आपण अध्यापन करीत असलेल्या पाठ्यपुस्तकात 'पाणी' या विषयाशी निगडीत आशय लक्षात घेवून जाणीवपूर्वक 'जलसंस्कार' विद्यार्थ्यांना द्यावे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जलसाक्षरतेचा धागा पकडून विद्यार्थ्यांना 'पाण्याचे' महत्व लक्षात आणून देण्यासाठी काही पाठांची रचना केली आहे.
जलमेव जीवनम्, पाणी हेच जीवन. सध्या कोणतेही वर्तमानपत्र हातात घेतले की, मान्सून केरळमध्ये दाखल, मान्सूनचा अल्पविराम, महाराष्ट्रात दुष्काळ, दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या, पाणी टंचाई मुळे माथेरानमधील हॉटेल बंद अशा आशयाच्या बातम्या वाचायला मिळतात. विशेष म्हणजे या सर्व बातम्या 'पाण्याशी' निगडीत आहेत. याचाच अर्थ असा की, पाण्याला 'जीवन' का म्हटले जाते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मानवजातीच्या उदयानंतर मानवाच्या अस्तित्वासाठी पाण्याने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. सर्वच सजीवांना जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. समुद्र, नद्या, तलाव, झरे, इत्यादी स्वरूपात आपल्याला पाणी उपलब्ध होते. पाऊस हा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे.
हवेच्या खालोखाल ज्या घटकाची सर्वात जास्त गरज सजीवांना भासते, त्यात पाण्याचा समावेश होतो. पाणी हे मानवी संस्कृती निर्माण करणारे आणि समृध्द करणारे तत्व आहे. म्हणूनच पाण्याचे 'प्रदूषण' म्हणजे मानवी 'संस्कृती' प्रदूषित करण्यासारखे आहे. पावसाचे पाणी योग्य पध्दतीने साठवून त्याचा काटेकोर वापर करणे भावी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच सर्व पातळीवर जलसाक्षरता मोहीम जोमाने सुरू होणे आवश्यक आहे.
शालेय जीवनापासूनच जलसंस्कारांची सुरूवात व्हावी. कारण बालपणात झालेले संस्कार आपल्या अखेर पर्यंत टिकून असतात. शाळा - महाविद्यालयीन जीवनात 'जलसाक्षरतेचे संस्कार' विद्यार्थी मनावर झाल्यास देशाचा भावी काळ पाण्याच्या बाबतीत उज्वल असेल, यात शंका नाही. त्याचा आणखी एक फायदा होवू शकेल, की हेच विद्यार्थी घरघरांत 'जलदूत' म्हणून कार्यरत होतील. घरातील मोठ्यांकडून पाणी वापराबाबत होणाऱ्या चुकांना प्रतिबंध करतील. याच अनुषंगाने जलसंस्काराची जबाबदारी शाळा महाविद्यालयात कार्यरत अध्यापकांवर येते. शिक्षक विद्यादानाचे अत्यंत पवित्र कार्य, प्रामाणिकपणे करीत असतात. असे करीत असताना पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांना सजग करून 'पाणी बचतीचे संस्कार' विद्यार्थ्यांवर झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना या समस्येबद्दल विचार प्रवृत्त करून 'कृतीप्रवण' बनविण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांची इतर कोणाहीपेक्षा शिक्षकांवर नितांत श्रध्दा असते, त्या विश्वासाचा लाभ आपण या सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करावा.
आपण अध्यापन करीत असलेल्या पाठ्यपुस्तकात 'पाणी' या विषयाशी निगडीत आशय लक्षात घेवून जाणीवपूर्वक 'जलसंस्कार' विद्यार्थ्यांना द्यावे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जलसाक्षरतेचा धागा पकडून विद्यार्थ्यांना 'पाण्याचे' महत्व लक्षात आणून देण्यासाठी काही पाठांची रचना केली आहे.
इयत्ता सातवी 'मराठी बालभारती' या पुस्तकात पावसात खंडाळा (कविता) ही शांता शेळके यांची कविता अध्ययनासाठी दिली आहे. त्यात पावसाळ्यातील सुंदर निसर्गवर्णन दिले आहे. पावसाचे महत्व मानवी जीवनात सांगून पावसाबाबत सध्या अनियमितपणा का निर्माण झाला याची चर्चा करून 'पाणी - पर्यावरण' रक्षणाचे संस्कार विद्यार्थ्यांवर करता येईल. बोली भाषेतील बहिणाबाई चौधरी यांची 'धरतीच्या कुशीमधी' ही एक गेय कविता आहे. सुजलाम् - सुफलाम् धरतीसाठी पावसाचे - पाण्याचे महत्व यातून विषद करता येईल. परंतु आपण पाण्याचे योग्य नियोजन, वापर करीत नसल्यामुळे काय नुकसान होत आहे, या बद्दल विद्यार्थ्यांत जागृती निर्माण करता येईल. 'माणसांनी छळले नदीला (पाठ - गद्य) - ष.त्र्य पाटील' यांतून पाण्यावर माणसाचे जीवन अवलंबून आहे. म्हणून पाणी दूषित न करता जपून वापरावे हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना देता येतो. 26 जुलै 2005 ला मुंबई महानगराला महापुराचा फटका बसला आणि मिठी नदी चर्चेत आली. त्याबाबत महापुराची ही आपत्ती निसर्गनिर्मित की मानवनिर्मित अशा आशयाचा पाठ विद्यार्थ्यांना विचार करावयास लावणारा आहे. यातून आपापल्या शहरातही अशी आपत्ती येवू शकते, ह्याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देता येईल.'रक्षण पर्यावरणाचे' यातून ऐतिहासिक पाण्याचे स्त्रोत, नदी, तलाव, विहीरी यांचे जतन आवश्यक असल्याचे पटवून दिले आहे.
इयत्ता आठवी - 'मराठी बालभारती' यांत या आशयाचे गद्य - पद्य तुलनेने कमी आहेत. ' हिरवळ आणिक पाणी' ही बा.भ.बोरकरांची कविता निसर्ग आपला मित्र आहे. असा संस्कार यांतून देता येतो.
सेनापती बापटांची 'हा देश माझा' ही असाच संदेश देणारी कविता आहे. उंच हिमालय, सागर, नद्या, वा भूमी असो, या सर्वांचे रक्षण करणे, एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी आहे, असा संदेश या कवितेतून विद्यार्थ्यांना देता येईल. सकाळच्या वेळेचे निसर्ग सौंदर्याचे वर्णन सकाळ मधून कवियित्री पद्मावती यांनी केले आहे. परंतु शहरांमधून अशी सकाळ का अनुभवता येत नाही ? त्याची कारणे कोणती? अशी चर्चा करून पाणी - पर्यावरण रक्षणाचे संस्कार विद्यार्थ्यांवर करता येतील.
'मराठी कुमारभारती' या नववीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांचा वयोगट आणि समज लक्षात घेवून जलसंरक्षणात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग करून घेता येईल. कवी अजय कांडर यांच्या 'बाया पाण्याशीच बोलतात' ही कविता महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वर्णन करणारी आहे. पाण्याच्या शोधात असणाऱ्या दुष्काळग्रस्त स्त्रियांची भावस्थिती या कवितेतून कवीने मांडली आहे. आपण पाण्याचा योग्य वापर केला नाही तर अशीच वेळ आपल्यावरही येईल असे विद्यार्थ्यांना सांगता येईल. कडक उन्हाळ्यात अशी परिस्थिती का निर्माण होते ? पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी साठवले जाते का ? त्यावर काय उपाय करता येतील ? यातून ' पाणी बचतीचे ' विविध उपाय चर्चेतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील. उन सावलीच्या श्रावण - (गद्यपाठ) - आसाराम लोमटे यांत निसर्गातील पानाफुलांचा बहर, पावसा - पाण्याचा खळखळाट इत्यादींचे वर्णन लेखकाने केले आहे. 'निसर्ग - पाणी' यांचा सहसंबंध लक्षात आणून देवून पाण्याचे महत्व सांगता येईल. कृष्णाकाठच्या आठवणीतून यशवंतराव चव्हाणांनी कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमाचे दर्शन या पाठातून घडविले आहे. नद्यांमुळे संस्कृतीचं वैभव जपले जाते. परंतु आज मात्र नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. का ? कोणामुळे? याची चर्चा करून याला जबाबदार कोण ? हे विद्यार्थ्यांना प्रभाविपणे सांगता येईल,. स्थूलवाचनातील श.के.सहस्त्रबुध्दे यांनी ' जलप्रदूषणाची' नाट्यातून मीमांसा केली आहे. त्यातून सर्वच शंकांना उत्तरे लेखकाने दिली आहेत. जल - दूषित झाल्याचे दुष्परिणाम लक्षात येतात. आपल्या परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांना भेटी देवून त्यांची सद्यस्थिती कशी आहे ? याचा आढावा घेता येईल.
इयत्त दहावीच्या ' मराठी कुमारभारती' या पुस्तकातून ही जलसंस्कार होणारे विविध पाठ देण्यात आले आहेत. मल्हाराची धून (कविता) - संगीता बर्वे - निसर्गाचे विविध विभ्रम शब्दांत मांडण्याचा प्रयत्न कवियत्रिने केला आहे. यातून पावसाचे पाणी साठविण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देता येईल. लेखक नागनाथ कोत्तापल्ले 'पाठ फिरवणारा पाऊस' मधून पूर्वीच्या काळातील पाऊस व आताचा पाऊस यांची तुलना करून विचार प्रवृत्त केले आहे. विद्यार्थ्यांना विचाराला चालना देणारा हा पाठ आहे. पावसाची अनियमितता का निर्माण झाली ? भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी शोधत का फिरावे लागते ? याबद्दल विद्यार्थ्यांना चर्चेतून माहिती देता येईल. अलिकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. त्याचे चिंतन करण्याचा प्रयत्न लेखक राजन गवस यांनी 'चिमण्या' या पाठातून केला आहे. संवेदनशील मनाच्या विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा हा पाठ आहे. पर्यावरणाचा 'कणा' म्हणून पाण्याचा विचार केला जातो. पशु व पक्ष्यांची निवासस्थाने धोक्यात आली आहेत. याची कारणे देवून पर्यावरण रक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना या मागच्या आधारे पटवून देता येतील.
इतर देशांच्या तुलनेने आपल्या भारतात मुबलक पाणी साठा आहे. अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत नद्यांचे जाळे देशभर पसरले आहे. परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवतो.
आपल्या अवती भवती असलेल्या पाणी साठ्यांना अथवा विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित कराव्यात. सध्या त्यांची स्थिती कशी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी. आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. परंतु प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात.
वर्तमानपत्रात रोज जल वापरा बाबत विविध लेख छापून येतात. त्यांचे वाचन वर्गात करावे. राजस्थान - राजेंद्रसिंह यांनी पाण्याच्या पारंपारिक स्त्रोतांचे पुनरूज्जीवन करून जलक्रांती घडवली हे विद्यार्थ्यांना सांगावे. योग्य जलनियोजनामुळे इस्त्राईल हा देश शेती उत्पादनात अग्रेसर आहे, त्याची माहिती द्यावी. आपल्या परिसरातील इतर जलतज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करावे.
सर्व प्रथम चूक करून ती सुधारण्याऐवजी चुक होवूच नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना जागरूक करणे आवश्यक आहे. तसेच स्वत: आणि इतरांना जागरूक राहण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
अजूनतरी प्रयोग शाळेत 'कृत्रिम पाणी' तयार होवू शकलेले नाही. त्यामुळे सध्यातरी पाण्याला पर्याय उपलब्ध नाही. सावधान.... ! पाण्याचे संरक्षण, संवर्धन ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.
शैलेश पाटोळे, नाशिक - मो : 9270770911