यावर्षी काही भागात बऱ्यापैकी पाऊस आहे. तर काही भागातील बांध बंधारे मोठमोठे प्रकल्प, धरण मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. गतवर्षाचे साठे काही धरणात आहेत. मात्र खूप कमी पाणी अशा धरणात आहे. या कमी असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन आजच करावयास हवे. जेथे भरपूर पाणी आहे, अशा धरणात ते पाणी साठवून ठेवण्याचे नियोजन हवे. या साठवलेल्या पाण्याची गरज उन्हाळ्यात फार महत्वाची असेल.
भारतातील पाऊस परतला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाने सर्वच शहारले आहेत. पण कुणाला याची चिंता नाही. यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. संपूर्ण भारताला या अपूऱ्या पावसाचा फटका बसलेला आहे. खरीप हंगामासाठी जेवढा पाऊस पाहिजे होता तो न झाल्याने खरीपाच्या हंगामातील पिकांचे उत्पादन प्रमाण घटणार यात शंका नाही. संपूर्ण देशाला धान्य पुरविणारे धान्याचे कोठार असलेले राज्य यांनाही यावर्षाच्या पावसाने फार मोठा फटका दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आजपासूनच निर्माण झालेली आहे. रब्बी पिकांसाठी पाणी कसे मिळणार ? पिण्याच्या पाण्यासाठी योग्य व परिणामकारक नियोजन करण्याची नितांत गरज आहे. आज नियोजन केले नाही तर उद्या विभिन्न समस्या, प्रश्न व अडचणी निर्माण होतील यात शंका नाही.
पाणी हे जीवन आहे. पाणी आत्मा आहे. पाणी संपूर्ण सजीव सृष्टीचे प्राण आहे. पाण्याशिवाय सजीव सृष्टीची कल्पनाच व्यर्थ ! मग असे असतांना आम्ही भारतीय पाण्याच्या वापराबाबत निष्काळजी का ? अजूनही आम्हाला पाण्याचे महत्व का बरे समजलेले नाही ? आम्ही पाण्याच्या उपयुक्ततेबद्दल अनास्था बाळगत आहोत? असे विविध प्रश्न भेडसावणार यांत शंका नाही. जगातील इतर देश वेळीच सावध झालेले आहेत. त्यांनी पाण्याच्या मर्यादित वापराचा अवलंब केलेला आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी या सर्व प्रणालींसाठी नियोजन बध्द आखणी करून पश्चिमात्यांनी पाण्याची काटकसर करायला सुरूवात केलेली आहे. आज त्यांच्या नियोजनबध्द अंमलबजावणीमुळे पाण्याची फार मोठी बचत पाश्चिमात्य करीत आहेत.
पश्चिमात्यांना जंगलाचे, वृक्षांचे, डोंगर, टेकड्यांचे महत्व ही आता समजले आहे. त्यामुळे ते वृक्ष, जंगल, डोंगर दऱ्या संवर्धन मोठ्या प्रमाणात करीत आहेत. निसर्गाचा लहरीपणा त्यांना जाणवत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर त्यांनी यशस्वीपणे मात केलेली आहे. भारतात मात्र याच्या अगदी विरूध्द क्रिया घडत आहेत. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा वाढत आहे. निसर्गाची मोठ्या प्रमाणातील मानवाद्वारे होणारी तोड फोड वाढत आहे. सिमेंटची जंगले वाढ वृक्षांची प्रचंड प्रमाणातील तोड व पाण्याचा गैर वापर, वाळू उपसा, डोंगर दऱ्यांचे सपाटीकरण या बाबी अतिशय गंभीर आहेत. या बाबी थांबल्या नाहीत तर देशासमोर फार मोठे संकट उभे राहणार यात सर्वात घातक संकट असेल तर पाण्याची गंभीर समस्या होय.
निसर्गाच्या चक्रात बदल झाले असे नेहमी ऐकावयास मिळत आहे. परंतु निसर्ग चक्र बदलण्यास कारणीभूत मानवच आहे. आपल्या स्वार्थासाठी व भल्यासाठी निसर्ग नियमांना डावलून मानवाने निसर्गाचे हनन चालविले आहे. म्हणून एक एक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पाणी ही आमची फार मोठी जलसंपत्ती आहे. पण या जलसंपत्ती गैर वापराने सीमा गाठलेली आहे. हा गैर वापर त्वरित थांबावा यासाठी खालील काही प्रयत्न केल्यास जल संकटाची तीव्रता कमी होवू शकते. मात्र हे प्रयत्न सर्वकष सातत्यपूर्ण व अंमलात काटेकोरपणे असणारे असावेत.
यावर्षी काही भागात बऱ्यापैकी पाऊस आहे. तर काही भागातील बांध बंधारे मोठमोठे प्रकल्प, धरण मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. गतवर्षाचे साठे काही धरणात आहेत. मात्र खूप कमी पाणी अशा धरणात आहे. या कमी असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन आजच करावयास हवे. जेथे भरपूर पाणी आहे, अशा धरणात ते पाणी साठवून ठेवण्याचे नियोजन हवे. या साठवलेल्या पाण्याची गरज उन्हाळ्यात फार महत्वाची असेल. तीन महिन्यानंतर कडक उन्हाळा असेल आणि या उन्हाळ्यात सर्वात गंभीर व भयानक समस्या म्हणजे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची असेल. सध्या राजकीय मंडळींना वेळ नाही. मात्र प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी धरणातील, तलावातील पाणी वापराचे व उन्हाळ्यात पिण्याचे पाणी किती लागेल याचे नियोजन आताच करायला हवे, उद्या खूप उशीर झालेला असेल.
दरवर्षी राज्यात कित्येक ठिकाणी जलवाहिन्या फोडून टाकण्यात येतात. याकडे बरेच संबंधित दुर्लक्ष करतात. मात्र यापुढे जलवाहिनी फोडणे, त्यातून पाण्याची चोरी करणे किंवा पाणी वाया घालविणे हे प्रकार होवू नये यासाठी दक्षता पथक नेमावे. जलवाहिनी फोडणाऱ्यांना कडक शिक्षा करा व पाणी वाचवा. जलवाहिन्या बऱ्याच ठिकाणी लीक होत असतात, हजारो लिटर पाणी या लिकेजच्या मार्गे वाहून जाते. कित्येक महिने - कित्येक वर्षे ही प्रक्रिया चालू रहाते. मात्र याकडे कुणीही लक्ष देत नाही. आता असे करू नका. जल वाहिन्याचे लिकेज काटेकोरपणे काढा. पाण्याचा थेंब - थेंब वाचविण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावे व पाण्याची बचत करावी.
शहरातील गल्लो गल्ली व अनेक मोठ्या रस्त्यावरील भूगर्भात असलेले पाण्याचे पाईप लिक होत असतात. यातून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहते. मात्र पालिका किंवा महानगर पालिका याकडे लक्ष देत नाही. आता मात्र असे चालणार नाही. लिकेज पथक प्रत्येक ग्रामपंचायत नगर पालिका व महानगरपालिकेने नेमावे व कुठेही पाईप लाईन मधून लिकेज होणार नाही याची खबरदारी घ्यावी व पाण्याची बचत करावी.
कित्येक शहरात घरासमोर नळ असतात, या नळांना वीजेची मोटार लावून पाणी भरले जाते. मात्र पाणी भरणे झाल्यावर मोटर काढून घेतल्या जाते. अशा समयी त्या नळाला तोटी नसल्यामुळे पाणी वाया जाते. अशा बाबी होवू नये, नळांना तोट्या लावा मोहीम आखून पाणी वाचवता येवू शकते व पाण्याची बचत होवू शकते.
नवीन बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी हे विहीरीचे असावे, नदीतील असावे मात्र नळाचे नसावे. हे पाणी सुध्दा वापरतांना त्यासाठी प्रमाण असावे, कसेही वापर करणे हे चूक आहे. वाहने धुण्यासाठीही भरपूर पाणी वापरले जाते व पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जातो. वाहने पुसून काढणे हा मार्ग काढावा व पाण्याची बचत करावी, पाण्याची काटकसर सर्वांनी करायलाच हवी.
भांडे व कपडे धुणे याचे पाणी साठवून ते अंगणातील सड्यासाठी वापरता येवू शकते तसेच हे पाणी अंगणातील झाडा वेलींनाही वापरता येवू शकते. तसेच आंघोळीचे पाणी सुध्दा साठवून त्याचा उपयोग फरशी पुसणे, सडा टाकणे यासाठी करता येवू शकतो. पिण्याचे पाणी घेतांना जेवढे आवश्यक तेवढेच घ्या. जास्तीचे पाणी घेवून राहिलेले पाणी फेकून द्यावे लागू नये म्हणून तांब्या व फुलपात्राचा वापर करा. पाण्याची निश्चित बचत होईल.
हॉटेल्स मध्ये वापरले जाणारे पाणी खूप वाया जाते. यासाठी ग्राहकांना पाणी देतांना पाणी आवश्यक तेवढेच वापरण्याच्या सूचना देणे. छोटा जग व रिकामे ग्लास देणे योग्य आहे. या बाबी कटाक्षाने सर्वांनी पाळाव्यात व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. भविष्यातील येणारी आपत्ती जल संकट असेल यासाठी आजच आम्ही जागृकपणे पाणी वापरात काटकसर करून पाणी वापरात दक्ष राहिल्यास भविष्यात आम्हाला पाण्याची चणचण भासणार नाही एवढे निश्चित.
श्री. धोंडीराम राजपूत, वैजापूर - मो : 9421312244