राजस्थानचे रजत जलबिंदू - 10


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


राजस्थानांत, विशेषत: मरूभूमीच्या समाजाने पाण्याचे काम हे केवळ 'काम' म्हणून नव्हे तर एक 'पवित्र पुण्यदायी कर्तव्य' म्हणून पाहिले आहे. आणि म्हणून आज ज्याला नागरिक 'अभियांत्रिकी' वगैरे म्हणतात, त्यापेक्षाही कितीतरी उच्च स्तरावर जावून ते एका समग्र जल दर्शनाचे सुंर रूप घेवू शकलं.

बैलजोडी किंवा एका उंटाच्या सहाय्याने 'चडस' ओढली जाते. त्यांनाही एवढं वजन खेचून वर आणायला जास्त श्रम पडू नयेत, म्हणून अशा विहिरीवर 'सारण' बांधतात. 'सारण' म्हणजे उताराचा रस्ता - ज्यावरून बैल चडस ओढतांना चालत असतात. सारण च्या उतारामुळेच त्याचं कठीण काम थोडं हलकं होतं. सारण चा एक अर्थ काम 'निभावणारा' किंवा 'बनवणारा' असाही आहे - आणि खरोखरच, सारण खोल विहीरींतून पाणी खेचून आणायचं काम निभावीत असते.

विहीर जितकी खोल असेल, तितकीच लांब सारण ठेवायची, तर जागा फार हवी. तसंच मग जी बैलजोडी सारणीच्या एका टोंकाकडून निघेल, ती ह्या लांबीमुळे सारणीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जात अगदी हळूहळू वर चढेल आणि अश्या तऱ्हेने दुसऱ्यांदा पाणी खेचण्यात बराच वेळ लागेल. म्हणूनच सारणीची पूर्ण लांबी ही विहीरीच्या एकूण खोलीच्या अर्धी ठेवली जाते.... आणि बैलांच्या एका जोडीऐवजी दोन जोड्या लावून चडस ओढली जाते.

300 हात खोल विहीरीत चडस भरतांच, पहिली जोडी उतरत्या सारणीवर 150 हात उतरून चडस विहीरीत अर्ध्या अंतरापर्यंत ओढून आणते - त्याचवेळी चडस ची ती दोरी मोठ्या कुशलतेने क्षणभरांतच जोडीशी जोडून दिली जाते - आणि तिकडे पहिली जोडी मोकळी करून चडस च्या दोरीपासून वेगळी करून, चढावावर हांकून वर आणली जाते - तर इकडे दुसरी जोडी उरलेल्या 150 हातांच्या अंतरापर्यंत चडस ओढून आणते. चडस भराभर रिकामी होते - पाताळांतलं पाणी धरेवरून वाहू लागतं.

एका वेळेची ही संपूर्ण क्रिया होण्याला 'बारी' किंवा 'बारो' म्हटलं जातं - आणि हे काम करणाऱ्यांना 'बारियो' म्हणतात. इतकी वजनदार चडस विहीरीतून वर खेचून आणून रिकामी करण्याच्या कामात बळ आणि बुध्दी दोन्ही हवीत. जेव्हा भरलेली चडस वर येवून थांबते, तेव्हा तिला हातांनी पकडणं शक्य नसतं - कारण असं करण्यांत बारियो भरलेल्या वजनदार चडसबरोबर विहीरीत आंत खेचला जावू शकतो - यासाठी आधी चडसला धक्का देवून उलट्या बाजूला ढकललं जातं, वजनामुळे ती दुप्पट वेगाने मागे येते आणि जगत ला टेकते. तेव्हा झपाट्यात ती पाणी ओतून रिकामी केली जाते.

बिरियोंच्या ह्या कठीण कामाला एके काळी समाजात मोठा मान होता. गावात लग्नाची वरात येत असे, तेव्हा सगळ्यांच्या आधी त्यांना आदरपूर्वक पंगतीला बसवून जेवण वाढलं जात असे. बारियोंचं एक संबोधन 'चडसिया' म्हणजे चडस रिकामी करणारा असंही आहे. बारियोंचा जोडीदार असतो 'खांभी' - 'खांभीडो'. खांभी सारणीतून बैल हांकतो. अर्ध अंतर पार केल्यावर हाच खांभीडो, चडसची दोरी एका विशिष्ट खिळ्याच्या सहाय्याने पहिल्या जोडीपासून सोडून दुसऱ्या जोडीशी बांधतो. म्हणून खांभीडोचं एक नाव 'कीलियो' असंही आहे.

बैलजोडी आणि चडस यांना जोडणारी जी लांब आणि मजबूत दोरी, तिला 'लाव' म्हणतात. ही दोरी गवत - तण किंवा लव्हाळ्यांपासून नव्हे, तर चामड्यापासून बनते. गवत - तण किंवा लव्हाळ्यांपासून बनलेली दोरी इतकी मजबूत होणार नाही, की ती दोन मणांची चडस दिवसभर ओढीत राहील... तसंच पुन्हा सारखी सारखी पाण्यात बुडत - उतरत राहिल्यामुळे ती लवकर कुजूही शकते. यासाठी चडसची दोरी चामड्याच्या लांबच लांब पट्ट्यांनी गुंफून बनवली जाते. काम झाल्यावर ती अश्या कुठच्या तरी जागी टांगून ठेवली जाते, जिथे उंदीर कुरतडू शकणार नाहीत. अश्याप्रकारे नीट काळजीपूर्वक सांभाळलेली 'लाव ' 15 - 20 वर्षांपर्यंत पाणी ओढत राहते.

'लाव' चं एक नाव 'बरत' असंही आहे. बरत साठी म्हशीचं चामडं वापरात येतं. मरूभूमीमध्ये गाय - बैल आणि उंट खूपच आहेत... म्हशीचा तर हा भाग नव्हताच, पण मग ह्या कामासाठी म्हशीचं चामडं पंजाबातून इथे येत असे आणि जोधपूर, फलोदी, बिकानेर इत्यादी ठिकाणी त्यांच्यासाठी वेगळा बाजार भरत असे. कुठे कुठे चडसच्या ऐवजी 'कोस' वापरला जायचा... तो बैलाच्या किंवा उंटाच्या चामड्यापासून बनवला जात असे.

कमी खोल - पण जास्त पाणी देणाऱ्या विहीरींमधून चडस किंवा कोस च्या ऐवजी 'सूंडिया' ने पाणी काढलं जातं. सूंडिया म्हणजे देखील एक प्रकारची चडसच, परंतु ती विहीरींतून वर येताच आपोआप ओतली जाते. सूंडियाचा आकारही वरून तसा चडससारखाच असतो, पण खाली तिच्यात हत्तीच्या सोंडेसारखी एक नळी बनवलेली असते. तिच्यात दोन दोऱ्या लावलेल्या असतात... वर मुख्य वजन खेचणारी चामड्याची वादी म्हणजे 'बरत' आणि एक हलकी दोरी ह्या सोंडेच्या तोंडावर बांधली जाते. सूंडिया विहीरीत जातांना ह्या सोंडेचं तोंड मुडपून बंद होतं - पाणी भरल्यावर वर येत असतांनाही ते बंदच राहतं - पण 'जगत' वर येताच सोंडेची दोरी सैल सोडली जावून तोंड मोकळं होतं आणि सूंडिया मधलं पाणी क्षणभरातच ओतलं जावून ती रिकामी होतं.

सूंडियावाल्या विहीरीवर एक नव्हे, तर दोन चरख्या लावल्या जातात. त्यापैकी वरची चरखी म्हणजे तं भूण असते. मग त्या भूण च्या चार हात खाली सूंडियाची सोंड मोकळी करणारी आणखी एक 'घिरी ' लागते, तिला 'गिडगिडी' म्हणतात. भूणला तर सगळा भार वाहायचा आहे, त्यामुळे तिथल्या चरखीचा आकार चाकासारखा ठेवला जातो - पण गिडगिडीला हलकं काम असतं, त्यामुळे ती लाटण्यासारख्या आकाराची बनवतात.

नावं आणि कामं यांची ही यादी संपतच नाही. सूंडिया चं मुख्य गोल तोंड ज्या लोखंडी तारेच्या किंवा बाभळीच्या लाकडी घेऱ्यामध्ये घट्ट बसवलं जातं, त्याला 'पंजर' असं म्हणतात. पंजर आणि चामड्याच्या झोळाला बांधायची तीकसण . त्याचं तोंड उघडं राखण्यासाठी जी लाकडी चौकट असते, तिला 'कलतरू' म्हणतात. कलतरूला मुख्य दोरीशी म्हणजे 'बरत' शी जोडण्यासाठी आणखी एक दोरी बांधली जाते, तिचं नाव 'तोकड'. 'लाव' च्या एका टोकाला ही तोकड बांधलेली असते, तर दुसऱ्या टोकाला असते बैलजोडी. ह्या बैलांच्या खांद्यावर जो जोखडसारखा बंध तडस ओढण्यासाठी असतो, त्याचं नाव आहे 'पिंजरो'. ह्या पिंजऱ्यांतच दोन्ही बैलांच्या माना अडकवलेल्या असतात. पिंजऱ्यात 4 प्रकारची लाकडं ठोकलेली असतात आणि त्या चारांचीही नाव वेगळी वेगळी आहेत. वर लांबीतून लावलेला जड लाकडी दांडा म्हणजे 'कोकरा'... त्याखालची हलक्या लाकडाची दांडी म्हणजे 'फट'... तसेच रूंदीतून लावलेल्या पहिल्या 2 दंड्यांना म्हणतात 'गाटा' तर आतल्या बाजूस असणाऱ्या 2 दांड्याची नावे 'धूसर.'

