स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठीत असा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार-२०१७ या वर्षी जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांना दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या १५ व्या स्मृतीदिनी एका विशेष सोहळ्यात औरंगाबाद येथे संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री भुजंगराव कुलकर्णी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सदर सोहळा औरंगाबाद येथे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील ललीत कला अकादमीच्या सभागृहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सु.भि.वराडे हे अध्यक्षस्थानी होते.
या सन्मान सोहळ्यास प्रतिष्ठित मान्यवरांची विशेषाने उपस्थिती लाभली होती. यात आ. न्यायमुर्ती श्री नरेंद्र चपळगावकर, श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दिनकरराव बोरीकर, श्री विजय दिवाण, उद्योजक श्री राम भोगले, श्री बाबा भांड, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री एस.ए.नागरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर विशेषाने उपस्थित होते. या प्रसंगी सौ. विजयाताई चितळे यांनाही सत्काराने आभुषित करण्यात आले. या प्रसंगी अधिकारी श्री भुजंगराव कुलकर्णी यांनी डॉ. माधवराव चितळे यांचेविषयी आपले हृदगत व्यक्त करतांना अनेक गौरवशाली आठवणींना उजाळा दिला.
या सत्कार समारंभानिमित्त डॉ. माधवराव चितळे यांचे मराठवाड्याच्या भविष्यकालीन विकास वाटा या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्रात समावेश झाल्यापासून नेमके काय झाले आणि पुढे काय केले तर आवश्यक विकास साधणार आहे, हे त्यांनी मार्मिक शब्दात उदाहरणे, आकडेवारीसह आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले. त्याच्या व्याख्यानातील काही ठळक मुद्दे येथे जलसंवादच्या वाचकांसाठी थोडक्यात अधोरेखित करीत आहे.
लिलावती या गणित क्षेत्रातल्या पहील्या ज्ञात असलेल्या गणितज्ञ महिला या मराठवाड्यातील असल्याची आठवण करून देत तसेच अजिंठा-वेरूळ, राष्ट्रककुटकाळ ही गौरवशाली परंपरेची मराठवाड्यास लाभलेली प्रतिके आहेत ज्यांचे आपण वारसदार आहोत, हे त्यांनी लक्षात आणून दिले.
मराठवाड्यातील सद्य:स्थिती विषद करतांना ते म्हणाले की आपण आता एका गतीशिल आणि सुदैवाने परिवर्तनशिलतेला अनुकुल असलेल्या मानसिक अवस्थेत आहोत. नव्या आधुनिक युगातील ही गतिशिलता अंगिकृत करीत असतांना प्रगतिची आपली गती वाढवत कशी ठेवायची हे आपल्याला शोधायला लागणार आहे. काही गोष्टीत तुलनेने आपण मागे असलो तरी आपण मागासलेलो नाहीत असे ठाम प्रतिपादन त्यांना केले. आपल्याकडे व्हिडीओकॉन, बजाज सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत आणि गतीने आणि उत्साहानी त्या काम करताहेत. असे असतांना काही लोकांच्या मनात आपण मागसलेले आहोत असा किंतू का येतो ? असा प्रश्न त्यांनी केला. त्यामुळे या पुढच्या काळात भविष्याची वाटचाल करतांना ज्या काही गोष्टी आपण प्राथम्याने करायला पाहिजेत त्यात मागासलेले या शब्दाला आपण कायमचा निरोप द्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले.
आपल्याला मानव निर्मित व्यवस्थांना लागणारी कुशलता, आधुनिक व्यवस्था आत्मसात करणारा समाज निर्माण करायचा आहे. मराठवाड्यातील समाज ते कसा हस्तगत करतो हे पाहिले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
गतिशिल काळातून आपण जात असलो तरी काही क्षेत्रे ही तुलनेने मागे आहेत. मराठवाड्यापुरते जर पाहिले तर रेल्वे व्यवस्थेचे अपुरेपण ही भविष्यातली विकासाची आपली मोठी अडचण आहे. रेल्वेमधून वाहतुकीचा खर्च हा मोटार / बस यांच्या पेक्षा अत्यंत अल्प असल्यामुळे आपल्या पुढच्या समृध्दीचा पाया मजबूत करण्यासाठी आपल्याला रेल्वे विस्तार करणे आवश्यक ठरणार आहे. ज्या प्रमाणात संचार व्यवस्था उत्तम त्या प्रमाणात आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था या अधिक परिणामकारक होतात. गोविंदभाई आज असते तर त्यांनी रेल्वे विस्ताराचे नेतृत्व केले असते. पण त्यांच्या नंतर ते आपण करू शकलो नाही. या क्षेत्रात आपली रेल्वे चळवळ कीती सबळ आहे याचा आपण जरूर विचार करायला हवा. रेल्वे ही केंद्रीय व्यवस्था आहे. त्यातील गुंतवणूक वाढावयाला हवी. पुर्वी अनेक भागांमध्ये लोकांच्या गुंतवणुकीमुळे रेल्वेचे जाळे उभारले गेले आहे.
केवळ वाहतुक व्यवस्थाच नाही तर आवश्यक असणार्या अनेक व्यवस्थांमध्ये असे बदल स्वीकारण्याची आवश्यकता आहे. त्यांना भविष्यात गतिमान करण्यासाठी काय केले पाहिजे याचा आपण आढावा घेतला पाहिजे. त्यामुळे कमी लाभ देणार्या व्यवस्था अधिक लाभदायी कशा होतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
नव्या आधुनिक व्यवस्थांचा अंगिकार करून अनेक देश पुढे गेले आहेत. तथापि, विकास व्यवहाराची कौशल्ये कमी आहेत म्हणून आपल्या अनेक योजना रखडल्या आहेत. त्यादृष्टीने आपल्यायेथील कारखानदारीसाठी अपेक्षित कौशल्य विकास झालेला नाही. सर्वच घटक यात सहभागी नाहीत. आपल्या पूर्वजांची थोरवी गाऊन नव्हे तर त्यांच्या पुढे विचार, संशोधन करून प्रगती साधावी लागेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत काम करणार्या संस्थांनी एका ध्येयाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
केवळ शेतीच्या आधारावर देश समृध्द होत नाही - पुर्वीही कधी झाला नाही आणि आजही होत नाही. शेतीचा पाया बळकट करतांना इतर औद्योगिक वस्तुंची निर्मिती, मुल्यदायी प्रक्रीया ज्या समाजात जास्त होते तो समाज संपन्न होतो. यासाठी इस्राएल, ऑस्ट्रेलीया, स्पेन, मेक्सिको या देशांचे आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्याला लक्षात येईल की केवळ पाणी कमी म्हणून आपल्या विकास व्यवस्था अडलेल्या नाहीत तर सामाजिक व्यवहाराचं कौशल्य कमी आहे म्हणून त्या अडलेल्या आहेत. या दृष्टीनी चिंतन करायला पाहिजे.
मराठवाड्यात कुरणाचा प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे. तो दुग्धोत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इतिहासावर नजर टाकल्यास असे दिसेल की चंद्रगुप्ताच्या काळात कुरणांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सचिव नियुक्त असे. ऑस्ट्रेलीयासारख्या अनेक देशांनी कुरणांचा विशेष अभ्यास - संशोधन करून विकास घडवला आहे आणि आपली मोठ्या प्रमाणात भरभराट केली आहे. आज फलोत्पादन आणि दुग्ध व्यवसाय या क्षेत्रात विशेष काम करण्याची, संशोधन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. मराठवाड्याला ह्या दोन्ही क्षेत्रात अनुकुलता लाभली आहे.
जंतू प्रसार होण्याचा वेग मराठवाड्यात कमी आहे. त्यामुळे भाजीपाला निर्मितीसाठी हा प्रदेश उत्तम आहे.
सर्व शेतकरी सारखेच असे भावनीकरण बर्याचदा केले जाते. वेगवेगळ्या भागातील शेतकारी हा तेथील प्राकृतिकतेमुळे वेगवेगळा आहे, एक नव्हे. त्यामुळे प्रत्येकाचा विचार हा एकाच पध्दतीने करून चालणार नाही.
सरासरी निकष मानून आखलेल्या योजना मराठवाड्यात लागू पडणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. कारण या क्षेत्राचा विचलांक मोठा आहे. ४०० मिमी ते १२०० मिमी पावसाच्या या प्रदेशात स्थानिक गरजेनुसार आणि दुर्भिक्षात टिकणार्या वेगवेगळ्या व्यवस्थांची बांधणी करणे तसेच सामुहिक आणि संघटनात्मक पातळीवर टिकण्यासाठी संशोधन झाले तरच आवश्यक विकासाच्या दिशेने जाता येईल. बर्याच बाबतीत पुणे, मुंबई नाशिक या पाण्याच्या बाबतीत समृध्द प्रदेशाचा अनुभव असलेल्या लोकांनी नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली असतात. ती येथे जशीच्या तशी उपयोगी ठरणार नाहीत.
आपल्या देशावर पेट्रोलीयम आयातीचा फार मोठा ताण आहे. त्यातुन मुक्त होण्यासाठी सौर उर्जेचा वापर अधिकाधीक कसा आणता येईल, हे पाहिले पाहिजे. त्यादृष्टीने उस्मानाबाद सारख्या भागात सौर उर्जेवर आधारीत प्रकल्प उभारण्यास अत्यंत अनुकुलता आहे.
प्रत्येक विकास योजनेच्या कोणत्याही गोष्टीला नाठाळपणे विरोध करणारा एक वर्ग दुर्दैवाने आपल्या समाजात आहे. कधी पर्यावरणाच्या नावाखाली, कधी निसर्गाकडे परत जाण्याच्या नावाखाली आपण येऊ घातलेल्या नव्या योजनांना विरोध करणार असू किंवा त्यात कोलदंडे घालणार असू तर आपली जी १० टक्के प्रगती करण्याची आकांक्षा आहे तिला खीळ बसणार आहे.
मराठवाडा कृषीप्रधान व्यवस्थेवर आधारित आहे हा गैरसमज आहे. कारण येथे १३ टक्केच जमिन शेतीसाठी अनुकुल आहे. ६४ टक्के जमिन गवताळ विकासासाठी अनुकुल आहे, तर २२ टक्के जमिन शेतीसाठी अनुकुल नाही. ही भौगोलिक अवस्था नजरेसमोर ठेऊन आपल्याला वेगळ्या व्यवसायांची, रोजगारांची, सामाजिक व्यवस्थेची मांडणी करायची आहे. पण ती करतांना इतर ठिकाणी काय झाले याचे अनुकरण न करता आपल्यासाठी काय सुयोग्य आहे ते स्वत: शोधावे लागेल, स्वयंभू व्हायला लागेल. येथे विकासाच्या दृष्टीने अनुकुल वातावरण आहेच, परंतु क्षमताही आहे.
आजही ९० टक्के लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. प्रत्येकाला निर्मळ पाणी कसे मिळेल हा खरेतर चिंतेचा विषय असला पाहिजे.
नव्या आधुनिक व्यवस्थेत टिकण्यासाठी प्रत्येक देश एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. आता आपण आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपल्याला येत्या काळात १० टक्के विकासदर साधायचा असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. चीन हा वेगळ्या बाबतीत प्रगती करतो आहे. तो आपला स्पर्धक देश आहे. त्यानी केलेल्या विकासाच्या बाबीची तुलना नेहेमी होत असते. पण चीनमधे बुलेट ट्रेन आता दैनंदिन व्यवहाराचा भाग आहे. ती येथे आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाद घालणे दुर्दैवाचा भाग आहे.
मराठवाड्यातील पाण्याची उकल करतांना डॉ. चितळे म्हणाले की अलिकडे गोदावरीच्या पाण्यावरून अकारण चिंता व्यक्त होते. गोदावरीवर अवलंबून असणारा भाग केवळ २०००० चौ.किमी आहे, तर ४८००० चौ.किमी प्रदेश गोदावरीवर अवलंबून नाही. या भागातील नद्यांचा उगमच बीड, उस्मानाबाद या अवर्षण प्रवण भागात आहे. गोदावरी शिवाय अन्य नद्यांचा विकासही गरजेचा असून पाणी वापराची नियमावलीही त्या प्रमाणे बदलावी लागेल.
इस्राएल हा आकाराने मराठवाड्याच्या १/३ देश आणि पाऊसमानही अत्यंत कमी. मात्र तेथे कृषी क्षेत्रात संशोधन करणार्या ८०० संस्था आहेत. आपल्याकडे तशी स्थिती नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेसारख्या अनेक संस्थांतून असे संशोधन कार्य मोठ्याप्रमाणावर होणे आवश्यक आहे.
पाण्याची कमतरता असल्याने पाणी पुन्हा पुन्हा शुध्दीकरण करून फेरवापर करून घेऊन अनेक देश पुढे गेले आहेत. त्यांचा अभ्यास करून आपणही प्रगती साध्य केली पाहिजे.
डॉ. माधवराव चितळे यांना प्रदान, दिनांक २१ नोव्हेंबर २०१७