महिला आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे दोन अविभाज्य घटक आहेत. पाण्यासंबंधी समग्र विचार करावयाचा असेल तर तो महिलांना सोडून करता येणार नाही. पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने पाणी वापरून पाण्याची बचत करण्याच्या कामात महिलांचा सक्रिय सहभाग आणि वाटा मोठा असणार आहे.
महिला आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे दोन अविभाज्य घटक आहेत. पाण्यासंबंधी समग्र विचार करावयाचा असेल तर तो महिलांना सोडून करता येणार नाही. पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने पाणी वापरून पाण्याची बचत करण्याच्या कामात महिलांचा सक्रिय सहभाग आणि वाटा मोठा असणार आहे. यासाठी पाण्याच्या संदर्भात महिलांचा विचार प्राधान्याने केल्यानेच पाण्यासंबंधीचा विचार परिपूर्ण होणार आहे.
पाण्याच्या संदर्भात 1992 मध्ये डब्लिन येथे आयोजित परिषदेत काही मूलभूत विचार मांडण्यात आले. पाणी हे जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे आणि अत्यावश्यक संसाधन आहे. पाण्याचा वापर, पाण्याचे नियोजन, पाण्यासंबंधी निती ठरविण्यात ज्यांचे उत्तरदायित्व आहे त्यांचा पाण्याच्या विकासात आणि व्यवस्थापनात सक्रिय सहभाग असावा. पाण्याची उपलब्धता करून देण्याच्या कामी, जलव्यवस्थापनात व जलसंधारणात स्त्रियांचे स्थान आणि भूमिका महत्वाची आहे. पाणी एक वस्तू असून या वस्तूला आर्थिक मूल्य आहे. ही महत्वाची चार तत्वे आहेत. म्हणून ती स्वीकारण्यात आली आहेत. डब्लिन परिषदेने पाण्याच्या संदर्भात स्त्रियांचे महत्वाचे स्थान आणि भूमिका अधोरेखित केली आहे, हे लक्षात घेवून पाण्याच्या सर्वकष व्यवस्थापनात महिलांचा विचार प्राधान्याने करणे क्रमप्राप्त ठरते.
हेग येथील आयोजित परिषदेमध्ये जे ठराव घेतले गेले त्यात अनेक कलमे महिलांना पाण्याशी संबंधित व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यासंबंधी आहेत. पाण्यासंबंधी व्यवस्थापनात हेग परिषदेनेही स्त्रियांचे स्थान महात्म्य अधोरेखित केले आहे.
घराघरात होणाऱ्या पाण्याच्या कौटुंबिक वापरामध्ये आणि शेतातील पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या वापरामध्ये मुख्यत: जबाबदारी महिलांची होती आणि आजही आहे. शतकानुशकतापासून मानवी समाजाचे पाण्याशी जे सांस्कृतिक नाते आहे त्याचा सांभाळ आणि कुशलतापूर्वक जपवणूक हे काम महिलांच्या माध्यमातून समर्थपणे होत आले आहे. भविष्यातही याच पध्दतीने होणार आहे. पाण्याच्या वाढत्या दुर्भिक्षाच्या परिस्थितीत पाण्याचे अपव्यय टाळून पाण्याच्या संवर्धन, संरक्षण आणि जलप्रदुषण नियंत्रण या बाबतीत तर पाण्याच्या व्यवस्थापनातील ग्रामीण आणि शहरी महिलांचा सहभाग सद्यस्थितीत आणि यापुढील काळात अतिशय महत्वाचा असणार आहे. पाणी हा महिलांच्या रोजच्या जीवनातील आणि जगण्यातील एक जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे भारतीय महिलांचे पाण्याशी अतूट नाते निर्माण झाले आहे.
पाणी आणि महिला यांचा अन्योेन्य संबंध लक्षात घेता सद्यस्थितीत आणि यापुढेही लोकांना पाणी या संकल्पनेशी जोडून घेण्यासाठी प्रथम पाणी चळवळीत महिलांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि नागरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विविध पदांवर काम करणाऱ्या महिलांवर जलव्यवस्थापनाची जबाबदारी टाकल्यास ही जबाबदारी त्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. तसेच शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य, समाजस्वास्थ्य, प्रबोधन, महिलांचे प्रश्न, पिडीत महिलांना कायदे विषयक सल्ला, आत्मसंरक्षण, स्त्रीभूण हत्या, हुंडा प्रथा, विधवा, परित्यक्ता, कुमारी माता, बचत गट यांचे प्रश्न आदी अनेक क्षेत्रात महिलांच्या संस्था, संघटना - मंडळ - मंच चांगले काम करीत आहेत. पाण्याच्या क्षेत्रात पाण्याची साठवण, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय टाळून पाण्याचा काटकसरीने वापर या संदर्भात महिला लोकांचे प्रबोधन त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. मात्र पाणी क्षेत्रातील त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडता यावी यासाठी त्यांना जलव्यवस्थापनाचे शास्त्रशुध्द शिक्षण देवून प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षित महिला आपआपल्या कुटुंबातील आणि समाजातील लोकांच्या पाणी वापराच्या खर्चिक सवयींमध्ये अपेक्षित बदल घडवून आणू शकतील. पाणी वापराबाबत कुटुंबातील लहान मुलांचा डोळस दृष्टीकोन विकसित करू शकतील. त्यांच्यात ही क्षमता आहे. त्यांना सक्षम केले पाहिजे. स्त्रीच्या सूप्त शक्तीला आपण जाणले पाहिजे. 'नारी के बिना हर बदलाव अधुरा है' हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे म्हणणे होते आणि ते रास्तही आहे. पाण्याच्या व्यवस्थापनात म्हणूनच स्त्रियांच्या एकूणच सहभागाला अनन्य साधारण महत्व आहे.
पंचायत राज व्यवस्थेत (ग्रामपंचायत, पंचायत, नगरपालिका) अशा स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांनीही पुरूषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून या संस्थांच्या प्रशासनात आणि जनतेच्या कल्याणासाठी विकास विषयक उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे व आपली क्षमता सिध्द करावी हा त्यांना आरक्षण देण्यामागचा मुख्य उद्देश आहे. परंतु काही ठिकाणी वास्तव काही वेगळेच आढळते. पुरूषप्रधान संस्कृतीत पुरूषी प्राबल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या महिला सदस्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे पतीच आपल्या पत्नी ऐवजी स्वत:च प्रशासनात ढवळाढवळ करण्यात अग्रेसर असतात. पत्नीच्या पतिपरायणतेचा आणि पती हाच परमेश्वर या त्यांच्या मानसिकतेचा त्यांचे पती गैरवाजवी फायदा घेतात. हा प्रश्न मानसिकतेशी निगडित आहे.
या हीन मानसिकतेचा जर बिमोड करावयाचा असेल तर 'पतीराज संस्कृती' समूळ नष्ट केली पाहिजे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी हरकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे सर्वेसर्वा मुख्य पदाधिकारी असतील आणि जे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी पतीराज संस्कृती संपविण्याचे उत्तरदायित्व खंबीरपणे पार पाडणे आवश्यक आहे. कुटुंबातील स्वयंपाक, धुणीभांडी आणि साफसफाई या मुख्य कामाबरोबरच पाण्याचे व्यवस्थापन करणे हे ही कुटुंबातील महिलांचे मुख्य आणि महत्वाचे काम आहे. महिलांची ही जबाबदारी सर्व कालीन आहे. एवढेच नाही तर पाणी हा विषय सर्व प्रकारच्या प्रगत - अप्रगत समाजांमध्ये आणि सर्व समाजघटकांत निर्णायक राहिला आहे.
कौटुंबिक वापरासाठी पाणी भरण्याच्या संदर्भात महिलांचा विचार करतांना त्यांना किती कमी अधिक कष्ट उपसावे लागतात या पध्दतीने करावा लागेल. तसा करावयाचा झाल्यास तो नागरी - ग्रामीण आणि दुर्गम भाग यात रहाणाऱ्या महिलांच्या बाबतीत वेगवेगळा करावा लागेल. शहरात बहुतांश वस्त्यांमध्ये घराघरात नळाने पाणी उपलब्ध होत असल्यामुळे पाणी भरणे महिलांना अल्पश्रमात सहज शक्य झाले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये जेथे नळ जोडणी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तेथे सार्वजनिक नळांवरून घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. पाणी टंचाईच्या काळात अशा वस्त्या - वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या कामासाठी महिलांना काही अंतराची पायपीट करावी लागते आणि पाण्याचे घडे डोक्यावरून वाहून न्यावे लागतात. हे काम महिलांच्या दृष्टीने कष्टप्रद ठरते.
नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांच्या दृष्टीने पाणी भरण्याचे काम अतिशय कष्टप्रद असते. अलिकडील काही वर्षात भूजलाच्या प्रचंड उपश्यामुळे भूजल पातळी बरीच खोलवर गेली असल्यामुळे साहजिकच विहीरींची पातळी खोलवर गेली आहे. अशा खोलवर जलपातळी असलेल्या विहीरींचे पाणी शेंदून पाण्याने भरलेले हंडे एकावर एक ठेवून घड्यांच्या, मानेचा आणि शरिराचा तोल सांभाळत जीवघेणी कसरत करत महिलांना पायपीट करीत पाणी भरावे लागते. प्रसंगी पोटात गर्भ किंवा कडेवर मूल असले तरी महिलांची पाणी भरण्याच्या कामातून सुटका होत नाही. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या काळात तर महिलांवर रानोमाळ पाण्याच्या शोधात भटकावे लागते. काही ठिकाणी तर कोरड्या नदीपात्रात पाण्यासाठी माती उकरून झऱ्यात येणारे पाणी वाटीने उपसून घड्यात भरावे लागते. हे संथपणे चालणारे वेळखाऊ काम असते. काहीवेळा तर पाण्यासाठी रोजगार बुडवावा लागतो. पाणी की रोजगार अशा द्वंद्वाला महिलांना सामोरे जावे लागते. या दोन पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय निवडला तर एका पर्यायाचे नुकसान होते.
वस्तीतील सार्वजनिक नळांवरून किंवा वस्तीत टँकर आला तर पाण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात. पाणी भरण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची संख्या जास्त असते. वस्तीत टँकर येण्याच्या वेळा निश्चित नसल्यास लोक पाण्यासाठी एकामागे एक अशी पाणी भरण्याची भांडी ठेवून आपला नंबर निश्चित करून आपल्याआपल्या उद्योगाला लागतात. टँकर आल्यावर पाण्यासाठी हजर होतात. पाण्यासाठी लोकांची झुंबड उडते. रेटारेटी होते. धक्काबुक्की होते आणि भांडणे होतात. काही काळ ताण - तणाव येतो. सामाजिक असंतोष निर्माण होतो आणि नंतर सारे सुरळीत होते. या गोष्टी नित्याच्याच असल्यामुळे त्या दैनंदिन जीवनाच्या त्या एक भाग बनतात. लोकांना अशा गोष्टींची सवय झालेली असते. या भांडणावर काही उपाय नसतो. आणि अशा भांडणांना अंतही नसतो. लोकांना पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. विनाकारण वेळ खर्ची पडतो आणि भांडणांना समोरेही जावे लागते. महिलांच्या दृष्टीने तर हे काम कंटाळवाणे आणि ताणतणावाचे ठरते.
सततच्या पाणी वाहून आणण्याच्या कष्टप्रद कामामुळे महिलांच्या आरोग्याला हानी पोहचल्याची नोंद वैद्यकीय संशोधनामध्ये घेतली गेली आहे. दूरवरून पाणी आणण्याच्या कामामध्ये महिलांचा वेळ तर खर्ची पडतोच पण पाणी भरण्याच्या सततच्या ताणामुळे आणि डोक्यावरून पाणी वाहून आणावे लागत असल्यामुळे महिलांच्या डोक्यावरचे केस गळतात. मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांचे आजार जडतात. पाठीला बाक येतो. सांधेदुखी निर्माण होते. पायावर ताण पडून पाय दुखू लागतात. हातांचा सतत पाण्याशी संबंध येत असल्यामुळे पंजाच्या बोटांमध्ये चिखल्या निर्माण होतात. ओटीपोटाचे विकार होतात. शारीरिक व्यंग निर्माण होते. प्रसंगी गर्भवती स्त्रियांचे गर्भपात होतात. शेतात महिला चिखलात काम करतात. पिकांना पाणी त्यांना द्यावे लागते. भात लागवडीसाठी पाण्याशी त्यांचा संबंध येतो. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. प्रदूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसार, कॉलरा, कॅन्सर, विषमज्वर, कावीळ असे रोग होवू शकतात.
पाणी टंचाईच्या काळात किंवा पाण्याच्या दुर्भिक्षांच्या दुष्काळाच्या काळात शारीरिक स्वच्छता, कपडे धुणे यासाठी पाणी उपलब्ध नसते. यातूनच डोक्यात कोंडा, ऊवा होणे, त्वचारोग होणे, अंगाची दुर्गंधी येणे या समस्या निर्माण होतात. दिवसा उजेडी मलमूत्र विसर्जनासाठी उघड्यावर जाणे महिलांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्या अंधाराची वाट पाहतात. मलमूत्र विसर्जनाचा नैसर्गिक आवेग रोखून धरल्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरते.
पाणी प्रश्नाबाबत स्वेच्छेने जनतेचे प्रबोधन करू इच्छिणाऱ्या महिला संस्थांनी, संघटनांनी - मंडळांनी - मंचांनी सांघिक आणि वैयक्तिकरित्या आपआपल्या परिसरातील गृहसंकुलांच्या, गृहनिर्माण संस्थांच्या, इतर संस्थांच्या आणि शाळांच्या परिसरातील पाण्याचा होणारा अपव्यय, गैरवापर, गळक्या आणि फुटक्या टाक्या, जलवाहिन्यांतून वाहणारे पाणी मलजल, पाण्याची स्वच्छता, पाण्याचा काळजीपूर्वक वापर आणि सांभाळ करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन किंवा प्रबोधन करण्यासाठी अग्रेसर असले पाहिजे. पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची वरील कार्याची जबाबदारी आहे असे समजून कामांचा भार त्यांच्यावर टाकून स्वस्थ बसता येणार नाही. समाजाचे आपण काही देणे लागतो या जाणिवेने सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी कटीबध्द असले पाहिजे.
घरात शौचालये नसल्यामुळे अशा घरात राहणाऱ्या कुटुंबात सून म्हणून जाण्यास काही नवपरिणीतांनी नकार दिल्याच्या घटना देशात घडल्या आहेत. त्या आल्या पावली सासरहून माहेरी परतल्या आहेत. नैसर्गिक आवेगाला वाट करून देण्यासाठी उघड्यावर जाणे त्यांना प्रतिष्ठेच्या दृष्टीने असुरक्षित वाटते हे याचे कारण आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून एकापेक्षा एक कठीण असे दुष्काळ पडत आहेत. अशा दुष्काळामुळे जनता होरपळली आहे. वर्षागणिक अवर्षणप्रवण क्षेत्र वाढते आहे. अशा खडतर परिस्थितीत डोक्यावरून पाण्याचे घडे भरून पायपीट करीत लांबवरून पाणी वाहून आणावे लागेल या भयापोटी नवतरूणी सून म्हणून अवर्षणप्रवण क्षेत्रातील कुटुंबात सून म्हणून जाण्यास कितपत तयार होतील ही शंका आहे. केवळ पाण्याच्या दुर्भिक्षाचाच प्रश्न नाहीये. तर या प्रश्नाच्या जोडीला देशातील अस्वच्छतेचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे आणि जटीलही आहे.
जगाच्या पाठीवरील सर्व देशांमध्ये भारत अस्वच्छ देश म्हणून ओळखला जातो. यामुळे भारताची प्रतिमा मलीन झाली आहे. पाण्याच्या स्वच्छतेशी स्वच्छतेचा जवळचा संबंध आहे. पाणी स्वच्छ राखण्यासाठी घर, परिसर आणि पाणवठ्यांचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आपल्या लाडक्या कन्यांनी विवाहानंतर डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहिलेले आणि रोखून धरलेल्या नैसर्गिक आवेगाला वाट करून देण्यासाठी प्रतिष्ठेच्या दृष्टीने असुरक्षित असलेल्या उघड्या जागावर गेलेले त्यांच्या पालकांना प्रशस्त वाट नाही आणि ते स्वाभाविकही आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अनेक महिला पदाधिकारी आणि सदस्य म्हणून प्रभावीपणे कामे करीत आहेत. आपल्याच माता - भगिनींना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये आणि उघड्यावर जावे लागू नये यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा करून वरील दोन जटील प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर येवून पडली आहे. हे उत्तरदायित्व त्यांनी पार पाडावे अशी अवघडलेल्या महिलांची सहाजिकच अपेक्षा आहे.
मंत्र - तंत्रज्ञानात व्यापक बदल झालेले आहेत आणि बदलाची प्रक्रिया निरंतर चालू आहे. श्रम वाचविणारी अनेक साधने (Labour saving devices) घराघरात उपलब्ध आहेत. यामुळे पूर्वीच्या तुलनेत कुटुंबातील स्त्रियांवरील कामाचा बोझा हलका झाला आहे. विशेषत: दळण - कांडण - वाटण, पाणी भरणे आदी कामे पूर्वीच्या तुलनेत आता अल्प श्रमात होवू लागले आहेत. परंतु श्रम हलके झाले असले तरी अशी साधने महिलांनाच हाताळावी लागतात. नळ आल्यामुळे शेंदून पाणी भरून वाहून आणण्याचे खडतर श्रम कमी झाले तरी नळावरून पाणी भरणे आणि पाण्याची व्यवस्था करणे या कामातून महिलांची सुटका झाली नाही.
काळाच्या ओघात समाजात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत आणि नित्यही होत आहेत. कुटुंबाच्या जडणघडणीत आणि कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेतही बदल झाले आहेत. पण जलव्यवस्थापनेसह गृहव्यवस्थापनाची जबाबदारी अद्यापही महिलांच्या कडेच प्रामुख्याने आहे. महिला अशिक्षित असोत वा सुुशिक्षित आणि नोकरी करणारी असो वा गृहिणी त्यांच्या भूमिकेत फारसा मुलभूत असा फरक पडलेला नाही. महिला जे अपार कष्ट आपल्या कुटुंबियांसाठी उपसतात त्याबाबत त्यांची तक्रार नसते. कारण त्यांची बांधिलकी त्यांच्या कुटुंबाशी असते. घरातील कामे करतांना त्यांना शीण आला तरी त्यांना कृतकृत्य वाटते. ही कामे त्यांनी आपल्या जिवलगांसाठी - आप्तांसाठी केलेली असतात. महिला जात्याच सोशिक असतात. कोटुंबिक पातळीवर महिलांचा हा सुखद अविष्कार कुटुंबियांच्या अनुभवास येतो आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव, तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंत महिलांना निवडणूकीत 50 टक्के आरक्षण दिले आहे. महिला निवडणीकीनंतर विविध पदावरून जबाबदारीने काम करीत आहेत. त्यांच्या जाणीवा विकसित झाल्या आहेत. अशा महिलांना पध्दतशीरपणे शिक्षण - प्रशिक्षण देवून प्रशिक्षित केले आणि विकासाच्या रचनात्मक उपक्रमात त्यांना सामील करून घेतले तर त्यांच्या जाणीवा अधिक विकसित होतील. कुटुंबात त्या जशा सर्व प्रकारच्या कामांचे व्यवस्थापन कुशलतेने करतात तश्या त्या अशा संस्थांमधूनही कार्यक्षमतेने कामे करू शकतील. यातूनच त्यांना अपेक्षित बदल घडवून आणण्याच्या प्रेरणा मिळतील आणि भविष्यातील संपन्न समाज निर्मितीचा पाया घातला जाईल. असा संपन्न समाज घडलेला भावी पिढीला याची देही याची डोळा पहाता यावे यासाठी आत्तापासून आपली पावले त्या दिशेने पडायला हवीत आणि अखंडपणे पडायला हवीत. आपल्याला पाण्यासह पर्यावरणीय दोलायमानता संपवयाची आहे. यातूनच साकारायचे आहे, स्थायी विकासाचे उद्दिष्ट्य. हे जर खरोखरच आपण केले तर आपल्या भावी पिढीने त्यांच्या भावी पिढीच्या हातात कशा प्रकारचा भारत सोपवायचा आहे, ते सांगण्याची गरज असणार नाही.
डॉ. बा.ल. जोशी, औरंगाबाद - मो : 9421380466