ही सगळी नाव आणि कामं काही ठिकाणी, काही विहीरींवर लागलेल्या विजेच्या आणि डिझेलच्या पंपांमुळे थोडी विसरलीशी होवू लागली आहेत. ह्या नव्या पंपांमध्ये, चडस किंवा कोसची 'तेवड' म्हणजे काटकसर नाही. पुष्कळश्या 'साठी' - 'चौतिनी' विहीरी आज बैलांच्या ऐवजी घोड्यांच्या म्हणजे 'हॉर्सपॉवर' ने ओळखल्या जाणाऱ्या पंपांनी पाण्याचा उपसा करत आहेत. आधीच्या काळात, काही नव्या - जुन्या वस्त्यांमधून नव्याने नळ लागले आहेत, पण त्या नळांमधूनही अश्याच पुराण्या साठी - चौतिनी मधून पंपांनी पाणी फेकलं जात आहे. ह्या नव्याशा दिसणाऱ्या नळांमधूनही राजस्थानच्या जलपरंपरेची धाराच वाहातेय... तर कुठे ही धारा तुटली सुध्दा गेलीय... याचं सर्वात दु:खद उदाहरण म्हणजे जोधपूर जिल्ह्याच्या फलोदी शहरातल्या सेठ सांगीदासजींच्या साठी विहीरीचं. विहीर कसली, ती तर चक्क वास्तुकलेचीच उंची - खोली मोजेल.

दगडी, अष्टकोनी, सुंदर, मोठी विहीर. आठांपैकी चार भुजांचा विस्तार लांबट अश्या चबुतऱ्यांच्या रूपात चारही दिशांनी बाहेर निघालेला आहे. मग प्रत्येक चबुतऱ्यावर एक याप्रमाणे चार छोट्या अष्टकोनी 'कोठ्या'.... आणि मग त्यांच्याशी जोडलेल्या चार आणखी मोठ्या कोठ्या. प्रत्येक कोठीच्या बाहेरच्या बाजूला, प्रत्येक उंचीच्या जनावरांसाठी पाणी पिण्याची सोय करणारे सुंदर 'खेलियां' म्हणजे 'हौद.' चार चबुतऱ्यांच्या मधून निघणाऱ्या चार 'सारणी' ज्यांच्यावर एकाच वेळी चारही दिशांनी चार बैलजोड्या कोसभर पाणी ओढण्यासाठी चढाओढ करीत असायच्या.

19 व्या शतकाच्या ह्या 'साठी' विहीरीने 20 व्या शतकाचा पूर्वार्धही पार केला होता. मग सन 1956 मध्ये सांगीदासजींच्या कुटुंबाच्या हातून तिचा ताबा नगरपालिकेच्या हातात आला. चार सारणींवर बैलजोड्या धावणं थांबलं. ह्या सुंदर विहीरीच्या बरोबर वर एक 305 फूट खोलीवर 15 हॉर्सपॉवरचा एक पंप बसविला गेला. पाणी अथांग होतं. शहरात जर 24 तास वीजपुरवठा असेल, तर तो पंप दिवसरात्र चालवला जाई आणि ताशी हजार गॅलन इतकं पाणी उपशीत असे. मग पंपाची मोटर 15 हॉर्सपॉवरवरून 25 हॉर्सपॉवर अशी बदलली गेली. साफसफाईच कामही बंद झालं. बस्, फक्त पाण्याचा उपसाच करीत राहिले. पाणी थोडं कमी झाल्यागत दिसलं - विहीरीने संकेत केला, की काम तर पुरं करून घतलं, पण सांभाळ - प्रतिपाळ विसरून जातांय - नगरपालिकेनं ह्या संकेताचा काही निराळाच अर्थ घेतला. आणखी 70 फूट बोअरिंग केलं गेलं. 300 हात खोल विहीरीचे आणखी 70 फूट वाढले. पण त्यामुळे सन 1990 पर्यंत येईतो विहीर पार थकून गेली. तरी सुध्दा ह्या थकल्या - भागल्या विहीरीने आणखी 4 वर्षांपर्यंत शहराची सेवा केली. मार्च 1994 मध्ये मात्र सेठ सांगीदासजींच्या ह्या विहीरीने हार पत्करली.

ह्या विहीरीत आजही पाणी आहे, पण साफल्याने झरे गाडले गेले आहे. सफाईसाठी इतक्या खोलवर कोण उतरणार ? ज्या शहरात इतक्या खोल विहीरी खणणारे 'कीणिया' होते, विहीरींना दगडांनी बांधून काढणारे, गजधर मिळत होते, तिथेच आज त्याविहीरींची साफसफाई करणाऱ्यांचा शोध नगरपालिका अजून घेवू शकलेली नाही.

परंतु बिकानेर शहरात 18 व्या शतकात बनलेला भव्य 'चौतानी' कुआं आजही केवळ गोड पाणीच देतो आहे असे नाही आहे, तर त्याच चौतानी च्या आत नगरपालिकेचे ऑफिस चालते... आजूबाजूच्या मोहल्ल्यांची वीजबिलं - पाणी बिलं जमा होतात आणि जलविभागीय कर्मचार्यांच्या युनियनचे कामही तिथेच चालते. पूर्वी कधी चार सारण्यांवर आठ बैलजोड्या पाणी खेचीत होत्या. आज तिथेही विजेचे मोठमोठे पंप लावलेले आहेत. दिवसरात्र ते पाणी उपशीत असतात, पण अजून चौतीन्याचा थांग लागलेला नाही आहे. केव्हाही 20 - 25 सायकली, स्कूटर्स, मोटारी वगैरे ह्या विहीरींशी उभ्या दिसतात. त्या साऱ्यांना आपल्या विशाल हृदयांत सामावून घेणाऱ्या ह्या विहीरीचा परिसर, कुठूनही जवळून किंवा लांबून पहा - विहीरीसारखी नव्हे, तर ही एखाद्या छोट्याश्या सुंदरश्या रेल्वेस्टेशनसारखी, बसस्टँडसारखी किंवा छोट्या महालासारखी दिसते.

तसेच तिथे एक नाही, अनेक विहीरी आहेत - आणि फक्त तिथेच नव्हे, तर प्रत्येकच ठिकाणी अश्या विहीरी आहेत.... कुंई, कुंड आणि टाके आहेत. तलाव आहेत. बावडी - पगबांव आहेत, नाडियां आहेत, खडीन - देईबंध जागा आहेत, भे आहेत, ज्यांच्यात रूपेरी थेंब सांभाळून ठेवले जातात. माती, पाणी आणि उष्णता यांची तपस्या करणारा हा प्रदेश वाहणाऱ्या आणि थांबणाऱ्या पाण्याला स्वच्छ करून ठेवतो - पालरपाणी, रेजाणीपाणी आणि पाताळपाणी यांच्या एका एका थेंबालाही सागरासारखा मानतो - आणि इंद्रदेवाच्या एका घडीला आपल्यासाठी 12 महिन्यात बदलतो.

कधी काळी क्षितिजापर्यंत लहरणारा अखंड समुद्र हाकडो - आजही इथे खंड विखंड होवून उतरतो.

आपल्या तन मन धनाची साधने :


राजस्थानांत, विशेषत: मरूभूमीच्या समाजाने पाण्याचे काम हे केवळ 'काम' म्हणून नव्हे तर एक 'पवित्र पुण्यदायी कर्तव्य' म्हणून पाहिले आहे. आणि म्हणून आज ज्याला नागरिक 'अभियांत्रिकी' वगैरे म्हणतात, त्यापेक्षाही कितीतरी उच्च स्तरावर जावून ते एका समग्र जल दर्शनाचे सुंर रूप घेवू शकलं.

ह्या जलदर्शनाला समजण्याची आमची यात्रा अनायसेच सुरू झाली होती ती सन 1987 मध्ये. बिकानेरच्या भीनासर गावात, तिथली 'गोचर जमीन' किंवा 'गायरान' वाचविण्यासाठी आंदोलन उभे राहिले होते. त्या संकटकाळी गावच्या लोकांना साथ देण्यासाठी आम्ही लोक तिथे पोहोचलो होतो.

भीमासर गावच्या चराऊ रानाबरोबर, एक छोटसे सुंदर देऊळ आणि एक बाग आहे. बागेच्या एका कोपऱ्याचे स्वच्छ - सारवलेलं - नीटस असे अंगण होते. त्याच्या चारही बाजूंनी साधारण हातभर उंचीची भिंत होती आणि एका कोपऱ्यात एक टाकीसारखी बांधलेली होती - लाकडी झाकणाने झाकलेली, झाकणाशी एक दोरी बांधलेली बादली ठेवलेली होती... हे काय आहे? असं विचारताच सांगितलं गेलं की ह्याला टाकं म्हणतात. त्याच्या आत पावसाच्या पाण्याचा साठ केला जातो, अंगणाबाहेर चपला काढून ठेवायला लावून आम्हाला आंत नेल गेलं. झाकण उघडून पाहिले, तेव्हा कळले की आत खूप मोठ्या कुंडात पाणी भरलेले आहे.

राजस्थानच्या जलसंग्रहाच्या विशाल परंपरेचे हे पहिले दर्शन होते. नंतरच्या प्रवासात जिथे जिथे गेलो, तिथे तिथे ही परंपरा अधिक समजण्याचे भाग्य लाभले. तोवर राजस्थान विषयी फक्त ऐकलेले - वाचलेले होते की तिथे पाण्याचा आत्यंतिक तुटवडा असतो... समाज फार कष्टात दिवस काढतो... परंतु पाणी साठवणाऱ्या अश्या काही कामांना पाहून राजस्थानचे एक वेगळेच चित्र समोर उभे राहू लागले होते. जलसंग्रहाच्या ह्या अद्भूत - विलक्षण प्रकारांची काही छायाचित्रेही काढली होती.

तोपर्यंत जी काही त्रोटक माहिती एकत्र झाली होती, ती मोठ्या संकोचाने एखाद्या वेळी राजस्थानच्या काही सामाजिक संस्थांच्या समोरही मांडली, तेव्हा कळाले की त्या भागात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आपल्याच समाजाच्या ह्या कौशल्यापासून तितक्याच विलग झाल्या आहेत, जितके की आमच्यासराखे राजस्थानच्या बाहरचे लोक ... संकोच कमी झाला आणि मग मात्र जिथेजिथे - जेव्हाजेव्हा म्हणून संधी मिळाली, तेव्हा तेव्हा - तिथेतिथे ही तुटपुंजी माहिती देणे चालू झाले.

ह्या कामाचा विस्तार आणि खोली - दोन्ही समजून घेणं आमच्या आवाक्याबाहेरचे काम होते. राजस्थानभर ठिकठिकाणी हजर असलेले हे काम नव्या अभ्यासक्रमात, पुस्तकात आणि पुस्तकालयांमध्येही जवळजवळ अनुपस्थितच आहे. राजस्थानच्या 'आयाराम - गयाराम' सरकारने फार काय, अगदी नव्या सामाजिक संस्थांनी सुध्दा आपल्याच समाजाच्या ह्या विशाल कामाला जस काही विस्मृतीच्या गर्तेत ढकलून दिले होते. बस्, आता ह्या कामाची ओळख उरली आहे ती फक्त समान्य जनांच्या आठवणींत... कारण केवळ तेच ह्या स्मृतींना वेद - श्रुतींसारखे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, अत्यंक निष्ठेने सोपवीत आले आहेत. ह्या स्मृती - श्रुती आणि कृतींना आम्ही अगदीच सावकाश, अक्षरश: थेंबाथेंबानेच समजू शकलो. त्यांचे काही अधिक अंग्रप्रत्यंग दिसू लागले होते, ठळक गोष्टी लक्षात येवू लागल्या होत्या, परंतु ह्या कामाच्या आत्म्याचं दर्शन मात्र आम्हाला 8 - 9 वर्षांनंतर जैसलमेरच्या यात्रांमधून, तिथे श्री. भगवानदास माहेश्वरी - श्री. दीनदयाळ ओझा आणि श्री. जेहूसिंह भाटी यांच्या सत्संगातच होवू शकले.

पाण्याच्या प्रसंगात राजस्थानच्या समाजाने वर्षानुवर्षांच्या साधनेने, आपल्याजवळच्या उपलब्ध साधनांद्वारेच, जी उंची आणि खोली गाठली आहे, त्याची खरी खरी माहिती पुष्कळ पाऊस पडूनही तहानलेले राहून जाणाऱ्या देशाच्या काही भागांपर्यंत तरी पोहोचलीच पाहिजे. त्याबरोबरच असही वाटणं, की दुनियेतल्या अन्य वाळवंटी प्रदेशात ह्या कामाचे औचित्य आहे. मग ह्याच संबंधी आशिया आणि आफ्रिका खंडांमधल्या वाळवंटी प्रदेशांची थोडी फार माहिती गोळा केली, तसेच काही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संपर्क सुध्दा केला.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 7

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 9



Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading