राजस्थानचे रजत जलबिंदू - 11


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


इथे राजस्थानसारखा कुंडी - विहीरी - टाकी यांचा वापर निदान आज तरी दिसण्यात येत नाही.... बस्, जास्तीत जास्त पाणी विहीरीतून आणि पावसाळ्यांत सखल भागांमध्ये पाणी साचून बनणाऱ्या नैसर्गिक तलावातून मिळते.

आज जगातल्या काही शंभर एक देशात वाळवंट पसरलेली आहेत... त्यातून अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया यासारखे संपन्न मानले गेलेले देश सोडून देवू... तसेच हवे तर पेट्रोलच्यामुळे अलीकडेच अमीर बनलेल्या खाडीच्या प्रदेशांना आणि इस्त्राईललाही बाजूला ठेवू... तरीसुध्दा आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथे काही असे देश आहेत, की जिथे वाळवंटामध्ये पाण्याच्या - म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या घोर संकटाची छाया पसरलेली आहे. पटकन ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, की तिथल्या समाजाने कित्येक वर्षांपासून तिथे राहूनही पाण्यासाठी असं अजोड काम केलेले नाही आहे, जसे राजस्थानमध्ये होवू शकले. तिथले जाणकार लोक आणि संस्था तर असेच सांगतात, की त्या प्रदेशांमध्ये अशी काही व्यवस्थित परंपरा नाही. कधी असलीच, तर गुलामीच्या लांबलचक कालावधीत ती छिन्नविच्छिन्न होवून गेली असेल.

ह्या देशांमध्ये, वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत एक विराट आंतरराष्ट्रीय योजना कार्यरत आहे. याखेरीज अमेरिका, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे, हॉलंडच्या दान - अनुदान देणाऱ्या काही अर्धा डझनभर संस्था, काही अरब रूपये ह्या देशांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या कामी खर्च करत आहेत. ह्या तमाम अरबपती संस्था आपापल्या देशातून आपले विचार, आपली यंत्र - साधन - निर्माण सामग्री, विशेषज्ञ, तंत्रविज्ञान शाखेचे लोक - एवढेच काय, पण अगदी प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते सुध्दा ह्या प्रदेशांमध्ये आणतात. पाणी एकत्र करण्याच्या ह्या अश्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा एक विचित्रसा नमुना बनलाय बोत्सवाना देश.

बोत्सवाना हे आफ्रिकेच्या वाळवंटी प्रदेशात वसलेल एक गणराज्य आहे... ह्याचं क्षेत्रफळ साधारणपणे 5,61,800 चौ. कि.मी आणि लोकसंख्या सुमारे 8,70,000 आहे. ह्याची राजस्थानशी तुलना करा - ह्या राज्याचे क्षेत्रफळ पुन्हा एकदा आठवूया - ते 3,42,000 चौ. कि.मी म्हणजे बोत्सवानापेक्षा खूपच कमी, पण लोकसंख्या साधारणपणे 4 कोटीच्या आसपास, म्हणजे बोत्सवानाच्या लोकसंख्येपेक्षा पन्नास पट जास्त. बोत्सवानाचा 80 टक्के भाग कालाहारी नावाच्या रेताड प्रदेशात येतो.

राजस्थानच्या मरूभूमीच्या तुलनेत इथलं पावसाचं प्रमाण थोडं बरंच म्हणावे लागेल... इथली पावसाची सरासरी वार्षिक 45 सें.मी आहे, तर कालाहारी वाळवंटात थोडी कमी होवूनही 30 सें.मी आहे. आता पुन्हा एकदा पाहू, की थरच्या वाळवंटात ह्याचे प्रमाण 16 सें.मी पासून 25 सें.मी पर्यंत आहे. तपमानाच्या बाबतीत सुध्दा कालाहारी क्षेत्र थरच्या पेक्षा बरच म्हणावे लागेल.... तिथे अधिकतम तापमान 30 डिग्रीहून अधिक होत नाही, तर थरमध्ये हेच तापमान 50 डिग्रीपर्यंत असते.

म्हणजेच - बोस्तवानामध्ये जागा जास्त, लोक कमी... तसेच पाऊस थोडासा जास्त आणि तापमान कमी - म्हणजेच बोत्सावानाच्या समाजाला राजस्थानच्या समाजापेक्षा अधिक चांगली उदार परिस्थिती लाभलेली आहे... परंतु आज पाण्याचे संकट इथे फार मोठे आहे. पूर्वी कधी काही उन्नत परंपरा असतील, तरी आज त्याचे नामोनिशाण सुध्दा दिसत नाही. खरं तर, अश्या कुठल्याही दोन समाजांची तुलना करणे, ही काही चांगली गोष्ट नाही - परंतु जी काही माहिती उपलब्ध आहे, तिच्या आधारे असे म्हटले जावू शकते, की बोत्सवानामध्ये पाणी अधिक उपलब्ध असूनही त्याच्या साठवणीची समयसिध्द - स्वयंसिध्द परंपरा आढळून येत नाही.

बोत्सवानाची 85 टक्के जनता राजस्थानसारखीच खेड्यांमध्ये राहते. पण त्यात एक फरक आहे - आणि तो फरक पाण्याच्या अभावामुळे आहे. तिथल्या गावातले लोक वर्षभरात एका घरात नव्हे, तर तीन घरातून फिरतात. एक घर गावात, दुसरे गायरानात आणि तिसरे घर चक्क गोशाळेत... जुलैपासून ते सप्टेंबरपर्यंत लोक गावातल्या घरात राहतात, ऑक्टोबरपासून ते जानेवारीपर्यंत गायरानात आणि फेब्रुवारी ते जून गोशाळांमध्ये राहतात.

इथे राजस्थानसारखा कुंडी - विहीरी - टाकी यांचा वापर निदान आज तरी दिसण्यात येत नाही.... बस्, जास्तीत जास्त पाणी विहीरीतून आणि पावसाळ्यांत सखल भागांमध्ये पाणी साचून बनणाऱ्या नैसर्गिक तलावातून मिळते.उपलब्ध माहितीनुसार कळते, की इथे पहिल्यांदा सन 1975 ते 1981 च्या दरम्यान कॅनडामधल्या एका अनुदान - संस्थेच्या सहकार्याने, पाणी साठवणीसाठी, कुंडीवजा पध्दतीचा प्रयोग सुरू झाला होता. त्यात बडे बडे सरकारी अधिकारी, विदेशी अभियंते (इंजिनिअर), जल विशेषज्ञ वगैरे इथल्या काही गावांमधून फिरले - आणि त्यांनी खळ्यांमधून, धान्य वाळविण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या अंगणांमधून जमिनीला थोडासा उतार देवून, एका कोपऱ्यात खड्डा करून, त्यात पावसाच्या पाण्याची थोडीशी साठवण केलेली आहे.... संपूर्ण विदेशी सहकार्यातून, कुठूनतरी लांबून आणलेल्या सामग्रीतून, अशी सुमारे 10 कुंड बनवली गेलीत... प्रत्येक कुंडाचा हरतऱ्हेने हिसाब - किताब ठेवला जातोय्, फायद्या तोट्याचा बारकाईने अभ्यास होतोय. ही सगळी कुंड गोलाकार न बनवता चौकोनी बनवलेली आहेत. चौरस खड्ड्यांत जमिनीचा दाब चारही बाजूंनी पडतो, त्यामुळे जमीन धसण्याची भीती नेहमीच असते. गोल आकारापेक्षा चौरस आकारात चिणकामाचे क्षेत्रफळ जास्त असते, भले संग्रहक्षमता तेवढीच असो. त्यामुळे आता हे विशेषज्ञ मान्य करू लागलेत, की भविष्यात कुंडांचे आकार चौरसाऐवजी गोलच बनविले पाहिजेत.

ह्या प्रयोगात्मक कुंडांच्या देखभालीसाठी, गाववाल्यांना - वापर करणाऱ्या कुटुंबांना त्यांच्याच भाषेत प्रशिक्षित केले जात आहे... कुंडांमध्ये पाण्याबरोबर वाळू जावू नये यासाठीही प्रयोग चालले आहेत... एक विशिष्ट प्रकारची चाळणी लावली जात आहे - पण विशेषज्ञांचे म्हणणे आहे, की ह्यांत एकच अडचण आहे, ती (चाळणी) दरवर्षी बदलावी लागेल.... ह्या कुंडांच्या तोंडावर बसवलेल्या सिमेंटच्या झाकणांनाही तडे गेले आहेत, त्यामुळे आता त्याऐवजी गोल घुमटाकार झाकणं लावण्याची शिफारस केली गेली आहे.

ह्याचप्रकारे इथोपियामध्ये, जगभरातून काही पाच संस्था, पाण्याच्या समस्येने ग्रासलेल्या गावांमध्ये छोट्या विहीरी खणू लागल्या आहेत. ह्या क्षेत्रांमध्ये भूजल काही फारसे खोलवर नाही आहे. ह्या सगळ्या विहीरी 20 मीटर्सपेक्षा अधिक खोल नाहीत. तरीदेखील ह्या विशेषज्ञांच्या समोर एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे अश्या विहीरीचे नीट चिणकाम.... कारण माती धसते. तुलना करा राजस्थानच्या त्या साठी विहीरींशी, ज्या 60 मीटर्सपेक्षाही जास्त खोल आहेत आणि ज्यांचे चिणकाम - सरळ, उलटं आणि फांकेसारखे - न जाणे कधीपासून उपयोगी पडत आलेलं आहे.

इथोपियामध्ये ह्या विहीरींखेरीज हँडपंप सुध्दा खूप लागले आहेत. चांगले हँडपंप थेट अमेरिका - इंग्लंडमधून येतात. एका चांगल्या हँडपंपची किंमत साधारणपणे 36 ते 40 हजार रूपये पडते. सांगितले जाते की ते खूप मजबूत असतात - सारखे बिघडत नाहीत - तसेच मोजतोड कमी प्रमाणात असते... परंतु सर्व गावांमध्ये इतके महागडे पंप बसवायला सरकारकडे अगदी उधारचे पैसेसुध्दा कमी पडतात, म्हणून मग थोड्या स्वस्त हँडपंपांचा शोधही चालू आहे. अर्थात्, ते सुध्दा 20,000 पेक्षा कमी खर्चाचे नाही आहेत आणि त्यांच्यात मोडतोडही फार होते... गाव लांब लांब आहेत, येण्याजाण्यास साधन नाहीत, म्हणून आता इथे सरकार, गावांमधूनच - त्यांच्या योग्य अनुरक्षणासाठी प्रशिक्षण शिबीरं चालविण्यासाठी, जिथून हे पंप आलेत त्याच देशांकडून अनुदान मागते.

टांझानियाच्या वाळवंटात सुध्दा अश्याच प्रकारे अनेक विदेशी संस्थांनी स्वस्त आणि स्वच्छ पाण्याच्या सुविधा योजना बनवल्या आहेत. गावांचा कायद्यानुसार सर्व्हे झालेला आहे, अशी माहिती गावांतून जिल्ह्यात, जिल्ह्यांतून केंद्रात .... आणि केंद्राकडून थेट युरोपमध्ये गेलेली आहे. हवाई - चित्र घेतली गेली आहेत, तसेच नाजुक विदेशी यंत्रांद्वारे भूजल स्थिती तपासली मापली गेली आहे. तेव्हा कुठे 2000 विहीरी बनल्या आहेत. ह्या सर्व विहीरींवर, पाण्याची शुध्दता टिकून राहण्यासाठी, सरळ पाणी खेचण्याची मनाई आहे. ह्या विहीरींवर, हातपंप बसवले गेले आहेत. हातपंपांत पोरं (खेळ म्हणून) दगड - गोटे घालतात... त्यामुळे आता इथेही, हातपंपाच्या चांगल्या उपयोगासाठी, ग्राम - संमेलने आयोजित केली जात आहेत. तसेच मोडतोड - खराबीच्या तक्रारी लवकर निकालात काढण्यासाठी गाव आणि जिल्हा यांच्या दरम्यान, सूचनांच्या देवाण - घेवाणीचा नवा आराखडा बनतो आहे.

केनियाच्या रेताड भागांमध्ये घरांच्या छप्परांवरच, पावसाचे पाणी एकत्र करण्याचे प्रयोग चालू आहेत... आणि पाण्याशी संबंधीत अश्या आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये, केनियाचे सरकारी अधिकारी, अश्या कामांना जनतेच्या सहकार्याचे उत्तम उदाहरण म्हणून दाखले देत आहे.

