच्या अनेक शहरात बांधलेल्या - आणि आता जवळजवळ सगळीकडे उजाड होत चाललेल्या बावड्या विषयीची माहिती सुध्दा उपलब्ध करून दिली. राष्ट्रदूत साप्ताहिकाच्या 18 जून, 1989 च्या अंकात श्री. अशोक आत्रेय ह्यांनी राजस्थानातल्या बावड्यांची लांबलचक यादी दिली आहे. राष्ट्रदूत साप्ताहिकाचा पत्ता असा आहे - सुधर्मा, एम.आय.रोड, जयपूर.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 7

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 9

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 10

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 11

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 12

 



Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading