राजस्थानचे रजत जलबिंदू - 14


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


चडस - लाव आणि बरत ह्यांच्या संबंधीची अधिकांश माहिती आम्हाला श्री. दीनदयाळ ओझा ह्यांच्याकडून मिळालेली आहे. बारियों ना समाजाकडून मिळणाऱ्या सन्मानाची माहिती श्री. नारायणसिंह परिहार ह्यांनी दिलेली आहे. त्यांचा पत्ता असा आहे - पोस्ट - भीनासर, बिकानेर. सुंडिया ची माहिती आम्हाला जैसलमेरच्या बडा बाग मध्ये काम करीत असलेल्या श्री. मघाराम यांच्याकडून मिळालेली आहे.

सारण वर चडस ओढणारे बैल किंवा उंट ह्यांच्या दमणुकीकडे सुध्दा लक्ष दिले जात होते. भूण च्या बरोबर आणखी एक छोटी चक्री जोडली जात असे, जिच्यावर एक लांब दोरा बांधलेला असे ... बैलांच्या प्रत्येक पाळीबरोबर तो दोरा गुंडाळला जाई.... पूर्ण दोरा गुंडाळला जाण्यामधून बैलांची जोडी बदलायची सूचना मिळत असे. जनावरांच्या थकण्याची सुध्दा इतकी काळजी वाहणारी ही पध्दत आता बहुतेक बंद झाली आहे. तरी देखील जुन्या शब्दकोषांमध्ये ती डोरा ह्या नावाने आढळते.

फलोदी शहराचे सेठ श्री. सांगीदास ह्यांच्या विहीरीची पहिली माहिती आम्हाला जयपूरचे श्री. रमेश थानवी ह्यांनी दिली होती... मग त्यातल्या बारकाव्यांमध्ये उतरवलं ते श्री. मुरारीलाल थानवींनी... तर त्यांचे वडील श्री. शिवरतन थानवी ह्यांनी सेठ सांगीदास आणि परिवाराचे जुने किस्से ऐकवले. थानवी कुटुंबाचा पत्ता आहे - मोची गल्ली, फलोदी, जिल्हा - जोधपूर, उत्कृष्ट गजधरांनी जी विहीर कित्येक वर्षांपूर्वी दगडांमध्ये घडवली, तिला कागदावर उतरवायला चांगल्या चांगल्या वास्तुशिल्पींनी आजही घाम फुटतो. विहीरीचा प्राथमिक नकाशा बनवण्यामध्ये आम्हाला दिल्लीचे वास्तुशिल्पी श्री. अनुकूल मिश्रजींची मदत झालेली आहे. बिकानेरच्या भव्य चौतीना ची माहिती आम्हाला श्री. शुभू पटवा आणि श्री. ओम् थानवी ह्यांच्याकडून मिळाली आहे. शहरात ह्याच्या दर्जाच्या आणखीही विहीरी आहेत... आणि त्या सर्व मागील 200- 250 वर्षांपासून गोडं पाणी देत आलेल्या आहेत. साधारणत: त्या इतक्या मोठ्या आहेत, की त्यांच्या नावावरूनच तो तो मोहल्ला ओळखला जातो.

मरूभूमीमध्ये विहीरींच्या पाण्यावर सिंचित क्षेत्रसुध्दा बरेच आहे. 17 व्या शतकातले इतिहासकार श्री. नैणसी मुहणोत ह्यांनी आपल्या कीर्दींत ठिकठिकाणच्या विहीरींच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. गावांची रेख म्हणजे सीमेवर पाण्याची स्थिती, शेती, शिंपणाची साधनं, विहीरी - तलावांची संख्या आणि पाणी कुठे किती खोलवर होतं, त्याचीसुध्दा माहिती मिळते. परगना री विगत नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये 1658 ते 1662 सालापर्यंत जोधपूर राज्याच्या वेगवेगळ्या परगण्यांची माहिती आहे. ह्या विषयावर अलिगढ विश्वविद्यालयातल्या इतिहास विभागाचे प्राध्यापक श्री. भंवर भादानी यांनी खूप काम केले आहे. आणखी काही माहिती श्री. मनोहरसिंह राणावत यांचे पुस्तक इतिहासकार मुहणोत नैणसी और उनके इतिहास ग्रंथ - प्रकाशक- राजस्थान साहित्य मंदिर, सोजती दरवाजा, जोधपूर ह्यामधून मिळू शकते.

विहीरींच्या जगतीवर (कठड्यांवर) बऱ्याचदा काष्ठ म्हणजे लाकडाचं बनवलेलं एक भांडं असतं, त्याला काठडी म्हणतात. काठडी बनवून विहीरीवर ठेवणं हे मोठं पुण्यकर्म मानलं जातं, आणि ही काठडी चोकणं किंवा तोडफोड करणं म्हणजे महत्पाप समजलं जातं. पाप आणि पुण्याची ही अलिखित व्याख्या समाजमनावर कोरलेली आहे. कुटुंबात काही चांगली घटना वा मंगलकार्य असलं, की कुटुंबप्रमुख काठडी बनवून घेवून विहीरीवर ठेवू येतात. मग ती कितीक वर्ष तिथेच ठेवलेली असते. हे लाकडी भांडं कधीतरी चुकून विहीरीत पडलं, तरी बुडत नाही - ते पुन्हा वर काढून वापारलं जातं. ह्या काष्ठापात्रांत जातीपातीची स्पृष्य - अस्पृश्यता सुध्दा वरच्या वरच राहते.

शहरातल्या कुलर्स वर साखळीने बांधून ठेवलेल्या, दीडदमडीच्या कचकड्याच्या ग्लासाशीं ह्याची तुलना करून बघा बरं जरा.

आपल्या तन मन धनाचं साधन :


राज्स्थानांत, विशेषत: वाळवंटी भागात, समाजाने पाण्याच्या ह्या कामाला - अभिमानानं एक आव्हान म्हणून नव्हे, तर खरोखरच विनम्रपणे एक कर्तव्य म्हणूनच उचललं होतं - पेललं होतं. ह्याचं साकार रूप आपल्याला कुईं, कुएं, टांके, कुंडी, तलाव यामध्ये पाहायला मिळतं... परंतु ह्याखेरीज त्या कामाचं एक निराकार रूप सुध्दा आहे... हे निराकार रूप दगड विटांचं नाहीये, तर ते आहे स्नेहाचं आणि प्रेमाचं - पाण्याच्या मितव्ययाचं म्हणजे काटकसरीचं. हे निराकार रूप समाजाच्या मनाच्या आगौर मध्ये बनवलं गेलं. जिथे मन तयार झालं, तिथे मग समाजाचं तन आणि धनसुध्दा एकवटत राहिलं. त्याच्यासाठी मग फार प्रयास नाही करावे लागले... ते विनासायास होत राहिले. राजस्थानच्या पाण्याच्या कार्याला समजून घेण्यासाठी आम्हाला त्याच्या साकार रूपाच्या उपासकांची जशी मदत मिळाली, तशी त्याच्या निराकार रूपाच्या पुजाऱ्यांची सुध्दा मदत मिळाली.

बोत्सवाना, इथोपिया, टांझानिया, केनिया, मलावी इ. देशात आज पिण्याचे पाणी मिळवायचे जे प्रयत्न होत आहेत, त्यांची माहिती, मलावी देशात जोग्या ह्या शहरी 1980 साली झालेल्या एका संमेलनाच्या रिपोर्टवरून आम्हाला मिळाली. रिपोर्ट तसा जरा जुमाच झालाय. पण आज तिथे परिस्थिती थोडी सुधारली असेल, असं मात्र वाटत नाही. प्रगती झालीच असेल, तर ती अगदी चुकीच्या दिशेने. मलावी सरकारने, कॅनडाच्या दोन संस्थांशी मिळून, त्या संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. त्या संस्था अश्या आहे - इंटरनॅशनल डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर आणि कॅनेडीयन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी.

सुमारे 100 देशांमध्ये असलेल्या वाळवंटी भागांमध्ये पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी जे प्रयास झाले, त्याची थोडी झलक आम्हाला, अमेरिकेत वॉशिंग्टन शहरात असलेल्या नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस तर्फे सन 1974 मध्ये छापलेल्या, मोअर वॉटर फॉर एरिड लँडस् - प्रॉमिसिंग टेक्नॉलॉजीस् आँड रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज ह्या पुस्तकात मिळाली. त्यामध्ये नेगेव्ह मरूप्रदेशात (हा आताच्या इस्त्राईलमध्ये आहे) पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या, 1000-2000 वर्षांपूर्वीच्या भव्य पध्दतींचे उल्लेख अवश्य आढळतात - परंतु आज त्यांची अवस्था काय आहे, ह्याविषयी नीट माहिती मिळू शकत नाही. आज तर तिथे कॉम्प्युटर ने शेती आणि ठिबक सिंचन ह्या गोष्टींचा एवढा जोर आहे, की आपल्या देशाचे राजस्थान - गुजराथ पासूनचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते त्यापासून काही शिकण्यासाठी आणि ते आपल्याकडे आणण्यासाठी इस्त्राईलकडे धाव घेत आहेत.

अश्या पुस्तकात प्लास्टीकच्या चादरींचा आगौर बनवून पावसाचं पाणी अडवायच्या पध्दतींचा मोठ्या उत्साहाने केलेलं विवरण आढळतं. कुठे कुठे जमिनीवर मेण पसरवण्या सारख्या प्रकारांना प्लास्टीकपेक्षा स्वस्त आणि मस्त सुध्दा म्हटलं जात आहे.

उत्तम पध्दती त्या भागामध्ये नाहीतच, असं म्हणणं जरा धाडसाचंच वाटतं. एक पध्दत अवश्य आढळते - ती म्हणजे उभ्यांऐवजी आडव्या विहीरी ह्या इराण, इराक इ. भागात बनत आल्या आहेत... त्यांना क्वंटा असं म्हणतात. .. ह्या प्रकारांत एखाद्या डोंगराच्या उतारावरच्या तिरकस भूजलपट्टीच्या पाण्याला, आडवं खोदकाम करून, अडवून एकत्र केलं जातं.

राजस्थानात ह्या सगळ्या प्रकाराची कामं आपल्या श्रमांनी आणि आपल्या साधनांनी झालेली आहेत - आणि समाजाला त्याचं फळदेखील मिळालेलं आहे.

सिमेंटच्या ऐवजी इथे सगळं काम गाऱ्या चुन्याने केलं जातं. दोन्हीची तुलना करून पाहू - चुन्याच्या कामाला तराई म्हणजे पाणी शिंपण्याची गरज नसते. सिमेंटला मात्र ते लावण्यावर 12 तासांनी - निदान पुढचे कमीत कमी 4 दिवस तरी त्यावर पाणी शिंपावं लागतं... सात दिवसांपर्यंत असं भिजवणं झालं तर आणखी उत्तम.. पण जर का तराई मिळाली नाही, म्हणजे पाण्याने ते ओलं राखलं गेलं नाही, तर सिमेंटचं बांधकाम - चिणकाम फुटायला लागतं, त्यांच्यात भेगा पडायला लागतात.

खरं तर चुना आणि सिमेंट - दोन्ही एकाच प्रकारच्या दगडातून बनतात. परंतु त्यांच्या बनवण्याच्या पध्दतींमुळे त्यांचा स्वभावधर्मही वेगळा वेगळा होतो... सिमेंट बनवण्यासाठी यंत्राद्वारे आधी त्या दगडाचं अतिशय बारीक पीठ केलं जातं आणि नंतर त्यामध्ये विशिष्ट प्रकारची वाळूदार मातीसुध्दा मिसळली जाते... परंतु गारा - चुना बनवण्यासाठी मग थंड केले जातात - आणि नंतर त्यात रेती आणि बजरी एकत्र करून मगच घिरट किंवा गिरणीमध्ये ते दळून काढले जातात.

ह्या एकाच प्रकारच्या दगडावर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया पध्दती त्याच्या गुणधर्माला सुध्दा बदलून टाकतात.

सिमेंट पाण्यात मिसळल्याबरोबर घट्ट व्हायला लागतं. ह्याला इंग्रजीत सेटिंग टाईम म्हणतात... हा वेळ साधारण अर्धा ते एक तासापर्यंत इतका मानला जातो... ही प्रक्रिया 2 ते 3 वर्षांपर्यंतच्या सवधीत चालू राहते.. त्यानंतर सिमेंटची ताकद कमी व्हायला लागते... घट्ट होण्याच्या - मिळून जाण्याच्या बरोबरीनेच सिमेंट आक्रसायलाही सुरूवात होते... पुस्तकात हा वेळ 30 दिवसांचा एवढा सांगितला आहे.. पण प्रत्यक्षात व्यवहारात आणणारे मात्र हा वेळ 3 दिवसां इतका मानतात... व्यवस्थितपणे आक्रसून, घट्ट होवून मग सिमेंट पुस्तकी हिशोबाने 40 वर्षांपर्यंत आणि व्यवहाराच्या हिशोबाने जास्तीत जास्त 100 वर्षांपर्यंत टिकतं.

पण चुन्याच्या स्वभावात खूप धीमेपणा आहे. पाण्यात मिसळल्यावर तो सिमेंट सारखा गोळा व्हायला लागत नाही... गाऱ्यामध्येच तो 1-2 दिवस तसाच राहातो... मिसळण्याची आणि घट्ट होण्याची प्रारंभिक प्रक्रिया 2 दिवसांपासून ते 10 दिवस पर्यंत चालते... त्या काळात त्यांच्यात भेगा पडत नाहीत, कारण तो मिळून येत असतांना आक्रसत नाही - तर प्रसरण पावतो, पसरतो... त्यामुळेच मिळून येण्याच्या वेळी ह्याला सिमेंटप्रमाणे भिजवून ठेवावे लागत नाही... ह्या दरम्यान हा प्रसरण पावतो, त्यामुळे त्याच्यांत वाळवी सुध्दा जावू शकत नाही... दिवसांगणिक तो घट्ट - मजबूत होत जातो आणि त्याला एक झिलई - चमक येवू लागते... नीट सांभाळणूक असेल, तर त्याचा मिळून येण्याचा - जमण्या चा अवधी 2-4 वर्ष नव्हे, 200 ते 600 वर्ष एवढा मोठा असतो. तोपर्यंत सिमेंटच्या 5 - 6 पिढ्या कोसळून गेलेल्या असतात.

एक आणखी फरक आहे दोघांच्यात - चुन्याचं बांधकाम पाणी झिरपण्याची शक्यता ठेवीत नाही आणि सिमेंट पाण्याचं झिरपणं थांबवू शकत नाही... हरएक शहरांमधली चांगल्यातली चांगली घरं - इमारती यांच्या भिंती - टाक्या ही गोष्ट जोरांत सांगतांना दिसतात.

ह्याच मुळे चुन्याने बांधलेल्या टाक्यांमधून पाणी झिरपत नाही. असे टांके, कुंड, तलाव 200- 300 वर्षांपर्यंत ऐटीत माथा उंच केलेले आढळतील.

समाज आणि राष्ट्राच्या निर्मितीत गाऱ्या चुन्याचं, त्याच्या कामाच्या सूक्ष्म शास्त्राला जाणणाऱ्या चुनेकऱ्यांचं, आपल्या तन - मन - धनाच्या साधनांनी साधणाऱ्यांचं आजही एक स्थान आहे.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 7

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 9

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 10

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 11

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 12

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 13



Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading