जिथे नदीला हळदी - कुंकू, बांगड्या, साडी - चोळी वाहण्याची आणि खणा - नारळाने तिची ओटी वाहण्याची प्रथा आहे, त्या देशातील केवळ पाच टक्के नद्या सुस्थितीत आहेत.... उज्जैनला क्षिप्रा नदीच्या काठी कुंभमेळा भरतो, पण त्यासाठी तिच्या कोरड्या पात्रात नर्मदेचे पाणी आणून सोडावे लागते.... प्राचीन समृध्दी संस्कृतीला जन्म देणारी सिंधूसारखी नदी आता समुद्रापर्यंत पोहोचत नाही…
ज्या भूमीत नद्यांना देवता मानले गेले, तिथली ही उदाहरणे मन विषण्ण करणारी आहेत. ' देवता ते शोषण करावयाची भोगवस्तू ' हा भारतभूमीत (काही प्रमाणात इतरत्रसुध्दा) झालेला नद्यांचा प्रवास. तो समजून घेण्यासाठी डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांचे 'शुष्क नद्यांचे आक्रोश ' हे पुस्तक वाचावे लागेल. नद्यांची आजची स्थिती काय आहे हे अनेक अहवाल, सर्वेक्षणे, त्यावर आधारित पुस्तके, माहितीपट यावरून कळू शकेल. किंवा चार नद्यांच्या पात्रात प्रत्यक्ष गेले तरी त्याचा अंदाज येईल. मात्र, हा प्रवास होण्याची कारणे, त्यामागची ऐतिहासिक - सांस्कृतिक - राजकीय पार्श्वभूमी आणि जगावर राज्य करणाऱ्यांचे बदलत गेलेले तत्वज्ञान या गोष्टी मांडण्याचा उत्तम प्रयत्न मोरवंचीकर यांनी या पुस्तकात केला आहे. त्यामुळे नद्यांच्या आणि एकूणच पर्यावरणाच्या सध्याच्या ढासळलेल्या परिस्थितीची कारणे समजून घ्यायला नक्कीच मदत होते. काही प्रश्न अनुत्तरित राहतात हे खरे, पण एखादी स्थिती उद्भवण्याच्या मुळाशी किती व्यापक घटक कार्यरत असू शकतात, याचा अंदाज हे पुस्तक वाचतांना येतो.
डॉ. मोरवंचीकर हे इतिहासाचे प्रसिध्द अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. प्राचीन जलसंस्कृतीच्या क्षेत्रातील ते प्रसिध्द तज्ज्ञ. यासंबंधी ' भारतीय जलसंस्कृती : स्वरूप व व्याप्ती' यासह एकूण तीस ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. संस्कृतीमध्ये झालेल्या बदलांच्या अंगाने त्यांनी नद्यांची सध्यस्थितीची मांडणी केली आहे.
साधारणत: 350 पानांच्या या पुस्तकाची विभागणी - शोध नद्यांचा, शोध नदी संस्कृतीचा आणि शोध वास्तवाचा या तीन भागांमध्ये करण्यात आली आहे. नद्यांचे तीन प्रमुख टप्पे - उदय, विकास आणि ऱ्हास या पुस्तकात मांडले आहेत. अर्थातच सध्या आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत. कोणत्याही देशाच्या विकासावर तिथल्या भूगोलाचा प्रभाव असतो. भारतावर प्रभाव पडला आहे तो मोसमी पावसाचा. कुलधर्म, कुलाचार, सण - समारंभ, आहार विहार, आचार वितार, वस्त्र - प्रावरणे यावरही त्याचा कसा प्रभाव पडला आहे, असे हे पुस्तक सांगते. त्यातून नद्यांची निर्मिती - विकास झाला. भारताबद्दल सांगायचे तर आपली संस्कृती नदीमातृक अर्थात जलकेंद्रीत होती. शेतीसाठी नदीच्या पाण्याचा उपयोग केला जाई, पण पाणी आणि नदी या गोष्टी केंद्रस्थानी असल्याने या व्यवस्थांवर कधीच ताण पडला नाही. त्यांचे शोषण झाले नाही. त्याला एक पूरक परिस्थिती म्हणजे - लोकसंख्यासुध्दा मर्यादित होती. अगदी इसविसन पूर्व 3000 वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीपासून ते इसविसन 1300 पर्यंत (चोल राजवट) अशीच स्थिती होती. त्यामुळे दुष्काळ, पूर, पावसातील चढउतार यासारख्या समस्या आल्या तरी नदी आणि माणूस यांच्यातील नाते टिकून होते.
भारतीय संस्कृतीतील पाणी, निसर्गप्रति असलेले हे नाते मोडीत निघाल्याचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याशी संबंध नसलेल्या राजवटींनी भारतावर केलेले राज्य. असे प्रतिपादन लेखक करतात. मध्य आशियातील टोळ्या, इस्लामी आक्रमक यांनी तलवारीच्या जोरावर भारतात सत्ता प्रस्थापित केली. ही मंडळी मुळातच शुष्क भागातून आली होती. त्यामुळे मुबलक पाणी, सुपीक जमीन, जलसंस्कृती, तिच्या प्रती असलेली श्रध्दा यांच्याशी त्यांना देणे - घेणे नव्हते. हा अंमल सुमारे चारशे वर्षे कायम होता. या काळात भारतातील नदीमातृक संस्कृतीला जबरदस्त धक्का बसला. त्यात सततचे दुष्काळ, बाजारपेठेतील मंदी याची भरच पडली.
पाठोपाठ इंग्रजांनी सत्ता ताब्यात घेतली. त्यांचे तत्व होते - निसर्गाला वाकवण्याचे आणि त्याच्यावर विजय मिळवण्याचे. लोकसंख्या वाढ तसेच, औद्योगिक क्रांतीनंतर कच्च्या मालाची गरज वाढत असतांना त्यांनीही नद्यांचे शोषण करणे सुरूच ठेवले. नद्यांवर धरणे बांधून सिंचनाची व्यवस्था केली. त्यामागे कारण होते - त्यांनी हवा असलेला कच्चा माल निर्माण करणे. हे करतांना पिकांचे नैसर्गिक निवडीचे तत्व नाकारले गेले. आपल्याला काय हवे हे निसर्ग ठरवत नव्हता किंवा स्थानिक लोकांची गरज ही ठरवत नव्हती, तर बाजारपेठ ठरवत होती. येथेच घोळ झाला. पुढेही स्वातंत्र्यानंतर औद्योगिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. हे धोरण, वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण यामुळे पाण्याची गरज वाढली. मोठी धरणे आली, नद्यांचे प्रवाह अडले. त्यांच्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या - लहान प्रवाह कोरडे पडले, भूजल - वाळू यांचा अतिउपसा झाला, कृषि उत्पादन वाढवण्यासाठी पीक रचना बदलली, नगदी पिके आली... नदयांच्या दुष्टचक्राबाबत कारणमीमांसा करतांना लेखक दोन गोष्टींना दोष देतात -
1. शुष्क भागातून आलेले आक्रमक राज्यकर्ते आणि
2. इंग्रजांचे धरणे बांधून सिंचन व्यवस्था करण्याचे धोरण (त्यामुळे पीकपध्दती बदलली. पाण्याची गरज वाढली आणि नद्यांचे शोषण सुरू झाले)
अशा प्रकारे नदीचे शोषण होत राहिले. तिच्याशी असलेले नाते केव्हाच माग पडले. नदीशी असलेले नाते संपलेले असतानाच नागरीकरण औद्योगिकरण वाढले. त्यांनी पाण्याची प्रचंड प्रमाणात गरज निर्माण झाली. त्यामुळे नद्यांचे - भूजलाचे शोषण वाढले. त्याचबरोबर शहरे - उद्योग यांच्यामुळे निर्माण झालेले सांडपाणी नद्यांमध्ये मिसळत राहिले. त्यामुळे नद्या समस्यांपासून मुक्त असत्या तरच नवल !.... भारताप्रमाणेच जगभरातील बहुतांश देशांमध्येही अशीच स्थित्यंतरे झाली. एकूणच जगाचा विचार केला, तर त्या पातळीवरही दोन गट होते - जलजन्य संस्कृती आणि उद्योगजन्य संस्कृती. औद्योगिक क्रांतीपर्यंत जगात जलजन्य संस्कृतीचा प्रभाव होता. त्याची जागा पुढे उद्योगजन्य संस्कृतीने घेतली. विज्ञान - तंत्रज्ञानामुळे पाणी सहज उपलब्ध होवू लागले. परिणामी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. जगभरातील नद्यांच्या समस्यांचे हेच प्रमुख कारण आहे. नद्यांच्या अनुषंघाने संपूर्ण पर्यावरणाच्या समस्यांच्या मुळाशी हीच कारणे आहेत.... डॉ. मोरवंचीकर यांच्या या मांडणीमुळे नद्यांच्या / पर्यावरणाच्या समस्यांचा आतापर्यंतचा संपूर्ण पट उभा राहतो.
या प्रमुख मांडणीसोबतच देशातील नद्या, धरणे, त्यांची माहिती, वैशिष्ट्ये, त्यांचा इतिहास - भूगोल, नद्यांशी जोडल्या गेलेल्या रंजक कथा, त्यांची सद्यस्थिती, बदललेली जैवविविधता आणि सोबत डॉ. मोरवंचीकर यांची त्यावरची टिप्पणी या पुस्तकात वाचायला मिळते. काही उदाहरणे हलवून सोडतात, तर काही सद्यस्थितीच्या भीषणतेचे वर्णन करतात. उज्जैनच्या क्षिप्रा नदीचे असेच एक उदाहरण. तिच्या काठावर कुंभमेळा भरतो. कुंभमेळा म्हणजे नद्यांना आपण किती पवित्र मानतो याचे प्रतिक, पण आता या क्षिप्रेचे इतके शोषण झाले आहे की काठावर कुंभमेळा असतानासुध्दा पात्रात नर्मदेचे पाणी आणून सोडावे लागते.
असेच मध्ये आशियातील अबुदर्यास, सिरदर्या नद्यांच्या बाबत घडले. या नद्या ताजिकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकीस्तान. तुर्कमेनिस्तान या देशांमधून वाहतात आणि अरल समुद्राला जावून मिळतात. त्यांच्या खोऱ्यात प्राचीन काळी समृध्द संस्कृती नांदली. पण नंतर चित्र पालटले. या नद्या पूर्वीच्या सोव्हिएट रशियाचा भाग होता. तेव्हा या नद्यांचा वापर राजकीय कारणासाठीच झाला. त्यांच्या खोऱ्यात विविध टोळ्या होत्या. पशुपालन, मासेमारी हा त्यांचा व्यवसाय होता. मात्र, सोव्हिएटने अमेरिकेला शह देण्यासाठी या खोऱ्यात कापूस उत्पादनचा घाट घातला. त्यासाठी या दोन नद्यांवर मोठी धरणे बांधून पाणी तिकडे वळवले. स्थानिकांची हकालपट्टी केली. ते देशोधडीला लागले. नद्यांच्या पाण्याचे इतके शोषण झाले की, त्या समुद्रापर्यंत पोहोचेनाशा झाल्या. हवामानातील बदल झाला. हे कितीतरी वर्षे सुरू राहिल्यामुळे अरल समुद्रही आटू लागला. या खोऱ्याचे वाळवंटीकरण झाले.... असेच काही प्रमाणात सिंधू नदीच्या बाबतीत होणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
याचबरोबर प्रमुख नद्यांच्या सध्याच्या समस्या, त्याबाबतचे काही वास्तव या पुस्तकाद्वारे समोर येते. अशा अनेक गोष्टी उलगडत गेल्यामुळे नद्यांचे विविध पैलू आणि समस्यांवर प्रकाश पडत असल्याने पुस्तक रंजक बनले आहे.
या पुस्तकात माहिती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, तिची रचना व मांडणी अधिक सूत्रबध्द पध्दतीने करता आली असती. ती विस्कळीत व विखुरलेली वाटते. काही उदाहरणे पुन्हा पुन्हा समोर येतात. त्यामुळे माहिती मिळते, पण ती फारशी प्रवाही वाटत नाही. नद्यांच्या आजच्या समस्यांबाबत वाचतांनाही काहीसा असाच अनुभव येतो... पण एकूणच हे पुस्तक आपला नद्यांबाबतचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करते. त्यामुळे नद्यांबाबत जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे... वाचणे ही सुरूवात झाली. पुढे नद्यांबाबत चिंतन आणि काही कार्यवाही व्हायला हवी. लेखक डॉ. मोरवंचीकर यांनी एवढी मेहमत घेतली आहे ती याच अपेक्षेने !
पुस्तक - शुष्क नद्यांचे आक्रोश
लेखक - डॉ. रा.श्री. मोरवंचीकर
सुमेरू प्रकाशन, डोंबिवली (पूर्व)
पृष्ठ संख्या - 352
किंमत - 500 रूपये
श्री. अभिजीत घोरपडे, पुणे, मो : 9822840436, abhighorpade@gmail.com