जगाच्या वाळवंटी प्रदेशात बोत्सवाना, इथियोेपिया, टांझानिया, मलावी, केनिया, स्वाझीलंड आणि सहेल ह्या देशांना अश्याच उपायांनी स्वत:साठी पाणी एकत्र करावे लागले काय ? जर पाण्याची सगळी काम अश्या रीतीने बाहेरूनच झाली, तर ती मरूभूमीच्या ह्या अंतर्गत गावांमधून फार काळ निभाव धरू शकतील काय ? समाजाचे स्वत:चे कौशल्य, तन - मन - धन, प्रतिभा - सगळ्याच जर अनुपस्थित असेल, तर पाणी तरी किती काळपर्यंत अस्तित्व टिकवून राहील?

मरूप्रदेशांच्या ह्या चित्राची तुलना करा राजस्थानशी - जिथे समाजाने फक्त सन 1975 ते 1981 किंवा 1995 च्या दरम्यान नव्हे, तर शेकडो वर्षांपासून पाण्याच्या रूपेरी थेंबांना ठायी ठायी एकत्र करून - सांभाळून ठेवण्याची परंपरा बनवून ठेवली आहे... आणि ह्या परंपरेने काही लाख कुंड, काही लाख टाके, काही हजार छोट्या विहीरी आणि कित्येक हजार लहान - मोठे तलाव बनवले आहेत... तसेच हे सारे काम इथल्या समाजाने स्वत:च तन - मन - धन लावून केले आहे - त्यासाठी त्याने कधीही कुणपुढे हात पसरलेले नाहीत.

अश्या विवेकी, स्वावलंबी समाजाला शत शत प्रणाम !!!

संदर्भ :
कधी मरूभूमीच्या लहरत्या हाकडोच्या (सागराच्या) कोरडे होण्याची घटना, राजस्थानचे मन पलक दरियाव सारखे घेते... ही गोष्ट समय किंवा काल बोधाच्या व्यापकतेची - विशालतेची - असीमतेची आठवण ठेवल्याखेरीज समजणार नाही. ह्या कालदर्शनात, मनुष्याच्या 365 दिवसांचा एक दिव्या (दैवी) मानला गेला आहे... असे 300 दिव्य दिवस म्हणजे एक दिव्य वर्ष.... 4,800 दिव्य वर्षांचे सत्ययुग, 3600 दिव्य वर्षांचे त्रेतायुग, 2400 दिव्य वर्षांचे द्वापारयुग आणि 1200 दिव्य वर्षांचे कलीयुग मानले गेले आहे .... ह्या हिशोबाला आपल्या मानवीय वर्षांत बदलले, तर 1728000 वर्षांचे सत्ययुग 1296000 वर्षांचे त्रेतायुग, 864000 वर्षांचे द्वापारयुग आणि 432000 वर्षांचे कलीयुग असे मानले गेले आहे. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगात झाला. श्रीकृष्ण जेव्हा ह्या हाकडोच्या क्षेत्रात आले होते, तेव्हा ही मरूभूमी निर्माण झालेली होती.... म्हणजे पलक दरियाव ची घटना त्याहीपेक्षा आधी कधीतरी घडून गेलेली होती.

एक कथा तर ह्या घटनेला पार त्रेता युगापर्यंत मागे घेवून जाते. प्रसंग आहे - श्रीरामांनी लंकेवर चढाई केल्याचा - वाटेत समुद्र तर रस्ता देत नाही... सतत तीन दिवस पर्यंत उपवास करीत, पूजा करीत राहतात...पण अनुनय - विनय करूनही जेव्हा रस्ता मिळत नाही, तेव्हा श्रीराम समुद्राला सुकवून टाकण्यासाठी धनुष्यावर बाण चढवतात... समुद्र देवता प्रगट होते, क्षमा मागते.... पण मग बाण तर धनुष्याच्या दोरीवर चढलेला होता, आता त्याचे काय करायचे ? असं म्हणतात, की समुद्र देवतेच्याच सांगण्यावरून तो बाण, जिथे हाकडो होता, त्या दिशेला सोडला गेला - आणि अश्या तऱ्हेने त्रेता युगात हाकडो सुकला होता.

समुद्राच्या किनाऱ्याच्या भूमीला - किनारपट्टीला फारसी भाषेत शीख म्हणतात. आजच्या मरूभूमीचा एक भाग शोखावटी आहे. असे म्हणतात - की कधीकाळी समुद्र तिथपर्यंत पसरलेला होता.... हकीम युसुफ झुंझनवीजींच्या झूंझनूका इतिहास ह्या पुस्तकात ह्याचे विस्ताराने वर्णन आहे. जैसलमेर री ख्यात मध्येही हाकडो शब्द आलेला आहे. देवीसिंह मंडावांचे पुस्तक शार्दूलसिंह शेखावत, तसेच श्री. परमेश्वर सोळंकीचे पुस्तक मरूप्रदेशका इतिवृत्तात्मक विवेचन (पहिला खंड) ही पुस्तके सुध्दा इथल्या समुद्राच्या स्थितीबद्दल पुष्कळ माहिती पुरवतात... शिवाय ह्या भागात मिळणारे जीवाश्म हेही काही प्रमाण आहेतच... आणि याखेरीज इथल्या समाजमनावर तरंगणारी समुद्राची अनेकानेक नावे आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथा - अशी कित्येक प्रमाणे आहेत.

जुन्या डिंगल भाषेच्या विविध पर्यायवाची कोषांमध्ये समुद्राची नावे लाटांसारखीच उठतात. अध्यायामध्ये जी अकरा नावे दिली आहेत, त्यात वाचक हवे तर आणखी ही नावे जोडू शकतात -

मुद्रां कूपार अंबधि सरितापति (अख्यं),
पारावारां परठी उदधि (फिर) जळनिधि (दख्यं) ।
सिंधू सागर (नामे) जागपति जळपति (जप्पं),
रत्नाकर (फिर रटहू) खीरजधि लवण (सुपप्पं)।
(जिण धामे नामे जे जाळ जे सटमुट जाय संसार रा,
तिण पर पाजां बंधियां अे तिण नामां तार रा)।।


ही नावे कवी हरराज याने रचलेल्या डिंगल मानमालेकील आहेत. कवी नागराज पिंगल यांच्या नागराज डिंगल कोषामध्ये समुद्राच्या नावांना अश्या तऱ्हेने मोजले गेले आहे -

उदध अंब अणथाग आच उधारण अळियळ,
महण, (मीन) महरांण कमळ हिलोहळ व्याकुळ ।
बेळावळ अहिलोल वार ब्रहमंड निधूवर,
अकूपार अणथाग समंद दध सागर सायर।
अतरह अमोघ चडतब अलील बोहत अतेरूडूबवण,
(कव कवत अेह पिंगल कहै बीस नाम) सामंद (तण) ।।


कवी हमीरदान रतनु विरचित हमीर नाममालेमध्ये समुद्रनाममालेला आणखी काही आणि नवीन नावे जोडली आहेत -

मथण महण दध उदध महोदर, रेणायर सागर महरांण।।
रतनाकर अरणव लहरीरव, गौडीरव दरीआव गंभीर।
पारावर उधधिपत मछपति, अथाण समींदर अचळ अतीर।।
सोरोवर जळराट वारनिधि, पतिजळ पदमालयापित।
सरसवांन सामंद, महासर अकूपार उदभव - अम्रति।।
कवीराज मुरारिदान समुद्राची आणइक उरलीसुरली नावे समाविषट करतो -
सायर महराण स्त्रोतपत सागर दघध रतनागर मगण दधी,
समंद पयोधर बारध सिंधू नदीईसबर बानरथी।
सर दरियाव पयोनध समदर लखमीतात जळध लवणोद,
हीलोहळ जऴपती बारहर पारावर उदध पाथोद।
सरतअधीस मगरधर सरबर अरणव महाकच्छ अकुपार,
कळब्रछपता पयध मकराकर सफरीभंडार।।


अश्या रीतीने पाण्यातून निघालेल्या मरूभूमीच्या हृदयाने समुद्राची इतकी नावे आजही आठवणीत ठेवली आहेत आणि त्याबरोबरच असा विश्वासही जतन केला आहे, की इथे पुन्हा एखादा समुद्र येणार आहे -

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 7

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 9

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 10



Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading